गोंदिया,
दि.14 : हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गावस्तरीय
हवामान अनुकूलन आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी
संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा २ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एकूण ८ तालुक्यातील २९३
गावांची निवड करण्यात आली आहे.
या
प्रकल्पामध्ये वैयक्तिक लाभाच्या बाबी, शेतकरी गट/कंपन्यांचे कृषी उद्योग प्रकल्प,
मृद व जलसंधारण कामे, हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच पर्यावरणीय
संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार ३० जून २०२३ रोजी या
प्रकल्पाच्या टप्पा २ ला मंजुरी देण्यात आली असून, सुमारे ६००० कोटी रुपयांचा
अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये हा
प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गाव निवडीस मान्यता
देण्यात आली, तर ८ जुलै २०२५ रोजी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस अंतिम मान्यता देण्यात
आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तालुकानिहाय विचार
केल्यास गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक-अर्जुनी, आमगाव व
सालेकसा या तालुक्यातील गावांचा प्रकल्पात समावेश आहे. यात गोंदिया उपविभागातील
१५८ तर देवरी उपविभागातील १३५ गावांचा समावेश असून, एकूण २९३ गावांमध्ये विविध
विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी
जुळवून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून, मृद व जलसंधारण, कृषी
उद्योग आणि पर्यावरणीय संरक्षण यामधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार असल्याचे प्रशासनाने
स्पष्ट केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment