गोंदिया, दि.8 : राज्यात पिकांची
उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडुन विविध प्रयोग करण्यात
येतात व उत्पादकता वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या
उत्पादक्तेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढुन आणखी उमेदीने
नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर
घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर
शेतक-यांना होऊन जिल्ह्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन
राज्यांतर्गत पिकस्पर्धा राबविण्यात येत आहे.
दिनांक २० जुलै २०२३ च्या शासन
निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तुर, मुग, उडीद,
सोयाबिन, भुईमुग व सुर्यफुल या 11 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीकस्पर्धेत समाविष्ट पीक : खरीप पीके
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तुर, मुग, उडीद, सोयाबिन, भुईमुग व सुर्यफुल
(एकूण 11 पिके).
पात्रता निकष : स्पर्धेत भाग घेण्यासाठी
शेतक-यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत
भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता
येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४०
आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहीत
नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरण्याचे चलन, ७/१२, ८-अ
चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदीवासी असल्यास), पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या
स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक
आहे.
अर्ज दाखल करण्याची तारीख : खरीप
हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तुर, मुग, उडीद, सोयाबिन, भुईमुग व
सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. तालुकास्तर,
जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे
पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पिक निहाय
सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदीवासी
गटासाठी १५० रुपये आहे.
स्पर्धा पातळी : तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार, दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार
रुपये. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस
10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रुपये. राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार
रुपये आहे.
नमूद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात
वाढ व्हावी याकरिता पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोंदिया, कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत
आहे. पिक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू-भगिनींनी संबंधित तालुका कृषी
अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ
www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
00000000
No comments:
Post a Comment