जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 30 December 2017

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे - अंकुश शिंदे

आपले सरकार सुविधा केंद्राचे उदघाटन


    नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. जनतेसाठी काम करीत असतांना पोलीस विभाग लोकाभिमुख करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. असे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.
       30 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आपले सरकार नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन श्री.शिंदे यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नागरी संरक्षण दलाचे महासमादेशक अरविंद देशमुख यांची उपस्थिती होती.
      गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले, अशाप्रकारची सेवा देणारा गोंदिया हा पहिलाच जिल्हा आहे. पोलीसविषयक कायदयाचा वापर चांगल्याप्रकारे झाला पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञान हे सर्वव्यापी होणार असल्यामुळे पोलीस विभागातील प्रत्येकाने त्याचा प्रभावी वापर करण्यास तयार व्हावे. त्यामुळे विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे  आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात आज होत आहे. गोंदिया पोलीस दलाने जिल्ह्यासाठी एखादे स्वतंत्र ॲप्स विकसीत करावे. पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.भूजबळ चांगले काम करीत असल्याचे ते म्हणाले.
        श्री.ठाकरे म्हणाले, अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस विभाग लोकाभिमुख होण्यास मदत होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता विकसीत होत आहे. जिल्ह्यातील पोलीस दलात चांगले वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
        श्री.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील प्रशासनात अत्यंत चांगला समन्वय आहे. जिल्ह्यात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजे. त्याबाबत जागरुकही असले पाहिजे. जिल्ह्यात नागरी संरक्षण क्षेत्रात चांगले काम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
     पोलीस अधीक्षक प्रास्ताविकातून म्हणाले, या सुविधेमुळे नागरिकांना सेवा देणे सोईचे होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी यापुढे ऑनलाईन तसेच मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहे. तक्रारीची त्यांना पोच मिळून प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे याबाबत सुध्दा माहिती मिळणार आहे. किओक्स केंद्राच्या माध्यमातून पोलीसविषयक सेवा गतीमान करण्यात येईल. 
       प्रारंभी मान्यवरांचे हस्ते आपले सरकार नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी देणे, कागदपत्रांचे साक्षांकन, ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना ना-हरकत परवानगी देणे, वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, विविध प्रकारचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे, नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून तक्रारदारास एफआयआर पुरविणे आदी सेवा या आपले सरकार नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाचे राखीव फौजदार सुनिल बांबडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त श्री.शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते. संचालन राधिका कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती खन्ना यांनी मानले.

Friday 29 December 2017

मुद्राच्या माध्यमातून गरजू व बेरोजगारांना स्वावलंबनासाठी मदत करा - जिल्हाधिकारी काळे

मुद्रा योजनेचा आढावा
     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गरजू व बेरोजगार युवक-युवती स्वावलंबी झाली पाहिजे याचे स्वप्न बघितले आहे. इथल्या जास्तीत जास्त बेरोजगार व गरजू व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ दयावा. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नुकतीच प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक एस.एम.शिवणकर, निमंत्रित सदस्य माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी निलेश भुते, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे निदेशक ए.सी.वासनिक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक श्री.शिरसुध्दे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक यांचे प्रतिनिधी आर.एस.देठूरे, देना बँकेचे जिल्हा समन्वयक श्री.चौरे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा समन्वयक अरुणा आगळे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, मुद्रा बँक योजनेबाबत ज्या बँकांना शिशु, किशोर आणि तरुण या गटाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यांनी ते उद्दिष्ट 31 मार्चपूर्वी वेळेत पूर्ण करावे. या योजनेची माहिती घेण्यासाठी कोणत्याही बेरोजगार व्यक्तींची बँकेत आल्यानंतर निराशा होणार नाही याची काळजी घ्यावी व त्यांना या योजनेबाबत विस्तृत माहिती दयावी. 31 मार्चपर्यंत जास्तीत जास्त मुद्रा योजनेची कर्ज प्रकरणे मंजूर करावी. बँकांच्या याबाबत तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी. अनेक बेरोजगार व गरजू व्यक्ती छोटे-छोटे उद्योग व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक आहेत अशांना मुद्रा योजनेतून हातभार लावावा त्यामुळे ते स्वावलंबी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
    श्री.सिल्हारे यावेळी म्हणाले, मुद्रा योजना बेरोजगार व गरजू व्यक्तींसाठी आशेचा ‍किरण आहे. त्यांना गावपातळीवर व आपल्या  परिसरात उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून मदत करावी. बचतगटाच्या महिलांना देखील वैयक्तीकरित्या मुद्रा योजनेतून कर्ज प्रकरणे मंजूर करावी. महिला हया अत्यंत काटकसरी असल्यामुळे व घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड करीत असल्यामुळे त्यांना सुध्दा या योजनेतून कर्ज उपलब्ध करुन दयावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
      सन 2017-18 या वर्षात जिल्ह्यातील 100 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेच्या माध्यमातून 452 शिशु गटात, 545 किशोर गटात आणि 157 तरुण गटात कर्ज प्रकरणे 13 नोव्हेंबरपर्यंत मंजूर केल्याचे सांगून श्री.सिल्हारे म्हणाले, या वर्षात मार्च 2018 पर्यंत  680 शिशु गटात, 808 किशोर गटात आणि 241 तरुण गटाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार, होतकरु व गरजू व्यक्तीला स्वबळावर उभे करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.खडसे यावेळी म्हणाले, बँकांनी मुद्रा योजनेतून बेरोजगार आणि गरजू व्यक्तींना कर्ज देतांना सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. बँकेमध्ये मुद्रा योजनेतून रोजगार उभा करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला समाधानकारक उत्तरे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली पाहिजे. अनेक बँका बेरोजगार व गरजू व्यक्तींना उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी बेरोजगार व गरजू व्यक्ती करीत आहे. यापुढे अशाप्रकारच्या तक्रारी या समितीकडे येणार नाही याची दक्षता बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे सांगितले.

     सभेला युको बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, युनियन बँक, आयडीबीआय बॅंक, सिंडीकेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विजया बँक, कॅनरा बँक, आयसीआयसी बँक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

Thursday 28 December 2017

जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ जोमात

     धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे धान आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था देखील बहुतांशी धानावरच अवलंबून आहे. आधुनिकतेच्या या जगात आज प्रत्येकाला घाई झालेली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करुन धान व अन्य पिके शेतीतून घेण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषयुक्त अन्न खाण्यात येते. त्याचे दुष्परिणाम देखील माणसाच्या शरीरावर होवू लागले आहे. विषमुक्त अन्न प्रत्येकाच्या आहारात असले पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळत आहे.
      परंपरागत कृषि विकास योजना सन 2016-17 या वर्षात कृषि आयुक्तालयाने जिल्ह्यात 20 सेंद्रीय शेती गटास मंजूरी प्रदान केली. जिल्हा नियोजन समितीने देखील यात पुढाकार घेवून 31 सेंद्रीय शेती गटास मंजूरी दिली. जिल्हा हा जैवविविधतेने समृध्द असल्यामुळे आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्यामुळे अनेक स्थलांतरीत व विदेशी पक्षी या तलावांवर आपली उपजिविका करतात. यामध्ये राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणाऱ्या सुंदर अशा सारस पक्षांचा देखील समावेश आहे. सारस पक्षाचे संगोपन, सेंद्रीय तांदूळ पिकविणाऱ्याला आर्थिक लाभ आणि लोकांना विषमुक्त तांदूळ पुरविणे असा तिहेरी संगम जिल्हाधिकारी काळै यांनी साधून जिल्ह्यात 51 गटामार्फत एकूण 2372 शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सेंद्रीय शेती करण्यास प्रोत्साहीत केले आहे.
      जिल्ह्यातील या 2372 शेतकऱ्यांकडून जय श्रीराम, एचएमटी, चिन्नोर इत्यादी वाणाचा एकूण 510 क्विंटल तांदूळ उपलब्ध होणार आहे. सेंद्रीय तांदूळाचे महत्व जाणून घेवून त्याची चव चाखता यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांच्या संकल्पनेतून सेंद्रीय तांदूळाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी भात शिजवून खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये 2800 लोकांनी सेंद्रीय तांदूळाच्या भाताची चव चाखली. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी या सेंद्रीय भाताची चव चाखली. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रीय तांदळाचा प्रचार व प्रसार सोबतच त्याबाबत जनजागृती झाल्यामुळे सेंद्रीय तांदळाची 3313 क्विंटलची मागणी लेखी स्वरुपात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या प्रकल्प संचालकाकडे नोंदविण्यात आली.

     विषमुक्त तांदूळ जास्तीत जास्त लोकांनी खावा त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील तसेच कर्करोगापासून देखील मुक्त राहण्यास मदत होईल. जिल्ह्यात सारस पक्षांचा अधिवास असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देवून त्यांच्याशी संवाद साधला. सारसांचे अस्तित्व कायम राहावे व त्यांच्यात वाढ व्हावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करुन विषमुक्त तांदूळ पिकविण्यास प्रोत्साहीत केले. त्यामुळे हे शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळले असून या शेतीतून सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला धान घेत आहे. त्यामुळे त्यांच्या तांदूळाला जास्त किंमत मिळण्यास मदत होत आहे.  

Sunday 24 December 2017

पालकमंत्र्यांच्या हस्ते कथा परिवर्तनाची पुस्तिकेचे विमोचन

      राज्य सरकारच्या कार्यकाळाला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने जनतेच्या कल्याणासाठी तीन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सरकारच्या कामगीरीची माहिती देणाऱ्या ‘कथा परिवर्तनाची’ ही पुस्तिका तयार केली आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 24 डिसेंबर रोजी गोंदिया येथील बसस्थानकात आयोजित गोंदिया-नागपूर या शिवशाही वातानुकूलीत बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी या पुस्तिकेचे विमोचन केले.
       कथा परिवर्तनाची या पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केलनका, एस.टी.चे भंडारा विभाग नियंत्रक गजानन नागूलवार, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया आगार प्रमुख जयकुमार इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

        कथा परिवर्तनाची या पुस्तिकेमध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी शेतीतील गुंतवणूक, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, तूर खरेदी, सोयाबीनला अनुदान, शेतकऱ्यांची सामाजिक सुरक्षा, 2065 हवामान केंद्रे, गटशेती, सातबारा ऑनलाईन, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, भ्रष्टाचार संपविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण, कृषि प्रक्रिया उद्योगाची निर्मिती, शेती सलग्न उद्योग, पाणी आणि सिंचन, स्वच्छ भारत अभियान, कायदयाचे सरकार, ग्रामोदयाचे सरकार, सुप्रशासन/डिजीटल महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र, पारदर्शीता आणि शाश्वतता, 2022 पर्यंत सर्वांना घरे, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, आदिवासी विकास विभागाच्या योजना, शिक्षण व रोजगार, वैद्यकीय शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, प्रकाशमान महाराष्ट्र, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, स्मार्ट सिटी, अमृत अभियान, महिला व बालकल्याण योजना, पर्यटनाला चालना व ग्राहक हिताचे सरकार, संगणकीकरण व पेपरलेस कार्यालय याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

एस.टी.ची प्रवाशांना चांगली सेवा मिळावी - पालकमंत्री बडोले

गोंदिया-नागपूर शिवशाही वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ
        राज्यात मागील तीन वर्षात मोठे परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचा एक भाग म्हणून एस.टी.ने सुध्दा कात टाकली आहे. राज्यात 2 हजार वातानुकूलीत बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागपूरकरीता येथून सुरु होणारी शिवशाही वातानुकूलीत बससेवेचा प्रारंभ हा त्याचाच एक भाग आहे. एस.टी. ही राज्यातील प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा एस.टी.ने दयावी अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
       24 डिसेंबर रोजी गोंदिया बसस्थानक येथे गोंदिया-नागपूर या वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांनी सकाळी 11 वाजता बसला हिरवी झेंडी दाखवून केला. या निमित्त्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केलनका, एस.टी.चे भंडारा विभाग नियंत्रक गजानन नागूलवार, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया आगार प्रमुख जयकुमार इंगोले, नंदकुमार बिसेन यांची उपस्थिती होती.
      लवकरच गोंदिया येथून शिर्डी, कोल्हापूर व रायपूरसाठी बससेवा सुरु करणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या लांब पल्ल्याच्या सेवेमुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यास मदत होईल. एस.टी. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबीत प्रश्न आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक निश्चित करण्यात येईल. एस.टी. तोट्यात का चालते याचा विचार केला पाहिजे. असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, देवरी व सडक/अर्जुनी येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयी-सुविधेकडे लक्ष दयावे. यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे ते म्हणाले.
     श्री.बडोले म्हणाले, गावखेड्यातील लोकांचे प्रवासाचे मुख्य साधन ही एस.टी. आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी एस.टी. हीच मुख्य साधन आहे. गोंदिया ते साकोली दरम्यान ज्या गावांसाठी जलद एस.टी.चे थांबे मंजूर आहे तेथे त्या बसेस थांबल्या पाहिजे. त्यामुळे एस.टी.ला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. सायंकाळी ग्रामीण भागातील काही मुख्य मार्गावर बसेस नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अशाप्रसंगी प्रवाशांना जीव धोक्यात घालून अन्य वाहनाने प्रवास करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी एस.टी.ने नियोजन करुन बसेस सोडाव्यात असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया हा राज्याच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर या उपराजधानीत रस्त्याने सुखकर पोहोचण्यासाठी ही शिवशाही वातानुकूलीत बससेवा एस.टी.ने सुरु केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगून त्यांनी शिवशाही बससेवेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       श्री.शिवहरे म्हणाले, परिवहन मंत्री व पालकमंत्री यांच्या पुढाकारातून ही शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली आहे. लोकांना चांगली प्रवासी सेवा उपलब्ध व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सुध्दा लक्ष दिले पाहिजे. एस.टी.ला कर्मचाऱ्यांनी चांगले चालविले तर एस.टी. तोट्यात जाणार नाही असे त्यांनी सांगितले.                                                                                                             
     प्रास्ताविकातून श्री.नागुलकर म्हणाले, प्रवाशांना चांगली सेवा मिळावी हा या शिवशाही वातानुकूलीत बससेवा सुरु करण्यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी एस.टी. कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
     प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शिवशाही वातानुकूलीत बससेवेला हिरवी झेंडी दाखवून नागपूरकरीता रवाना केले. गोंदिया ते नागपूर दरम्यानच्या 170 कि.मी.च्या प्रवासासाठी या बसचे प्रती प्रवासी भाडे 274 रुपये इतके आहे. गोंदिया बसस्थानकातून दररोज सकाळी 7.45 वाजता पहिली शिवशाही बस सुटेल व नागपूर येथे ती सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तर दुसरी शिवशाही बस ही सकाळी 8.30 वाजता गोंदिया येथून निघून दुपारी 12.15 वाजता नागपूर येथे पोहोचेल. आज या बसचे चालक श्री.पाठक व वाहक म्हणून श्री.पराते होते. दोघांनाही पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. या बसमध्ये इंटरनेटची वायफाय सुविधा तसेच मोबाईल रिचार्जची व्यवस्था असून संपूर्ण बस वातानुकूलीत आहे.
    कार्यक्रमाला रतन वासनिक, धनंजय वैद्य, प्रदिपसिंह ठाकुर, जयंत शुक्ला, श्री.सोनवाने, बसस्थानक प्रमुख संजना पटले, वाहतुक नियंत्रक रामजी चतुर्वेदी, श्री.कोसरकर, अर्पित वासनकर, दिलीप राऊत, प्रशांत डोंगरे, सईद खाँ, श्री.जोशी, श्री.भिमटे, शितल बंसोड, श्याम मेश्राम, ललित सोनवणे, गुलाब आडे यांच्यासह बसस्थानकावरील प्रवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार वाहतुक नियंत्रक पी.एन.केळुद यांनी मानले.

Friday 22 December 2017

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेलकम टू गोंदिया-2018 टेबल कॅलेंडरचे प्रकाशन

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 डिसेंबर रोजी विधानभवन येथे गोंदिया जिल्हा आढावा बैठकीत वेलकम टू गोंदिया-2018 या नववर्षाच्या टेबल कॅलेंडरचे प्रकाशन केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार डॉ.परिणय फुके, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचना गहाणे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातुन जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या टेबल कॅलेंडरमध्ये जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. यामध्ये काळविटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मानेगाव, आदिवासींचे दैवत असलेली कचारगड गुफा, श्रमाचे प्रतिक असलेले अर्धनारेश्वरालय मंदीर, सारस व स्थलांतरीत व विदेशी पक्षांचा अधिवास असलेला परसवाडा तलाव, वन पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हाजराफॉल धबधबा, कामठा येथील लहरीबाबाचे देवस्थान, निसर्गरम्य नवेगाव बांध, इटियाडोह प्रकल्प, चूलबंद प्रकल्प, बोदलकसा प्रकल्प, चोरखमारा प्रकल्प, नागरा येथील प्राचीन मंदीर, नागझिरा अभयारण्य, राज्यातील एकमेव तिबेटीयन वसाहत असलेले तिबेटीयन कॅम्प  येथील बुद्ध विहार, मांडोदेवी देवस्थान, प्रतापगड येथील महादेव मंदीर यांचा या कॅलेंडरमध्ये सहचित्र समावेश करण्यात आला आहे. सचित्राखाली गोंदियापासूनचे अंतर दर्शविण्यात आले आहे. सन 2018 या वर्षातील 12 महिण्यात येणाऱ्या महिनावार शासकीय सुट्टयासुद्धा नमूद करण्यात आल्या आहेत.

*******

Thursday 21 December 2017

अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोंदिया जिल्हा आढावा बैठक

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प आणि वाहतूकीची चांगली सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
            विधानभवनातील सभागृहात आज 21 डिसेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, विजय रहागंडाले, संजय पुराम, मुख्य सचिव सुमित मल्लीक, अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहल, रोहयोचे सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
            श्री. फडणवीस म्हणाले, भात पिकाला विमा देण्याबाबतचे निकष केंद्र सरकारकडून शिथिल करुन घेण्यात येईल, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यातील दरेकसा ते मुरकुटडोह हा अतिदुर्गम भागातील रस्ता तयार करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. रस्त्यांच्या सुविधेमुळे दुर्गम भागातील गावे तालुक्याशी जोडल्यास मदत होईल. रस्त्यांची कामे करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घ्यावे. पोलिसांसाठी गृह निर्माण योजनेतून तातडीने शासकीय निवासस्थाने तसेच पोलीस स्टेशन व सशस्त्र दूर क्षेत्रच्या इमारती बांधण्याचे काम हाती घ्यावे.
            प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 91 हजार लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आधी त्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामासाठी पहिला हप्ता राज्य सरकार देणार आहे. घरकुलांची कामे वेळीच पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक ते अभियंते देखील देण्यात येतील. गोंदिया शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देवून यासाठी नगरपालिकेला सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवावे. जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या शौचालयाची कामे रोहयोतून पूर्ण करण्यात यावी यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्याला व तालुक्याला जोडणारी महत्वाच्या रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी चांगली सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
            धरणाच्या पायथ्याशी पर्यटन विषयक सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यामुळे जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील  व स्थानिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. मागील काही वर्षापासून थकीत असलेले धान गोदामाचे भाडे देखील संबंधितांना त्वरीत देण्यात येईल. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कालवे वनविभाग क्षेत्रातून जात असेल तर त्या भागात पाईप लाईन टाकून ही कालवे पूर्ण करावी. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम देखील तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
            पालकमंत्री श्री. बडोले यावेळी म्हणाले, झाशीनगर उपसा सिंचन योजना ही नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे त्या भागातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी ही योजना त्वरीत पूर्ण करावी. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी वन विभागाने आवश्यक त्या परवानग्या उपलब्ध करुन द्याव्यात. वर्ष 2015 मध्ये घरकुल योजनेतून सुटलेल्या कुटुंबांची नावे पुन्हा यादीत समाविष्ठ करावीत. त्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ देता येईल. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार फुके यांनी गोदमाचे 17 कोटी थकीत असलेले भाडे त्वरीत देण्यात यावे. जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
            आमदार अग्रवाल यांनी आरोग्य उपकेंद्र बांधले असून तेथील पदांना मान्यता मिळावी, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंताचे कार्यालय गोंदिया येथे व्हावे, बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी व गोंदिया शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. पिंडकेपार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देणे, डांगुर्ली येथे नदीवर बॅरेज तयार करण्यात यावे. रजेगाव व तेढवा/शिवनी प्रकल्प जून 2018 पर्यंत पूर्ण व्हावा, अशी  मागणी यावेळी केली.
            आमदार पुराम यांनी सालेकसा व देवरी हे तालुके नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्यामुळे या भागात रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात झाली पाहिजे तसेच या भागातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी केली.
            आमदार रहागंडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा त्वरीत पूर्ण झाला पाहिजे यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच परसवाडा-धापेवाडा-गोंदिया या रस्त्याच्या दर्जोन्नतीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी केली.
            यावेळी जिल्हाधिकारी काळे यांनी विविध योजनांच्या विकासकामांचे सादरीकरण केले. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकरे यांनी स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची तसेच घरकुल योजनेच्या प्रगतीबाबतची देखील माहिती दिली.
            पोलीस अधिक्षक डॉ. भूजबळ यांनी पोलीस गृह निर्माण योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. नक्षलग्रस्त भागात सशस्त्र दूर क्षेत्रांतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, नक्षलग्रस्त भागात आवश्यक असलेल्या रस्त्यांची माहिती दिली.  यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            सेंद्रीय शेतीला चालना मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात असलेल्या सेंद्रीय शेतीच्या चळवळीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय पध्दतीने पिके घेण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. याचा चळवळीचा भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना आकर्षक पॅकींगमध्ये सेंद्रीय तांदूळ भेट म्हणून दिला.

Tuesday 12 December 2017

कर्जमाफीचा धान उत्पादकांना दिलासा

  • ग्रीन यादीत 46 हजार 283 शेतकऱ्यांचा समावेश
  • पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार
  •   राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियान राबवित आहे. नानाविध प्रयोग शेतीत करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यात येत आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केली आहे.  
ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 46 हजार 283 शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश असून 32 हजार 261 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 14 हजार 22 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच 3 हजार 95 शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचादेखील लाभ मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 पर्यंतच्या दीड लाख रूपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सन 2015-16 व सन 2016-17 या कालावधीमध्ये पिककर्जाची विहीत मुदतीत कर्जफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये यापैकी कमी असलेल्या रक्कमेचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जे शेतकरी पात्र होते, पण त्यांनी अर्ज केले नाही, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यात 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने 19 हजार कोटी रूपयांची रक्कम बँकाकडे वर्ग केली आहे. या योजनेतंर्गत राज्यभरात 77 लक्ष अर्ज प्राप्त झाले होते, छाननीअंती डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.
 जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी बियाणे , रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करण्यासाठी आणि पिकांची लावणी व कापणी करण्यासाठी खर्च येत असल्यामुळे शेतकरी बँकांचे कर्ज घेतात. कधी अतिवृष्टी, गारपीट, वादळ, रोगराई, तर कधी दुष्काळी स्थितीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. संसाराचा गाडा हाकताना अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकरी चिंताग्रस्त असतो. बँकांच्या कर्जाच्या परतफेडीमुळे तो हवालदील झालेला असतांना शासनाच्या या कर्जमाफी योजनेचा मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोबत नव्या पद्धतीने नगदी पिकाची कास धरून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याचे नियोजन देखील शेतकरी करू लागले आहेत.
    जिल्ह्यातील गोंदीया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 31 शाखा, विदर्भ-कोकण ग्रामीण विकास बँकेच्या 22 शाखा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या 78 शाखा अशा एकूण 131 बँक शाखेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.
गोंदीया तालुक्यातील नागरा येथील शेतकरी लक्ष्मण चौधरी कर्जमाफीबाबत बोलताना म्हणाले, माझ्याकडे 6 एकर धान शेती आहे. शेतीसाठी 36 हजार रूपये कर्ज घेतले होते. पाऊस  न आल्यामुळे व पिकांवर आलेल्या रोगराईमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. मात्र शासनाने कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय घेवून आमची चिंता दूर केली आहे. आता नव्याने कर्ज घेवून व घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड करून नगदी पिकांच्या शेतीकडे सुद्धा वळणार असल्याचे सांगितले.
नक्षलग्रस्त अतिदुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी येथील आदिवासी शेतकरी सुंदरलाल कटंगा म्हणाले, माझ्याकडे 7 एकर शेती आहे. 35 हजार रूपयांचे शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे ते 42 हजार रूपयांपर्यंत गेले. आमचा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही.  सरकारने कर्जमाफी करून आमची चिंताच दूर केली आहे. आता नव्याने कर्ज घेवून शेती करण्याचा विचार त्याने बोलून दाखविला. 

Friday 8 December 2017

व्याघ्र प्रकल्पालगतची गावे जन-वनमधून विकासाच्या वाटेवर



      नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे जिल्ह्याचे वैभव असून निसर्गाने या जिल्ह्याला दिलेली ही एक देणगीच आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 656.36 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेल्या पाच संरक्षीत क्षेत्राचा समावेश  12 डिसेंबर 2013 मध्ये करुन याला नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य या संरक्षीत क्षेत्राचा समावेश आहे. या व्याघ्र प्रकल्पाला लागून 1241.27 चौ.कि.मी. बफर झोन क्षेत्र आहे.
      व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास करुन मानव व वन्यजीवांचे सहजीवन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वन्यजीव विभाग गोंदियाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे. बफर क्षेत्रातील गावातील ग्रामस्थ हे जळावू लाकुड, पाळीव जनावरांचा चारा, घरगुती व शेतीच्या कामाकरीता लागणारे लहान लाकुड आणि रोजगार आदी दैनंदिन गरजांसाठी वनांवर अवलंबून आहेत. या अवलंबित्वामुळे वनांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. बफर क्षेत्रातील गावे जंगलव्याप्त असल्याने तेथे     मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहे. या गावातील जन, जल, जंगल आणि जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करणे, उत्पादकता वाढविणे, शेतीला पुरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे यामधून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संरक्षीत क्षेत्रालगतच्या गावात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उद्यान/अभयारण्यातील व त्याचे सीमेपासून 2 कि.मी.च्या आत येणाऱ्या गावांव्यतिरिक्त भारतीय वन्यजीव संस्थान यांनी निश्चित केलेल्या वन्यप्राणी भ्रमणमार्गामधील गावे, अभयारण्ये/राष्ट्रीय उद्यानामधून पुनर्वसन झालेली गावे तसेच ग्रामवनांचा समावेश करण्यात आला आहे.
        या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या नागझिरा अभयारण्य, पिटेझरी व उमरझरी नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (पार्क), डोंगरगाव-नवेगाव वन्यजीव अभयारण्य, बोंडे-नवेगाव वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य या वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. मागील दोन वर्षात एकूण 84 ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांची स्थापना या वनपरिक्षेत्राअंतर्गत करण्यात आली आहे. या वर्षात आणखी 13 गावात हया समित्या स्थापन करण्यात येत आहे. या समित्यामार्फत 6864 कुटूंबांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले तर 4756 कुटूंबांना सिलेंडरचा पुरवठा देखील केला आहे. वनावरील रोजगारानिमित्त असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी 246 कुटूंबांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. वन्यप्राणी शेतातील विहीरीत पडून त्यांचा मृत्यू होवू नये यासाठी 369 विहिरींना संरक्षीत कठडे बसविण्यात आले आहे. 228 कुटूंबांना सोलर कंदीलचा पुरवठा, वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी 359 शेतकऱ्यांच्या शेताला सौर कुंपन, 1152 कुटूंबाकडे शौचालये, 28 तलाव खोलीकरणाची कामे, गॅस कनेक्शन दिलेल्या कुटूंबापैकी 2837 कुटूंबांना किचन ओटे व 3189 घरी स्वयंपाकासाठी निर्धुर चुली दिल्या आहेत.
     गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच शेतीपुरक जोडधंदे निर्माण करणे यासह पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देण्यावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतून भर देण्यात आला आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यामधील 79 युवकांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलॅन्ड कंपनीत वाहन चालक प्रशिक्षण केंद्रात, कोल्हापूर येथील वेल्डींग    इलेक्ट्रीक प्रशिक्षण आणि 4 मुलींना अमरावती येथे हेल्थ केअरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बफर क्षेत्रातील गावातील 454 युवकांना निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार शिबिरामधून प्रशिक्षीत करण्यात आले आहे. 90 महिलांना लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षीत करण्यात आले आहे.
        परसोडी येथे शिक्षीत युवकांना नोकरीच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी ग्रंथालय सुरु केले आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समिती आतेगाव मार्फत 6500 क्विंटल सेंद्रीय तांदुळाचे उत्पादन करुन विक्री करण्यात आली आहे. या समित्यांमार्फत 12 अभ्यास दौरे काढण्यात आले. 2 कोटी आणि 4 कोटी वृक्ष लागवडीत देखील या समित्यांनी सहभाग घेवून वृक्षांची लागवड केली. सन 2017-18 या वर्षात वनालगतच्या 93 गावातील 100 टक्के कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी वनसंरक्षक तथा संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालयाला 1 कोटी 93 लक्ष 68 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.
       नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विशेष प्रशिक्षीत 168 वनरक्षक आणि वननिरिक्षक यांचा समावेश असलेले विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत आहे. व्याघ्र प्रकल्पातील तणससदृश्य वनस्पती निर्मुलनाची कामे करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांना पाण्यांचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यासोबतच बोअरवेलला सोलर पंप बसविण्याची कामे करण्यात येत आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे.

     डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रालगतच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या गावाच्या विकासाला गती मिळाली आहे. या योजनेमुळे मानव व वन्यजीवन प्रस्थापित होण्यासोबतच वनावरील अवलंबीत्व कमी होण्यास मदत झाली आहे. स्थानिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देण्यास ही योजना उपयुक्त ठरत आहे.

Tuesday 5 December 2017

मुर्रीत होणार मुलांचे वसतिगृह, बांधकाम तातडीने सुरु करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

     गोंदिया शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती व अपंग प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा निवाऱ्याचा व भोजनाचा प्रश्न सुटावा यासाठी गोंदिया जवळील मुर्री येथे 250 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह मंजूर झाले असून निधीही प्राप्त झाला आहे. तरी या वसतिगृहाचे बांधकाम तातडीने वेळेत पूर्ण करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 4 डिसेंबर रोजी शासकीय वसतिगृह व निवासी शाळांसाठी जमीन संपादनाचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, उपवनसंरक्षक एस.युवराज, समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जि.प.सदस्य श्री.सोनवाने, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसिलदार रविंद्र चव्हाण, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री म्हणाले, 10 कोटी रुपये खर्च करुन अत्यंत चांगली इमारत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. या वसतिगृहात राहून आपल्या जिल्ह्यातील मुले शिक्षण घेणार आहे. भविष्यात ती मोठ्या पदावर सुध्दा जाणार आहे. केवळ विरोध करुन बांधकाम थांबविणे अत्यंत चुकीचे आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी आपण जर विरोध करीत असू तर चांगला संदेश समाजात जाणार नाही. अत्यंत परिश्रमपूर्वक इथले वसतिगृह मंजूर करुन घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्त लावून वसतिगृहाचे काम सुरु करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

      मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तिरोडा, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्जुनी/मोरगाव, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देवरी आणि मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सडक/अर्जुनी येथील जमिनीसाठी लवकरच वन विभागाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मंजूरीपत्र देणार असल्याचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी यावेळी सांगितले.

Monday 4 December 2017

बळीराजासाठी संरक्षीत सिंचनाची सुविधा : 1041 सिंचन विहिरींची कामे पूर्ण

       जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. बिघडत्या पर्यावरणाचे परिणाम शेतीवर सुध्दा होत आहे. शेती हा व्यवसाय मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याने दगा दिल्यास शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची सुविधाच तारु शकते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेवून पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांसाठी 11 हजार धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम सन 2016-17 या वर्षात राबविण्यात आला. त्याअंतर्गत जिल्ह्याला 2000 विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 1041 विहिरींची कामे पूर्ण होवून 537 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे.
    अपुऱ्या व अनियमीत पावसामुळे गेल्या काही वर्षापासून राज्यात सातत्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येते. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साडेतीनशे वर्षापूर्वी मालगुजारांनी सिंचनाची व्यवस्था म्हणून तलाव बांधले. आज हे तलाव गाळाने भरल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्यात भूगर्भात पाण्याची उपलब्धता असूनही संरक्षीत सिंचनासाठी विहिरींची संख्या कमी आहे. शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
      जिल्ह्यात सन 2016-17 या वर्षात शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी 2000 विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 1578 विहिरीची कामे सुरु करण्यात आली. 358 विहिरीमध्ये बोअर करण्यात आल्या तर 683 विहिरीमध्ये बोअर करण्यात आलेल्या नाहीत. अश दोन्ही मिळून 1041 विहिरी तयार करण्यात आल्या. 537 विहिरीची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व आठही पंचायत समित्यांकडे एकूण 26 कोटी रुपये निधी दिला. त्यापैकी 21 कोटी 85 लक्ष 51 हजार रुपये निधी विहिरीच्या कामावर खर्च करण्यात आला.

      ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरले. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतला आहे अशांना या योजनेतून वगळण्यात आले. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास व त्यांनी सामुदायिक विहिरीची मागणी केली तर ते सामुदायिकरित्या विहीर मिळण्यास पात्र ठरले. पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेदारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारही करुन काही शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची सुविधा या योजनेतून उपलब्ध होणार असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारा शेतकरी आता दोन किंवा तीन पिके घेणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

क्रीडा स्पर्धेतून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना - उषा मेंढे

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा
                                     
       दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याच प्रकारच्या कल्पकता नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा हया त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणाऱ्या आहेत. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
      3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उदघाटन कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सीमा मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी अशाप्रकारचे शिक्षण दयावे की त्यांच्या मनातील आपण दिव्यांग असल्याचा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. त्यांच्या पालकांना सुध्दा वाटले पाहिजे की माझी मुले दिव्यांग असून सुध्दा शाळांमधून चांगले शिक्षण घेत आहे, असे त्या म्हणाल्या.
     श्रीमती मडावी म्हणाल्या, दिव्यांग मुले-मुली शारिरीकदृष्ट्या दिव्यांग असले तरी त्यांनी मनाने आपण दिव्यांग नाही ही भावना ठेवावी. सर्वसामान्य लोकांसारखेच आम्ही देखील आहोत अशाप्रकारची भावना दिव्यांग बांधवांमध्ये असली पाहिजे. मन सुदृढ असले आणि विचार चांगले असतील तर कोणत्याही दिव्यंगत्वावर मात करता येते असे त्यांनी सांगून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
     श्री.बरकते म्हणाले, कुठलेही दिव्यंगत्व हे शरीरात असणे हे यश संपादन करण्यासाठी अडसर ठरु शकत नाही. युपीएससीच्या परीक्षेत उल्हासनगर येथील श्रीमती प्रांजल पाटील हया दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या असून देखील त्या आयएएस बनल्या. त्या आपल्यासाठी आदर्श आहेत. त्या मुंबईत शिक्षण घेत असतांना लोकल ट्रेनने एकट्या महाविद्यालयात जायच्या. त्यांनी अपंगत्वावर मात करुन यश संपादन केले. शारिरीक आणि मानसिक अपंगत्व ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यांनी आपल्या बुध्दीने त्यावर मात करावी असेही ते म्हणाले.
      क्रीडा स्पर्धेत मंगलम मुकबधीर शाळा गोंदिया, डी.पी.पटेल मतिमंद मुलांची शाळा गोंदिया, मानवता मतिमंद मुलांची शाळा आमगाव, दंडकारण्य निवासी अपंग विद्यालय सडक/अर्जुनी व देवरी, श्रीराम मतिमंद निवासी शाळा गोंदिया, ज्ञानदिप मतिमंद मुलांची शाळा गोरेगाव, स्व.जमुनाबाई निवासी मतिमंद विद्यालय उमर्रा येथील 250 विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये धावणे 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी, स्पॉट जम्प, बादलीत बॉल टाकणे, भराभर चालणे आदी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.

Saturday 2 December 2017

सुरक्षा दौडमुळे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि प्रगतीची संधी - आ.गोपालदास अग्रवाल

सुरक्षा दौडचा समारोप व पारितोषिक वितरण

        नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. या दौडमुळे जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना प्रगतीची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
      गोंदिया पोलीस दलाच्या वतीने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमध्ये करियर घडविण्यासाठी आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी आमदार अग्रवाल मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे संचालक राहूल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
       आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले, गावाच्या विकासासाठी आणि आदिवासींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस व प्रशासन काम करीत आहे. नक्षलग्रस्त आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना धावण्याच्या स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळावे यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण भविष्यात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने झाली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी पुढाकार घेतल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, आज त्यांच्याचमुळे पोलीस विभागाच्या विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. पोलिसांशिवाय सर्वांना न्याय मिळू शकत नाही. आनंदाने जगता येत नाही. यासाठी पोलिसांची गरज असल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, लवकरच जिल्ह्यातील पोलिसांसाठी चांगले शासकीय निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी खेळामध्ये प्रगती करीत असले तरी त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच त्यांना रोजगार देणारे शिक्षणसुध्दा मिळावे यासाठी तंत्रनिकेतन विद्यालय, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या संस्था आपण मोठ्या प्रयत्नातून मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.ठाकरे म्हणाले, आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुलांचे पोलिसांबाबतचे अंतर या दौडमुळे कमी होण्यास मदत झाली आहे. पोलिसांचा संबंध हा गुन्हेगारीला आळा घालणे याबाबत येतो. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांनी सामाजिक बांधीलकी जोपासल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा कायम राहणार आहे. गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागात सुध्दा चांगल्या पध्दतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. भविष्यात आणखी चांगले शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    श्री.पाटील म्हणाले, पोलिसांसाठी सोशल पोलिसींग ही अवघड बाब असतांना जिल्ह्यात सोशल पोलिसींगच्या माध्यमातून नक्षलगस्त व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा दौडचे आयोजन करुन पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी चांगला पायंडा घातला असून त्यात ते यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
      प्रास्ताविकातून बोलतांना डॉ.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौड सहा क्रीडा प्रकारामध्ये आणि चार वयोगटामध्ये घेण्यात आली. जवळपास 7 हजार मुला-मुलींनी यामध्ये सहभाग घेतला. जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा उद्देश नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा व आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे हा आहे. याच दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकार आणि त्यांच्या यंत्रणा काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
       नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची शासन व प्रशासनाबाबत एक विश्वासाची भावना निर्माण व्हावी हाच पोलिसांचा उद्देश असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम या सुरक्षा दौडच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देखील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून या केंद्रातून आतापर्यंत 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 121 पोलीस कॉन्स्टेबल पोलीस दलात भरती झाले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची जडणघडण चांगली व्हावी, त्यांच्या करियरला दिशा देण्याचे काम या सुरक्षा दौडच्या यशस्वी आयोजनातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावण्याच्या सहा क्रीडा प्रकारामध्ये आणि चार वयोगटातील यशस्वी मुला-मुलींना पदक, प्रमाणपत्र व साहित्य देण्यात आले. यावेळी सडक/अर्जुनी वसतिगृहाच्या मुलींनी आदिवासी नृत्य, तिरोडा तालुक्यातील भजेपार येथील विक्तुबाबा दंडार समुहाने दंडार सादर केली. कार्यक्रमाला श्रीमती भूजबळ, श्रीमती ठाकरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, राजीव नवले यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमाला जिल्ह्यातील सहभागी आश्रमशाळा, शाळा व वसतिगृहाचे विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, अधीक्षक, पालक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.मेश्राम यांनी मानले.

Friday 1 December 2017

पुस्तके वाचण्यासारखा आनंद नाही - डॉ.हरिश्चंद्र बोरकर

     आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या युगात जो कठोर मेहनत घेईल तोच यशस्वी होतो. ग्रंथांमुळे जीवनाला दिशा मिळते. विविध क्षेत्राचे लिखाण आज ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. जीवन जगत असतांना माणसाला पुस्तके वाचण्यासारखा आनंद कुठेच मिळत नाही. असे प्रतिपादन झाडीबोलीचे ज्येष्ठ साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.
     जिल्हा ग्रंथालय अधिकारी व श्री शारदा वाचलनालयाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप शारदा वाचनालयाच्या बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी झाला. यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.बोरकर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांची उपस्थिती होती.
     डॉ.बोरकर म्हणाले, अभ्यासक्रमाची पुस्तके आणि वाचनाची पुस्तके यामध्ये फरक आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके वाचतांना ती आपण आवडीने वाचत नाही. जी पुस्तके वाचण्याची असतात ती पुस्तके वाचतांना माणसाला आनंद मिळतो. ग्रंथ वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. ग्रंथसंपदा ही माणसाच्या विकासाला चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.निमगडे म्हणाले, आज माणसे वैचारीक जडणघडणीपासून दूर जात असतांना ग्रंथालयातील विचार आपल्याला दिशा देण्याचे काम करते. ग्रंथ वाचनातून माणसाचे विचार प्रगल्भ होण्यास मदत होते. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी ग्रंथ महत्वाचे आहे. नव्या पिढीने सुदृढ मनासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. अनेक ग्रंथातील कथा हया प्रेरणादायी असतात. व्यक्तीमत्व घडविण्याचे कामही ग्रंथ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.जवंजाळ म्हणाले, आपल्या बालवयापासून ते आजच्या जीवनापर्यंत ग्रंथाने काय भूमिका बजावली हे आपल्या लक्षात येईल. विविध प्रकारचे साहित्य हे व्यक्तीमत्व घडविण्यास मदत करते. करियर निवडतांना देखील ग्रंथाचा उपयोग होतो. अलिकडे ग्रंथाचे स्वरुप बदलले आहे. डिजीटल स्वरुपात ग्रंथ उपलब्ध झाले आहे. आपल्याला आवड निर्माण करणारे ग्रंथ वाचले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

    कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, श्री.रहांगडाले, श्री.चौरागडे यांचेसह अनेक पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष, सचिव, ग्रंथपाल व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन विनायक अंजनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. 

करियरसाठी स्पर्धेचे आव्हान स्विकारा - संदिप जाधव

      आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर वाचनाची आवड महत्वाची आहे. स्पर्धेचे आव्हान स्विकारुन कठोर परिश्रमातून आपले जीवन उज्ज्वल करावे. असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी केले.
   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवानिमित्ताने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा एक आव्हान’ या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.जाधव बोलत होते. वक्ते म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे व स्टडी सर्कल शाखा गोंदियाचे संचालक श्याम मांडवेकर उपस्थित होते.
     श्री.जाधव पुढे म्हणाले, अथक परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही. त्यासाठी अभ्यासाची आवड व आत्मविश्वास बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. जीवनात कुठलेही क्षेत्र हे लहान-मोठे नसते. कुठलेही क्षेत्र निवडतांना धरसोडपणा करु नये. इच्छा असेल तर मार्ग निश्चित निघतो. प्रत्येकाने आपआपल्या पध्दतीने अभ्यास करावा. ध्येय निश्चित करा, यश आपल्याला निश्चितच मिळेल असे त्यांनी सांगितले.
    श्री.बरकते म्हणाले, आपल्याला काय बनायचे आहे हा उद्देश अगोदर निश्चित करुन विद्यार्थ्याने शिक्षण घ्यावे. जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर निश्चितच ध्येय पूर्ण होते. विद्यार्थ्याने कधीही हार मानू नये, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. ग्रामीण भागात ज्ञान देण्याचे काम वाचनालये करतात. वाचनालयात बरेचशी पुस्तके उपलब्ध असतात. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वाचनालयात जावून अभ्यास केला पाहिजे. आत्मविश्वास ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर निश्चितच यश आपल्या पदरात पडेल असे त्यांनी सांगितले.
      श्री.कोकणे म्हणाले, आधीच्या काळात शिक्षण घेतले की नोकरी मिळत होती. आता युग बदलले आहे. हे युग स्पर्धेचे आहे. दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच चालली आहे. स्पर्धेत उतरण्यासाठी अवांतर वाचन व कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. यश संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. हे युग स्पर्धेचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तीव्रता ओळखली पाहिजे. प्रत्येकाने आपले लक्ष्य निर्धारित करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.मांडवेकर म्हणाले, कोणतेही आव्हान असेल तर त्याला सामोरे जाण्याचे आपल्यामध्ये सामर्थ्य असले पाहिजे. बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वृत्तपत्रांचे वाचन, शासनाचे लोकराज्य मासिक, सामान्य ज्ञान पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यास केला तर ध्येय निश्चितच साध्य करता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत विस्तृत माहिती दिली.

    यावेळी उपस्थित काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत प्रश्न विचारले असता मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नांचे योग्यप्रकारे निराकरण केले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.

Thursday 30 November 2017

परिसंवादातील वक्त्यांचा सूर डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

गोंदिया ग्रंथोत्सव 2017

            आजचे युग हे संगणकाचे युग आहे. आजच्या या डिजीटल युगातही ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्तवतीने वाचनालयाच्या बजाज सभागृहात 29 नोव्हेंबर रोजी गोंदिया ग्रंथोत्सव-2017 च्या निमित्ताने डिजीटल युगात ग्रंथाचे महत्व या विषयावरील परिसंवाद वक्ते आपले विचार व्यक्त करतांना बोलत होते. या परिसंवादामध्ये राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू, प्रा. कविता राजाभोज व प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला.
          डॉ. जनबंधू म्हणाले, आजचे ग्रंथालय हे आधुनिकतेकडे वळलेले असावे. डिजीटायझेशनच्या माध्यमातून ग्रंथ उपलब्ध झाले आहे. माहितीचे आदान प्रदान झाले पाहिजे. पुस्तकाच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले पाहिजे. ग्रंथांच्या व्याख्या आज बदलत आहे. त्यानुसार ग्रंथालयाने बदल स्विकारले पाहिजे. डिजीटल युगातही ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी सांगितले.
          डिजीटायझेशनचे फायदे भरपूर असल्याचे सांगून डॉ. जनबंधू म्हणाले, ग्रंथालयांनी आता विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे. संगणकाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांना संगणक साक्षर व सुसंस्कृत केले पाहिजे. असे ते म्हणाले.
           प्रा. श्रीमती राजाभोज म्हणाल्या, युगाची परिभाषा ही अष्मयुगापासून हळूहळू बदलत गेली आहे. माणसाची परिभाषा बदलत गेली. त्याचप्रकारे साहित्यही बदलत गेले. काळाप्रमाणे माणसानेही बदल स्विकारणे गरजेचे आहे. डिजीटल युगात आपण स्क्रीनवर वाचतो, पाहतो, पण लक्षात किती राहते हा महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण ग्रंथाचे वाचन केले तर कायम लक्षात राहते. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांला मोबाईल घेऊन न देता वाचनासाठी पुस्तके घेवून दिली पाहिजे. वाचनाचे संस्कार आले नाही तर आपण आजच्या युगात जगू शकणार नाही. पूर्वी वाचन संस्कृती ही मार्यादित लोकांकडे होती, असे त्यांनी सांगितले.
           प्रा. मेश्राम म्हणाले की, आजची पिढी ही डिजीटल झाली आहे. ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. डिजीटलमुळे सर्व जग जवळ आले आहे. जग कितीही बदलले असले तरी ग्रंथाचे महत्व कमी झालेले नाही. आजही वाचकांचा ग्रंथावर  100 टक्के विश्वास आहे. पण ई-बुकवर विश्वास ठेवणे आजही अवघड जाते. ग्रंथालयाचे स्वरुप आज बदलले आहे. ते आज ज्ञानाचे मंदिर झाले आहे. ज्ञानरुपी या मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रंथालयातून ज्ञानदानाचे कार्य करण्यात येत आहे. 18 वे शतक हे क्रांतीचे होते. क्रांतीकारी विचाराचा प्रभाव समाजावर झाला त्यामुळे विचारसरणी प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.
         आज आपण 21 व्या शतकात वावरत असल्याचे सांगून प्रा. मेश्राम म्हणाले, ग्रंथ हे माहिती व ज्ञान देण्याचे काम करतात. व्यक्तीची आवड निवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथालये हे ज्ञानात भर घालण्याचे काम करतात. व्यक्तीला वाचनास प्रवृत्त करण्याचे काम ग्रंथालये करतात. मानवी समाजाचा विकास ग्रंथालयामुळे साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

           डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व या विषयांवर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी ग्रंथप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.

व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात - प्रा.नरेंद्र आरेकर

                              गोंदिया ग्रंथोत्सव-2017 परिसंवाद
     प्रत्येकाने आध्यात्मीक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ग्रंथ हेच गुरु आहेत. मानवी जीवनाचे व्यक्तीमत्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथात आहे, असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले.
    जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवा निमित्ताने आयोजित ‘ग्रंथाने काय दिले’ या परिसंवादात श्री.आरेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कवी व साहित्यीक माणिक गेडाम, प्रा.डॉ.वर्षा गंगणे, प्रा.डॉ.सविता बेदरकर उपस्थित होत्या.
      श्री.आरेकर पुढे म्हणाले, पुस्तके माणसाला घडवितात. ग्रंथ ज्या स्वरुपाचे असतात त्याचप्रमाणे आपण घडत असतो. ग्रंथ माणसाला बहुश्रूत करतात. आपल्याला बोलण्याची शक्ती ग्रंथाने दिली आहे. चांगला वाचक असल्याशिवाय चांगला नेता होत नाही. ग्रंथांनी संतांचे अभंग दिले. ग्रंथ हे जगाकडे बघण्याची दृष्टी देतात. ग्रंथ हे आपल्याला प्रेरणा देतात. अन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे काम पुस्तके करतात. प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. अवांतर पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. वाचन अविरत सुरु ठेवावे. मानवी जीवनाला समृध्द करण्याचे काम ग्रंथ करीत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.गेडाम म्हणाले, ग्रंथांनी समाजाची वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले आहे. निसर्ग हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी मृत्यूंजय कादंबरी एकदातरी वाचावी, त्यातून प्रेरणा मिळेल. क्रमीक पुस्तकांसोबतच इतर साहित्याचे सुध्दा वाचन केले पाहिजे. अवांतर वाचन केल्याने ज्ञान समृध्द होते. वाचन हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आत्मचरित्र लिहिण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
     प्रा.डॉ.गंगणे म्हणाल्या, सध्या वाचन संस्कृती लोप पावत आहे. आज पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आज वाचक हरवल्याचे दिसून येत आहे. ग्रंथांचे जतन केले पाहिजे. ग्रंथांमध्ये व्यक्तीमत्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. आई-वडिलांनी मुलांमध्ये पुस्तके वाचनाची आवड निर्माण करावी. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते, त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. अनुकरणाची परंपरा जपल्या गेली तर वाचन संस्कृती जपली जाईल. ग्रंथांमध्ये मानवाचे भवितव्य निर्माण करण्याची शक्ती आहे. एखादया कार्यक्रमात आपल्याला भेट वस्तू दयायची असेल तर आपण पुस्तक भेट म्हणून दयावी असेही त्यांनी सांगितले.
      प्रा.बेदरकर म्हणाल्या, विचारांना प्रेरणा देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके आपले जीवन घडवितात. देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर देवालयात जाण्यापेक्षा ग्रंथालयात जाण्याची आज खरी गरज आहे. ग्रंथांनी आपल्याला खुपकाही शिकवले आहे. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणेमुळेच यापुढेही काम करीत राहीन. ग्रंथांनी मला समृध्द केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.कटरे म्हणाले, मराठी ही आमची मायबोली आहे. झाडीबोली ही आपली मराठीची अमृत भाषा आहे. ग्रंथ हे माणसाला घडवितात. ग्रंथ वाचनाचा चांगला परिणाम होतो. ग्रंथ हे नेहमीच मदत करायला तयार असतात. वाचक घडवावा लागतो. विचारप्रवाह हे कधीही संपत नाही. जो संपतो तो वाद आणि जो प्रवाहीत राहतो तो विचारप्रवाह असतो. जीवनात प्रत्येकाला वाचणाची आवड असली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी मान्यवरांना भारतीय संविधान ग्रंथ म्हणून भेट देण्यात आले. शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर, नाथे पब्लीकेशन नागपूर, हिमालय पब्लीकेशन, अभिमन्यू बुक स्टॉल साकोली व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल या ग्रंथोत्सव कार्यक्रमात लावण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेषराव भिरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी मानले.