गोंदिया, दि.28 : ५
ऑक्टोबर २०११ च्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक
शाळांतून आनापान साधना वर्ग- "मित्र उपक्रम" सुरू करण्याचे निर्देश
आहेत. त्या अनुषंगाने दि. २६ जुलै २०२६ रोजी दामाजी पाटील लंजे माध्यमिक आश्रम
शाळा सडक अर्जुनी येथे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गोंदिया
आणि धम्मगोंड विपश्यना केंद्र, ओझाटोला यांच्या संयुक्त विद्यमाने
"आनापान" शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुलांचा बौद्धिक विकास
करणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे, त्यांची एकाग्रता वाढविणे, त्यांच्यावर
चांगले संस्कार घडविणे, सुजान नागरिक घडविणे तसेच विद्यार्थ्यांनी पंचशील तत्वे
म्हणजे हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये, मादक
पदार्थाचे सेवन करू नये ही तत्वे आत्मसात करावी, हा यामागचा उद्देश आहे. तसेच अशाप्रकारचे
शिबीर इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत प्रत्येक आश्रमशाळेत घेण्यात येत आहेत,
असे विचार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी
व्यक्त केले.
शिबिराची सुरुवात सकाळी ९
वाजे करण्यात आली व दुपारी ४ वाजता विद्यार्थ्यांना मंगल शुभेच्छा देऊन
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तीचे
श्वास व मनाची अवस्था व त्यातून होणारे फायदे याबद्दल विविध सत्रामध्ये मार्गदर्शन
करण्यात आले.
याप्रसंगी सविता कीर्तीकर,
सहाय्यक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग गोंदिया, अशोक लंजे संस्थाध्यक्ष,
संतोष कुलकर्णी, शरद बडोले, मधुकर टेंभुर्णीकर, सुषमा मेश्राम, त्रिवेणी साखरे,
अनिता जांभुळकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment