गोंदिया,
दि.10 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील
अधिसूचित क्षेत्राकरिता अधिसूचित पिकाकरीता (पिक- भात) शेतकऱ्यांना पिक विमा
योजनेत भाग घेता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी
महेंद्र ठोकळे यांनी केले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे
नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात
सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. पिक पेरणी पासून काढणी
पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी
कारणामुळे पिक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल
मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाचा
विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे.
महत्वाच्या बाबी : या योजनेत भाग
घेण्यासाठी फार्मर नोंदणी क्रमांक व ई पिक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात
अधिसूचित पिके घेणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. ई पिक व विमा घेतलेले पिक यात
तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून
विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या
यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. मंजूर नुकसान भरपाई
अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टलवरून जमा करण्यात
येणार आहे.
गोंदिया जिल्ह्याकरिता नियुक्त केलेली
विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे आहे. जिल्ह्यातील खरीप
हंगाम भात पिकाकरीता विमा संरक्षित रक्कम रू.६००००/ असून विमा हप्ता दर रू. ६०.००
प्रती हेक्टर आहे.
शेतकऱ्याने आपला आधार नोंदणी क्रमांक,
७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पिक पेरणीचे स्वयंघोषणा पत्र घेऊन
प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरून सहभाग घ्यावा. याशिवाय कॉमन सर्विस
सेंटर (सीएससी) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा
www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या
क्षेत्रीय पातळीवर काम करणारे सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि
अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी यांचेशी
संपर्क साधावा.
0000000
No comments:
Post a Comment