जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 22 July 2026

कावराबांध येथे जनआरोग्य समितीमार्फत क्षयरुग्णांना फुड बास्केटचे वितरण

 




गोंदिया, दि.22 : जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत दर महिन्याला जनआरोग्य समितीची सभा आयोजित केली जाते. जन आरोग्य समिती (JAS) ही एक अत्यंत महत्त्वाची स्थानिक समुदाय आरोग्य समिती आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सेवांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे, पारदर्शकता आणणे आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असते.

सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे दि.21 जुलै रोजी जनआरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत उपस्थित जि.प.सदस्य व मान्यवरांचे हस्ते क्षयरुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख यांनी दिली. यावेळी कार्यक्षेत्रातील आठ क्षयरोगी रुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आले.

क्षयरोगाच्या रुग्णांसाठी पौष्टिक 'फूड बास्केट' अतिशय महत्त्वाची असते. टीबीच्या औषधांमुळे रुग्णांची भूक मंदावते आणि शरीरातील ऊर्जा कमी होते. सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, वजन स्थिर राहते आणि रुग्ण लवकर बरा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख यांनी दिली.

यावेळी जनआरोग्य समिती सभेदरम्यान जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे व छाया नागपुरे, पंचायत समिती सदस्य प्रतिला गणवीर, सभापती यादनलाल बनोठे, सरपंच कुंजलाल नवगोडे, अरुण मच्छिरके, पुरुषोत्तम बनोठे, सामाजिक कार्यकर्ते गणवीर, नागपुरे, वच्छला बावनथडे व स्मिता कटरे यांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्षयरुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आले. यावेळी सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम, वैदकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख व डॉ.रोहिणी पवार यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

क्षयरोग रुग्णांच्या उपचारात आणि पुनर्प्राप्तीमध्ये 'फूड बास्केट' (पोषक आहाराचे किट) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. चांगला व सकस आहार आजाराशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, औषधांचे दुष्परिणाम कमी करतो आणि रुग्णाचे वजन व ऊर्जा पूर्ववत करून त्याला लवकरात लवकर बरे होण्यास मदत करत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम यांनी यावेळी दिली.

                                                             00000000

No comments:

Post a Comment