जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 14 July 2026

निवृत्तीवेतन धारकांसाठी महा-उपलब्धी ॲप कार्यान्चित

 


       गोंदिया, दि.14 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेव कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित विविध माहिती व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन, वित्त विभाग संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महा-उपलब्धी हे मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे महा-उपलब्धी मोबाईल अॅप दि.1 जुलै 2026 पासून यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने डिजिटल महाराष्ट्र च्या दिशेने एक पाऊल समोर टाकले आहे.

         महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय, मुंबई शासन निर्णय दि.१६ जून २०१६ नुसार विकसित करण्यात आलेल्या या मोबाईल अॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

         या अॅपमध्ये मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, महागाई भत्त्याचा फरक, आयकर कपात दाखला (फॉर्म क्र.16), उत्पन्नाचा दाखला, तसेच निवृत्तीवेतन विषयक शासन निर्णय यांसारख्या महत्वाच्या वैय्यक्तिक तसेच शासनाच्या सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे संबंधितांना कोषागार कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रथम टप्प्यातील सुविधांमध्ये Single Digital Platform हा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सुविधेद्वारे वित्तीय वर्ष २०२४-२५ पासून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई अथवा संबंधित कोषागार कार्यालयामार्फत अदा करण्यात आलेल्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा सविस्तर तपशील पाहता येणार असून तो PDF स्वरूपात डाउनलोड व जतन करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

         या अॅपचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे निवृत्तीवेतनधारकांना Single Digital Platform वर सर्व सेवा उपलब्ध करून देणे, कोषागार व अधिदान कार्यालयातील प्रत्यक्ष भेटी कमी करणे, सुरक्षित व वापरण्यास सुलभ डिजिटल सेवा प्रदान करणे आणि निवृत्तीवेतनासंदर्भातील महत्त्वाच्या सुचना वेळेवर उपलब्ध करून देणे हे आहे.

         हे महा-उपलब्धी मोबाईल अॅप आपल्या मोबाईलच्या play store व Apple App Store (iOS) वर download साठी उपलब्ध आहे. महा-उपलब्धी अॅपच्या वापराबाबतची सविस्तर माहिती तेथे पाहता येणार आहे

        सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेऊन महा-उपलब्धी ॲपचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तौसिफ हसीन तसेच अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) समीर देशमुख यांनी केले आहे.

                                                                 0000000

No comments:

Post a Comment