जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 15 July 2026

अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावात केली परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची पाहणी

 




गोंदिया, दि.15 : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने परिसस्पर्श कुष्ठरोग तपासणी व जनजागृती मोहीम हार्ट टु रिच, हाय रिस्क व्हिलेज सर्वेक्षण बाबत दि.13 जुलै 2026 रोजी जिल्हास्तरीय चमुने अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावात परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची पाहणी केली.

            राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.10 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यात "परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान" राबविण्यात येत आहे. परीसस्पर्श कुष्ठरोग अभियातुन अतिजोखमीच्या व दुर्गम भागातील गावातील लोकांवर लक्ष ठेवुन तपासणी व जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय चमुत सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय, जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ.मुकेश येरपुडे व अभिषेक भलाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांचा समावेश होता.

जिल्हास्तरीय चमुने तालुक्यातील सिरोली, महागाव व अर्जुनी गावातील घरोघरी प्रत्यक्ष भेटी देवुन लोकांशी संवाद साधला. कुष्ठरोग आजाराबाबत जनमानसात असलेले भ्रामक अंधश्रद्धा, गैरसमजुती बाबत माहिती घेवुन लोकांना कुष्ठरोग आजाराबाबत मार्गदर्शन केले. गावात सुरु असलेले सर्वेक्षण पथकातील कर्मचारी यांचेसोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. नंतर जिल्हास्तरीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे भेट देवुन मोहिमेची पडताळणी केली. तसेच अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जावुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे यांचेशी चर्चा करुन तालुकास्तरीय परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाची माहिती घेतली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्नानुसार कुष्ठरोग मुक्त भारत अंतर्गत सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसार कमी करणे आहे. परीसस्पर्श कुष्ठरोग मोहिमेतुन संशयित कुष्ठरोग लक्षणे असलेले रुग्णांवर तपासणी करुन मोफत उपचार व समुपदेशन केले जाणार आहे. सदर मोहीम कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास कुठलेही लक्षण न लपवता खरी माहिती देवुन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.महेंद्र धनविजय यांनी केले आहे.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे हे परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाचा उद्देश असल्याची माहिती डॉ.महेंद्र धनविजय यांनी यावेळी दिली.

सदर भेटी दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार साखरे, तालुका आरोग्य सहायक सुरेश धुर्वे, पॅरा मेडिकल वर्कर विलास कारेवार, आरोग्य सहायक जे.एस.कत्तूरवार यांचेसह कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

                                                                     00000000

No comments:

Post a Comment