जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 1 July 2026

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळमार्फत स्वयंरोजगाराकरीता कर्ज योजना

 


          गोंदिया, दि.1 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुख्यकंपनी तसेच वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, लोहार समाजासाठी ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, नाथपंथी समाजासाठी श्री. शिव गोरक्षणाथ आर्थिक विकास महामंडळ या सहा उपकंपनी मार्फत आर्थिक दुर्बल लोकांकरीता स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन कृषी संलग्न  व्यवसाय, लघुउद्योग, वाहतुक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातुन वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे.

          वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जास्तीत जास्त रु. 15 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत रु. 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनांनमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे, त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म 12% पर्यंत लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करते.

         बीज भांडवल कर्ज योजने अंतर्गत रु. 05 लाखापर्यन्त (बँक सहभाग 75% व महामंडळ सहभाग 25%) महामंडळाच्या 25% सहभागावर 4% व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येते. तसेच थेट कर्ज योजने अंतर्गत रु. 1,00,000/- बीनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या WWW.VNVJNT.ORG या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

         अधिक माहितीकरीता महामंडळाच्या कार्यालयात येऊन संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), गोंदिया यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment