गोंदिया, दि.10 : महाकृषी ॲप हे राज्यातील
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह शासकीय ॲप आहे. या ॲपद्वारे शेतकरी
शासकीय योजनांची माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, किडरोग
नियंत्रण, माती परीक्षण आणि इतर अनेक सेवा घरबसल्या मोबाईलवरुन मिळवू शकतात.
त्यामुळे शेतीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते आणि उत्पादन वाढविण्यास मदत
होते.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि
वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र
व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढविणे शक्य असून शेती अधिक नफ्याची ठरू शकते.
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना
म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN). या योजनेअंतर्गत पात्र
शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
यामुळे शेतीच्या प्राथमिक गरजांसाठी आर्थिक मदत मिळते.
तसेच, पिक विमा योजना (PMFBY)
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नैसर्गिक आपत्ती, पावसाचे अनियमित प्रमाण
किंवा कीड-रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या
योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे.
माती परीक्षण व सेंद्रिय शेती याकडेही
शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. माती परीक्षण करून योग्य खतांचा वापर केल्यास
उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढते. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून
राहते तसेच बाजारात सेंद्रिय उत्पादनांना चांगली किंमत मिळते.
याशिवाय, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन
पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते. शासनाकडून यासाठी
अनुदान देखील दिले जाते.
कृषी प्रक्रिया उद्योग (PMFME योजना)
अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याची
संधी मिळते. यामुळे थेट बाजारपेठेत विक्री करून अधिक नफा मिळविता येतो.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी
शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी विभागाशी संपर्क साधावा तसेच ऑनलाइन नोंदणी पूर्ण
करावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित
बियाणे, जलसंधारण उपाय आणि बाजारपेठेची योग्य माहिती यांचा वापर केल्यास शेती
व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहून उद्योजक व्हावे असाच शासनाचा प्रयत्न
आहे.
*मोबाईलवर संबंधित सर्व ॲपचे अपडेशन आलेले असते, ते पाहून वेळोवेळी
महाकृषी ॲप ही अपडेट करावा.*
00000000
No comments:
Post a Comment