जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 30 October 2019

गोंदियात राष्ट्रीय एकता दिवसानिमित एकता दौडचे आयोजन अनेकांचा सहभाग



         माजी उपप्रधानमंत्री तथा गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून आज 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन सकाळी 7.30 वाजता गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून करण्यात आले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक आणि ज्येष्ठ धावपटू मुन्नाजी यादव यांनी मशाल प्रज्वलित केली. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन,गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्तवतीने 'रन फॉर युनिटी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडमध्ये  खेळाडू, कर्मचारी, शहरातील विद्यालय- महाविद्यालयाचे विद्यार्थी,क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह  नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडमध्ये सहभाग घेतला. ही एकता दौड इंदिरा गांधी स्टेडियम येथून जयस्तंभ चौक, गुजराती विद्यालय,पाल चौक पोहचली.या चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला श्री.मुस्तक व श्री.यादव यांनी पुष्पहार अर्पण केला. दौड त्याच मार्गाने परत येऊन इंदिरा गांधी स्टेडियम येथे  एकता दौडचा समारोप  करण्यात आला. यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके,क्रीडा संघटक विशाल ठाकूर,अनिल सहारे,मुजीब बेग,निलेश फुलबांधे,संदीप मेश्राम,श्री.कम्मू,स्नेहदीप कोकाटे,रविना बरेले,शेखर बिरणवार,उपेंद्र थापा,सऋतिक कटरे,अनिल एलूरू,रवी रहांगडाले,पूर्वा अग्रवाल, ओम भादुपोते यांनी पुढाकार घेतला

Thursday 24 October 2019

विधानसभा निवडणूकीत जिल्हयात 1 अपक्ष, 1 भाजपा, 1 कॉग्रेस व 1 राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार विजयी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मनोहर चंद्रीकापूरे,  तिरोडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा मतदासंघातून अपक्ष विनोद अग्रवाल आणि आमगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे सहसराम कोरोटे विजयी झाले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 8 उमेदवारांनी निवडणूक लढविली. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजकुमार बडोले,  राष्ट्रवादी कॉग्रेसचे मनोहर चंद्रीकापूरे व वंचित बहूजन आघाडीचे अजय लांजेवार यांच्यात झाली. या निवडणूकीत 2 लाख 52 हजार 591 मतदारापैकी 1 लाख 74 हजार 229 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी कॉग्रेसचे मनोहर चंद्रीकापूरे यांना 72 हजार 400, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना 71 हजार 682 व वंचित बहूजन आघाडीचे अजय लांजेवार यांना 25 हजार 579 मते पडली. श्री चंद्रीकापूरे यांनी बडोले यांचा 718 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला  2 हजार 45 मते पडली.
तिरोडा विधानसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवारांनी निवडणूक लढविली. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय रहांगडाले,  राष्ट्रवादी कॉग्रेसचे रविकांत बोपचे व अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड यांच्यात झाली. या निवडणूकीत 2 लाख 57 हजार 351 मतदारापैकी 1 लाख 67 हजार 460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय रहांगडाले यांना 76 हजार 482, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे रविकांत बोपचे 50 हजार 519 तर अपक्ष दिलीप बन्सोड यांना 33 हजार 183 मते पडली. विजय रहांगडाले यांनी श्री बोपचे यांचा 25 हजार 963 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला  1 हजार 841 मते पडली.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल व अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यामध्ये झाली. या निवडणूकीत 3 लाख 21 हजार 798 मतदारापैकी 2 लाख 9 हजार 379 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपाल अग्रवाल  यांना 75  हजार 827, तर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल  यांना 1 लाख 2 हजार 996 मते पडली. अपक्ष विनोद  अग्रवाल यांनी श्री गोपालदास अग्रवाल यांचा 27 हजार 169 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1 हजार 857 मते पडली.
आमगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पुराम व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांच्यामध्ये झाली. या निवडणूकीत 2 लाख 66 हजार 530 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 80 हजार 181 मतदारांनी मतदान केले.  भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांना 88  हजार 265 तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पुराम यांना 80 हजार 845 मते मिळाली. श्री कोरोटे यांनी श्री पुराम यांचा 7 हजार 420 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1 हजार 883 मते पडली.
                                        


Tuesday 22 October 2019

जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत 66.73 टक्के मतदान

·        7 लाख 32 हजार 869 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
·        सर्वाधिक मतदान अर्जुनी/ मोरगाव मतदार संघात

: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 66.73 इतकी आहे.
जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ हे नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चित केली होती. गोंदिया आणि तिरोडा विधानसभा क्षेत्रातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती.
चारही विधानसभा मतदारसंघ मिळून जिल्हयात 5 लाख 45 हजार 405 पुरुष, 552860 स्त्री मतदार आणि 5 तृतीयपंथी असे एकूण 10 लाख 98 हजार 270 मतदार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात 3 लाख 62 हजार 220 पुरुष, 3 लाख 70 हजार 648 स्त्री आणि 1 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 7 लाख 32 हजार 869 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव-316, तिरोडा-295, गोंदिया-361 आणि आमगाव-310 अशा एकूण 1282 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यापैकी अर्जुनी/मोरगाव मतदारसंघात 32, तिरोडा मतदारसंघात 30, गोंदिया मतदारसंघात 37 आणि आमगाव मतदारसंघात 31 मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग करण्यात आले.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 27 हजार 102 पुरुष, 1 लाख 25 हजार 488 स्त्री आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 52 हजार 591 मतदार असून मतदानाच्या दिवशी 86 हजार 756 पुरुष आणि 88 हजार 179 स्त्री अशा एकूण 1 लाख 74 हजार 935 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी 68.26 आणि स्त्री मतदारांची टक्केवारी 70.27 इतकी असून एकूण टक्केवारी 69.26 इतकी आहे. हा मतदारसंघ आदिवासीबहुल व नक्षलदृष्टया संवदेनशील तसेच काही भाग दुर्गम असतांना देखील मोठया प्रमाणात मतदान झाले.
तिरोडा मतदारसंघात 1 लाख 27 हजार 292 पुरुष, 1 लाख 30 हजार 55 आणि 4 तृतीयपंथी अशा एकूण 2 लाख 57 हजार 351 मतदारांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी 83 हजार 402 पुरुष, 84759 स्त्री, आणि 1 तृतीयपंथी अशा एकूण 1 लाख 68 हजार 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदानाची टक्केवारी 65.52, स्त्री मतदारांची टक्केवारी 65.17 आणि तृतीयपंथी मतदारांची टक्केवारी 25 इतकी असून एकूण टक्केवारी 65.34 इतकी आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात 1 लाख 57 हजार 614 पुरुष आणि 1 लाख 64 हजार 184 स्त्री असे एकूण 3 लाख 21 हजार 798 मतदार आहे. यापैकी 1 लाख 2 हजार 789 पुरुष आणि 1 लाख 4 हजार 947 स्त्री अशा एकूण 2 लाख 7 हजार 736 मतदारांनी 21 ऑक्टोबरला मतदान केले. यामध्ये 65.22 टक्के पुरुष आणि 63.92 टक्के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 64.55 इतकी आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघ हा नक्षलदृष्टया संवेदनशील, आदिवासी बहुल आणि दुर्गम आहे. या मतदारसंघात 1 लाख 33 हजार 397 पुरुष, 1 लाख 33 हजार 133 स्त्री अशा एकूण 2 लाख 66 हजार 530 मतदार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या मतदारसंघात 89 हजार 273 पुरुष आणि 92 हजार 763 स्त्री मतदार अशा एकूण 1 लाख 82 हजार 36 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी 66.92 तर स्त्री मतदारांची टक्केवारी 69.68 इतकी असून एकूण मतदानाची टक्केवारी 68.30 इतकी आहे.
जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात 3 लाख 62 हजार 220 पुरुष आणि 3 लाख 70 हजार 648 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये पुरुष मतदारांची 66.41 टक्के, स्त्री मतदारांची 67.04 टक्के व तृतीयपंथी मतदाराने 20 टक्के असे एकूण 66.73 टक्के मतदान झाले.
जिल्हयाचा काही भाग नक्षलदृष्टया संवेदनशील असतांना या भागातील मतदारांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात मतदान केले. जिल्हयात निवडणूकीच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अप्रिय घटना मतदानाच्या दिवशी घडली नाही.
                                                       

Monday 21 October 2019

जिल्हयात शांततेत अंदाजे 70 टक्के मतदान

                         47 उमेदवारांचे भाग्य मतदानयंत्रात बंद





विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. जिल्हयात शांततेत अंदाजे 70 टक्के मतदान झाले. जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील 47 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्हयातील आमगांव आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हे नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होती.  दोन्ही तालुके हे आदिवासी बहूल असून ग्रामीण व दुर्गम भागातील मतदारांनी सकाळी 7 वाजतापासूनच उत्साहात मतदान केले. गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान झाले. या मतदारंसघातील काही मतदान केंद्रावर  सायंकाळी  6 वाजतानंतरदेखील मतदार रांगेत उभे होते.
जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत 68.77 टक्के, आमगांव मतदारसंघात 57.47 टक्के तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात सांयकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत 63.53 टक्के आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात 61.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी उपलब्ध व्हायची असल्यामुळे जिल्हयात सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 10 लक्ष 98 हजार 270 इतके मतदार आहे. यामध्ये 5 लाख 45 हजार 404 पुरुष आणि 5 लाख 52 हजार 862 स्त्री मतदार तर 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात 5 हजार 13 पुरुष आणि 123 महिला असे एकूण 5 हजार 136 अधिकारी- कर्मचारी मतदान पथकात होते. 552 अधिकारी-कर्मचारी राखीव पथकात ठेवण्यात आले होते. जिल्हयातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पाँईटची व्यवस्था करण्यात आली होती. युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पाँईटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्हयातील गोंदिया येथे दोन, अर्जुनी/मोरगाव येथे दोन, तिरोडा येथे दोन आणि आमगांव या मतदारसंघात एक महिला मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होते. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष ते पोलीस कर्मचारी देखील महिलाच होत्या.  जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव मतदारसंघातील बोंडगावदेवी, तिरोडा मतदारसंघातील खैरबोडी आणि गोंदिया मतदारसंघातील गोंदिया येथील 205 क्रमांकाच्या मतदानकेंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली होती. तर जिल्हयातील चारही मतदारसंघात पाच आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दुपारी 12 वाजता फुलचूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावला. जिल्हयातील दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यांनी देखील उत्साहाने मतदान केले. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्हयात शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
                                                       0000000000000

Wednesday 16 October 2019

गोंदिया व तिरोडात सकाळी 7 ते सायं 6 तर अर्जुनी/मोर व आमगावात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान

     येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ, 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ,65- गोंदिया विधानसभा मतदारसंघ, 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ आणि 66- आमगाव विधानसभा मतदारसंघ हे नक्क्षलग्रस्त भागामध्ये येत असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आहे. तर 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ आणि 65- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत आहेया चारही विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या वेळेची  नोंद घ्यावी. जास्तीत जास्त संख्येने 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

21 ऑक्टोबर रोजी चार विधानसभा मतदारसंघात 10 लक्ष 98 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क


                                                विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019


      विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहेजिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील 10 लक्ष 98 हजार मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 5 लाख 45 हजार 404 पुरुष, 5 लाख 52 हजार 862 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

            अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 27 हजार 102 पुरुष,  1 लाख 25 हजार 488 स्त्री आणि 1 तृतीयपंथी असे एकुण 2 लाख 52 हजार 591 मतदार, तिरोडा विधानसभा क्षेत्रात 1 लाख 27 हजार 291 पुरुष, 1 लाख 30 हजार 57 स्त्री आणि 3 तृतीयपंथी असे एकुण 2 लाख 57 हजार 351 मतदार, गोंदिया विधानसभा क्षेत्रात 1 लाख 57 हजार 614 पुरुष, 1 लाख 64 हजार 187 स्त्री असे एकुण 3 लाख 21 हजार 798 मतदार आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात 1 लाख  33 हजार 397 पुरुष आणि 1 लाख 33 हजार 133 स्त्री मतदार असे एकुण 2 लाख 66 हजार 530 मतदारांचा समावेश आहे.              
          जिल्हयातील  दोन  विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत 9 हजार 339 स्त्री मतदारांची संख्या जास्त आहे. यामध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा 2 हजार 766 स्त्री मतदार आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा 6 हजार 573 स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे.
           जिल्हयात 31 ऑगस्टपर्यंत 10 लाख 96 हजार 441 मतदार होते. 1 सप्टेंबर 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आयोजित मतदार नोंदणी अभियानात 1 हजार 829 मतदारांची वाढ झाली. आता एकुण मतदारांची संख्या 10 लाख 98 हजार 270 इतकी आहे

मानवी श्रृंखलेच्या माध्यमातुन विद्यार्थी, महिला व नागरीकांनी केली मतदार जागृती

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 
                                                     




         येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम व नाविण्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन आज 16 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील पतंगा मैदानापासून ते काटी या गावापर्यंत मानवी श्रृंखला तयार करण्यात आली. ही मानवी श्रृंखला जवळपास 29 कि.मी. अंतराची होती. यामध्ये गावोगावी विद्यार्थीनागरीक, बचतगटांच्या महीला व ग्रामस्थ् तेथे सहभागी झाले होते.
        जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पतंगा मैदान येथे मानवी श्रृंखलेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी गोंदिया विधानसााभाभाभा मतदारसंघाचे निवडणूक निरिक्षक शौकत अहमद परे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, स्वीपचे नोडल अधिकारी एस... हाश्मी, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी राजकुमार हिवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मानवीय श्रृंखलेमध्ये गोंदिया शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, बचतगटातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उत्तम प्रतिसाद देऊन सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी मतदार जागृती करणाऱ्या विविध घोषणा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती मतदार जागृती करणारे संदेश फलक होते. येत्या 21 ऑक्टोबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे हा बालहट्ट घेऊन विद्यार्थ्यांनी या मानवी श्रृंखलेतून मतदार जागृती केली. जिल्हाधिकारी  डॉ. बलकवडे यांनी या मानवी श्रृंखलेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्या पालकांना व शेजाऱ्यांना येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्यास आग्रह धरावा असे आवाहन केले.
          पतंगा मैदान येथून सुरु झालेली मानवी श्रृंखला फुलचुर नाका, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरु चौक, कालेखॉ चौक, पाल चौक, नमाद महाविद्यालय, कुडवा नाका, गुंडीटोला, जब्बार टोला, पांढराबोडी, लईटोला, गिरोला, झिटाबोडी, निलज, दासगाव, तेढवा, मरारटोला ते काटी अशी 29 कि.मी. ची मानवी श्रृंखला तयार करण्यात आली होती. या मार्गावरील अनेक गावातील शाळा,महाविद्यालय, बचतगटांच्या महिला व नागरीक या श्रृंखलेमध्ये गावाच्या मार्गावर सहभागी झाले होते. अनेकांनी या श्रृंखलेकडे कुतुहलाने बघुन मतदार जागृतीमुळे निश्चितच आता येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचा संकल्प केला. मानवी श्रृंखलेदरम्यान जयस्तंभ चौक आणि  गुजराती विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्ल  जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश स्वीपचे नोडल अधिकारी यांना देण्यात आले.
            मानवी श्रृंखलेच्या यशस्वितेसाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच मानवी श्रृंखलेमध्ये सहभागी शाळा,महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच गावोगावातील बचतगटातील महिला व नागरीक यांनी पुढाकार घेतला.


Saturday 12 October 2019

महिलांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा - शौकत अहमद परे

कुंभारेनगर येथे महिला मतदार जागृत मेळावा
* रांगोळी व पोस्टर्स प्रदर्शन



        देशात 50 टक्के महिला आहेत. महिला आणि पुरुषांच्या समस्या वेगळया आहेत. कुटूंबाच्या अर्थाजनाची जबाबदारी महिला यशस्वीपणे पार पाडतात. येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्हयात मतदानाचे प्रमाण कसे वाढेल यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सामान्य निवडणूक निरीक्षक शौकत अहमद परे यांनी केले.
            11 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला जागृती मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून श्री परे बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, कार्यकारी अभियंता श्री विश्वकर्मा, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            श्री परे पुढे म्हणाले, जिल्हयात 6 हजार बचतगटाच्या माध्यमातून 70 हजार महिलांचे संघटन आहे. या संघटनामुळे महिलांची एक शक्ती दिसून येत आहे. त्यामुळे या शक्तीचा वापर जिल्हयात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी होईल. गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकती आज एकही महिला उमेदवार निवडणूक लढवित असल्याचे दिसत नाही. महिलांनी आपली शक्ती दाखविली पाहिजे. महिलांनी स्वत: मतदान करुन अन्य मतदारांना येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदानासाठी प्रोत्साहीत करावे असे सांगितले.
श्री हिवरे म्हणाले माविमच्या माध्यमातून जिल्हयात मोठया प्रमाणात मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यानी येत्या 21 ऑक्टोबरला पालकांकडे मतदानाचा आग्रह धरावा व आपल्या पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. यासाठी हा दिवस आग्रह दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक व त्यांच्या कुटूंबातील मतदार व्यक्ती मतदानासाठी प्रोत्साहीत होवून निश्चितपणे मतदान करतील. असे ते म्हणाले.
श्री खडसे म्हणाले, 25 ऑक्टोबरपासून आपण दिवाळीचा सण साजरा करणार आहोत तत्पूर्वी 21 ऑक्टोबर रोजी आपल्याला लोकशाहीचा उत्सव साजरा करावयाचा आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने स्वयंप्रेरणेने सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावावा. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानामुळे आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला आपला उमेदवार निवडण्याचा हक्क संविधानाने दिला आहे. तरी 21 ऑक्टोबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
प्रास्ताविकातून श्री सोसे म्हणाले, महिलांनी संघटीत करण्याचे काम आणि त्या माध्यमातून त्यांना स्वावलंब होण्याचे काम करण्यात येत आहे. महिला आता संघटीत झाल्या आहेत. बचतगटाच्या माध्यमातून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करण्यात येत आहे. जिल्हयात महिलांच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी काढलेल्या मतदार जागृती करणाऱ्या पर्यावरणपुरक रांगोळ्या  व पोस्टर्सची मान्यवरांनी पाहणी केली. महिलांनी त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रांगोळ्या व पोस्टर्सचे मान्यवरांनी कौतूक केले. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर उपस्थित महिलांनी मतदार करण्याची प्रात्यक्षिके केली. यावेळी उपस्थित महिलांनी मतदान करण्यासाठी संकल्प शपथ पत्राचे वाचन केले. अनेक महिलांनी सेल्फीस्टॅन्डीजवळ आपली सेल्फी काढली व या माध्यमातून मतदार जागृती केली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मोनिता चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला शहरी भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी कुंजलता भुरकुंडे, पुनम साखरे, राम सोनवाने, प्रफुल अवघड, एकांत वरघने, गीता भोयर, पल्लवी बनकर, शालू मेश्राम यांचेसह अन्य सहयोगीनी यांनी पुढाकार घेतला.

मतदारांनो ! स्वयंप्रेरणेने मतदान करा - डॉ. कादंबरी बलकवडे


दिव्यांग मतदार रॅली






          येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी  स्वयंप्रेरणेने मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

दि. 11 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिव्यांग मतदार बांधवांच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखविताना आयोजित कार्यक्रमात डॉ. बलकवडे बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समाजकल्याण सहायक आयुक्त अनिल वाळके, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, गटविकास अधिकारी श्री ईनामदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, ज्येष्ठ नागरिक मुन्ना यादव यांची उपस्थिती होती.
श्री घुगे म्हणाले, केवळ दिव्यांग मतदारांनाच नाही तर इतर मतदारांना सुध्दा या कार्यक्रमाची प्रेरणा मिळणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन जिल्हा मतदानात राज्यात अव्वल कसा राहील यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. रॅलीमध्ये स्विकार मतीमंद स्कुल गोंदिया व मंगलम मुक बधीर स्कुल गोंदिया, मनोहर मुन्सीपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, दिव्यांग मतदार बांधव सहभागी होते. इंदिरा गांधी स्टेडिअम येथून निघालेल्या रॅलीचे विसर्जन नवीन प्रशासकीय इमारतीतील परिसरात करण्यात आले. समारोप प्रसंगी शौकत अहमद परे यांनी आपली उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विस्तार अधिकारी मनोज दिक्षीत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे सुधाकर खोब्रागडे, विनोद परतेकी, अनिता ठेंगडी, कविता नागपूरे, श्रीमती मंगला बडवाईक, दिनेश उके, वशिष्ठ खोब्रागडे, डी.डी. रामटेके, राजेश मते, विजय ठोकणे, श्री सोनकांबळे व इतर दिव्यांग कर्मचारी तसेच दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला.
                                              000000000000    

Monday 7 October 2019

जिल्हयात 47 उमेदवार निवडणूक रिंगणात 24 उमेदवारांची माघार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
       येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हयातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीनंतर 71 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. आज 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 24 उमेदवारांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात 47 उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत. यामध्ये 63- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून 8 उमेदवार, 64 तिरोडा मतदारसंघातून 12 उमेदवार, 65- गोंदिया विधानसभा क्षेत्रातून 18 उमेदवार आणि  66- आमगांव विधानसभा क्षेत्रातून 9 उमेदवार असे एकूण 47 उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहे. यामध्ये 26 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
            जिल्हयातील ज्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे आणि निवडणूक लढवित आहे असे उमेदवार पक्षनिहाय पुढीलप्रमाणे - 63- अर्जुनी/मोरगाव - माघार घेतलेले उमेदवार - आनंदकुमार जांभूळकर, अंजली जांभूळकर, कैलाश डोंगरे, जगन गडपाल, नितीन भालेराव, निशांत राऊत, राजेश नंदागवळी, ॲड. पोमेश  रामटेके, माणिक घनाडे, रत्नदिप दहीवले, रिता लांजेवार, ॲड. विशाल शेन्डे, रिंगणात असलेले उमेदवार मनोहर चंद्रीकापूरे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ), राजकुमार बडोले (भारतीय जनता पार्टी ), शिवदास साखरे (बहूजन समाज पार्टी ), अजय लांजेवार (वंचित बहूजन आघाडी), इंजि. दिलीप वालदे (बहूजन विकास आघाडी), अजय बडोले(अपक्ष), प्रमोद गजभिये (अपक्ष), प्रितम साखरे (अपक्ष), 64 तिरोडा - माघार घेतलेले उमेदवार झामसिंग रहांगडाले, डॉ. नामदेव किरसान, जगदिश बावनथडे, सुरेंद्रकुमार रहांगडाले, रिंगणात असलेले उमेदवार कमल हटवार (बहूजन समाज पार्टी), रविकांत बोपचे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), विजय रहांगडाले (भारतीय जनता पार्टी ), संदिप तिलगामे(वंचित बहूजन आघाडी), धनजंय टेकाम(अपक्ष), दिलीप नारनवरे (अपक्ष), दिलीप बन्सोड (अपक्ष), रामविलास मसकरे(अपक्ष), राजेशकुमार तायवाडे(अपक्ष), राजेंद्र बोंदरे(अपक्ष), विजय तिडके(अपक्ष),  विलास नागदेवे(अपक्ष), 65 गोंदिया - माघार घेतलेले उमेदवार पुढीप्रमाणे रामेश्वर शेन्डे, नामदेव बोरकर, प्रफुल भालेराव, विलास राऊत, प्रदीप वासनिक, बबन शेन्डे व इर फान शिद्दीकी, रिंगणात असलेले उमेदवार गोपालदास अग्रवाल (भारतीय जनता पार्टी ), अमर वराडे(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), धूरवास भोयर(बहूजन समाज पार्टी), अतुल हलमारे(बळीराजा पार्टी), चनीराम मेश्राम(भारतीय शेतकरी कामगार पक्ष) , जनार्दन बनकर(वंचित बहूजन आघाडी), पुरुषोत्तम मोदी(आम आदमी पार्टी), अरुणकुमार चौहान(अपक्ष), कमलेश उके(अपक्ष), कमलेश बावनकुळे(अपक्ष), प्रमोद गजभिये (अपक्ष), जावेद पठाण(अपक्ष), जितेश राणे (अपक्ष), प्रल्हाद महंत (अपक्ष), भूनेश्वर भारद्वाज(अपक्ष), लक्ष्मण मेश्राम(अपक्ष), विनोद अग्रवाल(अपक्ष), विष्णू नागरीकर(अपक्ष),  66- आमगांव - माघार घेतलेले उमेदवार निकेश गावड, रिंगणात असलेले उमेदवार अमर पंधरे (बहूजन समाज पार्टी), सहसराम कोरोटे(भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), संजय पुराम (भारतीय जनता पार्टी ) , उमेशकूमार सरोटे (गोंडवाना गणतंत्र पार्टी) , सुभाष रामरामे ( वंचित बहूजन आघाडी), ईश्वरदास कोल्हारे (अपक्ष), उर्मिला टेकाम (अपक्ष), निकेश गावड (अपक्ष), रामरतन बापू राऊत (अपक्ष) यांचा समावेश आहे.
                                

Saturday 5 October 2019

निवडणूक निरीक्षक जिल्हयात दाखल

       विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता भारत निवडणूक आयोगाने जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक जिल्हयात दाखल झाले आहे.
       जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघाकरीता सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून श्री मंजूर अली (7820879236), 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. राजीव मेहता (7820877981), 65- गोंदिया विधानसभा संघाकरीता श्री शौकत अहमद प्यारे (7820890970), 66- आमगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री धनजंयसिंग भदोरीया (7620752181), पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून 63- अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री धर्मवीर (9454401662),64- तिरोडा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. सुधीर कुमार पोरीका (8344428152), 65- गोंदिया विधानसभा संघाकरीता श्री जी.जी.पांडे (9425060369), 66- आमगांव विधानसभा मतदारसंघाकरीता श्री टी. इक्का (9479190820) यांची नियुक्ती केली . सामान्य निवडणूक निरीक्षक हे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उपस्थित असणार आहेत. निवडणूकीसंबंधी असलेल्या तक्रारी व समस्यांच्या निराकरणासाठी संबंधित मतदारसंघातील नागरिकांनी संपर्क साधावा.
                                                   

निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक तयारीचा आढावा




      जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सामान्य निवडणूक निरीक्षक आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांनी 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हयातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सामान्य निवडणूक निरीक्षक सर्वश्री मंजूर अली(अर्जुनी/मोरगाव), श्री राजीव मेहता (तिरोडा), श्री शौकत अहमद प्यारे(गोंदिया), श्री धनंजयसिंग भदोरीया (आमगाव), पोलीस निवडणूक निरीक्षक श्री धर्मवीर(अर्जुनी/मोरगाव), श्री सूधीरकुमार पोरीका(तिरोडा), श्री जी. जी. पांडे (गोंदिया), श्री टी. ईक्का (आमगाव), गोंदिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्हयाला लागून गोंदिया जिल्हयाची सीमा आहे. जिल्हयातील आमगांव आणि अर्जुनी/मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे. या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 या दरम्यानची आहे. तर गोंदिया आणि तिरोडा या मतदारसंघातील मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
         18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या, मतदार जागृतीसाठी जिल्हयात 103 ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनीट वापरण्यात येत आहे. मतदान केंद्राची माहिती मतदान केंद्रावर असलेल्या सुविधा, निवडणूक प्रक्रीयेसाठी असलेले मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, सीव्हीजीलवर प्राप्त तक्रारी तसेच जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात 10 लक्ष 96 हजार 441 मतदार आपला मतदानाचा हक्क 1282 मतदान केंद्रावरुन बजावणार आहे.        
        निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी सूचविले की, मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे. त्या ठिकाणी मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवावे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यास मदत होईल.  ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे त्याची कारणे शोधून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी पुढाकार घ्यावा. उमेदवाराच्या प्रत्येक बातमीवर लक्ष असावे. ते प्रचारासाठी वापरणार असलेल्या ध्वनीचित्रफित, बल्क एसएमएस, जाहिराती याबाबतची पूर्व परवानगी घेवूनच त्यांचे प्रसारण करावे असे सांगितले. 1950 तक्रार नंबरवर प्राप्त तक्रारीची माहिती घेतली. मोबाईल कवरेज एरीया जिल्हयात कोणत्या क्षेत्रात नाही याबाबतची देखील त्यांनी माहिती घेतली.
            सभेला उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, पोलीस उपअधीक्षक(गृह) सोनाली कदम, खर्च विषयक बाबीचे नोडल अधिकारी विकास राऊळकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री जाधव, उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री तांबे, सीव्हीजीलच्या नोडल अधिकारी प्रणती बुलकुंडे  यांचेसह अन्य नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सादरीकरणाद्वारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री चौधरी यांनी निवडणूक तयारीची अन्य माहिती दिली.
                                                       000000000000



Wednesday 2 October 2019

गांधी जयंती निमित्ताने तिरोडा जि.प. हायस्कुलमध्ये स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रम


तिरोडा येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज 2 ऑक्टोबर रोजी मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातुन मतदानाचा टक्का वाढावा आणि त्याचे महत्त्व कळावे. यासाठी विविध प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन विद्यार्थी घोषणा देत जनजागृती करीत होते. या रॅलीला प्राचार्य आर.वाय. जैतवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रॅलीला प्राचार्य श्री. जैतवार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही रॅली  जिल्हा परिषद हायस्कुल ते मोहनलाल चौक. गुरुदेव चौक, भूतनाथ मंदिर, राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, सपना फॅशन चौक, पोलीस स्टेशन या मार्गाने घोषणा देत विद्यार्थ्यांनी रॅलीचा समारोप  केला.

गांधी जयंती निमित्ताने जिल्हा परीषदेत स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रम



राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज 2 ऑक्टोबर  रोजी स्वच्छता दिन  व मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परीषद गोंदिया येथे करण्यात आले. यावेळी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.इ.ए हाश्मी यांनी उपस्थित अधिकारी/ कर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परीषद इमारतीच्या परीसरात स्वछता मोहीम राबविली. यावेळी एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिक चहा के कप, नास्ता प्लेट, चम्मच, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक ग्लास इत्यादिचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, रेश भांडारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, सांख्यीकी अधिकारी वैशाली खोब्रागडे, आयटी विषय सहायक दिनेश उके, दिलीप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.