जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 27 July 2018

नक्षल हल्ल्यात शहीद नागरिकांचे वर्षभरात स्मारक उभारणार - डॉ. दिलीप पाटील भुजबळ





Ø  नक्षलवादी चळवळ लोकशाहीला मारक
Ø  नक्षल दमन विरोधी सप्ताहाचा समारोप
Ø  पोलिसांच्या नाविन्यपूर्ण स्पर्धा
          नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 23  पोलीस अधिकारी कर्मचारी व 34 नागरिक शहीद झाले आहेत. नक्षल हल्ल्यात आपला प्राण गमावणाऱ्या पोलिसांसह नागरिकही शहीद असून या सर्व शहीद नागरिकांचे पोलीस विभाग वर्षभरात स्मारक उभारेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले.
           गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने 20 ते 27 जुलै दरम्यान नक्षल दमन विरोधी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, गोंदिया या ठिकाणी आयोजित केला असता  ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्राचार्य संगिता घोष, पोलीस उपअधिक्षक (गृह) सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले व राजीव नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
              विकासाच्या नावावर गोरगरीब नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम नक्षलवादी करतात असे सांगून डॉ. भुजबळ म्हणाले की, नक्षलवाद्यांची ही योजना पोलीस विभागाने मोडून काढली पाहिजे. त्यासाठी नक्षल सप्ताहाच्या अगोदरच पोलीस विभागाने नक्षल दमन विरोधी सप्ताह साजरा केला पाहिजे. विकास आणि नक्षलवाद या दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत. ही बाब जनमानसात पटवून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
             नक्षलहल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांबरोबरच नागरिकांनी जे बलीदान दिले त्याची जाणीव ठेवण्यासाठी 34 शहीद नागरिकांचे एक वर्षांच्या आत स्मारक उभारण्यात येणार असल्याचे डॉ. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. ही स्मारक समाजाला नवी चेतना नवी ऊर्जा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे अधिकारी कर्मचारी शहिद झाले अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेत जाऊन त्यांच्या कार्य कर्तृत्वाविषयी आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
             दमन विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेमुळे व विविध नाविन्यपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नक्षल विचार समाजाला घातक असल्याचा संदेश जनमानसात पोहचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला असे ते म्हणाले.
             करिअर सोबत कला जोपासणे तसे कठीण आहे आणि त्यातही पोलिसांसारखा जोखमीचा जॉब असतांना तर त्याहून कठीण. मात्र आज पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली अशा शब्दात प्राचार्य संगिता घोष यांनी पोलीस विभागाचे कौतुक केले.
             दमन विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने नक्षलविरोधी घोषवाक्य, पोस्टर, व्हिडीओ, पथनाट्य व कविता वाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 88 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. नक्षलवाद आदिवासी जनतेवरील क्रूर अत्याचार या विषयावर निबंध स्पर्धा तर नक्षलवाद लोकशाही व विकासाचा शत्रू या विषयावर वक्तृत्व  स्पर्धा आयोजित केली होती. सप्ताह दरम्यान विद्यार्थी व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. याचा लाभ 1348 नागरिकांनी घेतला. तर निबंध स्पर्धेत 2163 वक्तृत्व स्पर्धेत 427 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
      यावेळी पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नक्षल या विषयावर उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. या स्पर्धेत पथनाट्य- प्रपोगंडासेल गोंदिया प्रथम, ऐओपी धाबेपवनी द्वितीय, पोलीस स्टेशन केशोरी व गोठणगाव तृती, एओपी बिजेपार व दरेकसा चतुर्थ तर पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना  प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे घोषवाक्य स्पर्धेत प्रपोगंडासेल प्रथम, जेटीएसई द्वितीय, पिंपरीया व बिजेपार तृती, चिचगड व मगरडोह चतुर्थ क्रमांक पटकविला. कविता सादरीकरणामध्ये पोलीस स्टेशन केशोरी प्रथम, बिजेपार द्वितीय व नवेगावबांध तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांचे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday 1 July 2018

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज - खा.मधुकर कुकडे

                           खामखुरा येथे 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम


          मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मागील बऱ्याच वर्षापासून वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मींग व वातावरणातील बदलामुळे परिस्थितीला तोंड दयावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो. या सर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. त्यामुळे बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे. असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

        आज 1 जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खामखुरा येथे 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोहर चंद्रिकापूरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रचना गहाणे, किशोर तरोणे, गिरीश पालीवाल, पं.स.सदस्य आशा झिलपे, नगरपंचायत सदस्य श्रीमती ब्राम्हणकर, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रविण बडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.कुकडे पुढे म्हणाले, यंत्रणा आणि संस्थांनी जिल्ह्याला दिलेले 31 लक्ष 64 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकाभिमुख झाला पाहिजे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पर्यावरण संतुलीत ठेवण्याकरीता प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करुन त्याची जोपासणा करावी, तरच ही वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.चंद्रिकापूरे म्हणाले, आपला जिल्हा भाग्यशाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून बराच भूभाग हा वनाने आच्छादीत आहे. जीवसृष्टीचा विनाश थांबविणे हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन करतात त्याचप्रमाणे वृक्षांचे सुध्दा संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासणा करावी असे त्यांनी सांगितले.
      श्री.ढेंगे म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे’ हे सांगून पर्यावरणाचे महत्व विषद केले आहे. त्याची प्रचिती आता दिसून येत आहे. वृक्ष लागवडीमध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. याचा फायदा भविष्यात आपल्याला निश्चितच होणार आहे असे सांगितले.
      श्री.बडगे म्हणाले, शासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर ती वृक्ष जगविणेही महत्वाचे आहे. लावलेल्या वृक्षांचा उपयोग भविष्यात निश्चितच होणार आहे असे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविकातून माहिती देतांना श्री.युवराज म्हणाले, यावर्षी 1 ते 31 जुलै दरम्यान 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला 31 लाख 64 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात 35 लाख 78 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत विविध यंत्रणा, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था सहभागी आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होवून लोकचळवळ निर्माण करावी असे त्यांनी सांगितले.
       यावेळी खासदार मधुकर कुकडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी खामखुरा गावाच्या परिसरात राखीव वन कक्ष क्रमांक 259 येथे वृक्ष लागवड केली. कार्यक्रमास अर्जुनी/मोर वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले, खामखुरा गावचे सरपंच अजय अंबादे, ईटखेडाचे सरपंच अश्विन कोडापे, इसापूरचे सरपंच आनंदराव सोनवाने, झरपडाचे सरपंच श्रीमती डोंगरवार, पोलीस पाटील जयप्रकाश लाडे, माजी सरपंच मधुकर गुनेवार, तिबेटीयन सेटलमेन्टचे अध्यक्ष सो ग्यालसेन, प्राचार्य श्री.परशुरामकर तसेच खामखुरा गावाच्या परिसरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार भारतीय वनसेवेचे अधिकारी पुनम पाटे यांनी मानले.