जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 28 August 2018

मेहनत, सातत्य व नियोजनामुळे हमखास यश - ना. राजकुमार बडोले





    -रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद
-
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
-
समता प्रतिष्ठानचा उपक्रम 
        कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी मेहनत, सातत्य व योग्य नियोजनाची आवश्यकता असते. आपापल्या क्षेत्रात मोठ्या झालेल्या व्यक्ती आपण पाहतो मात्र त्यांनी घेतलेली मेहनत व कष्ट आपल्याला माहित नसतात. करिअर साठी जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रात मेहनत व कष्टाने उच्च स्थान प्राप्त करा असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
              रोजगार शिबिराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी  अप्पर जिल्हाधिकारी  अशोक लटारे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.. सभापती  विश्वजित डोंगरे, अर्जुनी मोर पं.. सभापती अरविंद शिवनकर, सडक  अर्जूनी पं.स. सभापती गिरधर हत्तीमारे, राजेश राठोड़ (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गोंदिया), प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त समाज कल्याण मंगेश वानखेडे, बाजार समिती अर्जुनी मोरचे उपसभापती लायकराम भेंडारकर, माजी सभापती उमाकांत ढेंगेप्रकाश गहाणे तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनंजय वंजारी, निलेश रोहितकर, हेमंत सुटे, अश्विन कापसे, संदिप बडोले, विनय मानकर आदि तज्ज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.
               सामाजिक न्याय विभागाने रोजगाराभिमुख अनेक योजना सुरू केल्या आहेत. या शिबिरात उपस्थित मार्गदर्शक त्या विषयी आपणास सविस्तर माहिती देणार आहेत. या योजना समजून घ्याव्यात तसेच त्याचा लाभ घ्या असे आवाहन ना. बडोले यांनी केले.
               या शिबिरात तज्ञ मार्गदर्शकाकडून रोजगारासंदर्भात मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राष्ट्राचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. तज्ञ मार्गदर्शकांनी इयत्ता बारावी, पदवी नंतर काय? यावर मार्गदर्शन करुन स्पर्धा परीक्षा, पायलट, एअर होस्टेस, केबिन क्रू, ग्राऊंड स्टाफ आदी प्रशिक्षण मार्गदर्शन, एम. फील, पी. एचडी फेलोशिप मार्गदर्शन, उद्योजकता विकास, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, देश-विदेशातील उच्च शिक्षण, जात पडताळणी, शिष्यवृत्ती आदिंवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन बादल श्रीरामे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक (समाज कल्याण निरीक्षक, नागपुर) यांनी केले.
                                                                  00000

Monday 27 August 2018

‘युवा माहिती दूत’ उपक्रमात नोंदणी करण्याचे युवकांना आवाहन


     राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
          महाविद्यालयातील विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट आहे.
         शासन अनुदानित वैयक्तिक लाभाच्या योजना प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याची आवश्यकता असते. दारिद्र्यरेषेखालील तसेच ग्रामीण  वा दुर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित  लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी  असलेल्या  विविध योजनांची  माहिती  पोहचविण्याला वृत्तपत्रे, रेडिओ आणि दूरचित्रवाणी वाहिन्या या माध्यमांना मर्यादा येतात. शासकीय योजना प्रस्तावित लाभार्थ्यापर्यंत दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यास राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याच्या हेतूने ‘युवा माहिती दूत’  हा  उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
योजनेची अंमलबजावणी : प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी त्या महाविद्यालयातील अध्यापक वा अध्यापकेतर अधिकारी/कर्मचारी यापैकी एक ‘मार्गदर्शक’म्हणून नेमण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी  विशेष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून  या मोबाईल ॲप्लीकेशनमध्ये प्रत्येक  महाविद्यालयातील  मार्गदर्शक,समन्वयक आणि सहभागी युवक यांचे अकाऊंट असेल.                                                   महाविद्यालयातील विद्यार्थी ’माहितीदूत’ होण्यासाठी  स्वत:हून  या  ॲप्लीकेशनवर स्वत:च्या  नावाची  नोंदणी करतील. युवकांनी प्रस्तावित लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती द्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर/ व्हिडीओ/ एफएक्यू देण्यात आलेला आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल असेल.      
प्रस्तावित लाभार्थ्याची भेट घेतल्यानंतर ‘युवा माहिती दूत’ हे त्या लाभार्थ्यांचा तपशील आपल्या मोबाईलमधील ॲप्लीकेशनमध्ये नोंदवितील या तपशिलानुसार संबंधित योजनांची माहिती ॲप्लीकेशनमधून घेऊन प्रस्तावित लाभार्थ्याना समजून सांगतील. लाभार्थ्यांना हे ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी माहिती दूत मदत करतील. तसेच या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना, उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे.       माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि माहिती दूत यांमध्ये संदेशांची देवाणघेवाण, प्रशिक्षण,पुनर्विलोकन या ॲप्लीकेशनमार्फत होईल. 
मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत,प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल. विविध समाजातील  (शेतकरी, महिला,आदिवासी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,) असलेल्या वैयक्तिक लाभाच्या किमान 25 ते 30 योजनांचा समावेश या उपक्रमासाठी केलेला असेल.
कार्यपद्धती : जिल्हा माहिती अधिकारी : जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी हे नोडल अधिकारी असतील. मार्गदर्शक : प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून हे मार्गदर्शक महाविद्यालयाची नोंदणी करतील. महाविद्यालयातील अध्यापक व अध्यापकेतर अधिकारी यांची‘मार्गदर्शक’ म्हणून महाविद्यालय  निवड करतील.  ज्या विद्यार्थ्यांनी ‘माहिती दूत’होण्याची ॲपवर इच्छा व्यक्त केली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या नावाला मार्गदर्शक मंजुरी देतील किंवा नामंजूर करतील.
समन्वयक : शासन यंत्रणेची आणि योजनांची माहिती असलेल्या व समाजसेवेची आवड असलेल्या व्यक्तीची समन्वयक म्हणून निवड करण्यात येणार आहे.
युवा महिती दुत : या उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या/ निवडण्यात आलेल्या विद्यार्थी 6 महिन्याच्या कालावधीसाठी राज्य शासनाचे ‘युवा माहिती दूत’ असतील. या कालावधीत किमान 50 प्रस्तावित लाभार्थ्याच्या घरी जाऊन, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी(कुटुंबाला) लागू असणाऱ्या योजनांची माहिती देणार असून योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणाशी संपर्क करावा याबद्दल माहिती दूत यांनी माहिती द्यावी आणि लाभार्थ्यांशी अथवा त्यांच्या परिसराशी निगडित  विकास कामांची माहिती देऊन संबंधितांच्या प्रतिक्रियेची नोंद करतील.
‘युवा माहिती दूत’ म्हणून  राज्य शासनाकरिता काम करण्याची महत्त्वाची संधी युवकांना मिळेल. ‘युवा माहिती दूत’ अशी ओळख राज्य शासनाच्यावतीने त्यांना 6 महिन्याकरिता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम केल्यानंतर त्यांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
                                                            00000


Wednesday 15 August 2018

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री बडोले





       जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री.बडोले यांनी पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती सीमा मडावी, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, मा.मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक कर्जमाफी करुन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा  लाभ जिल्ह्यातील 66 हजार 331 शेतकरी सभासदांना होवून शेतकऱ्यांचे कर्जाचे खाते निरंक झाले आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्ज माफीची योजना सुरु राहील असे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँकांकडून 27 हजार 194 शेतकऱ्यांना 130 कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
       जिल्ह्यातील मजूरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यात यशस्वी ठरली आहे. चालू वर्षात 1 लाख 44 हजार 211 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आला आहे. त्यापैकी 8 हजार 912 कुटूंबांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.    
        जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे 33 हजार 892  शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरला आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्यास या योजनेतून शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
        जिल्हयात गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीन तालुक्यात खरीप हंगाम 2017 करीता दुष्काळ जाहिर झाला असून संयुक्त पंचनामे करुन 27 कोटी 20 लाख रुपये इतक्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे नोंदविली होती. सदर रक्कम महसूल विभागास प्राप्त झाली असून ती 1 लाख 84 हजार 527 शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे.                                                                                        
        खरीप हंगाम सन 2017-18 मध्ये तुडतुडा किडीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाई पोटी 41 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून सदर निधी 1 लाख 5 हजार 688 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
        जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हयात सन 2015-16 पासून राबविण्यात येत असून या वर्षात 94 गावाची निवड करण्यात आली होती. यापैकी 94 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. सन 2016-17 मध्ये 77 गावामधील 2 हजार 621 कामे पूर्ण झाली असून 20 हजार 697 टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. यामुळे 41 हजार 393 हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. सन 2017-18 वर्षात 63 गावांपैकी 55 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. याचा लाभ सिंचनासाठी निश्चित होईल असे सांगितले.
        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा स्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वी विभागीय स्तरावर जात पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. आता जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्यामुळे लोकांच्या वेळ व पैशाची बचत झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदियाकडे 9 हजार 577 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 9 हजार 210 अर्ज निकाली काढण्यात आले आहे.         
        27 नोव्हेंबर 2017 नुसार महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार अर्जदाराच्या रक्तनाते संबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र असल्यास पाल्यास वैधता प्रमाणपत्र मिळू शकते. रक्तनाते संबंधातील एकूण 250 प्रकरणे जिल्हास्तरावर निकाली काढण्यात आली आहे.
         सामान्य कुटूंबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे व त्यांचे राहणीमान उंचवावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली असून सन 2016-17 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 5 हजार 711 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या 903 लाभार्थ्यांना व शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या 434 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सन 2017-18 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 10 हजार 360, रमाई आवास योजनेअंतर्गत 5 हजार व शबरी आदिवासी योजनेत 467 घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.  
        वनालगत असलेल्या गावातील कुटूंबांचे वनावरील असलेले अवलंबीत्व कमी करण्यासाठी  मागील तीन वर्षात 9 हजार 903 कुटूंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे वन व वन्यजीवांच्या संरक्षणाचे काम प्रभावीपणे करण्यात येत आहे. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या 96 गावात विविध विकास कामे करण्यात येत आहे. यावर्षी 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले.
        जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्यजीव आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबध्द असून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील व त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सन 2017-18 या वर्षात जिल्ह्यातील क वर्गाच्या पर्यटनस्थळांच्या मुलभूत सुविधा विकासासाठी 4 कोटी रुपये मंजूर होते. या निधीतून हाजराफॉल, कचारगड, चोरखमारा, बोदलकसा, प्रतापगड, नवेगावबांध येथील विकासकामे प्राधान्याने करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होईल.
         जिल्ह्यात ऊर्जा विकासाच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून 8 नविन उपकेंद्र, 4 उपकेंद्राची क्षमता वाढ करणे, 17411 दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना वीज जोडणी देणे, उच्चदाब वाहिनी व वितरण रोहित्रांची 96 कोटीची कामे करण्यात येणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत गोंदिया व तिरोडा शहरासाठी 28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
            शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी सातही दिवस वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे कृषि फिडरचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील कृषिपंप वाहिन्यांच्या जाळ्याच्या नूतनीकरणासाठी 102 कोटी रुपये व शेततळ्यावरील कृषिपंप विद्युतीकरणासाठी 48 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा विकासाला गती मिळणार आहे.
            ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घर ते शाळा दरम्यान ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशन मधून जिल्ह्यातील 5328 मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे. महिलांचा स्वाभिमान जपण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे आरोग्य चांगले राहावे यादृष्टीने जिल्ह्यातील 58 हजार 943 महिलांना प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.
            शेतकऱ्यांना आधारभूत दराचा लाभ मिळावा म्हणून आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत 98 आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात आले. खरीप पणन हंगाम 2017-18 मध्ये जिल्हा पणन अधिकारी यांचे खरेदी केंद्रावर 5 लाख 81 हजार 20 क्विंटल व प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ भंडारा यांचे खरेदी केंद्रावर 2 लाख 94 हजार 612 क्विंटल असे एकूण 8 लाख 75 हजार 632 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
            जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रोजेक्ट आत्मसन्मान मार्फत 100 महिलांना फुलवात बनविण्याचे मशिन देवून रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत 7 तालुक्यात 415 महिलांना कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्हयात शेतीवर आधारित 35 हजार 210 महिलांचे व बिगर शेतीवर आधारित 15 हजार 750 महिलांचे व्यवसाय सुरु असून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे.
रजेगाव/काटी, तेढवा/शिवनी व झाशीनगर उपसा सिंचन योजना तसेच कटंगी, कलपाथरी, ओवारा, बेवारटोला, निमगाव व पिंडकेपार लघु प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करुन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, होमगार्ड पथक, आर.एस.पी.पथक, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक व श्वान पथक यांनी संचलन केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार गुरुनानक शाळेच्या शिक्षिका मंजुश्री देशपांडे यांनी मानले.
                                                                                            00000