जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 24 July 2026

कर्जमुक्ती योजनेचा लाभ लवकरच; बँकांनी डाटा अपलोड करून ‘झिरो प्रलंबितता’ साध्य करावी : जिल्हाधिकारी मंदार पत्की

 


गोंदिया, दि.24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार असून, त्यासाठी सर्व संबंधित बँकांनी शेतकऱ्यांचा प्रलंबित डाटा तातडीने पोर्टलवर अपलोड करून ‘झिरो प्रलंबितता’ साध्य करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले. कामात कुठलाही कामचुकारपणा झाल्यास कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, राज्यात असणाऱ्या महत्त्वाच्या बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या सर्व पतसंस्था व बँकांनी अद्यापपर्यंत अपलोड न केलेला शेतकऱ्यांचा डाटा तात्काळ अपलोड करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार 994 पात्र प्रकरणे (Eligible Cases) असून, त्यापैकी 29 हजार 838 प्रकरणांची माहिती बँकांच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणेही तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना योजनेंतर्गत लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, आत्माचे प्रकल्प संचालक अजित आडसुळे, जिल्हा उपनिबंधक योगेश भाकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे कौशल तिराळे तसेच सर्व राष्ट्रीयकृत व राज्यातील बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                     0000000

No comments:

Post a Comment