जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 7 July 2026

“दलाई लामा हे दया, प्रेम व मानवतेचे प्रतीक” : अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे

 





नोर्गेलिंग तिबेटी वस्तीमध्ये 91 वा वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा

          गोंदिया, दि.7 :  परम पूज्य दलाई लामा हे दया, प्रेम आणि मानवतेचे जिवंत प्रतीक असून त्यांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील नोर्गेलिंग तिबेटी वस्ती येथे दलाई लामा यांची 91 व्या वाढदिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संभोटा तिबेटी शाळेच्या मैदानावर हा सोहळा अत्यंत सकारात्मक व भावनिक वातावरणात पार पडला.

          यावेळी उपविभागीय दंडाधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, केशोरी पोलीस ठाण्याचे स्टेशन हेड ऑफिसर चेतन देखाणे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच नागपूर व भंडारा येथील ‘तिबेट सपोर्ट ग्रुप - इंडो तिबेटी मैत्री सोसायटी’चे सुमारे 35 सदस्य आणि स्थानिक तिबेटी समाज सहभागी होते.

         यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. घोरपडे यांनी तिबेटी समाजाला संबोधित करताना, ही भूमी तुमचे घर आहे. तिबेटी समाजाचा संघर्ष सोपा नाही, मात्र प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे सांगितले. तसेच कॅनॉल रोड दुरुस्ती व तिबेटी वस्तीच्या जमीन लीज संदर्भात आवश्यक पावले उचलल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी आवाहन केले.

          सकाळी दलाई लामांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. सेटलमेंट ऑफिसर तेनझिन त्सांगपा यांनी धर्मशाळा येथील केंद्रीय तिबेटी प्रशासनाचे ‘काशाग निवेदन’ वाचून दाखवले. स्थानिक तिबेटी सभेचे अध्यक्ष लोबसांग धोन्यो यांनी तिबेटी संसदेच्या अध्यक्षांचे निवेदन सादर केले.

          प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर सेटलमेंट ऑफिसर यांनी मान्यवरांचे स्वागतपर भाषण प्रथमतः मराठीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते माजी तिबेटी स्थानिक सभासद व कॅम्प लीडर्स यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्थानिक तिबेटी नागरिकांनी सादर केलेल्या पारंपरिक सांस्कृतिक नृत्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

          कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांना करुणेचे प्रतीक असलेले स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण व्यस्त वेळापत्रक असूनही स्वीकारल्याबद्दल तिबेटी समाजाने त्यांचे आभार मानले.

         सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या गोठणगाव येथील नोर्गेलिंग तिबेटी वस्तीमध्ये सध्या सुमारे ७८३ लोकसंख्या असून कॅम्प १ व कॅम्प २ असे विभाग आहेत. या वाढदिवस सोहळ्याद्वारे तिबेटी समाजाने दलाई लामांच्या विचारांचे स्मरण करत सकारात्मकता, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश अधोरेखित केला.

                                                          00000000

No comments:

Post a Comment