जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 18 May 2018

तंटामुक्त गाव मोहिम बातमीदारांसाठी तंटामुक्त पुरस्कार


15 जून पर्यंत प्रवेशिका आमंत्रित
       महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची वृत्तपत्रातून व्यापक प्रसिध्दी देणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने गौरविण्यात येते. 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम या विषयावर लिखान केलेल्या बातमीदारांकडून पुरस्कारासाठी 15 जून 2018 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहे.

       महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची व्याप्ती व महत्व लक्षात घेता हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता ती व्यापक लोकसहभागाची चळवळ होणे आवश्यक आहे.
       छोट्या-छोट्या कारणावरुन निर्माण होणारे तंटे ग्रामपातळीवरच सामोपचाराने मिटवून व भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत असे वातावरण निर्माण करुन लोकांनी स्थायी विकासाच्या मार्गावरुन वाटचाल करावी, असा व्यापक उद्देश या मोहिमेमागे आहे. सकारात्मक पत्रकारितेचा भाग म्हणून हा विचार, प्रसार माध्यमे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात वृत्तपत्रे महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यादृष्टीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीरित्या राबविण्यामध्ये पुरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतात.
      जिल्हास्तरावर प्रथम- 25 हजार, द्वितीय- 15 हजार, तृतीय- 10 हजार. विभागीय स्तरावर प्रथ्म- 1 लक्ष, द्वितीय- 75 हजार, तृतीय- 50 हजार रुपयांचा पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम- 2 लक्ष 50 हजार, द्वितीय-        1 लक्ष 15 हजार व तृतीय- 1 लक्ष रुपयांच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.
       पुरस्कारासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक निकष मिळून 100 गुण आहेत. संख्यात्मक तपशिलात बातम्या, वृत्तांकन, फोटो फिचर्स, लेख, अग्रलेख यांची संख्या यासाठी 40 गुण आहेत. साहित्य व अ वर्गवारीतील दैनिकात प्रसिध्द झाले असेल तर त्याला मिळालेल्या एकूण गुणांच्या 10 टक्के व ब वर्गवारीतील दैनिकास        5 टक्के ज्यादा गुण देण्यात येतात.
      गुणात्मक निकषात कल्पकता, प्रबोधनात्मकता, व्यवहारिकता तसेच मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात दखल घेवून मोहिमेच्या अंमलबजावणीत किती व कोणत्या गावात बदल करण्यात आला याबाबत अनुषंगीक माहिती लेखासोबत दिलेली असल्यास त्यावर सुध्दा गुण देण्यात येतात. बातमी, लेखामध्ये सुचविलेल्या धोरणात्मक सुधारणांची दखल घेवून शासनाकडून सुधारणा केल्यास त्यावर सुध्दा गुण असतात. जनमानसावरील बातमी, वृत्तांकन, लेख, अग्रलेख, लेखमाला, फोटो फिचर्सचा परिणाम व प्रभाव यावर सुध्दा गुण आहेत. संबंधित बातमीदाराने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची अंमलबजावणी व्यापक स्वरुपात व्हावी म्हणून प्रत्यक्ष कृतीपूर्ण पध्दतीने बजावलेली सकारात्मक भूमिका असे मिळून 60 गुण गुणात्मक तपशिलास व 40 गुण संख्यात्मक तपशिलास राहणार आहेत. या दोन्ही तपशिलाचा विचार करुन बातमीदारांनी प्रवेशिका संपादकाच्या शिफारसीने पाठवाव्यात.
      प्रवेशिका पाठवितांना बातम्या, लेख हे 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीत प्रकाशित झालेले असावेत. प्रवेशिका तीन प्रतीत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, न.प.इंजीन शेड शाळा इमारत, लोकोशेड जवळ, मेठी बगीच्या समोर, सिव्हील लाईन, गोंदिया येथे 15 जून 2018 पर्यंत पाठवाव्यात. असे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment