जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 13 July 2026

सोशल मीडियावर एसआयआरबाबत बनावट संदेश निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण : ‘मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये’

 


        गोंदिया, दि.13 : सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सअॅपवर @ecisveep आणि @ceo_maharashtra यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची बाब समोर आली आहे. ‘SIR-2026’ प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचा दावा करत, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल, असा संदेश पसरवला जात आहे.

         मात्र, हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारचे कोणतेही संदेश अधिकृत नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

         निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदार यादीसंबंधित कोणतीही माहिती, पडताळणी किंवा कार्यवाही ही केवळ अधिकृत माध्यमांतूनच केली जाते. अनोळखी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याची आवश्यकता नसून, अशा संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे.

         नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास थेट अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांपासून सावध राहून केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000000

 

No comments:

Post a Comment