जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 20 August 2019

गोरगरीबांची शासकीय कामे त्वरीत व्हावी - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

सालेकसा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण



       सालेकसा हा तालुका राज्याच्या टोकावर आहे. हा तालुका दुर्गम, आदीवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसिल कार्यालयात शासकीय कामानिमित्त बाहेरगावावरुन गोरगरीब लोक येतात. आता त्यांची कामे या नवीन इमारतीतून त्वरीत झाली पाहिजे. असे मत पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केले.
                सालेकसा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.केशवराव मानकर,माजी आ.भेरसिंग नागपुरे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अलताफ हमिद, जि.प महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, नगराध्यक्ष विरेद्र उईके, जि. प सदस्य दुर्गा तिराले, परसराम फुंडे, तहसिलदार श्री. पित्तुलवार यांची उपस्थिती होती.
                डॉ. फुके म्हणाले,  हा भाग दुर्गम नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्याच्या विकासाला गती मिळाली पाहिजे यासाठी  अधिकारी- कर्मचारी इथे निवासी असले पाहीजे. या इमारतीमूळे गोरगरिब जनतेची व नागरिकांची कामे एकाच छताखाली लवकर होण्यास मदत होईल. गोरगरिबांच्या पैशातुन कर स्वरुपात पैसा उपलब्ध होतो तोच पैसा निधी म्हणुन विकास कामात येतो. त्यामुळे गरिबांच्या पैशाची जाणिव ठेवून विकासकामे चांगल्याप्रकारे झाली पाहिजेत. हाजराफॉल व कचारगडच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. सालेकसा नगराच्या विकासाकरिता नगरपंचायतला 8 कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहे. आमगाव- देवरी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात 1 हजार कोटी रुपयांची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
                सालेकसा, देवरी आणि आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासनाने तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करावे असे सांगून डॉ. फुके म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल. जिल्हातील नागरिकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेवून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
                आमदार पुराम म्हणाले, अनेक वर्षापासुन येथे तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीची आवश्यकता होती.आज ती लोकार्पणामुळे पूर्ण झाली आहे. तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे.मुरकुडडोह- दंडारी या रस्त्यासाठी 17 कोटी रुपये मंजुर झाले आहे. भजेपार-बोदलबोडी दरम्यान असलेल्या नदीवर पूल बांधण्यासाठी 6 कोटी रुपये मंजुर झाले आहे. या भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. दरेकसा- जमाकुडो या भागात रुग्णांना त्वरीत उपचार मिळाले पाहिजे यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहीका या भागात उपलब्ध झाली पाहिजे असे ते म्हणाले.
                पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानातंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील अनुसया हत्तीमारे, धुरपता मेंढे, रंभा मेंढे, भगवंती शहा, हारबी शहा,चमेली सय्यद, जेलनबी शहा,जहारा शहा, बनेरबी शहा, मौसम शहा, नजमा सय्यद,हमिरबी सय्यद,अफसाना शहा ,सलमाबानो शहा, बशीरन सय्यद, शहेजनबी शहा या लाभार्थांना रेशन कार्डचे, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश लक्ष्मीबाई तरोणे, तारा नवाडे यांच्यासह अन्य लाभार्थांना तर भागरथा ब्राम्हणकर, शिला जंगेरे,गिता डोये, जीवनकला साखरे यांच्यासह अन्य लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली.
                कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री डॉ. फुके यांनी फित कापुन तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. तहसिल कार्यालय परीसरात पालकमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. प्रास्ताविक तहसिलदार पित्तुलवार यांनी केले. संचालन प्रा.श्रीमती बोपचे व प्रा. गणेश भदाडे यांनी केले.

व्याघ्र प्रकल्पाच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण

         गोंदिया जिल्ह्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे वैभव आहे. देशातील चांगल्या व्याघ्र प्रकल्पापैकी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा एक आहे. पर्यटक मोठया संख्येने या व्याघ्र प्रकल्पाला भेटीला आले पाहिजे यासाठी ब्रम्हपुरी वनविभागातुन पाच वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. वाघाच्या अस्तिवामुळे वाघ बघण्यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात या प्रकल्पाला भेट देतील. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाला गती मिळुन पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल असे  प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
                नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यानिमित्त्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम, उपवनसंरक्षक  एस. युवराज, नगर पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक घनश्याम पानतावने, बेबी अग्रवाल, बंटी पंचबुध्दे, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, सुनिल केलनका, सुभाष आकरे, भाऊराव उके, महेंद्र मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
                डॉ. फुके पुढे म्हणाले, जिल्ह्यातील जंगलाचे संरक्षण करतांना मृत्यूमूखी पडलेल्या वनरक्षकांच्या स्मरणार्थ या परिसरात त्यांचे स्मारक बांधण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा निर्माण करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असुन त्यांच्या मदतीने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी होम-स्टे ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हातील जे जूने वाडे आहेत तेथे पर्यटकांना मुक्कामाचा आनंद घेता यावा यासाठी वाडयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये देण्यात येतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. विदेशातील पर्यटकसुध्दा या होम-स्टे कडे आकृष्ट होतील. आता वन विभागाला आपण  गतिमान करणार असुन आता वन विभागाची कोणतेही कामे रखडणार नाही याची दक्षता वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी. असे ते यावेळी म्हणाले.
                प्रारंभी पालकमंत्री डॉ. फुके यांनी फित कापून नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी परिसरात वृक्षारोपण केले. या इमारतीत आता वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उपवनसंरक्षक, गोदिंया वनविभाग आणि विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया यांचे कार्यालय स्थानांतरीत झाले आहे. इमारतीच्या बांधकामावर 4 कोटी 96 लक्ष रुपये खर्च करण्यात आले.
                कार्यक्रमाला तिनही विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वन्यजीव प्रेमी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सहाय्यक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे यांनी मानले.

Monday 19 August 2019

देवरी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय दप्तरांचे वितरण



       पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते 19 ऑगस्ट रोजी देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे
इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 2343 विद्यार्थ्याना शालेय दप्तर वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, जि.प. समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, देवरीच्या पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, देवरीच्या नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे,जि.प. सदस्य उषा शहारे व माधूरी कुंभरे,शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईचे सहायक व्यवस्थापक हितेंद्र गांधी, इनोबल सोशल इनोव्हेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग भंडारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने देवरी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव या आदिवासी बहूल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 2343 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पुरविण्यात येणार आहे. यावेळी देवरी तालुक्यातील जि.प.च्या 12 प्राथमिक शाळेतील 97 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वितरीत करण्यात आले. या दप्तराचे वजन 400 ग्राम असून त्याचे रुपांतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई, लिहीण्या व वाचण्याकरीता डेस्क या दप्तरासोबत देण्यात आले आहे. पर्यावरण पुरक असे हे दप्तर आहे. विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्यासाठी साबण ठेवण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. मुलांनी केलेला कचरा इतरत्र न टाकावा यासाठी दप्तरामध्ये छोटी पिशवी सुध्दा आहे.  या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, सर्व शिक्षा अभियानाचे श्री बिसेन, श्री ठोकने यांचेसह विविध शाळांचा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                 000000000000



ग्रामीण जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

देवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन 


      देवरी हा तालुका राज्याच्या टोकावर आहे तसेच येथून राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गावर अपघात झाल्यास जखमीला तातडीने उपचार मिळाले पाहिजे. हा तालुका आदिवासी बहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्यामुळे  या तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
            19 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय देवरीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन डॉ. फुके यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार केशवराव मानकर, नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोगंरे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, प्रमोद संगीडवार, महेश जैन, झामसिंग येरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            डॉ. फुके म्हणाले, देवरीसारख्या मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त भागात चांगली आरोग्याची सुविधा देवरी येथे नव्याने निर्माण होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत मिळणार आहे. इमारतीचे बांधकाम उत्तम दर्जाचे झाले पाहिजे. देवरी हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी  चांगले ट्रामा केअर सेंटर सुरु करावे.  चांगला बगीचा या नवीन इमारतीच्या परिसरात तयार करावा. जुने झाडे तोडू नये. पाच वर्षात देवरी तालुक्यात विकास कामे झाली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार पुराम म्हणाले, तालुक्यातील रुग्ण व नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी सुसज्ज अशी ग्रामीण रुग्णालयाची इमारत दिडवर्षाच्या आतच तयार होणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या देखील पाहिजे त्या प्रमाणात असली पाहिजे. हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळाले पाहिजे. जिल्हयात अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करतांना या नक्षलग्रस्त तालुक्यातील रिक्त पदे प्राधान्याने भरावे. देवरी शहराच्या विकासासाठी सतरा कोटीची विकास कामे मंजूर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            नव्याने बांधण्यात येणाऱ्या देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवर 12 कोटी 32 लाख 65 हजार रुपये खर्च येणार असून ही इमारत एक वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. याइमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थाने, विविध कक्ष राहणार आहे.

दुर्गम व आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देणार - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण




       देवरी तालुक्यातील ककोडी हा भाग राज्याच्या सीमेवर असून हा भाग अतिदुर्गम, आदिवासी  बहुल आणि नक्षलदृष्या अतिसंदेनशील म्हणून ओळखल्या जातो. या भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
            देवरी तालुक्यातील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दिनांक 19 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी हया होत्या. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय पुराम यांची तर  जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा परिषद सदस्य माधूरी कुंभरे, उषा शहारे, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, प्रमोद संगडीवार, महेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
            डॉ. फुके म्हणाले, या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात अधिकारी व कर्मचारी येण्यास तयार नसतात.  ते या भागात सेवेत रुजू झाले पाहिजे यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी निश्चितच शासन घेणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.या भागातील विविध समस्या आपण सोडविण्यास कटीबध्द आहोत. चिचगड येथे या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच अपर तहसिलदार कार्यालय सुरु होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून देवरी तालुक्यात मोठया प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आल्यामुळे दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना वाहतुकीची व कामानिमित्त ये-जा करण्याची चांगली सुविधा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
            देवरी तालुक्यातील दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आरोग्याच्या सुविधा आणखी बळकट करण्यासाठी बाईक ॲम्बूलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा पोहोचविणार असल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, या भागात मातामृत्यू, बालमृत्यू तसेच उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता देखील घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार पुराम म्हणाले, आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. अधिकारी व कर्मचारी देखील या भागात येण्यास तयार होत नाही. इकडे बदली होणे काळया पाण्याची शिक्षा ते समजतात. शासनाच्या विविध  योजनांच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे. आरोग्य केंद्राच्या  माध्यमातून माणसांच्या आरोग्याची काळजी तर पशुवैद्यकीय दवाखानाच्या माध्यमातून गुरांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. सर्व विभागांनी या भागात त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. आरोग्याच्या मोफत चांगल्या आरोग्यसेवा या केंद्रातून मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्र्यांनी प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे फित कापून उद्घाटन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत असलेल्या विविध कक्षाला भेट देवून समाधान व्यक्त केले. या इमारतीच्या बांधकामावर 2 कोटी 19 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. कार्यक्रमाला तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री हिरुळकर यांचेसह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ककोडी येथील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. सुनील येरणे यांनी मानले.

ग्रामस्थांच्या अस्तित्वाचे दस्ताऐवज लवकरच देणार - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

धमदीटोला येथे जनजागृती व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम


        नक्षलवादयांनी मिसीपीरी ग्रामपंचायतीला आग लावल्यामुळे ग्रामस्थांचे जन्म व मृत्यू अभिलेखे जळून नष्ट झाली. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही योजनांचा लाभ घेतांना तसेच शासकीय कामासाठी लागणारी ग्रामपंचायतीची हीच दस्ताऐवज नष्ट झाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ग्रामस्थांचे हे दस्ताऐवज तयार करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. ग्रामस्थांच्या अस्तित्वाचे दस्ताऐवज लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
            19 ऑगस्ट रोजी धमदीटोला येथे जन्म मृत्यू अभिलेखांचे पुर्नबांधणी करुन जन्म मृत्यू दस्ताऐवज पुर्नस्थापित करण्याबाबत जनजागृती व  प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. फुके बोलत होते. अध्यक्षस्थानी  आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा परिषद सदस्य माधूरी कुंभरे, उषा शहारे, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, पंचायत समिती सदस्य महेंद्र मेश्राम, प्रमोद संगडीवार, महेश जैन, झामसिंग येरणे, शिवप्रसाद हिरवानी, गिरीधारी मडकाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
            डॉ. फुके म्हणाले, मिसीपीरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना त्यांचे जाळलेले हे दस्ताऐवज लवकर मिळावे यासाठी आपण व आमदार पुराम यांनी पुढाकार घेतला. याबाबतचा शासन निर्णय 2 ऑगस्टला काढण्यात आला. या दुर्गम, आदिवासी व नक्षलदृष्टया संवेदनशील असलेल्या या भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. ककोडी येथे सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यन्वित झाले आहे. त्यानंतर चिचगड येथे अप्पर तहसिलदार कार्यालय देखील सुरु होणार आहे. या भागातील बेरोजगार युवकांना देवरी येथील एमआयडीसीमधील उद्योगातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार पुराम म्हणाले, मिसपीरी या गावासाठी हा आज एक ऐतिहासिक दिवस आहे.  या गावाला भेट देणारे डॉ. फुके हे पहिले पालकमंत्री आहेत. जन्म मृत्यू दस्ताऐवज या ग्रामंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना मिळाले पाहिजे. यासाठी आपण ग्रामस्थांना 15 दिवसाचे आश्वासन दिले होते. शासनाने याबाबतचा शासन निर्णया काढून या कामाला मूर्त रुप दिले आहे. हे काम इतक्या लवकर करणे सोपे नव्हते. आठ वर्ष या ग्रामस्थांनी ही समस्या सहन केली. या भागातील आदिवासी बांधवाना तेंदूपत्ता बोनस देण्यात येईल तसेच वनहक्क पट्टे देखील देवून त्यांच्या इतरही समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
            श्रीमती मडावी म्हणाल्या, नक्षलवाद्यांनी ग्रामपंचायत जाळल्यामुळे गावातील नागरिकांचे ग्रामपंचायतीशी संबंधित दस्ताऐवज जळाले ते नव्याने तयार करुन देण्याचे काम सुरु झाले असून आज त्यापैकी काही प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
            यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मिसीपीरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुजूरबडगा येथील मनोहर वादले, येडमागोंदी येथील चंद्रपाल सलामे, कलकसा येथील लखनलाल कुंभरे, धमदीटोला येथील मानिकलाल कुंभरे, मांगाटोला येथील संतोष नरेटी, मिसपीरी येथील पांडू मडावी चतुरलाल मडावी, कृष्णा शेवता, सुरेंद्र बन्सोड यांना जन्म प्रमाणपत्र तर सिंधूबाई कुंभरे, लताबाई सयाम, प्रमिलाबाई पंधरे या महिलांना कन्यारत्न जन्मानंद भेट योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयाचे धनादेश वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गोंविद पराते यांनी केले. प्रास्ताविक उपसंरपच जीवनलाल सलामे यांनी केले.
                                                        

Thursday 15 August 2019

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्ती सन्मानित





        पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज 15 ऑगस्ट रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी जिल्हयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच व्यक्तीं व संस्थांचा सत्कार केला. यामध्ये नक्षलग्रस्त भागात उत्तम सेवा केल्याबद्दल पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2019 चे आंतरीक सुरक्षा सेवापदक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजू मेंढे, पोलीस हवालदार मार्टीन लिओनार्ड, सेवक राऊत, पोलीस शिपाई आशिष वंजारी, राजेंद्र चकोले, अर्जुन सांगडे, हितेश बरीये यांचा, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत  वन व वन्यजीव संबंधित उत्कृष्ट कार्य केलेल्या उमरझरी वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्रअधिकारी बालाजी भिवगडे, कोकाचे वनरक्षक साहेब आगलावे, पीटेझरीचे वनरक्षक गिरीधरगोपाल गोहरे व विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनरक्षक दिनेशकुमार भगत, सामाजिक क्षेत्रात हर्ष मोदी, सर्पमित्र शंशाक लाडके, प्रणयपार्थ शर्मा, समाजसेविका चांदणी गुप्ता, गोंदिया नगरपालिकेचे फायर फायटर जितेंद्रसिंह गोटे यांचा, लायन्स क्लब गोंदिया राईस सिटी लायन्स क्लब गोंदिया यांच्यावतीने बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे 408 दिवसांपासून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देत असल्याबद्दल भरत क्षत्रीय, संदीप कडूकर, विजय शर्मा, अजय जयस्वाल, गौरव बग्गा, प्रदीप जयस्वाल, लायन्स क्लब गोंदिया यांच्यावतीने कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथील रुग्णांना व नातेवाईकांना मोफत भोजन देत असल्याबद्दल अशोक अग्रवाल, सिताराम अग्रवाल, कालूराम अग्रवाल, मनोज डोहटे,  हुकुमचंद अग्रवाल यांचा, आदिवासी बहूल नक्षलग्रस्त क्षेत्रात आरोग्य सेवेत अनेक वर्षापासून काम करीत असलेल्या सुशीलकुमार जैन, पर्यावरण संवर्धानासाठी अतिदुर्गम चिचगड भागात काम करणारे शिवछत्रपती प्रतिष्ठान चिचगडचे उमेश गिरी, विविध ठिकाणी स्टॉल लावून मागील एका वर्षापासून निरंतर सर्वसामान्याकरीता निशुल्क भोजन देणारे गोंदिया येथील खालसा सेवा दल, आदिवासी बहूल नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात भजेपार येथे मागील 9 वर्षापासून स्वदेशी खेळाला व प्रतिभावान खेळाडूंना चालना देणाऱ्या सुर्योदय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकर, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला आणि त्यांच्या कुटूंबासाठी उपक्रम राबविणारे तसेच पर्यावरण आरोग्यविषयक विषयांवर काम करणारे आकृती थिंक टूडे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुडधे, चित्रकला आणि संस्कार भारतीशी जुळलेल्या वृक्षारोपण चळवळीस चालना देणारे चित्रकार अरुण नशीने, आमगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश असाटी, आरोग्य क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चान्ना/बाकटी येथे वैद्यकीय अधिकारी  म्हणून उत्तम काम करणारे डॉ.कुंदनकुमार कुलसंगे, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्णांना योग्य व नियमित औषधोपचार करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. चौरागडे, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक भोजेंद्र बोपचे, संजय रेवतकर, संजय भगवतकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
                                                             000000000000000000


जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबध्द - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

                      भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा




         केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी  व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्हयातील नागरिकांना लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
         आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री  डॉ. फुके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक रामानुजम,  उपवनसंरक्षक एस. युवराज, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, श्री गाणार, श्री पठाण, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त, श्री वाळके, जिल्हा‍ नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री गजभिये, जिल्हा उपनिबंधक श्री कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नायनवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राठोड, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी श्री वासनिक, शिक्षणाधिकारी श्री हिवरे, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  
           पालकमंत्री डॉ. फुके पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून घेतला आहे. आतापर्यंत जिल्हयातील 77 हजार 464 खातेदार शेतकऱ्यांची 223 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्हयातील 1 लाख 22 हजार 142 शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जसंधारण आणि मृदसंधारणामध्ये क्रांती घडून आली आहे. या अभियानाला जिल्हयात लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याने मागील चार वर्षात जिल्हयातील 399 गावात 8 हजार 992 कामे पूर्ण करण्यात आली. यामधून 82 हजार 496 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून 1 लाख 64 हजार 993 हेक्टर क्षेत्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
         जिल्हयातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मागील पाच वर्षात पुढाकार घेण्यात आल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, जिल्हयातील विविध प्रकल्पातून 14 हजार 563 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. 11 हजार 884
शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना जुलै 2019 पर्यंत वीजजोडणी देण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांची शेती संरक्षित सिंचनाखाली आल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. धडक सिंचन विहीरी कार्यक्रमाअंतर्गत 2 हजार पैकी 1979 विहीरी पूर्ण झाल्यामुळे नव्याने 1184 हेक्टर संरक्षित सिंचनक्षमता निर्माण झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थीती सुधारण्यास मदत झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून 15 हजार 967 तर रमाई, शबरी आणि इंदिरा आवास योजनेतून 21 हजार 141 घरकुलाची कामे पूर्ण झाल्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधण्याचे स्वप्न शासनाने पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
                डॉ. फुके पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चार वर्षात जिल्हयातील 430 किलोमीटरची ग्रामीण रस्त्यांची 81 कामे पूर्ण करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतूकीची चांगली सुविधा निर्माण झाली आहे. जिल्हा हागणदारी मुक्‍त झाला असून नादुरुस्त असलेली 41 हजार 797 शौचालय दुरुस्त करुन वापरात आणण्यात यश आले आहे. जिल्हयातील मजूरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना  जिल्हयासाठी महत्वाची ठरली आहे. या योजनेतून पाच वर्षात 6 लाख 89 हजार 729 कुटूंबाना  रोजगार पुरविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
                जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, मागील पाच वर्षात शासनाने 1759 कोटी 96 लक्ष रुपयांची धान खरेदी करुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. या धान उत्पादक शेतकऱ्यांना 212 कोटी 62 लक्ष बोनस दिला आहे. वनहक्क कायदयाचे जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून 856 सामूहीक वनहक्क दावे मान्य करुन 98 हजार 555 हेक्टर तर 8 हजार 500 वैयक्तिक दावेदारांना 12 हजार 64 हेक्टर वनक्षेत्र त्यांच्या उपजिविकेसाठी वाटप करण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा 556 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्हयात 1 कोटी 39 लाख 93 हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे ते म्हणाले.
                 डॉ. फुके पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हा हा नैसर्गिकदृष्टया समृध्द आहे. जिल्हयात पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे, वन्यजीव व स्थलांतरीत पक्षी मोठया प्रमाणात आहे. जिल्हयाचे वैभव असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासोबतच जिल्हयातील अन्य पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच जास्तीत जास्त पर्यटक जिल्हयात कसे येतील व त्या माध्यमातून स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
              प्रारंभी  पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्विकारली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार केला. परेडमध्ये पोलीस महिला-पुरुष, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र योजना, स्काऊड गाईड, श्वानपथक, बँडपथक यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजूश्री देशपांडे यांनी मानले.

Thursday 1 August 2019

महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी 28 महिला बचत भवन बांधणार - आ.गोपालदास अग्रवाल




प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा
         गोंदिया तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचतगटाची मोठी चळवळ सुरु केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात 833 बचतगटांच्या माध्यमातून 9772 महिला संघटीत होवून उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाकडे वळत आहे. आता महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी गोंदिया तालुक्यात 28 गावात महिला बचतगट भवन बांधणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
          आज 1 ऑगस्ट रोजी जलाराम लॉन येथे जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त वतीने आणि उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया यांच्या सहकार्याने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, न.प.सदस्य भावना कदम, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य धनंजय वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष तुलसी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, एकीकडे मोठे उद्योगपती बँकांचे कर्ज बुडवून पळून जातात. मात्र बचतगटातील महिला ह्या घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच करतात. महिला ही घरची अर्थ आणि गृहमंत्री आहे. घराचे बजेट कसे करायचे हे काम महिला चांगल्याप्रकारे करतात. महिलांच्या बचतगटाच्या चळवळीला सर्वांकडून मदत मिळाली पाहिजे. बँकांनी बचतगटांना कर्ज देतांना कमी व्याज दर आकारण्याचा विचार केला पाहिजे. बचतगटांना व्याजदरात सवलत मिळाली तर ही चळवळ आणखी सक्षम होईल. सहकारी बँकांनी सुध्दा बचतगटांना कर्ज देतांना कमी व्याजदर आकारले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
        महिलांचा विकास झाला पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, प्रत्येक ग्रामसंघाला बचत भवन असले पाहिजे ही आपली इच्छा आहे. तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी 28 बचत भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच महिन्यात या बचत भवनांचे भूमीपूजन करण्यात येईल. जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादित वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बचतगटांच्या अर्थाजनास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        श्रीमती मडावी म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला मदत मिळाली आहे. शेती व्यवसायासाठी देखील बचतगटातील महिला घरच्या कर्त्या पुरुषाला मदत करीत आहे. शेळी पालन, मत्स्य पालन यासह अनेक योजना आहेत. बचतगटातील महिलांनी कोणत्या योजनांचा लाभ घ्यावा हे त्यांनीच ठरवावे असे त्यांनी सांगितले.
        श्रीमती दोनोडे म्हणाल्या, आज पुरुषांपेक्षा महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. त्यांनी जिद्दीने कोणत्याही क्षेत्रात काम करावे. पूर्वी महिला चुल आणि मुल या कार्यक्षेत्रापुरत्याच मर्यादित होत्या, आज त्या सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्यासह कुटूंबाच्या आरोग्याकडे देखील लक्ष दयावे. छोटे-छोट उद्योग सुरु करुन कुटूंबाला हातभार लावावा.
       श्रीमती हरिणखेडे म्हणाल्या, आज महिला विविध उद्योग उभारुन स्वावलंबी होत आहे. महिला ह्या घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमीत करतात. महिलांनी कुटूंबाकडे लक्ष देवून महिलांना चांगले शिक्षण दयावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
        भावना कदम म्हणाल्या, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या निमित्ताने महिला आज या मेळाव्याला एकत्र आल्या आहेत. माविमच्या माध्यमातून महिला आता सक्षम होत आहे. प्रत्येक्ष क्षेत्रात महिलांनी पुढे आले पाहिजे. महिलांनी एकमेकींना पुढे नेण्यास हातभार लावला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
        डॉ.बेदरकर म्हणाल्या, बचतगटातील महिलांनी बचतगटाअंतर्गत मिळणाऱ्या कर्जातून उद्योग व्यवसाय सुरु करुन प्रगती साधावी. कुटूंबाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यासाठी महिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे सांगितले.
        यावेळी श्री.जागरे, श्री.खडसे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. सन 2018-19 या वर्षात मुद्रा योजनेतून कर्ज घेवून उद्योग सुरु करणाऱ्या दिपाली खवासे व पुष्पा विखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
          यावेळी उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून सहयोग ग्रामसंस्था बाघोली, उत्कृष्ट वस्तीस्तर संघ म्हणून गोंदिया येथील शिल्पकार वस्तीस्तर संघ, सात लाख रुपये घेवून व्यवसाय सुरु करणारा गणखैरा येथील ओमश्री स्वयंसहाय्यता बचतगट, गोंदिया रामनगर येथील रजा महिला बचतगट, यशस्वी महिला उद्योजक म्हणून सेजगाव येथील ममता बारेकर, बचतगटांच्या महिलांचे पाल्य यांनी दहावी व बारावी परीक्षेमध्ये चांगले यश संपादन केल्याबद्दल एकोडी येथील देवकी ठाकरे, गोंदिया येथील संस्कृती काळे यांचा गौरवचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुद्रा योजनेअंतर्गत 15 महिलांना 12 लाख रुपये कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले. यामध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोंदिया- 6 लाभार्थी, बँक ऑफ इंडिया शाखा एकोडी- 2 लाभार्थी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गोंदिया- 2 लाभार्थी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोंदिया- 4 लाभार्थी आणि इंडियन ओव्हरसीस बँक शाखा गोंदिया- 1 लाभार्थी, अशा एकूण 15 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यासोबतच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 11 महिला बचतगटांना 22 लक्ष 50 हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.
        यावेळी जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रतिनिधी हिना अग्रवाल, बँक ऑफ इंडिया शाखा एकोडीच्या श्रीमती बन्सोड, आयसीआयसीचे व्यवस्थापक अर्जुन रहांगडाले, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक मलिंक्य बेसरा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज विभागप्रमुख दुर्गेश रहांगडाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बचतगटातील महिलांनी वस्तू विक्री व खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने हिवताप निर्मूलनासाठी कशाप्रकारे आपण उपाययोजना करावी याची सचित्र माहिती उपस्थित महिलांना दाखवून आशिष बले व पंकज गजभिये यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मानले. संचालन प्रदिप कुकडकर व मोनिता चौधरी यांनी केले. या मेळाव्याला गोंदिया तालुक्यातील व गोंदिया शहरातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी, कुंजलता भुरकंडे, आशिष बारापात्रे, श्री.सोनवणे, श्री.मेश्राम, श्री.अवघड यांच्यासह माविमच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.

सुजाताला स्वयमचा आधार


        गोंदिया जिल्हा राज्याच्या पुर्वेकडे वसलेला असून त्याला छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. हा जिल्हा मागास,दुर्गम,नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील आदिवासी भागातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांचे कुपोषण दूर व्हावे यासाठी त्यांच्या आहारात अंगणवाड्यांच्या माध्यमातून अंड्यांचा पुरवठा व्हावा आणि कुक्कुट पालनाच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयम प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील जमाकुडो या नक्षलप्रभावीत, दुर्गम व आदिवासी वस्ती असलेल्या गावातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या जान्हवी स्वयंसहायता बचतगटाच्या सचिव सुजाता राजकुमार कुमडे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करुन कुटूंबाच्या कर्त्या पुरुषाला अर्थोत्पादनात हातभार लावला आहे.
          राज्य शासनाने 29 एप्रिल 2017 रोजी एक निर्णय घेवून आदिवासी भागातील कुटूंबांची संतुलीत आहाराची गरज लक्षात घेवून तसेच त्या कुटूंबांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अंड्यांचा पुरवठा करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याच्या मुख्य उद्देशातून स्वयम प्रकल्प सुरु केला आहे. सुजाताला या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे. सुजाताला सन 2018-19 या वर्षात मार्च 2019 मध्ये या प्रकल्पातून सातपुडा देशी प्रजातीची 45 कोंबडीची पिल्ले देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 20, दुसऱ्या टप्प्यात 15 आणि तिसऱ्या टप्प्यात 10 अशा एकूण 45 पक्षांचा पुरवठा करण्यात आला.
         सुजाताचा जान्हवी स्वयंसहायता बचतगट हा पिपरटोला येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्राअंतर्गत कार्यरत असून जमाकुडो येथील कचारगड ग्रामसंस्थेशी जुळला आहे. मागीलवर्षी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जमाकुडो येथील कचारगड ग्रामसंस्थेत आले असता त्यांनी बचतगटातील महिलांना तंत्रशुध्द कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे कोंबडी पालन कसे करावे याची दिशा मिळाल्याचे सुजाताने सांगितले. सुजाताला 975 रुपये अंडी विक्रीतून मिळाले. 5 रुपये प्रती अंडा याप्रमाणे विक्री केली. अंगणवाडीत देखील सुजाताजवळून 6 रुपये प्रती अंडी याप्रमाणे खरेदी केली. 150 अंडी गावच्या अंगणवाडीला सुजाताने विकली. अंगणवाडीची  अंडीची गरज पूर्ण करुन इतरांनाही अंडीची विक्री केली. कोंबडे सुध्दा यामध्ये होती. 350 रुपये प्रती किलो याप्रमाणे कोंबडे विक्रीतून 8750 रुपये तीन महिन्यात सुजाताला मिळाले.
          पावसाच्या पाण्यावर अवलंबून अडीच एकर घरच्या शेतीत काम करणाऱ्या सुजाताला कुक्कुटपालन व्यवसाय एक रोजगाराचा आधार झाला. कोंबड्या ठेवण्यासाठी खुराडा तयार करण्यासाठी 1500 रुपये प्रकल्पातून मिळाले. पाच महिन्यात सुजाताला कोंबडी पालनातून 9675 रुपयांचे उत्पन्न मिळाले. बांबूपासून सुप-टोपल्या तयार करण्याचे काम सुध्दा सुजाता फावल्या वेळेत करते. जमाकुडो येथे पोलीस दूरक्षेत्र केंद्र आहे. आठवडी बाजार इथे भरत असल्यामुळे अंडी व कोंबड्यांना चांगली मागणी आहे. यामधून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे कुक्कुटपालन या व्यवसायासाठी स्वयम प्रकल्पाची सुजाताला चांगली मदत झाली आहे. उत्पन्नाचे एक नवीन साधन मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुजाताला स्वयमचा आधार झाला आहे.