जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 21 April 2017

जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविणार - अभिमन्यू काळे

                                      


                                                           नागरी सेवा दिन साजरा
    जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढणे गरजेचे आहे. शुन्य माता व बाल मृत्यू अभियान, पशुपक्षांना जंगलात, शेतशिवारात त्यांचे खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी शेताच्या बांधावर झाडे लावून त्याचे संगोपन करणे, यासह अनेक उपक्रम भविष्यात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयात 21 एप्रिल रोजी अकराव्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे व आर.टी.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंब कॅशलेस व्यवहार करतील असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संबंधित शेतीविषयक विशेष ग्रामसभेला शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे जमिनीविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यास हया ग्रामसभा उपयुक्त ठरल्या आहे. यामध्ये तलाठ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
      नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे गोरेगावचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांना ई-फेरफार, इडिट मॉड्युल प्रणालीत 100 टक्के काम, महाराजस्व अभियानात विविध दाखल्यांचे वाटप, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगडे यांना सेंद्रीय शेती कार्यशाळेचे आयोजन, रोजगार हमी योजनेतून हाजराफॉलच्या रस्त्याचे काम, पर्यटन वाढीच्या दृष्टीने होम स्टेसाठी पारंपारिक घरांचे फोटो संकलन, तिरोडा तहसिलदार श्री.चव्हाण यांना पारंपारिक घराचे फोटो संकलन, डासमुक्तीसाठी मॅजिक पीट बांधणे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे यांना रोजगार हमी योजनेच्या मजुरांना रोखरहीत मजुरी वाटप, या योजनेतील उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

      तत्पूर्वी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सिव्हील सेवा दिनाच्या मुख्य समारंभाचे थेट प्रसारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातील पडदयावर बघण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नागरी सेवा दिनानिमित्त संबोधीत केले. देशातील विविध राज्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनहक्क पट्टयांची प्रकरणे त्वरित निकाली काढा - राजकुमार बडोले

    जिल्ह्यातील वैयक्तीक व सामुहिक वनहक्क जमिनीच्या पट्टयाचे वाटप तातडीने करण्यासाठी महसूल विभागाने वन विभागाच्या सहकार्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन ही प्रकरणे त्वरित निकाली काढावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
    20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील वनहक्क जमिनीच्या पट्टे वाटपाच्या प्रकरणांचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, देवरी उपविभागीय अधिकारी एम.एच.टोणगावकर, तिरोडा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसिलदार अरविंद हिंगे,अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
    श्री.बडोले पुढे म्हणाले, तिरोडा शहरातील झुडपी जंगल प्रकरणाचा केंद्र शासनाकडे योग्य पाठपुरावा करुन ज्याप्रमाणे निपटारा करण्यात आला त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील संजयनगर येथील झुडपी जंगल प्रकरणाचा सुध्दा निपटारा करण्यात यावा असे यावेळी सांगितले.    
       श्री.रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील वनहक्क पट्टे जमीन धारकांना पीक कर्ज व पीक विमा मंजूर झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सभेला संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
    जिल्ह्यात वैयक्तीक वनहक्काचे ग्रामस्तरीय गावे 1590, उपविभागीय स्तरीय समितीकडे 3512, तर जिल्हास्तरीय समितीकडे 983 दावे प्रलंबीत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी यावेळी दिली. एकूण प्राप्त प्रकरणापैकी निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या 15654 इतकी असून वाटप केलेल्या टायटलची संख्या 8431 इतकी असून 4811.231 हेक्टर टायअल्सच्या जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       सामुहिक वनहक्क दाव्यांची संख्या 395 इतकी असून मंजूर गटांची संख्या 843 इतकी आहे. यांना 38676.56 हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे व प्रलंबीत असलेल्या 257 दाव्यात तपासणीचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊर्जा विकासाची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री बडोले

         पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत करण्यात येणारी उपकेंद्राची कामे, उपकेंद्रांची क्षमता वाढ, नविन रोहीत्र, नविन वाहिन्या व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वीज जोडणीच्या कामासह अन्य ऊर्जा विकासाची कामे वीज वितरण कंपनीने वेळेत पूर्ण करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 20 एप्रिल रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, विद्युत वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, मागील सन 2016-17 या वर्षात वीज वितरण कंपनीने जिल्ह्याच्या ऊर्जा विकासाबाबत जिल्हा नियोजन समितीकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 3 कोटी रुपये मंजूर झाले होते. यातून मार्च 2017 अखेरपर्यंत जिल्ह्यातील 64 गावात ऊर्जा विकासाअंतर्गत पथदिव्यांची कामे करण्यात आली. सन 2017-18 या वर्षात वीज वितरण कंपनीने 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे, त्यापैकी 3.50 कोटी रुपये मंजूर झाले असून यातून जिल्ह्यातील 70 गावात पथदिव्यांची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
      सन 2017-18 या वर्षात दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत 96 कोटी 8 लक्ष रुपयांची कामे मंजूर असून या योजनेतून कृषी ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत 28 कोटी 20 लक्ष रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून या योजनेअंतर्गत गोंदिया व तिरोडा शहरातील विद्युत वितरण जाळ्याचे सक्षमीकरण करण्यासाठी, तसेच तांत्रिक व व्यवसायीक वीज हानी कमी करण्यास मदत होईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्युत फिडर लाईन व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देवून कामे करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील मुंडीपार व काटी, गोरेगाव तालुक्यातील मोहाडी, तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव(मेंढा), देवरी तालुक्यातील मुल्ला, सडक/अर्जुनी तालुक्यातील कोकणा, आमगाव तालुक्यातील ठाणा, सालेकसा तालुक्यातील तिरखेडी येथे 33 के.व्ही.च्या उपकेंद्राची कामे लवकरच सुरु करण्यात येतील. जिल्ह्याचा 760 कोटीचा ऊर्जा विकासाचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

      आ.रहांगडाले म्हणाले, दिवसेंदिवस विद्युत जोडणीची संख्या वाढत आहे, परंतू ट्रान्सफॉर्मरची क्षमता तीच कायम राहते. अशावेळी ट्रान्सफॉर्मरवर दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. अशावेळी वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन देतांना ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून दयावी असे सांगितले. सभेला  समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपअभियंता एस.आर.कायंदे, मेडाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र माडे यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Tuesday 18 April 2017

चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न - पालकमंत्री बडोले

                         परसोडी उपकेंद्राचे लोकार्पण

      अर्जुनी/मोरगाव सारख्या मागास, दुर्गम भागाच्या विकासाला गती मिळाली आहे.  ग्रामीण भागातील लहान गावात सुध्दा ग्रामस्थांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे. परसोडी सारख्या लहान गावात उपकेंद्राचे लोकार्पण करुन चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील परसोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी 17 एप्रिल रोजी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी/मोरगाव पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, परसोडी सरपंच अनिल कुंभरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत, श्री.ठवरे यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बोलतांना यावेळी म्हणाले, या उपकेंद्राच्या लोकार्पणामुळे पांढरवाणी/रयत आणि परसोडीच्या 1500 नागरीकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. तालुक्यातील इतर उपकेंद्राचे भूमीपूजन व बांधकाम लवकरच करण्यात येतील. या उपकेंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी चांगली आरोग्य सेवा ग्रामस्थांना उपलब्ध करुन देतील असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजनेत परसोडी या गावाची निवड करण्यात आली असून आलेल्या त्रुटी दूर करुन लवकरच या योजनेचे काम सुरु होईल. रस्ते, तलाव व बंधाऱ्याचे इथले कामेही लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.
     श्रीमती गहाणे म्हणाल्या, जिल्ह्यातील विविध समस्यांना न्याय देण्याचे काम पालकमंत्री करीत आहे. ग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. या उपकेंद्रातून डॉक्टर व कर्मचारी तसेच आवश्यक तेवढ्या औषधांचा नियमीत पुरवठा करण्यात येईल. या भागातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.शिवणकर म्हणाले, आरोग्याच्या सुविधा वृध्दींगत व्हाव्यात यादृष्टीने आरोग्य विभाग काम करीत आहे. जास्तीत जास्त निधी आरोग्य सेवेसाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

     परसोडी उपकेंद्राची इमारत 37 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आली आहे. पांढरवाणी/रयत व परसोडी या दोन गावातील 1500 नागरिकांना या उपकेंद्राच्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल हजारे, अभियंता सुनिल तरोणे व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. संचालन डॉ.अजय अंबादे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ.विजय राऊत यांनी मानले.

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे - खासदार नाना पटोले

                            जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा
      केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे. त्यामुळे एकमेकांच्या समन्वयातून विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकतीच जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांची उपस्थिती होती.
      खासदार पटोले बोलतांना पुढे म्हणाले, योजनांची अंमलबजावणी करतांना यंत्रणांनी एक परिवार म्हणून काम करावे. शोषित, पिडीत व गरजू व्यक्तींना योजनांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून काम करावे. रोजगार हमी योजनेच्या ज्या मजुरांची मजूरी प्रलंबीत आहे त्यांना ती तातडीने देण्याची कार्यवाही करावी. जे लोक उघड्यावर शौचास जातील त्यांना शासकीय योजनांचा लाभ देवू नये. पाण्याचे महत्व लक्षात घेता भविष्यात कोणत्याही गावातून पावसाचे पाणी वाहून जाणार नाही याचे सुक्ष्म नियोजन करावे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार नाही. असे त्यांनी सांगितले.
     गावपातळीवर काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षक, कृषी सहायक यांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे असे सांगून खासदार पटोले पुढे म्हणाले, गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधीतून एक पैसाही वापस जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. विकासाची कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे करावी. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना वीज वितरण कंपनीने तात्काळ वीज जोडणी करावी. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत गरजू व बेरोजगार तरुण-तरुणींना कर्ज पुरवठा करावा. बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज मागणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये. यापूढे जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून मुद्राची प्रकरणे मंजूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      1 मे च्या ग्रामसभेतून गरजू व योग्य लाभार्थ्यांची घरकूलसाठी निवड करण्यात यावी असे सांगून खा.पटोले म्हणाले, माणूसकीच्या नात्यातून गरजू व गरीबांना राष्ट्रीय अर्थ सहाय्य कार्यक्रमांतर्गत विविध योजनांचा लाभ दयावा. जीवन प्राधिकरणने शहरवासीयांना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. दोन महिन्याच्या आत सर्व लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचा लाभ दयावा. सेवाभावी संस्थेने यंत्रणांच्या समन्वयातून कौशल्य विकासाचे गरजू व बेरोजगारांना प्रशिक्षण दयावे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून नकली बियाणे, किटकनाशके व खतांची माहिती दयावी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले.
      जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, जिल्ह्यात कौशल्य विकासाला गती देण्याची आवश्यकता आहे. कॅशलेस व्यवहारासाठी बँकांनी दुकाने, विविध आस्थापना आणि प्रतिष्ठानाला प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील 2 लाख 80 हजार कुटुंबांना कॅशलेस व्यवहार करता यावा यासाठी 100 कुटुंबांसाठी 1 व्यक्ती याप्रमाणे 2400 व्यक्ती कुटुंबांना माहिती देत आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना रुपी कार्डच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.पुलकुंडवार यावेळी म्हणाले, ज्या गावच्या ग्रामरोजगार सेवकांच्या तक्रारी असतील तर त्यावर संबंधित गावच्या ग्रामसभेने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

     सभेला अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगावच्या पंचायत समिती सभापती श्रीमती डोये, गोंदिया पंचायत समिती सभापती श्रीमती हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. संचालन विस्तार अधिकारी श्री.राठोड यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री.जवंजाळ यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

Thursday 13 April 2017

डिजीटल इंडियाचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा - राजकुमार बडोले

                                       डिजीधन मेळावा
       व्यवहारात पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचे स्वप्न डिजीटल इंडियाचे आहे. भीम ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी पाहिलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 13 एप्रिल रोजी बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित डिजीधन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे व जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
     पालकमंत्री पुढे म्हणाले, बँकांचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या मोबाईलवर भीम ॲप हे लोड केलेले नाही. यावरुन ते कॅशलेस व्यवहार करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी हे अधिकारी व कर्मचारी चांगले वागत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी खेद व्यक्त केला. जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेत ग्रामीण भागात पाहिजे तसे काम झाले नाही. सामान्य गरजू व बेरोजगारांना स्वावलंबी करण्याचे काम बँकांनी मुद्रा योजनेतून करावे. जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलदृष्ट्या संवेदनशील असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अशाप्रकारच्या योजनेतून हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.    
      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 126 व्या जयंतीनिमित्त यावेळी अभिवादन करण्यात आले. 8 ते 14 एप्रिल दरम्यान समता सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, 14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व क्षेत्रात प्रचंड ज्ञान होते. त्यांनी दीनदलित, शोषित पिडितांचा विचार मांडला, महात्मा फुलेंनी पददलितांच्या व महिलांच्या शिक्षणाचा तर पं.दिनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. या सर्वांनी समतेचाच विचार मांडल्याचे दिसून येते. त्यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणे हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे श्री.बडोले यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आज कॅशलेसचा मार्ग स्विकारणे आवश्यक झाले आहे. प्रिंटेड मटेरिअल शिवाय व्यवहार झाला पाहिजे. कॅशलेस व्यवहारासाठी प्रत्येकाने भीम ॲपचा वापर केला पाहिजे. जिल्ह्यात भीम ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या माध्यमातून व्यवहार होत आहे. शेतकऱ्यांना देखील कॅशलेस व्यवहारासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. कॅशलेस व्यवहाराबाबत मात्र बँकेतील अधिकारी-कर्मचारी उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्हा अग्रणी प्रबंधक श्रीवास्तव म्हणाले, डिजीटल इंडियाच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे. बेरोजगार व गरजूंना मदत व स्वावलंबी करण्यासाठी मुद्रा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

      डिजीधन मेळाव्याला अनेक बँकांचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अनिलकुमार श्रीवास्तव यांनी मानले.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर व शेतीपुरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा - पालकमंत्री बडोले

                                खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
       जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आली पाहिजे, त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. कृषि विभागाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येते. या बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दयावा. जिल्ह्यातील बहुतेक धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करुन त्यांना बोनसचा लाभ मिळण्यास सहकार्य करावे. धान साठवणूकीसाठी गोदाम ठरविण्याचे अधिकार लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. 1 मे पासून दोन्ही एजन्सींनी धान खरेदीची तयारी पूर्ण करावी.
      रब्बी हंगामात सिंचनाचे योग्य नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषिपंपांना वेळीच वीज जोडणी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना योग्य वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मोठ्या प्रमाणात कसे देता येईल याचे नियोजन करावे. फिडर निहाय समित्यांचे गठण करण्यात यावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्यात याव्यात. शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे काढावे असेही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.
     श्रीमती मेंढे म्हणाल्या, शेतात खोलवर बोअरवेल करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने समज देवून बोअरवेल करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करावा. त्यामुळे जलसंकट निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
     जिल्हाधिकारी काळे म्हणाले, बोअरवेलच्या मशीन जिल्ह्यातील काही भागात आल्या आहेत. या मशीनवर उपविभागीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असावे. त्यांना बोअर करण्याची परवानगी देवू नये. लवकरच याबाबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     सन 2017-18 च्या खरीप हंगामात 25 हजार 360 क्विंटल बियाण्यांची महाबीजकडून आणि 13134 क्विंटल बियाण्यांची खाजगीतून मागणी करण्यात आली आहे. युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते आणि मिश्र खतांची एकूण 75 हजार मेट्रीक टनाची मागणी करण्यात आली आहे. चालू हंगामात 247 कोटी 21 लक्ष रुपये पीक कर्ज वाटपाचे लक्ष असून यामध्ये  126 कोटी 50 लक्ष रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, 46 कोटी 51 लक्ष ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना 74 कोटी 20 लक्ष रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सिंचन प्रकल्प व इतर साधनापासून 1 लक्ष 28 हजार 881 हेक्टर सिंचनाचे नियोजन असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी सांगितले. आढावा सभेला कृषि, सिंचन व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Monday 10 April 2017

गरजू व बेरोजगारांना स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण - राजकुमार बडोले

कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळावा
      कायमस्वरुपी नोकऱ्या हा विषय आज हद्दपार झाला आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरजू व बेरोजगार व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        आज 10 एप्रिल रोजी सडक/अर्जुनी पंचायत समिती समोरील पटांगणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या वतीने आयोजित कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी, सडक/अर्जुनी नगराध्यक्ष रिता लांजेवार, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, शारदा बडोले, बार्टीच्या कौशल्य विकास विभागाचे राज्य समन्वयक भुषण रामटेके, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, जि.प.सदस्य सर्वश्री शिला चव्हाण, माधुरी पातोडे, विश्वजीत डोंगरे, पं.स.उपसभापती विलास शिवणकर, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, उमाकांत ढेंगे, विजय बिसेन, डॉ.लक्ष्मण भगत, भरत क्षत्रीय, नगरसेवक शिव शर्मा यांची मंचावर उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शहरातील मोठ्या कंपन्यांशी करार करुन ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विषयक प्रशिक्षण देवून त्यांना प्लेसमेंट देण्याची कार्यवाही करण्यात येईल. बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींच्या विकासासाठी व रोजगारासाठी काम करण्यात येत आहे. मागील वर्षी पुणे, मुंबईकडील 34 मुलींची एअर होस्टेस म्हणून नियुक्ती झाली. यावर्षी नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील 4 मुली एअर होस्टेस झाल्या आहेत. आता यावर्षी 50 मुलींना एअर होस्टेसचे प्रशिक्षण देण्यात येईल.
      बार्टीच्या माध्यमातून राज्यातील 30 हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, या मेळाव्यात जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरात प्रशिक्षण देवून तसेच त्यांना प्लेसमेंट सुध्दा देण्यात येईल. जिल्हा कौशल्य विकास समितीच्या माध्यमातून 500 ते 1000 सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना सुध्दा प्लेसमेंट देवून रोजगाराभिमुख करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जे उद्योग उभारणार आहेत त्यांना उद्योगाबाबतचे प्रशिक्षण व ज्ञान असले पाहिजे अशी अट टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
       स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा बँक योजना अशा प्रकारच्या योजनेतून स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी मुद्रा बँक मेळावे घेवून गरजू व बेरोजगारांना स्वावलंब करण्यास मदत करण्यात येईल. औद्योगिक विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा आदिवासी बहुल, नक्षलदृष्ट्या संवेदनशील व मागास असल्यामुळे जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक कमी आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात येईल. महिला बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांच्या सक्षमीकरणास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       डॉ.फुके म्हणाले, ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळावा उपयुक्त ठरला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजु व बेरोजगार युवकांना निश्चितच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त मनाची प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे. 2020 पर्यंत भारत हा तरुणांचा देश म्हणून नावारुपास येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे नवेगावबांध व नागझिरा अभयारण्याचा विकास करण्यात येत आहे. काम करणाऱ्या महिलांसाठी ज्याप्रमाणे वसतिगृह उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्याप्रमाणेच काम करणाऱ्या पुरुषांसाठी देखील वसतिगृहे बांधण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.                              
      श्री.पुराम म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा रोजगार मेळावा महत्वाचा ठरला आला आहे. उच्च शिक्षण घेवून सुध्दा नोकरी मिळत नाही म्हणून निराश होवून आत्महत्या न करता जीवनात यशाचा मार्ग शोधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आज जग बदलत चालले आहे. जीवन उज्वल करायचे असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणे विद्यार्थ्यांना आवश्यक झाले आहे. शासनाने कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ बेरोजगार व गरजु व्यक्तींनी घ्यावा. जिल्ह्याचा आराखडा तयार करुन विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     श्री.ढाबरे म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी बाटीमार्फत कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गृह उद्योगांना आता कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या रोजगार मेळाव्याच्या आयोजनातून ग्रामीण भागातील बेरोजगारांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
        श्रीमती गहाणे म्हणाल्या, गोंदिया हा आदिवासी, नक्षलग्रस्त व मागास जिल्हा म्हणून ओळख आहे, ती ओळख आता पुसून काढली पाहिजे. आधुनिक युगात स्पर्धेत उतरतांना कौशल्य विकासाची आवश्यकता आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. ग्रामीण भागातील युवकांना  मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
    श्री.रामटेके म्हणाले, सर्व प्रवर्गातील युवक-युवतींना आपले करिअर घडविण्याची दिशा मिळावी यासाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दहावी, बारावी झाल्यानंतर पुढे काय करायचे हे माहित नसते. त्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे सुरु करण्यात आले आहे. युवकांना रोजगाराची माहिती मिळाली पाहिजे यासाठी बेरोजगार युवकांना रोजगाराबाबत प्रशिक्षण देणे सुरु आहे. गोंडी पेंटींगमुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकते असेही त्यांनी सांगितले.
      यावेळी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. लावण्यात आलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून आवश्यक त्या प्रशिक्षणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरुन दिले व विविध प्रशिक्षणाविषयी माहिती जाणून घेतली. विविध स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्थशास्त्र विषयावर प्रफुल पवार, चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त श्री.राठोड व करिअर प्लॅनिंगबाबत शैली गंभीर, उद्योजकता बाबत आनंद खडतकर यांनी मार्गदर्शन केले.
     कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यात बार्टी, टॉप्स् ग्रुप्स, थिंक स्कील, इंफोनेट, जावेद हबीब, बँक ऑफ इंडिया, रुस्तमजी ग्लोबल एजंसी, आय.बी.पी.एस.वर्धा, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा यांच्यासह फ्युचर शार्प स्कील्स, सुखकर्ता इंजिनियरींग क्लस्टर पुणे, महाराष्ट्र स्टेट स्कील डेव्हलपमेंट सोसायटी, बी-एबल, क्वीज कॉर्पोरेशन, हिंदूस्थान लॅटेक्स फॅमिली प्लॅनिंग प्रमोशन ट्रस्ट, ज्ञानदा इन्स्टीट्यूट ऑफ प्लो पायपींग टेक्नॉलॉजी, युवा परिवर्तन गोंदिया, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, महारारष्ट्र सेंटर फॉर इंटरपीनरशिप डेव्हलपमेंट, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेले महामंडळे, आरव्हीएस एज्युकेशन ट्रस्ट, माविमचे आधार लोकसंचालीत साधन केंद्र, रमाबाई व लक्ष्मी महिला बचतगट डोंगरगाव, ओरियन एज्युटेक, बार्टी आयबीपीएस, आरोग्य विभाग, कविरा सोल्यूशन, सामाजिक न्याय विभाग, जागृती महिला बचतगट, नागझिरा स्वयंसहायता बचतगट, शेतकर्णी, जागृती, महासरस्वती महिला बचतगट आदींचे स्टॉल प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा चित्ररथ यामध्ये लावण्यात आला होता.
     कार्यक्रमाला गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.खडसे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच समतादूत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बार्टीच्या निबंधक रुपाली आवळे यांनी केले. संचालन रवि वरके आणि रजनी गायधने यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.