जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 28 February 2017

मराठी भाषेचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी - युवराज गंगाराम

                                                          मराठी भाषा गौरव दिन साजरा
                         




      मराठी भाषेचे वैभव आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तिची जोपासना व संवर्धन करणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे मत कवि व ज्येष्ठ साहित्यिक युवराज गंगाराम यांनी व्यक्त केले.
      28 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात जिल्हा ग्रंथालय कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. यावेळी एस.एस.गर्ल्स कॉलेजच्या प्रा.डॉ.कविता राजाभोज, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.सविता बेदरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     श्री.गंगाराम पुढे म्हणाले, आपली मातृभाषा मराठी आहे. मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले, आज आपल्याला मराठी भाषेचे चिंतन व विचार करण्याची गरज आहे. मराठी भाषेचे भवितव्य सुरक्षीत आणि समृध्द करण्यासाठी मराठीच्या विविध बोलींची जोपासना केली पाहिजे. कोणत्याही साहित्याला वाङमयीन मुल्य असते. त्यामुळे मराठी भाषेची सर्जनशीलता वाढविली पाहिजे. माणसाला कोणत्याच प्रकारची गरीबी नको, तर भाषेची सुध्दा गरीबी नको. माणसांनी माणसासोबत संवाद करायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रास्ताविकातून श्री.बोपचे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या वतीने 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही आपण सर्वांची मायबोली आहे. आपल्या मराठी भाषेला चांगले दिवस यावेत तसेच सामान्य जनतेपर्यंत मराठी भाषा पोहोचावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कविवर्य कुसुमाग्रजांचे नटसम्राट साहित्य फार प्रचलीत आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.खडसे म्हणाले, कोणत्याही कार्यक्रमाला जावून त्यांचे प्रबोधन ऐकूण आपली विचारशक्ती प्रगल्भ होत असते. भविष्यात आपली विचारशक्ती आपले भविष्य घडविते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व खुप परिश्रम करुन अभ्यास करावा व प्रशासकीय नोकरी मिळवावी. एकीकडे मराठी भाषेची होत असलेली अधोगती पाहता मराठी भाषेचे संवर्धन, संरक्षण व प्रचार-प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या मातृभाषेचे आपण संवर्धन व संरक्षण केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले, मराठी भाषा चांगली प्रगल्भ व्हावी यासाठी राज्य शासनाच्या विभागात मराठी भाषा विभाग कार्यरत आहे. नक्कीच एक दिवस आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा व चांगली विचारसरणी निर्माण व्हावी यासाठी साहित्यिकांनी लिहिलेले विचार आत्मसात करुन आपली विचारसरणी प्रगल्भ करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रा.बेदरकर म्हणाल्या, संतांनी मराठी भाषेच्या वृध्दीसाठी फार मोठा हातभार लावला. ‘लाभले अम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी’ असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येकाने आपल्या घरी तरी मराठी बोलावे. जेवढी मराठी भाषा बोलू तेवढी भाषा समृध्द होईल. मूळ मराठी भाषा लोप पावत चालली आहे. मराठी भाषेची कुठेतरी गडचेपी होत आहे असे दिसून येत आहे, त्यासाठी भाषेचे महत्व लक्षात घेवून भाषा वाचवनं अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये मातृभाषेचे गुण असावे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आशावादी जाणवते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रा.डॉ.राजाभोज म्हणाल्या, मराठी ही आमची मातृभाषा आहे. आपली मातृभाषा अत्यंत रसाळ आहे. इंग्रजी ही भाषा सुध्दा आपल्याला समजली पाहिजे. मराठी भाषेची प्रत्येकाने जोपासना केली पाहिजे. मातीचीच भाषा मातीचीच भूमी, तिचे स्थान इंग्रजीपेक्षा का कमी. आन मराठी, मान मराठी, सकल जणांची शान मराठी. कविवर्य कुसुमाग्रजांचे विशाखा काव्यसंग्रह साहित्य त्यांचे भूषण मानले जाते. भाषा मागे पडली तर संस्कृती मागे पडते आणि सृष्टीचा संबंध भाषेशी आहे. आपण आपल्या मातृभाषेचा बोलण्यात वापर केला तर खरोखरच आपण मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवायला मागे पडणार नाही. इंग्रजी भाषेचे पाय न तोडता आपण आपल्या मराठी भाषेला टिकवून ठेवले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी जिल्हा ग्रंथालय कार्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मयुर हुमणे व भूपेश शहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शेषराव भिरडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पंकज घारपिंडे यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.


Sunday 26 February 2017

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्त्याचे भूमीपूजन

      
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 25 फेब्रुवारी रोजी तिरोडा तालुक्यातील चुरडी फाटा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चुरडी-चिखली-लेंडीटोला ते इंदोरा/खुर्द रस्त्याच्या 9 कि.मी.लांबीच्या दर्जोन्नती कामाचे भूमीपूजन केले. या कामावर 4 कोटी 50 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, जि.प.सदस्य रजनी कुमरे, पं.स.सदस्य पवन पटले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चिंतामन रहांगडाले, सलाम शेख, भाऊदास कठाणे, चुरडीचे सरपंच सचिन कराडे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सोनेगाव येथे तलाव खोलीकरण व नूतनीकरणाचे भूमीपूजन


     तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलाव खोलीकरण व नूतनीकरणाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 25 फेब्रुवारी रोजी केले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, जि.प.माजी उपाध्यक्ष मदन पटले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन चिंतामन रहांगडाले व डॉ.वसंत भगत, सलाम शेख, पं.स.पवन पटले, श्रावण रहांगडाले, तहसिलदार श्री.चव्हाण, तालुका कृषि अधिकारी श्री.पोटदुखे यांची उपस्थिती होती.

     या कामावर 31 लक्ष रुपये खर्च येणार आहे. पालकमंत्री यावेळी म्हणाले, रब्बी व खरीप हंगामात सिंचनाची योग्य सुविधा नसल्यामुळे पिकांना फटका बसतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकरी खचून जातो व निराश होतो. शेतीची उत्पादकता व भूगर्भातील पाण्याची साठवणूक वाढविण्यासाठी मागील दोन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार रहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री.वासनिक यांनी, तर उपस्थितांचे आभार डॉ.वसंत भगत यांनी मानले. कार्यक्रमाला सोनेगावच्या ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तिरोडा शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - पालकमंत्री बडोले


बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन
      तिरोडा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहर वासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      25 फेब्रुवारी रोजी नगरपरिषद गांधी विद्यालय तिरोडा येथील परिसरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदानातून 4 कोटी 71 लक्ष रुपयांच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, माजी आमदार भजनदास वैद्य, माजी आमदार हरीश मोरे, न.प.उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, माजी नगराध्यक्ष अजयसिंह गौर, मुख्याधिकारी श्री.उरकुडे यांची उपस्थिती होती.
     पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, तिरोडा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. नगरपरिषदेने जो विकास आराखडा तयार केला आहे त्यानुसार कामे होत आहेत का हे महत्वाचे आहे. कामे झाली असतील तर सिटी सर्व्हेक्षण करुन आराखडा पुन्हा तयार करण्यात येईल. विकास करतांना आराखड्यानुसार कामे झाली पाहिजेत. नागरी सुविधांची कामे तिरोडा शहरात करण्यात येतील.
     नगरोत्थान योजनेतून निधी देणार असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, महात्मा फुले वार्डातील वन जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न त्रुटी दूर करुन सुटला पाहिजे. याबाबत लवकरच बैठक घेवून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. शहरातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना 2019 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी घरकूल योजना या योजनांमधून घरकुल बांधून देण्यात येतील. तिरोडा नगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    आमदार रहांगडाले म्हणाले, सत्तेत आल्यानंतर काम करण्याची जबाबदारी येते. तिरोडा नगरपालिकेने शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. विकासाला आवश्यक तो निधी विविध विभागांकडून व योजनातून मिळवून देण्यात येईल. शहराच्या विकासाचे नगरपरिषदेने सुक्ष्म नियोजन करावे असेही ते म्हणाले.
     नगराध्यक्ष श्रीमती देशपांडे म्हणाल्या, तिरोडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीयांनी एकत्र यावे. जनतेने आपल्याला निवडून देवून विकास करणार असल्याचा विश्वास टाकला आहे. येत्या पाच वर्षात तिरोडा शहराचा चेहरा-मोहरा बदललेला दिसेल असेही त्या म्हणाल्या.
     उपाध्यक्ष पालांदूरकर म्हणाले, येत्या दोन वर्षात सुसज्ज असे सभागृह उभारुन पूर्ण होईल. त्यामुळे या सभागृहाचा उपयोग विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करता येईल. येणाऱ्या काळात तिरोडा शहरात जलतरण तलाव सुध्दा बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला तिरोडातील नागरिकांची विशेषत: महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री.उरकुडे यांनी केले.
                        �े त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला तिरोडातील नागरिकांची विशेषत: महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री.उरकुडे यांनी केले

शिक्षण,आरोग्य व रोजगार निर्मितीला प्राधान्य - राजकुमार बडोले



बेरडीपार प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन
      अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आता पूर्ण झाली आहे. मागील अनेक वर्षापासून जी कामे झाली नाही ती कामे आता होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांची अंमलबजावणी करतांना आपले शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मितीला प्राधान्य राहील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      25 फेब्रुवारी रोजी तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जि.प.माजी उपाध्यक्ष मदन पटले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, जि.प.सदस्य रजनी कुमरे, पं.स.सदस्य डॉ.ब्रिजलाल रहांगडाले, पवन पटले, रगनीक सयाम, तुमेश्वरी बघेले, भाऊदास कठाणे, सलाम शेख, बेरडीपारच्या सरपंच ज्योत्सना टेंभेकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत भगत, सेजगावच्या सरपंच मिनेश्वरी पारधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     पालकमंत्री बडोले म्हणाले, तिरोडा तालुक्यातील भानपूर व बेरडीपार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नविन पध्दतीची इमारत इथे लवकरच उभी राहणार आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या भागातील रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता रस्ते विकासाची कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येतील. तालुक्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी समाधान शिबीर घेण्यात यावी अशी उपयुक्त सूचना त्यांनी यावेळी केली.
     माजी आमदार पटले म्हणाले, लोकांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरचे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहणार आहे. शासन अनेक योजना लाभार्थ्यांसाठी राबवित आहे. त्या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात विकासाला गती मिळाली आहे. धापेवाडा उपसा सिंचनचे पाणी खडबंदा तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
     आमदार रहांगडाले म्हणाले, आरोग्याच्या सुविधा या भागातील नागरिकांना मिळाव्या यासाठी बेरडीपार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. इमारत आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषधी नाही अशी स्थिती भविष्यात राहणार नाही याची ग्वाही देवून श्री.रहांगडाले पुढे म्हणाले, 5 कोटी 50 लाख रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात येणार आहे. प्रत्येक लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे. जनतेने जी पाच वर्षासाठी जबाबदारी दिली आहे ती निश्तिच पूर्ण करण्यात येईल. जिल्हा परिषदेने या क्षेत्राच्या रस्ते विकासासाठी निधी दयावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरपंच श्रीमती टेंभरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

     कार्यक्रमाला बेरडीपार व परिसरातील गावातील नागरिकांची, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर.टेंभूर्णे यांनी मानले.

Friday 24 February 2017

वन व्यवस्थापनातून गावे समृध्द करा - राजकुमार बडोले

                                                सोदलागोंदी येथे निसर्ग पायवाटचा शुभारंभ
          ग्राम वन आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनालगतच्या गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. या गावांनी आता वनांचे योग्य व्यवस्थापनातून रोजगार निर्मिती करुन गावे आर्थिकदृष्ट्या समृध्द करावी. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       24 फेब्रुवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील ग्राम वन सोदलागोंदी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने वन महोत्सव व निसर्ग पायवाटचा शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, पं.स.सभापती दिलीप चौधरी, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य ज्योती वालदे, पं.स.सदस्य अलका काटेवार, ललिता बहेकार, सहायक वनसंरक्षक एस.एस.शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम.जाधव, पोलीस निरिक्षक सुरेश कदम, बुरड कामगार नेते लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, न.प.उपाध्यक्ष नितीन बारेवार, मुरदोली सरपंच ससेंद्र भगत, पोलीस पाटील दिलीप मेश्राम, ग्राम वन समितीचे अध्यक्ष बाबुलाल फरदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंद राऊत, मुंडीपारच्या सरपंच सिंधू मोटघरे यांची उपस्थिती होती.
      याप्रसंगी बडोले पुढे म्हणाले, इथल्या नागझिरा महिला बचतगटाने मोहाचे लोणचे, लाखेपासून बांगड्या तयार केल्या असून निर्धुर चुलीचे उत्पादन सुध्दा येथे होत आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत चांगले पाऊल इथल्या ग्रामस्थांनी उचलले आहे. महिलांच्या बचतगटाला कर्जपुरवठा उपलब्ध करुन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुला बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. आदिवासी उपयोजने अंतर्गत जे लाभार्थी गॅस कनेक्शनपासून वंचित आहेत त्यांना कनेक्शन देण्यात येईल. या गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा कायम सुरु राहील असे त्यांनी सांगितले.
      आरोग्याच्या सोयीसुविधा इथे नसल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, भविष्यात या भागातील काही गावांसाठी आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यासाठी आणि या गावापासून ग्रामपंचायतचे अंतर जास्त असल्यामुळे या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत तयार झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जागा उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांना सभा मंडप बांधून देण्यात येईल. हा भाग अभयारण्य लगत असल्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान आणि प्रसंगी जिवितहानी होत असल्यामुळे वन विभागाकडून वेळीच मोबदला देण्यात येईल. गावाजवळील तलावाचे खोलीकरण करुन पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून 300 हेक्टर जंगलाचे व्यवस्थापन करण्यात येत असल्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.रामगावकर म्हणाले, सोदलागोंदी हे गाव वनसंपदेने नटलेले आहे. या गावातील लोकांनी वन आणि वन्यप्राण्यांना आपल्या मनात जागा दिली आहे. शासनाच्या विविध योजना या गावात राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य प्रशासनाला मिळत आहे. इथल्या महिला आणि पुरुषांनी लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने या व्यवसायाला महत्व आले आहे. निसर्ग पायवाट तयार केल्यामुळे पर्यटकांची पाऊले सोदलागोंदीकडे वळतील. पर्यटनातून होम स्टे ची सुविधा या गावात भविष्यात उपलब्ध होणार आहे. तलावाच्या परिसरात पक्षी निरिक्षण मनोरा बसविण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
     श्री.चौधरी म्हणाले, निसर्गाच्या सानिध्यात येथील लोक जीवन जगत असल्यामुळे ते भाग्यवान आहेत. सर्वच प्रकारच्या प्रदुषणापासून ते दूर आहेत. वन आणि मानवाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे वनांचे रक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. वन विभाग या गावासाठी अनेक योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य श्रीमती वालदे, श्री.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
      पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोदलागोंदी गावाजवळ असलेल्या तलाव परिसरातील शिवमंदिरात जावून मूर्तीची व वृक्षाची पूजा केली.

      यावेळी महाराष्ट्र हरित सेनेत सोदलागोंदी हे गाव सहभागी झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते रुपलाल डोल्हारे व अन्य ग्रामस्थांना तसेच नागपूर परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत आदिवासी विभागातून दुसरा आलेल्या चेतन राऊत याचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सरपंच ससेंद्र भगत यांनी केले. कार्यक्रमाला सोदलागोंदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवेगावबांधला गत वैभव प्राप्त करुन देणार - पालकमंत्री बडोले

                                                                  बोटींगचा शुभारंभ
                       
                                       
                                                                                निसर्गाने नवेगावबांधला भरभरुन दिले आहे. परंतू आजपर्यंत तलाव परिसरात असलेल्या नैसर्गीक साधन संपत्तीचा योग्य वापर झालेला नाही. इथे जास्तीत जास्त पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नवेगावबांध तलाव परिसराला गत वैभव प्राप्त करुन देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
      24 फेब्रुवारी रोजी नवेगावबांध जलाशय परिसरात वन विभागाच्या नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बोटींगचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, माजी आमदार तथा नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम कापगते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी व्ही.जी.उदापुरे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे, माजी सरपंच रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, अण्णा-पाटील डोंगरवार, रामदास बोरकर, विजय डोये, घनश्याम चांदेवार यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, नवेगावबांधला येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर आहे. परंतू येथे सुविधा नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. आता बोटींगचा सुविधा सुरु झाली आहे. भविष्यात इथे बिचेस, रोप वे, वॉटर पार्क तयार करुन याचे सौंदर्य जपतांना येत्या दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीने इथे रिसॉर्टची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. बोटींग करतांना कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटकांचा ओढा वाढल्यानंतर बोटींगची संख्याही वाढविण्यात येईल. असेही ते यावेळी म्हणाले.
      डॉ.रामगावकर म्हणाले, नवेगावबांध जलाशयात बोटींगचा शुभारंभ हा इथल्या पर्यटनाची सुरुवात आहे. भविष्यात इथे अनेक योजना राबवायच्या आहेत. पर्यटकांना चांगल्या सुविधा करुन देण्यासाठी वन विभाग पुढाकार घेईल. पर्यटन वाढल्यास बेरोजगारांच्या हाताला काम सुध्दा उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची आवड या भेटीतून निर्माण होईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
     माजी आमदार कापगते म्हणाले, नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी अभयारण्य आहे. हा परिसर विविधतेने नटलेला आहे. त्याचा विकास झाला पाहिजे. अभयारण्यात चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. पर्यटकाला या परिसरात आल्यानंतर संपूर्ण दिवसभर फिरण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आता इथे बोटींगची सुविधा उपलब्ध झाली आहे. भविष्यातही आणखी सुविधा इथे निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      बोटींगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या 2 रोवींग बोट, दोन व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या 2 पॅडल बोट आणि 2 कॅग बोट बोटींगच्या सुविधेसाठी उपलब्ध झाल्या आहे. 20 बेरोजगार युवकांनी याचे प्रशिक्षण घेतले असून 3 जणांनी लाईफ गार्डचे प्रशिक्षण घेतले आहे. बोटींगची फी 20 मिनिटांसाठी 30 रुपये आकारण्यात येणार आहे.
      कार्यक्रमाला नवेगावबांध संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.खान यांनी केले. उपस्थितांचे आभार वन विभागाचे श्री.शेंडे यांनी मानले.

Thursday 23 February 2017

मानव विकास निर्देशांक वाढीसाठी रोजगार निर्मितीवर भर देणार - राजकुमार बडोले






गोरेगावात 16827 लाभार्थी लाभान्वयीत
महावितरण महासमाधान शिबीर
         महासमाधान शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि वस्तु स्वरुपात मदत करण्यात आली आहे. केवळ यावरच समाधान न मानता आता जिल्ह्याच मानव विकास निर्देशांक वाढीसाठी वनावर आधारीत व्यवसाय, मत्स्योत्पादन, दुग्धव्यवसाय आणि उद्योग वाढीच्या चालनेतून आता रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      आज 23 फेब्रुवारी रोजी गोरेगाव पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित महावितरण महासमाधान व दिव्यांग स्वावलंबन अभियानाच्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी,  उपसभापती बबलु बिसेन, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, रोहिणी वरकडे, रजनी सोयाम, पं.स.सदस्य श्री.गजभिये, पुष्कराज जनबंधू, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, लक्ष्मण भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दिव्यांग स्वावलंबन अभियानाची राज्यात सुरुवात गोंदिया येथूनच झाली आहे. या शिबिरात 426 दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात आला आहे. जवळपास 51 योजनांचा लाभ या तालुक्यातील 16827 लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. अपंगांना 3 टक्के घरकुल व नोकरी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्यासाठी 3 टक्के ग्रामपंचायतचा निधी खर्च झाला पाहिजे. नक्षलग्रस्त भागासाठी निधी खर्च करतांना सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
      जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती नोकरीला लागावेत यासाठी एमपीएससी व युपीएससीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणार असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, कौशल्य विकासासाठी बार्टीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल. विविध लाभार्थ्यांना व पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, कलपाथरी प्रकल्पात ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.
      आमदार रहांगडाले म्हणाले, शासन विविध योजना राबविते. परंतू गरजू लोकांपर्यंत त्या पोहचत नाही. या शिबिराच्या योजना पोहोचविण्यास मदत होत आहे. प्रत्येक विभाग या निमित्ताने लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देत आहे. शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठ्यांनी पार पाडावी. जिल्ह्यातील बेरोजगार, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न सुटले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
     श्री.काळे म्हणाले, गरजु लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे महासमाधान शिबीर उपयुक्त ठरले आहे. भविष्यात मोबाईच्या माध्यमातून योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. अशाच प्रकारचे काम भविष्यातही सुरुच राहील असेही ते म्हणाले.
      डॉ.भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात हे समाधान शिबीर यशस्वीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणांना आणून सुसूत्रतेने लोकांच्या कल्याणाचे काम पालकमंत्री करीत आहेत. पोलीस विभाग आपल्या कर्तव्यावर दक्ष राहून जिल्ह्यात काम करीत आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून युवावर्ग नक्षलप्रवाहात न जाता विकास प्रक्रियेत यावा यासाठी रोजगार निर्मितीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.पटले म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिबिराची मदत झाली आहे. अडचणीतील लोकांना न्याय देण्याचे काम प्रशासनाने करावे. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.
      पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी प्रांगणात लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग स्वावलंबन अभियानाअंतर्गत आवश्यक कृत्रिम अवयव व साहित्य तसेच विविध महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच योजनेच्या लाभार्थ्यांना वस्तुस्वरुपात मदत करण्यात आली. आवश्यक ती कागदपत्रेही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
     यावेळी गोरेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, अनेक गावातील नागरिक व विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी मानले.
            

Wednesday 22 February 2017

शेतकऱ्यांनो ! नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नगदी पिकाची कास धरा - पालकमंत्री बडोले

                                                  दवनीवाडात कृषि व पशुपक्षी प्रदर्शन
                       





   शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय चांगल्याप्रकारे करावा. आता केवळ धानावर अवलंबून न राहता शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नगदी पिकाची कास धरावी. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

      दवनीवाडा येथे 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषि व पशुपक्षी प्रदर्शन तसेच शेतकरी व पशुपालक मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, पं.स.उपसभापती श्री.भक्तवर्ती, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, वनिता पटले, श्रीमती ठाकरे, दवनीवाडा सरपंच तिजाबाई मस्करे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अनिल गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक, गटविकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, डॉ.पी.आर.सय्यद, निलकंठ लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
     श्री.बडोले पुढे म्हणाले, प्रदर्शन व मेळाव्याचा शेतकरी व पशुपालकांना फायदा झाला पाहिजे. पशुपालकांनी जास्त दूध देणाऱ्या गाई-म्हशींचे संगोपन करुन त्यांना चांगला पशुआहार दयावा. कुक्कुट पालनाकडेही लक्ष दयावे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतांना सेंद्रीय शेती करावी. त्यामुळे उत्पादीत मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी पिकांचे नियोजन करावे.
      या क्षेत्रातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, दवनीवाडाला तालुक्याचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी जूनी आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे. तेव्हाच शेतीची प्रगती झालेली दिसेल असे ते म्हणाले.
      आमदार रहांगडाले म्हणाले, शेतीपुरक जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन व कुक्कुटपालन हा चांगल्याप्रकारे करता येवू शकतो. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची पोत बिघडली आहे. पण आज शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे. शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले पाहिजे यासाठी कृषी विभागाने शेतीतील मातीचे परीक्षण करावे. कृषि विभागाने योग्य मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना शेती करण्याची दिशा मिळेल. विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       यावेळी छाया दसरे, डॉ.पुलकुंडवार, डॉ.वासनिक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित कृषि व प्रदर्शनी, विविध संकरीत गाई, म्हशी, कोंबड्या, शेळी, पशुखादय, विविध प्रकारचे सेंद्रीय खते प्रदर्शनीत लावण्यात आली होती. तसेच विविध शेतकऱ्यांचे भाजीपाला, फळे यांचे स्टॉल, बियाणे, खते कंपन्यांचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले होते. या मेळाव्याला दवनीवाडा परिसरातील अनेक गावातील शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वासनिक यांनी केले. संचालन डॉ.महेश राठोड यांनी केले. उपस्थितांचे आभार वंदना शिंदे यांनी मानले.




महासमाधान शिबीरे ही लोकचळवळ व्हावी - राजकुमार बडोले

                                                                 महासमाधान शिबीर
                            सडक/अर्जुनीत 18,384 लाभार्थ्यांना लाभ






         शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. या शिबिरातून शासन आपल्या दारी आले आहे. गरजु व पात्र लाभार्थी हा योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी महासमाधान शिबिरे ही लोकचळवळ झाली पाहिजे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
     सडक/अर्जुनी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आज 22 फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित महावितरण महासमाधान आणि दिव्यांग स्वावलंबन अभियानाच्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, पं.स.सभापती कविता रंगारी, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, सडक/अर्जुनी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स.उपसभापती विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, श्रीमती मडावी, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.अविनाश काशीवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाभळे यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून 51 योजनांचा लाभ गावपातळीवरच्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. या शिबिरामुळे गावातील कोणत्या कुटुंबांना किती योजनांचा लाभ दिला तसेच किती योजनांच्या लाभाची आवश्यकता आहे याची परिपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याची आवश्यकता आहे. यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे शिबिराच्या माध्यमातून  18,384 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. गावातील कुटुंबांना जास्तीत जास्त गॅस कनेक्शनचे वितरण वन विभागाने करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
     राज्याचा समाजकल्याण मंत्री म्हणून अनेक योजना कार्यान्वीत केल्याचे सांगून लंडन येथील डॉ.आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर खरेदी केले. इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 125 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील डव्वा, कालीमाटी येथील बौध्दविहार आणि गोंदिया येथील भिमघाटाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात ओबीसी मंत्रालयाचे कामकाज सुरु होईल. नवेगावबांध येथे 8 कोटी रुपये खर्चून रिसॉर्टचे बांधकाम सुरु आहे. प्रतापगड विकासाला गती मिळाली आहे. मामा तलावांची दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती, मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना गावांसाठी कार्यान्वीत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     श्रीमती गहाणे म्हणाल्या, शासन विविध घटकांसाठी योजना राबविते. या भागातील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात योजनांचा लाभ मिळाला नाही. या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे.पूर्वी एका कागदपत्राच्या पूर्ततेसाठी अनेकदा विविध कार्यालयात लाभार्थ्याला चकरा माराव्या लागत होत्या. मात्र या शिबिरामुळे लाभार्थ्याला जागेवरच लाभ देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात बहुतांशी नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
     डॉ.रामगावकर म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देखील मिळत आहे. जिल्ह्यात 50 टक्के पेक्षा जास्त वने असल्यामुळे अनेकांना त्याचा लाभ होत आहे. गेल्या दोन वर्षात 18 हजार कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे. अनेक योजना आता ऑनलाईन झाल्या आहेत. गावाशेजारी असलेल्या वनाची जबाबदारी ग्रामस्थांवर सोपविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
     श्री.मोहिते म्हणाले, वेगवेगळी प्रमाणपत्र व साहित्य वितरण करण्यासाठीच शिबिराचे आयोजन करण्यात येत नसून तर जनसामान्यांचे प्रश्न लोकप्रतिनिधीसमोर मांडण्याची ही संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रत्यक्ष लाभ देवून पूर्ण करण्यात येत आहे. प्रत्येक गाव व नागरिकाला आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी शासन कार्यरत आहे. लोकांचे समाधान या शिबिरातून करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती रंगारी म्हणाल्या, ज्यांना या शिबिरात योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांनी निराश होऊ नये. कागदपत्रांची पूर्तता करुन भविष्यात योजनांचा लाभ घ्यावा. शेतकरी, गरीब लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी पालकमंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रारंभी पालकमंत्र्यांनी प्रांगणात लावलेल्या स्टॉलचे उदघाटन केले व विविध स्टॉलची पाहणी केली. यावेळी पुरवठा, आदिवासी विकास, आरोग्य, एकात्मिक बालविकास, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जिल्हा उद्योग केंद्र , महावितरण, पोलीस, राज्य महामार्ग परिवहन महामंडळ, लोकराज्य स्टॉल, सामाजिक न्याय, महात्मा फुले महामंडळ, मुद्रा बँक, जनधन, जीवन ज्योती, पशुसंवर्धन, महिला आर्थिक विकास महामंडळ, मत्स्य व्यवसाय, राजश्री शाहू महाराज कृषि विद्यालय, वन आदि विभागाची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग स्वावलंबन अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप, राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना थेट कर्ज योजनेचे 20 हजार रुपयाचे धनादेश, वैयक्तीक थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूरीपत्र देण्यात आले. महात्मा फुले महामंडळाअंतर्गत लाभार्थ्याला 10 हजार रुपये धनादेश, इतर मागासवर्ग महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये धनादेश. वसंतराव नाईक महामंडळाअंतर्गत लाभार्थ्यांना 25 हजार रुपये धनादेश. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नविन शिधापत्रिका, दुय्यम प्रत, जात प्रमाणपत्र, वर्ग-2 चे वर्ग-1 प्रकरण, वाटणीपत्र, वनहक्क पट्टे वाटप, भूमी अभिलेख मोजणी क प्रत वाटप, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, ट्रॅक्टर अनुदान, नॅपसॅक हायटेक स्प्रेपंप, म्हैस खरेदी धनादेश वाटप, शेळी संच धनादेश वाटप, रमाई आवास योजनेअंतर्गत सौर कंदील व ब्लँकेट वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पिव्हीसी पाईप वाटप, मुद्रा बँक लोन, पीओएस मशीन वाटप, सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत पासबुक वाटप, वनविभागामार्फत एलपीजी गॅसचे वितरण, महावितरणकडून घरगुती वीज कनेक्शन, कृषिपंप कनेक्शन, सौर ऊर्जा कृषिपंप आदी योजनेच्या 18 हजार 384 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

       यावेळी महासमाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवोदय विद्यालय नवेगावबांध व आश्रमशाळेच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर करुन उपस्थितांकडून प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाला सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. संचालन अनिल मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार प्रभार गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांनी मानले.

Tuesday 21 February 2017

योजनांच्या लाभातून सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न - राजकुमार बडोले



अर्जुनी/मोरगाव येथे महावितरण महासमाधान शिबीर
27840 लाभार्थ्यांना दिला योजनांचा लाभ
      गोंदिया,दि.21 : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ आजपर्यंत घेता आला नाही. महासमाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या दारापर्यंत पोहचून योजनांचा लाभ देवून सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 21 फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगाव तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात महाराजस्व अभियानाअंतर्गत महावितरण महासमाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव कापगते, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुमरे, श्री.पालीवाल, तेजुकला गहाणे, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या तालुक्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुढील तीन वर्षात तलावांची दुरुस्ती व खोलीकरण करण्यात येईल. रस्ते, सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या भागातील नागरीकांना व्हावी याचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आता धानाव्यतिरिक्त इतर नगदी पिकाकडे वळावे. उसाची जास्तीत जास्त लागवड करुन त्यावर प्रक्रियेसाठी साखर कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, लवकरच या योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळेल. जुनेवानी प्रकल्पाला मंजूरी मिळाली असून तो प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागेल. या भागातील वीज भारनियमन कमी करुन शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. स्वच्छ महाराष्ट्रमध्ये गोंदिया सुध्दा प्रथम क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, विविध क्षेत्रात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले घर खरेदी केले आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहणार आहे. ओबीसी बांधवांसाठी क्रिमीलेअरची मर्यादा 6 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज जग बदलत चालले आहे. आधारकार्ड हे सर्वव्यापी होणार आहे. आधारबेस इंटरनेट सेवेचा उपयोग करुन भविष्यात लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. भिम ॲपद्वारे शिबिराचे अर्ज ऑनलाईन करण्यात येणार आहे. कोणते प्रमाणपत्र पाहिजे हे त्यावर नमूद करावे लागणार आहे. भविष्यात जनतेच्या समस्या सोडवण्याचे मोबाईल हे महत्वाचे साधन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     माजी आमदार कापगते म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनहक्क पट्टे वाटपांचा कालबध्द कार्यक्रम वन विभागाने आखावा. उन्हाळा, पावासाळा व हिवाळा या तिनही ऋतुमध्ये या भागातील शेतकरी बारमाही पीक कसे घेतील याचे नियोजन कृषि विभागाने करावे. तलावातून सिंचनाची सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे. भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची सुटका करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली                                                                            डॉ.पुलकुंडवार म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अभियानामुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी जनजागृती झाली आहे. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी हे अभियान यशस्वी ठरले आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना सन 2022 पर्यंत घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनांचा लाभ गरजु व्यक्तीला मिळाला पाहिजे. जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य चांगले असणे महत्वाचे आहे. जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करुन ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ पात्र व गरजु लाभार्थ्यांना पारदर्शकपणे पोहोचविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.भुजबळ म्हणाले, कल्याणकारी राज्य आणि विकासात्मक प्रशासन याचा प्रत्यय या अभियानातून दिसून येत आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून चांगले सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आणि नोकरी विषयक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
      डॉ.रामगावर म्हणाले, वनांचा विकास लोकांच्या सहभागातून करण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. ग्राम वनाची संकल्पना देशात केवळ महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. वनाचे अधिकार ग्रामस्थांना देण्यात येत आहे. ग्राम वनांचा विकास करण्यात येणार आहे. गॅस कनेक्शनचा ग्रामस्थांना पुरवठा करुन त्यांचे वनावरील अवलंबीत्व कमी करण्यात येत असल्याचे सांगितले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना यापूर्वी खुप त्रास होत होता. पालकमंत्र्यांनी या महासमाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांनाच थेट लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भविष्यात तलावांचे खोलीकरण व दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महासमाधान शिबिरातून 27840 लाभार्थ्यांना मिळाला लाभ
    आजच्या महावितरण महासमाधान शिबिराचे औचित्य साधून तालुक्यातील 27840 लाभार्थ्यांना 44 योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना कागदपत्रे व वस्तू स्वरुपात लाभ देण्यात आला. यामध्ये नविन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव चढविणे/कमी करणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, जमिनीचे वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतर, संपत्तीचे आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, विद्यर्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, जमिनीचे मोजणी पत्र, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, कृषि पंपांना नविन वीज जोडणे, व्यावसायीक कनेक्शन, घरगुती नविन वीज जोडणे, रमाई घरकूल योजना, इंदिरा आवास योजना, मुद्रा बँक कर्ज, पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, आंतरजातीय विवाहन प्रोत्साहन योजना, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसान भरपाई, महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी कर्ज वाटप, वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप, मुलामुलींना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप, अपंगगत्व ओळखपत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, डिझेल पंप वाटप, उज्वला गॅस योजना, शेड नेट पॉलीहाऊस, बैलजोडी, पाईप, औजारे, धान उफणनी, पंखा, बैलगाडी, जनधन योजना, अपंगत्व प्रमाणपत्र, अपंग व्यक्तींना सहायक साधने व उपकरणे आणि गटई कामगारांना स्टॉलचे वाटप तसेच दिव्यांग स्वावलंबन योजनेअंतर्गत तपासणीअंती निवड झालेल्या 106 व्यक्तींना उपकरणे व साधनांचे वाटप करण्यात आले.

     प्रारंभी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेट दिली. महावितरण समाधान शिबिरात विविध विभागाचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी या स्टॉलला भेट देवून योजनांविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी तिबेटियन निर्वासीत वसाहतीतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी, नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी आणि आश्रमशाळेच्या विर्थ्यार्थीनींनी नृत्य सादर केले. महासमाधान शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेण्याऱ्या अधिकारी, कर्मचारी, सरपंच, तलाठी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील हजारोच्या संख्येने लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार डी.सी.बोंबर्डे यांनी केले. संचालन प्रा.डी.यु.काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.

Friday 17 February 2017

चौकीमुळे सुरक्षा व्यवस्था निर्माण होण्यास मदत - आमदार अग्रवाल

                                 सावराटोली पोलीस चौकीचा शुभारंभ




        शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षापासून इथे पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती. इथल्या परिसरातील नागरिकांच्या, उत्पादित माल बाजारपेठेत आणणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या चौकीमुळे सुरक्षा व्यवस्था निर्माण होवून मोठ्या प्रमाणात व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल. असे प्रतिपादन राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
            आज 17 फेब्रुवारी रोजी गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सावराटोली पोलीस चौकीचा शुभारंभ आ.अग्रवाल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे यांची उपस्थिती होती.
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. आ.अग्रवाल यांनी फित कापून तंबूतील चौकीचा शुभारंभ केला. शुभारंभ केल्यानंतर चौकीला भेट दिल्याची पहिली नोंद जिल्हाधिकारी काळे यांनी केली.
            आमदार अग्रवाल पुढे म्हणाले, पोलीस चौकीच्या सुविधेमुळे धान व्यापार इथे आणता येईल. भाजी मार्केट सुध्दा इथे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, स्टेट बँकेची शाखा इथे उघडण्यात येणार आहे. निवडणूकीच्या काळात पोलीस विभागाने चांगले काम केले आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांनी काम करावे. रामनगर, सिटी पोलीस स्टेशन, रावणवाडी पोलीस स्टेशनच्या इमारती आणि 144 पोलीस क्वॉर्टरची कामे येत्या सहा महिन्याच्या आत सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            सावराटोली पोलीस चौकी 24 तास सुरु असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, पांढराबोडी व काटी येथेही पोलीस चौकी सुरु करण्यात येईल. गोंदिया शहराचे सिटी सर्व्हेक्षण झाल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. सिटी सर्व्हेक्षणासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवून देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया सिटी सर्वेच्या दृष्टीने नगर परिषद पुढाकार घेईल. वादाची सुरुवात ही जमिनीपासून होते. गोंदिया शहरात जमिनीच्या किंमती सोन्यापेक्षा जास्त आहे. राज्यातील सर्व जमीन मोजणीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या 1 मार्च रोजी शहरातील जागेच्या मोजणीच्या दृष्टीने बैठक घेण्यात येईल. पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल. असेही ते यावेळी म्हणाले.
            श्री.इंगळे म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने पोलिसांनी कायदयाची अंमलबजावणी करावी. सामान्य जनतेचे हित साध्य करण्यासाठी ही चौकी उपयुक्त ठरणार आहे. गोंदिया शहरात अपराधी टोळ्यांनी जनतेला त्रस्त करुन सोडले आहे. शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाला सहकार्य करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडू असेही ते यावेळी म्हणाले.
            प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, गोंदिया शहरात देशाचे छोटे स्वरुप दिसून येते. सर्व जाती धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. पोलीस चौकी उभारुन पोलीस केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. सावराटोली परिसरात गुन्हेगारांचा वावर असल्याचे सांगितले जाते. ही गुन्हेगारी निश्चित आपण मोडीत काढू. या परिसरात सुरक्षीतता व शांतता नांदण्यास या चौकीची मदत होणार आहे. चौकीमुळे पोलिसींग चांगल्याप्रकारे करण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धनलाल ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.      

            मान्यवरांच्या हस्ते सावराटोली पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय गुरपुडे, पोलीस नाईक ओमेश्वर मेश्राम व संदिप नाईक यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. कार्यक्रमाला कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शेतकरी, व्यापारी, नागरिक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले.

Tuesday 14 February 2017

आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न - राजकुमार बडोले

                                                         घटेगाव येथे उपकेंद्राचे भूमीपूजन
     पूर्वी डॉक्टर गावात उपलब्ध नसल्यामुळे लोक वैदू, मरीमाईच्या मागे लागायचे. आता लोकांचा शिक्षणावर भर असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सुधारणा झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती उभारुन आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       12 फेब्रुवारी रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन करतांना आयोजित कार्यक्रमात श्री.बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.वाय.ब्राम्हणकर, घटेगावच्या सरपंच रेखा कोसलकर, उपसरपंच कांता गायधने, पोलीस पाटील कुंदा नेवारे, प्रतिष्ठीत नागरिक विष्णुजी अग्रवाल यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन तर भिवखिडकीच्या आरोग्य केंद्राचे कोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर तर सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. घटेगाव व परिसरातील गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
      श्रीमती रंगारी म्हणाल्या, पूर्वी घटेगाव परिसरातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी बाहेरगावी जावे लागत होते. आता या उपकेंद्र इमारतीच्या बांधकामामुळे आरोग्यविषयक सुविधा इथेच मिळण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचेच असल्यामुळे अनेक कामे त्यांनी मंजूर केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्यासाठी त्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी. असेही त्यांनी सांगितले.
      श्रीमती चव्हाण म्हणाल्या, घटेगावसाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत होणे ही आनंदाची बाब आहे. घटेगाव हे अनेक समस्यांनी ग्रस्त गाव आहे. पूर्वी या परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत होते. पालकमंत्र्यांनी या भागाकडे लक्ष दिल्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. असे त्या म्हणाल्या.
      सरपंच श्रीमती कोसलकर म्हणाल्या, आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी आल्यात. गावात बसची सुविधा नाही. पिण्याच्या पाण्याची अडचणी आहे. ग्रामपंचायतीची इमारत नादुरुस्त आहे. या समस्या पालकमंत्री निश्चित सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      प्रास्ताविकातून डॉ.निमगडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात 29 आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून 9 उपकेंद्रासाठी निधी प्राप्त झाला आहे. तसेच 7 पैकी 5 आरोग्य केंद्रासाठीही निधी मिळाला आहे. घटेगाव व परिसरातील 3 हजार लोकांना या उपकेंद्राच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला डॉ.श्री.गुंड व आरोग्य विभाग कर्मचारी तसेच घटेगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री.उरकुडे यांनी मानले.

Saturday 11 February 2017

सुक्ष्म व योग्य नियोजनातून यंत्रणांनी निधी खर्च करावा - पालकमंत्री बडोले

            जिल्हा नियोजन समिती सभा


जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीची महत्वाची भूमिका आहे. या समितीकडून विविध यंत्रणांना देण्यात येणारा निधी हा सुक्ष्म व योग्य नियोजनातून खर्च करावा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      आज 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, नियोजन विभागाचे उपायुक्त बकुल घाटे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
         जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 या वर्षात सर्वसाधारण योजनेवर 118 कोटी 38 लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेवर 38 कोटी 65 लक्ष, आदिवासी उपयोजनेवर 59 कोटी 45 लक्ष व आदिवासी क्षेत्रबाहय योजनेवर 15 कोटी 84 लक्ष रुपये निधी सन 2016-17 साठी अर्थसंकल्पीत करण्यात आला असून जानेवारी 2017 अखेर सर्वसाधारण योजनांवर वितरीत 48 कोटी 51 लक्ष रुपयांपैकी 26 कोटी 55 लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत वितरीत निधीच्या 18 कोटी 81 लक्ष रुपयांपैकी 16 कोटी 61 लक्ष रुपये, आदिवासी उपयोजनेवर वितरीत केलेल्या 44 कोटी 17 लक्ष रुपयांपैकी 27 कोटी 95 लक्ष तर आदिवासी बाहय क्षेत्र उपयोअंतर्गत वितरीत केलेल्या 11 कोटी 85 लक्ष रुपयांपैकी 10 कोटी 92 लक्ष रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी यांनी यावेळी दिली.
       या सभेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या सन 2017-18 च्या 212 कोटी 92 लक्ष 88 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे.
       यावेळी पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात अनेक माजी मालगुजारी तलाव आहेत. या तलावातून मासेमारी करुन अनेक ढिवर बांधव सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपली उपजिविका करतात. त्यांना आवश्यक असलेल्या बिगर यांत्रिकी नौका व जाळे मत्स्य विभागाने उपलब्ध करुन दयावेत, त्यामुळे त्यांना चांगल्याप्रकारे मासेमारी करण्यास मदत होईल. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या ज्या इमारतीकरीता जागा अधिग्रहीत केलेली नाही त्यासाठी तातडीने जागा अधिग्रहीत करुन व निधीची मागणी करुन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. इमारतीचे बांधकाम 70 टक्के झाल्यानंतर पद निर्मिती करुन पद भरती करावी. पिण्याच्या पाण्यापासून कोणतेही ग्रामस्थ वंचित राहणार नाही यासाठी स्वतंत्र नळ योजनेचे प्रस्ताव तयार करावे. पूर बाधीत गावांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       मामा तलावाच्या खोलीकरणाचे व दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा हया परिपूर्ण झाल्या पाहिजे असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, पुन्हा-पुन्हा त्याच तलावाच्या निविदा यापुढे काढू नये. ज्या पाणीपुरवठा योजनांना अद्याप वीजपुरवठा करण्यात आलेला नाही त्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने तातडीने कार्यवाही करुन वीज कनेक्शन दयावे. तसेच शेतकऱ्यांना सुध्दा वेळीच वीज पुरवठा होईल यासाठी आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा वीज वितरण कंपनीने करावा. जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतींची दुरावस्था असून यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पशुपालकांची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक ते कर्मचारी व औषधाचा पुरवठा करावा.
     जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांचे प्रस्ताव मंत्रालयामध्ये संबंधित विभागाकडे प्रलंबीत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आपण व्यक्तीश: लक्ष घालून हे प्रस्ताव तातडीने मार्गी लागतील यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकामाला तीन महिन्याच्या आत जिल्हा परिषदेने मंजूरी दयावी, त्यामुळे ही कामे तातडीन पूर्ण करता येईल. डिसेंबर पूर्वीच करण्यात येणाऱ्या कामाच्या अंतिम यादया तयार असल्या पाहिजे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींनी विकासाचा आराखडा करावा. योग्य नियोजनातून मिळणारा निधी खर्च करावा. बांधकाम विभागाने नविन नगरपंचायतींना विविध बांधकामांचे अंदाजपत्रक तयार करुन दयावे असे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण व नगरविकास विभाग यांनी अद्यापपर्यंत निधी खर्च न केल्यामुळे पालकमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
         आमदार अग्रवाल म्हणाले, मागील सहा वर्षापूर्वी ज्या राईस मिलर्सकडे भरडाईसाठी दिलेला तांदूळ अद्याप जमा केला नाही अशांकडून त्याची रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच संबंधितांना नोटीस देवून कडक कार्यवाही करण्यात यावी. यामधून शासनाचा पैसा बुडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. स्वदेशी खेळांना राजाश्रय मिळावा यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा. दोन्ही नगर पालिकेची अग्नीशमन सेवा बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
       आमदार रहांगडाले यांनी, तिरोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा बांधकामासाठी निधी देवून सुध्दा तो खर्च करण्यात आला नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. दिलेला निधी वेळेत खर्च होत नाही ही गंभीर बाब असल्याचे सांगून ते म्हणाले की, संबंधित कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी. मेहंदीपूर हे गाव अदानी प्रकल्पात गेल्यामुळे दुसऱ्या गावी आरोग्य उपकेंद्र देण्यात यावे. माकडांमुळे घरांचे नुकसान होत असल्यामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी वनविभागाने शासनाकडून निधी उपलब्ध करुन दयावा.
       आमदार पुराम म्हणाले, सालेकसा व देवरी तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. हया पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु राहील याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष दयावे असे त्यांनी सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, ज्या यंत्रणांचा निधी अद्याप खर्च झालेला नाही त्या यंत्रणांनी योग्य समन्वयातून निधी वेळीत खर्च करावा. तो निधी परत जाणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. पुनर्विनियोजनाबाबत आपण लवकरच संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येईल. गावठाण विस्तार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील काही गावांची पहिल्या टप्प्यात निवड करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.