जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 28 September 2017

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीतून धानाचे उत्पादन घ्यावे - जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे


प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी चाखली भाताची चव
            गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा सोबतच आपले आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीची कास धरुन धानाचे उत्पादन घ्यावे. असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
       कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रीय तांदूळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधतांना श्री.काळे बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, गोंदिया जिल्ह्यासाठी कृषि आयुक्तालयाने परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये 20 गटांना मंजूरी दिली आहे. प्रति गट 50 शेतकऱ्यांना व प्रति शेतकरी 1 एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या 31 गटांना सन 2017-18 वर्षाकरीता सेंद्रीय शेती राबविण्याची मंजूरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 51 सेंद्रीय गटामध्ये 2346 शेतकरी सेंद्रीय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      धान उत्पादक शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, आपल्या दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रीय तांदूळ उत्पादनामुळे शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादन सुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पक्षांना सुध्दा विषमुक्त अन्न मिळेल. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ बळकट व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
      सेंद्रीय शेतीमधील उत्पादित सेंद्रीय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या कार्यक्रमात जवळपास 1500 लोकांनी सेंद्रीय तांदूळाचा आस्वाद घेतला आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री कार्यक्रमामध्ये 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जय श्रीराम व एचएमटी या तांदूळाची प्रति किलो 60 रुपये याप्रमाणे 4 क्विंटल सेंद्रीय तांदूळाची विक्री करण्यात आली. सेंद्रीय तांदूळ खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखविली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना सेंद्रीय शेतीतील उत्पादित सेंद्रीय तांदूळ शिजवून खाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
      श्री.चव्हाण माहिती देतांना यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील 2372 शेतकरी 51 गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतू यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास 11680 क्विंटल सेंद्रीय तांदूळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास 7116 क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति कुटूंब 10 ते 50 किलो सेंद्रीय तांदूळ देण्याचे नियोजन आत्मा कार्यालयामार्फत सुरु असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले, सदर तांदूळ खरेदीकरीता ग्राहकांनी फेसबुकवर Organic Gondia (ATMA) किंवा 9503525672 या भ्रमणध्वनीवरील व्हॉटस् ॲपवर नोंदणी करावी. नोंदणीकृत ग्राहकांना मागणीनुसार डिसेंबर पहिल्या पंधरवाड्यापर्यंत तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ग्राहकांनी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषि विभाग कार्यालय येथे सुध्दा नोंदणी करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 27 September 2017

ज्युदोचा नावलौकीक वाढविण्याचे प्रयत्न करा - डॉ.दिलीप-पाटील भूजबळ




45 व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्युदो स्पर्धेचे उदघाटन
               ज्युदो हा क्रीडा प्रकार मुळ भारतीय आहे. येथून तो चीन, जपान त्यानंतर अमेरिकेत गेला आणि अमेरिकेतून परत भारतात आला. असा या खेळाचा प्रवास आहे. हा खेळ मुळात भारतीय असल्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगून, या खेळाचा नावलौकीक वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप-पाटील भूजबळ यांनी केले.
      आज 27 सप्टेबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील इंडोअर स्टेडियम  येथे अमॅच्युर ज्युदो असोसिएशन गोंदिया व महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 45 वी राज्यस्तरीय सब ज्युनियर मुले/मुली ज्युदो स्पर्धेचे उदघाटन करतांना पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे सचिव दत्ता आफळे, उपाध्यक्ष राजकुमार पुंडकर, सहसचिव डॉ.गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रवि मेटकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मनोहर बनगे, ॲड.सुधीर कोंडे, नरसिंग यादव, पुरुषोत्तम चौधरी, जिल्हा अमॅच्युर असोसिएशनचे अध्यक्ष अजयसिंह गौर, संयोजक अपुर्व अग्रवाल, सचिव राजेश गायधने यांची उपस्थिती होती.
      डॉ.भुजबळ पुढे म्हणाले, पोलीस प्रशिक्षणात ज्युदो क्रीडा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. आत्मसंरक्षणासाठी ज्युदोची भुमिका महत्वाची आहे. गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असून सुध्दा या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेच्या आयोजनामुळे गोंदियाचा नावलौकीक वाढण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
       समाजाचे रक्षण करण्यासाठी मुलींनी ज्युदोचे चांगले प्रशिक्षण घेवून दुर्गेच्या अवतारातून पुढे आले पाहिजे असे सांगून डॉ.भूजबळ पुढे म्हणाले, राज्य किंवा राष्ट्रीयस्तरावर या स्पर्धेत सहभागी असल्याचे प्रमाणपत्र असल्यास खेळाडूला नोकर भरती प्रक्रियेत 5 टक्के खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.आफळे म्हणाले, ज्युदो खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. ज्युदोच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आज गरज आहे. महाराष्ट्राच्या मातीत खेळावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. राज्याची खेळाची परंपरा ही उज्वल आहे. या खेळाच्या वाढीसाठी समाजातील अनेक घटक आज पुढे येत आहे ही आनंदाची बाब आहे. ज्यांनी या खेळात खेळाडू म्हणून सुरुवात केली ते पुढे जावून आंतरराष्ट्रीय पंचापर्यंत पोहोचले. शासनाच्या धोरणाप्रमाणे खेळाडूंसाठी 5 टक्के आरक्षण नोकरीमध्ये आहे. या खेळातून आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी कागदपत्रांची पुर्तता करण्याची प्रक्रिया सोपी झाली पाहिजे असे ते म्हणाले.
      श्री.अग्रवाल म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने आतापर्यंत सर्वात जास्त ज्युदो खेळाडू गोंदिया येथील स्पर्धेत सहभागी झाले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेत जे खेळाडू यशस्वी होतील ते देशपातळीवर राज्याचा नावलौकीक करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
       या स्पर्धेत मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील 277 मुले व 173 मुली सहभागी झाल्या आहेत. यामधूनच सन      2017-18 ची राष्ट्रीय निवड चाचणी सुध्दा या स्पर्धेतूनच होणार आहे. यावेळी ज्युदो खेळासाठी योगदान देणारे पुणे येथील ॲड.सुधीर कोंडे यांचा शाल, श्रीफळ देवून डॉ.भूजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध जिल्ह्यातून आलेले स्पर्धक मुले/मुली, पंच व मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार राजेश गायधने यांनी मानले.
00000


Wednesday 20 September 2017

आमगाव/खुर्दच्या सहारा कृषि केंद्राला झारखंडच्या अधिकाऱ्यांची भेट

       महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदियाच्या वतीने सालेकसा तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा संचालीत  बचतगटांच्या महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या आमगाव/खुर्द येथील सहारा कृषि केंद्राला झारखंडच्या समाजकल्याण विभागाचे विशेष सचिव ब्रजेश कुमार दास व झारखंड आदिवासी विकास समितीचे संचालक भुजेंद्र बस्की यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, साधन केंद्राच्या व्यवस्थापक शालु साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
      कृषि केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता कां भासली. कृषि केंद्र सुरु केल्यानंतर आलेल्या अडचणी, या अडचणींची केलेली सोडवणूक याबाबतची माहिती कृषि केंद्र चालविणाऱ्या महिलांनी यावेळी दिली. या भागात भात हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. परंतु शेती करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक क्षमता नसते. यासाठी त्यांना कर्ज काढून पीक घ्यावे लागते. माविमअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियानाच्या माध्यमातून श्री पध्दतीने भात लागवडीची कार्य सुरु करण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणी बियाणे व खते जास्त किंमतीत खरेदी करावे लागत असायचे व मोठ्या व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जायची. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ती जास्त किंमतीत खरेदी करावी लागत असायची. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी बचतगटांचे कृषिकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
       सहारा लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून कृषि केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके कृषि केंद्रातून विक्रीसाठी कृषि विभागाकडून परवाना मिळविण्यात आला. एप्रिल महिन्यात गाव आणि गट स्तरावर बि-बियाणे व खते यांची मागणी गोळा करण्यात येते. तालुकानिहाय मागणी एकत्र करुन विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि.जिल्हा कार्यालय गोंदिया यांच्याकडे मागणीचा प्रस्ताव व माविम जिल्हा कार्यालय यांच्याकडून हमीपत्र सादर करण्यात येते. खते व बि-बियाणे ठेवण्यासाठी गोदाम व कार्यालयाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कृषि केंद्राच्या कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्ष अर्चना चुटे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.

      कृषि केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बियाणे व खते विकली जात नाही तर नविन तंत्रज्ञानाबाबत कृषि व्यवस्थापक यांच्या माध्यमाधून माहिती देण्यात येत असते. याबाबतची माहिती कृषि केंद्रांच्या महिलांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या सर्व सेवा देत असतांना शेतकऱ्यांकडून काही फी घेतली जाते कां, कृषि केंद्राचे रेकॉर्डस् कशाप्रकारे ठेवण्यात येते हे सुध्दा त्यांनी जाणून घेतले. कृषि केंद्रामार्फत केले जाणारे विविध उपक्रमांचे कौतुक त्यांनी केले. उत्तरोत्तर या केंद्राची सेवा तालुक्यातील जास्तीत जास्त गरीब महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या भेटीदरम्यान सहारा लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष अर्चना चुटे, उपाध्यक्ष धनवंता वडगाये, सचिव सुकेश्वरी रहांगडाले, कोषाध्यक्ष सुनीता खेर, सहसचिव प्रिती कटरे, सदस्य दमयंती मौजारे, ममता लिल्हारे, वंदना मेंढे, लता टेंभरे, सुनीता कटरे, वैशाली हरिणखेडे आदी उपस्थित होत्या.

सालेकसा येथे सहारा साधन केंद्राला झारखंडच्या अधिकाऱ्यांची भेट

     महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सालेकसा तालुक्यात बचतगटाचे काम मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे सुरु आहे. याच बचतगटांची सालेकसा येथे असलेल्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्राला नुकतीच झारखंड राज्याचे समाजकल्याण विभागाचे विशेष सचिव ब्रजेश कुमार दास आणि झारखंड आदिवासी विकास समितीचे संचालक भुजेंद्र बस्की यांनी भेट दिली व गावपातळीवर काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यवसाय, उद्योग व कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्तंड, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड, साधन केंद्राच्या व्यवस्थापक शालु साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
     ग्रामीण भागात महिलांच्या उपजिविका वाढविण्याचे कार्य कशा पध्दतीने केले जात आहे याबाबतची माहिती तालुका कार्यक्रम व्यवस्थापक श्री.गायकवाड यांनी दिली. पशुसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, कृषिसखी, समुदाय कृषि व्यवस्थापक, मत्स्यसखी, समुदाय मत्स्य व्यवस्थापक यांच्या कार्याची माहिती यावेळी सादरीकरणातून त्यांनी दिली.
       शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण करणे, श्री पध्दतीने भात लागवडीविषयी माहिती देणे, माती परिक्षण करुन घेणे, शेतीशाळा घेणे, अभ्यास दौरे आयोजित करणे, चांगल्या प्रकारची बियाणे, रोपे उपलब्ध करुन देणे, सामुयीक पध्दतीने बियाणे, खते खरेदी करावयास मार्गदर्शन करणे, विविध रोगांवर उपाययोजना सांगणे, कृषि विभागाच्या योजनांची माहिती देणे, याबाबतची माहिती आपण आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देत असल्याचे उपस्थित कृषि सखींनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.        
    मत्स्यसखीने मत्स्यसखी म्हणून काम करीत असतांना तलावांचे मत्स्यपालकांचे सर्व्हेक्षण, तलावांची पुर्वतयारी करुन घेणे, मत्स्यपालकांची मत्स्यबीज व बोटूकली याबाबतची एकत्रित मागणी घेवून त्यांना शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून उपलब्ध करुन देणे, माशांच्या आहार व्यवस्थानाबाबत माहिती देणे, बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती दिली.

       या बैठकीत पशुसखी, कृषिसखी, मत्स्यसखी यांच्या स्तरावर ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डसची पाहणी झारखंडच्या अधिकाऱ्यांनी केली. श्री.सोसे यांनी जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या महिला बचत गटांच्या विविध व्यवसायाबाबत व योजनांच्या प्रगतीबाबतची माहिती दिली. यावेळी तालुक्यातील 25 पशुसखी, 10 कृषिसखी, 5 मत्स्यसखी, 7 समुदाय पशुधन व्यवस्थापक, 2 समुदाय कृषि व्यवस्थापक, 2 समुदाय मत्स्यव्यवस्थापक, माविम जिल्हा कार्यालय व सहारा लोकसंचालीत साधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Friday 15 September 2017

'मी मुख्यमंत्री बोलतोय' : 'डिजिटल प्रशासन'च्या पहिल्या भागाचे रविवारी प्रसारण


         राज्यातील जनता आणि शासन यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यासाठी 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येते. राज्यातील जनतेने ई- मेल, व्हॉटस ॲप आणि थेट विचारले़ल्या प्रश्नांची  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमातून उत्तरे देत असतात. 'डिजिटल प्रशासन' विषयाच्या अनुषंगाने पहिला भाग विविध 'दूरचित्रवाणी'वाहिन्या आणि 'आकाशवाणी' वरून प्रसारित करण्यात येणार आहे.
दूरदर्शन, झी 24 तास, झी मराठी, साम मराठी
या दूरचित्रवाहिन्यांवर पहायला विसरू नका !
            'डिजिटल प्रशासन' या विषयाचा पहिला भाग हा  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी,साम मराठी, झी 24 तास या वाहिन्यांवरून रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2017 रोजी  सकाळी 10.00 वाजता तर झी मराठी या वाहिनीवरून सकाळी 10.30 वाजता प्रसारित होणार आहे.या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सोमवार दिनांक‍ 18 सप्टेंबर 2017  रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे.
आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर
'दिलखुलास' मध्ये नक्की ऐका!
        'डिजिटल प्रशासन' या विषयाचा पहिला भाग हा आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून 'दिलखुलास' या कार्यक्रमात सोमवार दिनांक 18 आणि मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 वाजता या वेळेत प्रसारित  होईल.
जनतेने विचारले विविध प्रश्न

                महाराष्ट्रात बहुतांश ग्रामीण व दुर्गम भागत अद्याप इंटरनेची सुविधा नाही सर्वत्र चांगल्या स्पीडने इंटरनेट सुविधा कधी उपलब्ध होणार शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज तातडीने उपलब्ध व्हावे याकरिता  कोणते ॲप आहे ? माहिती तंत्रज्ञानाधारित "स्मार्ट शहरे " बनवण्याबरोबरच "स्मार्ट गावे" बनविण्यासाठी शासनाचे काही प्रयत्न अथवा योजना आहेत का? राज्यातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची कमतरता आहे. अशा वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या डिजिटल तंत्रज्ञनाचा कशा प्रकारे उपयोग करत आहात ? आपले सरकारच्या माध्यमातून शिधापत्रिका सेवा कधी सुरू होईल ? जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन आपले सरकारच्या माध्यमातून पडताळणीसाठी किती कालावधी लागतो ? यासह अनेक प्रश्न 'मी मुख्यमंत्री बोलतोय' : 'डिजिटल प्रशासन'च्या पहिल्या भागात जनतेने विचारलेले आहेत.

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण - मंगेश मोहिते

        



            सांघिक पध्दतीच्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. सांघिक खेळामुळे एकात्मतेची भावना निर्माण होत असल्यामुळे अशा प्रकारच्या खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांनी व्यक्त केले.
       15 सप्टेबर रोजी इंदिरा गांधी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.मोहिते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपशिक्षणाधिकारी सुरेश मांढरे, स्काऊट ॲन्ड गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक मनिषा तराळे, तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई, लेखाधिकारी एल.के.बाविस्कर, डॉ.हरगोविंद चौरसीया, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांची उपस्थिती होती.
      श्री.मोहिते पुढे म्हणाले, सांघिकपणे खेळतांना मदत केली पाहिजे ही भावना देशपातळीवर देखील दिसून येते. एकमेकांशी आपली स्पर्धा असते. मात्र संघ म्हटला की आपण सर्वजन सारखे असतो आणि संघासाठी आपण एकमेकांना मदत करतो. जीवनात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होवू शकतो असेही ते म्हणाले.
      यावेळी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई यांचा अपर जिल्हाधिकारी श्री.मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
      प्रास्ताविकातून माहिती देतांना श्री.गांगरेड्डीवार म्हणाले, पुढील ऑक्टोबर महिन्यात फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचे आयोजन आपल्या देशात होत आहे. त्यापैकी 6 सामने आपल्या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई येथे होत आहेत. ग्रामीण भागात सुध्दा फुटबॉल खेळाची चळवळ गतीमान झाली पाहिजे. जिल्ह्यात आज 12320 खेळाडू फुटबॉल खेळत आहेत. यामध्ये 8220 मुले आणि 4100 मुली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध मैदानावर आज 16000 खेळाडू फुटबॉल खेळत असल्याचे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाला गोंदिया येथील एनएमडी महाविद्यालय, एस.एस.गर्ल्स महाविद्यालय, मनोहर मुन्सीपल हायस्कूल, राजस्थानी मारवाडी हायस्कूल, महावीर महाविद्यालय, गुरुनानक इंग्लीश मिडियम स्कूल, मनोहर मुन्सीपल कॉन्व्हेंट, एन.एम.पटेल महाविद्यालय, गोंदिया फुटबॉल अकॅडमी, सिटी क्लब गोंदिया आदी संघाचे फुटबॉल खेळाडू यावेळी उपस्थित होते.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, वरिष्ठ लिपीक डी.एस.बारसागडे, शिवचरण चौधरी, रवी परिहार यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. श्री.मोहिते यांनी फुटबॉलला कीक मारुन खेळाचा शुभारंभ केला. संचालन क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी मानले.

Tuesday 12 September 2017

महाराष्ट्र वार्षिकी-2017 संदर्भ ग्रंथ उपयुक्त - अभिमन्यू काळे

       राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला  महाराष्ट्र वार्षिकी-2017 हा संदर्भ ग्रंथ विविध घटकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयात 11 सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना महाराष्ट्र वार्षिकी-2017 हा संदर्भ ग्रंथ जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी भेट म्हणून दिला. यावेळी ते बोलत होते.
      या संदर्भ ग्रंथात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती, शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध विषयांची माहिती जाणून घेणारे अभ्यासक, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी उपयुक्त माहिती आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्र राज्याची वस्तुनिष्ठ व अधिकृत माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती, महाराष्ट्राची परंपरा, मागील वर्षातील राज्य शासनाच्या संदर्भात महत्वाच्या घडामोडी, शासनाचे विविध विभाग, जिल्ह्यांची माहिती, मंत्रीमंडळाचे निर्णय, केंद्र व राज्य शासनाचे मंत्रीमंडळ, क्रीडा, पर्यटन, दळणवळण, शिक्षण, कृषि, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य, संसद सदस्य यांच्या माहितीचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

      या संदर्भ ग्रंथाची किंमत 300 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, न.प.इंजिन शेड शाळा इमारत, मेठी बगीच्या समोर, सिव्हील लाईन,गोंदिया येथे हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी दिली.

सफाई कामगारांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - रामु पवार

       आरोग्य आणि स्वच्छता राखण्याच्या बाबतीत सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र त्यांच्याच समस्यांकडे दुर्लक्ष होते. सफाई कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी. असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामु पवार यांनी दिले.
       आज 12 सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित आढावा सभेत श्री.पवार बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, गोंदिया न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, तिरोडा न.प.मुख्याधिकारी विजय देशमुख, जि.प. प्रभारी समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, समाजकल्याण अधिकारी संभाजी पवार, सफाई कर्मचाऱ्यांचे नेते नंदकिशोर महतो, जयसिंगजी कछवा, सतीश सीरसवान, मोतीजी जनवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.पवार म्हणाले, लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिका क्षेत्रात सफाई कामगारांची भरती करण्यात यावी. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेने तातडीने सफाई कामगारांची भरती करावी. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे स्वच्छता राखण्यात अडचणी निर्माण होत आहेत. नगरपालिकेने स्वच्छता राखण्यासाठी आराखडा तयार करावा. गोंदिया शहरासाठी आज 660 सफाई कामगारांची आवश्यकता असतांना केवळ 207 सफाई कर्मचारी स्थायी, अस्थायी पध्दतीने काम करीत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रोगराई वाढत आहे असे ते म्हणाले.
      वाढत्या लोकसंख्येचा भार सफाई कामगारांवर येतो असे सांगून श्री.पवार म्हणाले, सफाई कामगार भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे शासकीय यंत्रणेने सफाई कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. पंतप्रधानांचे  स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सफाईबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाही यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. सफाई कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लाड समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी. सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्कानुसार सेवेत सामावून घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील व आरोग्य विभागातील सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. सफाई कामगारांच्या प्रश्नांची सहानुभूतीपूर्वक सोडवणूक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
      श्री.पाटील यावेळी म्हणाले, गोंदिया नगरपरिषदेतील सफाई कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव दोन महिन्याच्या आत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. सफाई कामगारांना घान भत्ता आणि गणवेश धुलाई भत्ता देण्यात येतो. सफाई कामगारांना 34 घरे बांधून देण्यात आली आहे. 4 सफाई कामगारांना मुकादम या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. 42 पात्र सफाई कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.देशमुख म्हणाले, तिरोडा नगरपरिषदेमध्ये 2005 च्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची 23 स्थायी पदे व 6 अस्थायी पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत एकही सफाई कामगाराचे पद रिक्त नाही. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पदोन्नती समितीकडे सादर केला आहे. काही कामगारांना घरे मंजूर करण्यात आली आहे. काहींचे घर बांधून देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
      यावेळी उपस्थित सफाई कामगार प्रतिनिधींनी 5 तारखेच्या आत सफाई कामगारांचा पगार झाला पाहिजे. पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर सहा महिन्याच्या आत सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. सफाई कामगार ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून राहत आहेत त्यांच्या नावावर मालकी पट्टे देण्यात यावे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी समाज भवन असावे. सफाई कामगारांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे. रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे. नगरपालिका व आरोग्य विभागात रिक्त असलेली सफाई कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

      यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी शशी सारवान, विजय मोगरे, मनोज डकाहा, सोनू मारवे, भूषण ढंडोरे यांचेसह विविध सफाई कामगारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी मानले.

Wednesday 6 September 2017

महास्कीम संकेतस्थळावरुन योजनांची माहिती जाणून घ्या - प्रशांत सांगडे

                           बामणीत गणेशोत्सवानिमित्त संवाद पर्व
     शासन जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना राबवित असते. लाभार्थ्यांना अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महास्कीम या संकेतस्थळावरुन योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी केले.
     सालेकसा तालुक्यातील बामणी येथे नुकतेच माँ शितला बाल गणेश उत्सव समिती श्री साई ग्रामसंस्था आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन तहसिलदार श्री.सांगडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, तालुका कृषि अधिकारी श्री.तोडसाम, तालुका आरोग्य अधिकारी नरेश येरणे, माविमचे तालुका प्रकल्प समन्वयक अनिल गायकवाड, पोलीस पाटील सोमेश्वरी कटरे, सेवकराम कटरे, अमृतलाल लिल्हारे, शालुराम दमाहे, भटुलाल कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.सांगडे बोलतांना पुढे म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीतून विविध मोठ्या आजारावरील उपचारासाठी मदत मिळते. जिल्ह्यात शुन्य माता व बालमृत्यू अभियान जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून नवजात बाळ व मातेचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेणे या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. पुरातन वृक्षांचे जतन करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 वृक्षांपर्यंत दहा हजार रुपयांचे वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, दिनदयाल उपाध्याय योजना, तलाव तेथे मासोळी अभियान, ग्राम समृध्दी योजना, रोजगार हमी योजना आदी योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
     श्री.तोडसाम म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने शेती करावी. शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करावा. आता केवळ धान पिकावर अवलंबून न राहता भाजीपाला, फळे व फुलांची शेती करावी. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर न करता सेंद्रीय शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी अवलंबीला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
       महिला आर्थिक विकास महामंडळ हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत असल्याचे सांगून श्री.सोसे म्हणाले, कुटूंबाची आर्थिकस्थिती बळकट करण्यास महिलांचा मोठा हातभार लागत आहे. गावात असलेल्या महिलांच्या ग्रामसंस्थेकडे 75 हजार रुपये जोखीम निधी देण्यात येतो. बचतगटातील महिलांनी दशसूत्रीचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले.
     डॉ.येरणे म्हणाले, गरोदर महिलांसाठी जननी शिशु सुरक्षा योजना व जननी सुरक्षा योजना आहे. 102 क्रमांकावर संपर्क साधल्यास ॲम्बुलन्स गरोदर महिलेला बाळंतपणासाठी रुग्णालयात आणणे व बाळंतपणानंतर महिलेला व बाळाला घरी नि:शुल्क सोडून देण्याचे काम करते. मुलींच्या रक्तवाढीसाठी शाळेतून औषधी देण्यात येतात. महाअवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. आपल्या शरीरातील अवयव यामुळे दान करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

     जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी प्रास्ताविकातून गणेशोत्वानिमित्ताने संवाद पर्व आयोजनामागची भूमिका विशद केली व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री साई ग्रामसंस्थेच्या सरला कटरे, शामकला लिल्हारे, कविता कटरे, शकुंतला उपराडे, अनिता दसरीया, अंगणवाडी सेविका उर्मिला माहुले, माविमचे समुदाय साधनव्यक्ती पुस्तकला मंडलवार, ग्रामसंस्थेच्या लेखापाल कल्पना वालदे, प्रभाग समन्वयक लक्ष्मी नागदेवे, सहयोगीनी सुशीला बघेले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बामणी येथील ग्रामस्थ तसेच बचतगटातील महिला व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मी नागदेवे व उपस्थितांचे आभार सुशीला बघेले यांनी मानले.