जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 24 July 2026

"माय भारत” नोंदणी अभियानाला गती द्या : जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे निर्देश

 


            गोंदिया, दि.24 : मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील युवकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेत पार पडली.

मेरा युवा भारत गोंदिया यांच्या जिल्हा सल्लागार समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी व संबंधित सदस्य उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सौरभ निषाद, उपसंचालक, मेरा युवा भारत गोंदिया यांनी माय भारतच्या वार्षिक कार्ययोजनेची सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध युवक-केंद्रित उपक्रमांची माहिती देत, या माध्यमातून युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी माय भारत पोर्टलवर सुरू असलेल्या नोंदणी अभियानाचा विशेष आढावा घेण्यात आला. 15 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अभियानात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामस्तरावर विशेष प्रयत्न करून युवकांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

युवकांना संधी, मार्गदर्शन आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माय भारत उपक्रम महत्त्वाचा ठरत असून, जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment