जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 27 July 2018

नक्षल हल्ल्यात शहीद नागरिकांचे वर्षभरात स्मारक उभारणार - डॉ. दिलीप पाटील भुजबळ





Ø  नक्षलवादी चळवळ लोकशाहीला मारक
Ø  नक्षल दमन विरोधी सप्ताहाचा समारोप
Ø  पोलिसांच्या नाविन्यपूर्ण स्पर्धा
          नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 23  पोलीस अधिकारी कर्मचारी व 34 नागरिक शहीद झाले आहेत. नक्षल हल्ल्यात आपला प्राण गमावणाऱ्या पोलिसांसह नागरिकही शहीद असून या सर्व शहीद नागरिकांचे पोलीस विभाग वर्षभरात स्मारक उभारेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले.
           गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने 20 ते 27 जुलै दरम्यान नक्षल दमन विरोधी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, गोंदिया या ठिकाणी आयोजित केला असता  ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्राचार्य संगिता घोष, पोलीस उपअधिक्षक (गृह) सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले व राजीव नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
              विकासाच्या नावावर गोरगरीब नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम नक्षलवादी करतात असे सांगून डॉ. भुजबळ म्हणाले की, नक्षलवाद्यांची ही योजना पोलीस विभागाने मोडून काढली पाहिजे. त्यासाठी नक्षल सप्ताहाच्या अगोदरच पोलीस विभागाने नक्षल दमन विरोधी सप्ताह साजरा केला पाहिजे. विकास आणि नक्षलवाद या दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत. ही बाब जनमानसात पटवून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
             नक्षलहल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांबरोबरच नागरिकांनी जे बलीदान दिले त्याची जाणीव ठेवण्यासाठी 34 शहीद नागरिकांचे एक वर्षांच्या आत स्मारक उभारण्यात येणार असल्याचे डॉ. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. ही स्मारक समाजाला नवी चेतना नवी ऊर्जा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे अधिकारी कर्मचारी शहिद झाले अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेत जाऊन त्यांच्या कार्य कर्तृत्वाविषयी आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
             दमन विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेमुळे व विविध नाविन्यपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नक्षल विचार समाजाला घातक असल्याचा संदेश जनमानसात पोहचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला असे ते म्हणाले.
             करिअर सोबत कला जोपासणे तसे कठीण आहे आणि त्यातही पोलिसांसारखा जोखमीचा जॉब असतांना तर त्याहून कठीण. मात्र आज पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली अशा शब्दात प्राचार्य संगिता घोष यांनी पोलीस विभागाचे कौतुक केले.
             दमन विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने नक्षलविरोधी घोषवाक्य, पोस्टर, व्हिडीओ, पथनाट्य व कविता वाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 88 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. नक्षलवाद आदिवासी जनतेवरील क्रूर अत्याचार या विषयावर निबंध स्पर्धा तर नक्षलवाद लोकशाही व विकासाचा शत्रू या विषयावर वक्तृत्व  स्पर्धा आयोजित केली होती. सप्ताह दरम्यान विद्यार्थी व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. याचा लाभ 1348 नागरिकांनी घेतला. तर निबंध स्पर्धेत 2163 वक्तृत्व स्पर्धेत 427 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
      यावेळी पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नक्षल या विषयावर उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. या स्पर्धेत पथनाट्य- प्रपोगंडासेल गोंदिया प्रथम, ऐओपी धाबेपवनी द्वितीय, पोलीस स्टेशन केशोरी व गोठणगाव तृती, एओपी बिजेपार व दरेकसा चतुर्थ तर पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना  प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे घोषवाक्य स्पर्धेत प्रपोगंडासेल प्रथम, जेटीएसई द्वितीय, पिंपरीया व बिजेपार तृती, चिचगड व मगरडोह चतुर्थ क्रमांक पटकविला. कविता सादरीकरणामध्ये पोलीस स्टेशन केशोरी प्रथम, बिजेपार द्वितीय व नवेगावबांध तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांचे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment