विशेष लेख...
नैसर्गिक
आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अशा शेतकऱ्यांच्या
कुटुंबावर उडवलेल्या संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा यासाठी गोपीनाथ मुंडे
शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान या विमा सुरक्षा योजनेचे कवच मिळत आहे.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दोन लक्ष रुपयाचे सानुग्रह अनुदान
दिले जाते. शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात
आलेल्या या योजनेमुळे नागपूर विभागात 703
कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला
आहे.
शेती हा निसर्गावर अवलंब असलेला
व्यवसाय आहे. शेतात काम करताना अनेकदा अनपेक्षित अपघात घडतात आणि कुटुंबाचा आधार
असलेली व्यक्ती संकटात सापडते, अशावेळी कुटुंबाची आर्थिक ओढाताण होऊ नये यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह
अनुदान योजना राज्यात लागू केली ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेमुळे
विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शेतकऱ्यांना ही योजना अत्यंत लाभदायी ठरत आहे.
शेती
कामात होणाऱ्या अपघात सर्पदंश, वीज पडणे किंवा वाहन अपघातासारख्या घटनांमुळे
शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो अशा संकट काळात संबंधित कुटुंबांना
सावरण्यासाठी कृषी विभागामार्फत ही सानुग्रह अनुदान योजना राबवली जात आहे. विशेष
म्हणजे ही योजना कायमस्वरूपी असून यासाठी शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील
कोणत्याही एका सदस्याचे नाव सातबारावर असणे आवश्यक आहे. या वर्षापासून शासनाने या
योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गोपीनाथ
मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये या वर्षात नागपूर विभागात
प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी 603 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तर 271
प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी 561 मृत्यू संदर्भात तर आठ
अपंगत्व आलेल्या अशा एकूण 569 प्रकरणामध्ये अकरा कोटी 34 लक्ष रुपयाचे सानुग्रह
अनुदान वितरित करण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघाती
मृत्यू अपघातामुळे डोळे निकामी होणे तसेच अवयव निकामी होणे यासाठी दोन लक्ष
रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येते. यासाठी शेतकरी कुटुंबांना सातबाराचा उतारा,
मृत्यूचा दाखला तसेच शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून नोंद असणे आवश्यक आहे. तसेच
वारसदाराची ओळखपत्र वयाचा दाखला त्यासोबत घटनास्थळाचा पंचनामा व प्रथम माहिती
अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेच्या पात्रता निकषानुसार
शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले आई-वडील यापैकी एक
सदस्य शेतकऱ्याची पती अथवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक
व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकूण दोन जणांना अपघाती विमा संरक्षण यामध्ये एक शेतकरी
आणि एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती यांना अनुज्ञेय आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा
सानुग्रह अनुदान योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अपघातामध्ये रस्ते अथवा रेल्वे
अपघात, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्यकारणाने विषबाधा, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, नक्षलवाद्याकडून
झालेल्या हत्या, बाळांतपणातील मृत्यू, पाण्यात बुडून झालेला मृत्यू, विजेचा धक्का
बसल्याने झालेला मृत्यू, खून, सर्पदंश, विंचू दंश, जनावरांच्या चावल्यामुळे झालेला
मृत्यू, दंगल आदी घटनांमध्ये शेतकऱ्याचा झालेला मृत्यू, अपंगत्व आदींचा समावेश
करण्यात आला आहे. शेतकरी कुटुंबावर
ओढवलेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरत आहे.
-
अनिल गडेकर
0000000
No comments:
Post a Comment