जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 8 July 2026

विस्मरणात गेलेले आदिवासी लोकनेते - क्रांतिवीर नारायणसिंह उइके (जयंती विशेष लेख - 11 जुलै)

 


           पूर्व विदर्भातील जबरान जोत चळवळीचे प्रणेते, आदिवासी व भूमीहीनांना जमिनी मिळवून देणारे, गोंदिया तालुका मुख्यालयाचे पूर्वीचे नाव गोंडिया असेच असायला पाहिजे अशी मागणी लावून धरणारे, आदिवासी, भूमीहीन लोकांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून ६० हजार लोकांचा मोर्चा नागपूर विधानसभेवर घेऊन जाणारे उच्चशिक्षित, सुजाण, निर्भीड व त्यागी आदिवासी लोकनेते क्रांतिवीर नारायणसिंह उइके हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील कटंगी (नागरा) या गावचे.  त्यांचा जन्म गोंदिया जिल्ह्यातील (पूर्वीच्या भंडारा जिल्ह्यात) १९१७ साली कटंगी या गावी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. १९२५ मध्ये त्यांनी तत्कालीन नागपूर विद्यापीठातून बी. ए. ची  पदवी प्राप्त केली. त्या काळात आदिवासी  समाजातील अगदीच मोजके व्यक्ती  पदवी  परीक्षेपर्यंत पोहचलेले होते. अभ्यासातच हुशार नाही तर ते उत्तम फुटबॉल व कबड्डीपटू होते. काही काळ त्यांनी चंद्रपूर (चांदा) येथे न्यू इंग्लिश हायस्कूल या शाळेत शिक्षक पदावर कार्य केले. १९४७ मध्ये या नोकरीचा त्याग करून  ते आदिवासी  मुलांच्या शिक्षणासाठी  सोय  व्हावी  यासाठी  वस्तीगृहाची  स्थापना केली. चांदा जिल्हा काँग्रेस आदिवासी  सेवा  मंडळाची  स्थापना  करून आदिवासींच्या  प्रश्नांना वाचा फोडली.

         १९५२ मध्ये पुराडा (हेटी) निर्वाचन क्षेत्रातून (सध्या कुरखेडा तालुक्यातील गाव) संपूर्ण देशात काँग्रेसची लाट असतांनाही ते अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९५५ मध्ये त्यांनी नागविदर्भ आदिवासी सेवा  मंडळाची स्थापना केली. १९५५-५८ ते या संस्थेचे अध्यक्ष होते.

          १९५५-५८ या काळात वडसा- भंडारा या क्षेत्रात त्यांनी जबरानजोत आंदोलन चालवले. ज्यातून  भूमिहीनांना जमिनीचा हक्क मिळण्यात मदत झाली. १९५५ च्या भंडारा येथील पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी सर्वतोपरी मदत केली. आदिवासी व दलित जनसंख्या एकत्रित यावी हा त्यांचा उद्देश होता.

          ६ डिसेंबर १९६० रोजी पूर्व विदर्भातून बैलबंडी, खाचर व पायी चालून अंदाजे ६०, ००० लोकांचा मोर्चा नागपूर विधानसभेवर काढला होता. १८ एप्रिल १९६५ रोजी आमरण उपोषण करुन भूमीहीन आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळवून दिले.

          १८८१ च्या इंपेरिअल गॅजेटिअर ऑफ इंडिया नुसार भंडारा जिल्ह्यात भंडारा व्यतिरिक्त तिरोडा व साकोली असे दोनच तालुके होते. १९१४ मध्ये तिरोडा हे तालुक्याचे मुख्यालय गोंदिया येथे हलविण्यात आले. १९०८ च्या सेंट्रल प्रोव्हिन्स डिस्ट्रिक्ट गॅजेटिअर भंडारा मध्ये आर. व्ही. रसेल या इंग्रज आयसीएस अधिका-याने केलेल्या नोंदीनुसार गोंदिया परिसर हा गोंड राजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड जातीचे लोकं येथील मूळ रहिवासी होते. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख विकण्याचा होता. त्यावेळी लाखेचे ३२ कारखाने गोंदिया परिसरात होते. गोंड जातीच्या  लोकांच्या वास्तव्यावरुन या शहराला गोंडिया हे नाव पडले होते. परंतु, १९१४ नंतर परप्रांतीय वसाहत उभी राहिली व मूळ निवासी आदिवासी हळूहळू डोंगराळ भागात जाऊन राहू लागले. इंग्रजी स्पेलिंग गोंडिया असलेले हे शहर नंतर हिंदी व मराठीत गोंदिया असे प्रचलित झाले. क्रांतिवीर नारायण सिंह उईके यांनी या शहराचे नाव 'गोंडिया' असेच असायला पाहिजे अशी मागणी करुन ब्रम्हपुरी येथे आमरण उपोषण केले. या उपोषणा दरम्यानच त्यांनी २६ जुलै १९७३ रोजी आपले प्राण सोडले. त्यांचा एकमेव पुतळा ब्रम्हपुरी (जि.चंद्रपूर) येथे ब्रम्हपुरी-वडसा रोडवर आहे. त्याला नारायण सिंह उईके चौक असे नाव दिले गेले. आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे हे गोंदिया जिल्ह्यातील लढवय्ये लोकनेते आज विस्मरणात गेल्याचे जाणवते.

         पूर्व विदर्भातील आदिवासी व गैरआदिवासी समाजासाठी त्यांचा हा इतिहास महत्वपूर्ण आहे.

 

   - डॉ. रुपेशकुमार राऊत 

No comments:

Post a Comment