जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 20 July 2026

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर : प्रारूप मतदार यादी 17 ऑगस्टला, अंतिम यादी 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 


            गोंदिया, दि.20 : अलिकडच्या कालावधीमध्ये कोकण, मुंबई व काही भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गणना कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमामध्ये काही मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. सदर विनंती मान्य करुन भारत निवडणूक आयोगाने 15 जुलै 2026 च्या पत्रान्वये राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

           सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

त्यानंतर 17 ऑगस्ट 2026 (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत नोटीस देणे आणि दावे व हरकती निकालात काढण्याची प्रक्रिया पार पडेल. यानंतर 19 ऑक्टोबर 2026 (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment