जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 1 October 2019

मतदानात जिल्हा अव्वल राहण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती


: जिल्हयात जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे करता येईल व राज्यात गोंदिया जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत अव्वल कसा राहील यासाठी निवडणूक विभाग मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. मतदारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देवून जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रोहन घुगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी,  मतदार जनजागृती कार्यक्रमातून जिल्हा नोडल अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे म्हणाल्या, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हयात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा राज्याच्या सीमेवर असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा जिल्हयाला लागून आहे. जिल्हयाचा काही भाग आदिवासी बहुल असून नक्षलदृष्टया संवेदनशील आहे. तरी जिल्हा राज्यात मतदानात अव्वल कसा राहील यासाठी मतदान जनजागृती कार्यकम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयातील विविध शाळा, महाविदयालयाच्या माध्यमातून विद्यार्थी या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. बलकवडे पुढे म्हणाल्या, आतापर्यंत 611 कॅम्पस ॲम्बेसिडरची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी वाचन कार्यक्रम चित्रकला स्पर्धा, विद्यार्थी उदबोधन, व्याख्यानमाला, प्रभातफेरी, दिव्यांग मतदारांना विशेष सुविधेबाबत माहिती देणे, नव मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार यादीत आपले नाव शोधणे (Go verify), मतदार मदत ॲप इन्स्टॉल करणे , रांगोळी स्पर्धा, जनजागृती रॅली काढणे, शॉर्ट फिल्म स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धा, मानव श्रृंखला तयार करणे, वॉल पेटींग, वॉकेथॉन, दिव्यांग मतदार रॅली, बचत गटामार्फत जनजागृती अभियान संकल्प पत्र स्वाक्षरी इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. Go verify उपक्रमाअंतर्गत जिल्हयात 2368 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीत बघितले आहे. तसेच मतदार मदत ॲप्स त्यांनी इन्स्टॉल केले आहे. स्वीप उपक्रमाअंतर्गत 49,807 विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयात 10 लाख 96 हजार 441 मतदार असून एका महिन्यात या मतदारामध्ये 1564 इतकी वाढ होवून आता जिल्हयातील मतदाराची संख्या 10 लाख 98 हजार 5 इतकी आहे. तर सेनातदलातील मतदार 1792 आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 4 ऑक्टोबर हा आहे. आमगांव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आणि तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी यावेळी दिली.
            निवडणूकीसाठी 16 भरारी पथके, 15 स्थिर सर्वेक्षण पथक , 25 व्हीडीओ सर्व्हेलन्स पथक कार्यरत असून आचारसंहिता अमलात आल्यापासून उत्पादन शुल्क विभागाने 31 केसेस दाखल केले असून 14 लाख 587 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सी व्हीजील ॲप्सच्या माध्यमातून मोबाईलद्वारे निवडणूक विषयक तक्रारी करता येणार असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली.                                                                                                                        श्री शिंदे म्हणाले, पोलीस विभागाने निवडणूक विषयक प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. जिल्हयातील सर्व 834 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहे. बँक सुरक्षीततेसाठी काही शस्त्रे त्यांच्याकडे देण्यात आली आहे. अवैध दारु विक्रीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयात 7 आंतरराज्यीय सीमेवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक मतदारसंघासाठी पोलीस विभागाचा निवडणूक कक्ष गठीत करण्यात आला आहे. गुंडांच्या तडीपारीचे 11 प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment