जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 27 July 2026

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे

 


गोंदिया, दि.27 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२६ असून जास्तीत जास्त पात्र अर्जदारांनी मुदतीचे आत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक यांनी केले आहे.

साहित्य, कला व संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणारे ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे निकषांची पूर्तता करणारे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतील. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहे. (दिव्यांगाना वयोमर्यादा ४० वर्ष). ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार.  केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज दि.३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने mahakalasanman.org या पोर्टलवर सादर करावेत. योजनेसाठी नोंदणी, अर्ज भरणे तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहे. अपलोड करण्यात आलेले अर्ज व आवश्यक कागदपत्र, संबंधीत पंचायत समितीकडे दोन प्रतित सादर करावेत.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  

                                                      0000000

No comments:

Post a Comment