जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 27 December 2019

गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा संपन्न



उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांचा सत्कार
                               • बचतगटांना कर्ज मंजूरीपत्रांचे वितरण

     महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती गोंदिया, नियोजन विभाग महाराष्ट्र शासन, तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गोरेगाव यांच्या संयुक्त वतीने आज 27 डिसेंबर रोजी गुरुकृपा लॉन, गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. उदघाटक म्हणून गोरेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती आरती चव्हाण उपस्थित होत्या.
         नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गोरेगावचे व्यवस्थापक श्री.कांबळे, आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सुभाष राऊत व पंकज बिरीया, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वय रजनी रामटेके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
        आरती चव्हाण म्हणाल्या, महिलांचा कुठेतरी आर्थिक विकास व्हायला पाहिजे, यासाठी बचतगटाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय चांगले काम करीत आहे. माविमद्वारे महिला बचतगटांना लघु उद्योग म्हणून एक चांगले प्लेटफॉर्म मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.
         सुनिल सोसे म्हणाले, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. महिलांना मुद्रा योजनेची माहिती व्हावी तसेच मुद्रा याजनेचा लाभ कशाप्रकारे मिळू शकतो याबाबत माहिती देवून प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे शिशु गट- 50 हजार रुपये, किशोर गट- 5 लाख रुपये व तरुण गट- 10 लाख रुपये कर्ज बँकेद्वारे मंजूर करण्यात येते. महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. बँकेद्वारे घेतलेल्या कर्जाची महिला प्रामाणिकपणे परतफेड करतात. महिला बचतगटांना बँकेचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.
         नीरज जागरे म्हणाले, नाबार्डद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजना योजना आहेत, त्या राज्य शासन राबविते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी आर्थिक विकास करुन घ्यावा असे त्यांनी सांगितले.
        रजनी रामटेके म्हणाल्या, आज महिलांवरचे अन्याय व अत्याचार कमी झालेले नाही तर ते वाढतच चालले आहे, यावर विचार करणे गरजेचे असून यासाठी सुरक्षेची अत्यंत गरज आहे. महिलांना कायद्याची जाणिव असायला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आहेत, त्या कायद्याविषयी त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
        डॉ.सविता बेदरकर म्हणाल्या, स्त्रीया हया समाजाचा दागिना आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार दयावे. प्रत्येकाने समाजशील व्हावे. तळागाळातील लोकांना मदत करावी. महिलांनी अन्यायाविरुध्द लढा दयावा असे त्यांनी सांगितले. यावेळी आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सुभाष राऊत व तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा नलिनी डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        यावेळी निर्मल ग्रामसंस्था महाजनटोला व अलंकीत ग्रामसंस्था घोटी या उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांचा आणि उत्तम सर्वात जास्त कर्ज उचल करणाऱ्या संजीवनी आदिवासी बचतगट गोवारीटोला व श्रीगणेश महिला बचतगट गोरेगाव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         विदर्भ कोकण ग्रामीण बँक गोरेगाव द्वारे मनिषा बिसेन (सेंट्रींगकाम), चंद्रकांता पटले (शिवणकाम) व रुखमा हरिणखेडे (शिवणकाम) यांना प्रत्येकी 50 हजार रुपये आणि आय.सी.आय.सी.आय. बँक द्वारे जनलक्ष्मी महिला बचतगट महाजनटोला- 1,36000/-, जागृती महिला बचतगट हलबीटोला- 1,26000/-, एकता महिला बचतगट चंद्रपूरटोली- 2,16000/- व त्रिवेणी महिला बचतगट चंद्रपूरटोली यांना 1,75000 हजार रुपयाचे मुद्रा लोन कर्ज मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
       यावेळी ‘‘तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गोरेगाव’’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये रेडिमेड कापड, फुलवाती, इमिटेशन ज्वेलरी, सेंद्रीय शेतीपासून तांदळाचे उत्पादन, खानावळ, हळद उत्पादन इत्यादी स्टॉल्सला भेटी देवून मान्यवरांनी विचारपूस केली.
         प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी, तर उपस्थितांचे आभार पदमा सरोजकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम सोनवाने तसेच तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा नलिनी डोंगरे व सर्व सहयोगीनी यांनी सहकार्य केले.

Sunday 8 December 2019

सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार - विधानसभा अध्यक्ष पटोले


                                     गोंदिया येथे नागरी सत्कार समारंभ





             भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी विधानसभा अध्यक्ष या पदाचा उपयोग करुन घेण्यात येईल. राज्यातील सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
            गोंदिया येथील सुभाष हायस्कूलच्या मैदानावर 8 डिसेंबर रोजी भंडारा आणि गोंदिया जिल्हा नागरी सत्कार समितीच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदी आमदार नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल तसेच दोन्ही जिल्ह्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात सत्काराला उत्तर देताना श्री नाना पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. प्रमुख अतिथी म्हणून रिपाई(गवई गट)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई हे होते. सत्कारमूर्ती म्हणून आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर माजी खासदार मधूकर कुकडे, माजी मंत्री भरत बहेकार, नाना पंचबुध्दे, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंग पवार, के.आर. शेंडे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सूनील फुंडे, गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख मुकेश शिवहरे, गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंचम बिसेन, गोंदिया काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया न.पा.उपाध्यक्ष शिव शर्मा, धनंजय दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
               श्री पटोले पुढे म्हणाले, माझ्या जन्मगावी हा सत्कार होत असल्याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी त्या गावाचा विकास आराखडा तयार करावा व तो आपल्याला सादर केल्यास आपण निश्चितच या गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहोत.  दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे आपल्यावर ऋण आहेत त्याची परतफेड त्यांचा विकास करुन आपल्याला करावयाची आहे. दोन्ही जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगार, शेतमजूर अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांची निश्चितपणे आपण सोडवणूक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे पाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 9 तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगून श्री पटोले म्हणाले, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात सिचंनाची व्यवस्था मोठया प्रमाणात निर्माण होवून जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे.  बेरोजगारीवर देखील सिंचन सुविधेमुळे मात करता येईल. दोन्ही जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या व्यवस्थेवर आपला भर राहणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदीचे पैसे दोन दिवसात देण्याची व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दोन्ही जिल्हयात आणखी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.
धानाची भरपाई आठ दिवसात झाली पाहिजे अशी सुविधा निर्माण करण्यात येईल असे सांगून श्री पटोले पुढे म्हणाले,  दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. राज्य सरकारच्या निधीचा योग्य वापर विकास कामासाठी झाला पाहिजे याकडे आपले विशेष लक्ष राहणार आहे. सर्वांनी मिळून दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्यास हातभार लावला पाहिजे तरच जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. मागास जिल्हे म्हणून दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे ही आपण मिटवून टाकू. गोंदिया जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
            अध्यक्ष म्हणून बोलतांना खासदार प्रफुल पटेल म्हणाले, आजच्या या नागरिक सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष आज एकत्र या मंचावर दिसत आहे. दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी हे सर्व एकत्र आले आहेत. विकासासाठी एकत्र येऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री पटले पुढे म्हणाले,  नाना पटोले हे संघर्षमय व्यक्तिमत्व आहे. आमचे कर्तव्य आहे की ज्या जनतेमुळे हे पद आम्हाला मिळाले आहे त्यांच्यासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नेते विकासासाठी एकत्र येतांना दिसतात, आपल्याकडे मात्र असे होतांना दिसत नाही, ते झाले पाहिजे तरच आपल्या दोन्ही जिल्हयाचे चित्र बदलण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
               राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर अध्यक्ष म्हणून आली असल्याचे सांगून श्री पटेल पुढे म्हणाले, धापेवाडासारखे आणखी काही बंधारे जिल्ह्यात बांधण्यात येतील. त्या बंधाऱ्यातील पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता धानासोबतच अन्य पिकाकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा वापर अन्य पिकांसाठी केला तर जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. जिल्हयातील शेतकऱ्यांना  आज दिशा देण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा हातभार लागला तर जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदललेले दिसेल. आणि हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत अग्रेसर झालेली दिसतील, असे त्यांनी सांगितले.
                आमदार अग्रवाल म्हणाले, आज आनंदाचा क्षण आहे. सर्वांनी मिळून जिल्हयाच्या विकासात हातभार लावला तर दोन्ही जिल्हे विकासात अग्रेसर असतील. प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणर आहे. जिल्ह्यातील शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. प्र फुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे निश्चितच आपले योगदान देतील. सर्वांच्या प्रेमामुळे मला विधानसभेत जाण्याची संधी इथल्या मतदारांनी दिली आहे. त्यांचे ऋण या पाच वर्षात विकास कामाच्या माध्यमातून फेडण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             आमदार भोंडेकर म्हणाले, दोन्ही त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खा. प्रफुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे अधिक गती मिळणार आहे. जिल्हयातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आता आम्हाला थेट नानाभाऊंकडे जाता येईल. विधानसभेत दोन्ही जिल्हयाचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जिल्हयाच्या विकासाला निश्चित गती देवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
           आमदार चंद्रीकापूरे म्हणाले, अर्जुनी मोरगाव तालुक्याला सिंचनातून समृध्द करण्यात इटियाडोह प्रकल्पाचा महत्वाचा वाटा आहे. इटियाडोहचे कालवे 70 किलोमीटरपर्यंत आहे हे कालवे सिमेंटचे झाले तर या प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होणार नाही. या पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला नाना पटोले अध्यक्षपदावरून न्याय देतील. चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे नानाभाऊंनी काम करावे. विकास कामांचा मोठा अनुभव खा. प्रफुल पटेल यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे निश्चितच आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. दोन्ही जिल्हयातील प्रश्न सोडविले पाहिजे. विकासाची गंगोत्री जिल्ह्यातील धापेवाडा टप्पा दोनच्या पाण्याच्या माध्यमातून येण्यास मदत होणार असल्यामुळे हे काम लवकर व्हावे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
         आमदार रहांगडाले म्हणाले, सर्वपक्षीय सत्कार आज होत आहे, यातून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी आज संकटात आहे. त्याला आधार देण्याचे काम विधानसभेत आमच्या जिल्ह्यातील समस्या मांडून त्या सोडविण्यावर आम्हाला निश्चितच वेळ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          आमदार कारेमोरे म्हणाले, दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे गती मिळणार आहे. शेती व शेतीवर आधारित उद्योगाला या नेतृत्वामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. धान उत्पादक  शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास त्यांची मदत होईल. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला आता थेट विधानसभा अध्यक्षांकडे जाता येईल. दोन्ही जिल्ह्यातील समस्या त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या सोडविण्यास पुढाकार घेण्यास आम्ही त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.
             आमदार कोरोटे म्हणाले, देवरी हा आदिवासी तालुका असून हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. या तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प असून हा तालुका सिंचनापासून वंचित आहे. आमगाव, सालेकसा व मध्यप्रदेशमध्ये या तालुक्यात असलेल्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. परंतु या तालुक्याला सिंचनापासून वंचित राहावे लागते. देवरी मतदारसंघात  शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था झाल्यास इथला शेतकरी समृध्द होईल असे त्यांनी सांगितले. या तालुक्यात सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासाठी या प्रकल्पांचा तालुक्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
              खा. प्रफुल पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  तसेच नवनिर्वाचित आमदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व जि.. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. उपस्थितांचे आभार विनोद जैन यांनी मानले. प्रारंभी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Thursday 14 November 2019

बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवात रंगल्या मारुती चितमपल्लींशी गप्पा

पर्यटन विकास महामंडळाचा पुढाकार



‘केशराचा पाऊस’ कार्यक्रमातून मांडला निसर्गानुभव
 गोंदिया म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला जिल्हा. गोंदिया वनराईने तर समृद्ध आहेच, सोबत वन्यजीवसृष्टीने देखील समृद्ध असा आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र तर या जिल्ह्याचा मुकुटमणी आहे. सोबतच जिल्ह्यात हाजराफॉल, इटीयाडोह, चोरखमारा, बोदलकसा, चूलबंद यासह अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व तीर्थक्षेत्रांना पर्यटकांनी भेट द्यावी आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे.
तिरोडा तालुक्यातील निसर्गरम्य अशा बोदलकसा या जलाशयाच्या काठावर, गर्द वनराईत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टीने सुदंर असे रिसॉर्ट बांधले आहे. निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या या रिसॉर्टकडे आता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अभ्यासू, लोकाभिमुख व प्रयोगशील अधिकारी अभिमन्यू काळे हे २ डिसेंबर २०१६ ते मे २०१८ या कालावधीत गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी गोंदिया महोत्सव, सेंद्रिय शेतीला चालना, वृक्षांना पेन्शन, स्वदेशी वृक्षांची लागवड आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. श्री. अभिमन्यू काळे यांच्या रूपाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला एक प्रयोगशील, निसर्ग व वन्यजीवप्रेमी सनदी अधिकारी मिळाल्यामुळे पर्यटन विकासाला गती मिळाली आहे. अनेक उपक्रम ते पर्यटकांसाठी राबवीत आहेत.
श्री. काळे यांच्या संकल्पनेतून ११ नोव्हेंबर रोजी बोदलकसा येथील पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टच्या परिसरात बोदलकसा जलाशयाच्या काठावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने पौर्णिमा महोत्सवाचे नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात आले. पौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, थोर वन्यजीव साहित्यिक तथा निसर्गमित्र मारुती चितमपल्ली यांच्याशी त्यांनी लिहिलेल्या ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकावर आधारित निसर्गानुभावाच्या गप्पांची मैफिल चांगलीच रंगली. प्रसिद्ध निवेदिका श्रीमती कांचन संगीत यांनी घेतलेली श्री. चितमपल्ली यांची मुलाखत उपस्थित पर्यटक, विद्यार्थी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी व पत्रकारांना थेट निसर्गाच्या आणि वन्यजीवांच्या सानिध्यात घेवून गेली.
बोदलकसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, संचालक दिलीप गावडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक श्री. रामानुजम, वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, सिद्ध समाधी योग पुणेचे मनोज गोखले, पर्यटन विकास महामंडळाचे लेखाधिकारी श्री. कांबळे, वन्यजीवप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, वर्धा येथील मानद वन्यजीव रक्षक कौशल मिश्र, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या निसर्गानुभवाबाबत बोलताना श्री. चितमपल्ली म्हणाले की, मी ध्यानाचा अभ्यास केला आणि नियमित ध्यान करीत असल्यामुळे वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी या ध्यानाचा उपयोग झाला. रानम्हशीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, या म्हशी रानटीच आहेत, पण त्या म्हशीच्या प्रजातीमधील आहेत. लगतच्या छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्यातील घनदाट जंगलातून या म्हशींचे कळप गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात चरण्यासाठी येवून निघून जातात. मेळघाटात आदिवासी बांधव रानकंदाचे डोळे जमिनीत लावतात. पुढे त्या कंदाचा आकार घागरी एव्हढा होतो. दुष्काळाच्या काळात आदिवासी रानकंद खावून जगतो. त्यामुळे त्यांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी या रानकंदाची मदत होते, असे त्यांनी सांगितले.
केशराच्या पावसाच्या अनुभवाबद्दल बोलताना श्री. चितमपल्ली म्हणाले, या पावसाचा अनुभव घेण्यासाठी मेळघाटातील खोल जंगलात असलेल्या कोकटू येथील ब्रिटीशकालीन विश्रामगृहाच्या परिसरात जावे लागेल. डिसेंबर महिन्यात रात्री १ ते ३ वाजेदरम्यान या पावसाचा अनुभव घेता येतो. आपल्या अंगावरील कपड्यांवर केशरी रंगाचा सुगंधी पाऊस पडल्याचे दिसून येते. मेळघाटात १५० पेक्षा जास्त गावे रिठी अर्थात उजाड आहेत. या रिठी गावांचे वैशिष्ट्य म्हणजे या गावांत आता बोरांच्या झाडांचे वन आहे. रिठी गावांबाबत अधिक माहिती देतांना श्री. चितमपल्ली म्हणाले, ही गावे लहान असायची. गावातील लोकांकडे पाळीव जनावरे असायची. वाघ, बिबटे पाळीव जनावरांना मारून खायचे. या दहशतीमुळे ग्रामस्थ स्थलांतरित व्हायचे. गावे रिठी झाली की तेथे मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी व्हायच्या. मग उंदीर व घुशींना खाण्यासाठी कोल्ह्यांचे कळप तेथे जमा व्हायचे. उंदीर व घुशी खावून ते रात्रभर तेथेच झोपायचे. सकाळी जाताना कोल्ह्यांचे कळप तेथेच विष्टा टाकायचे. कोल्ह्यांनी खाल्लेली बोरे पचत नसल्याने त्यांच्या विष्टेतून प्रक्रिया होवून तिथेच बोरांच्या बिया बाहेर पडायच्या. त्यामुळे विष्टेतून पडलेले बी जसेच्या तसे तेथेच पडायचे आणि पहिल्या पावसात ते झपाट्याने उगवायचे.  विष्टेतून बियांवर प्रक्रिया झाल्यामुळे तिची उगवण क्षमता ही १०० टक्के असायची आणि झाड लगेच मोठे व्हायचे. यातूनच ही बोरींची जंगले वाढली. बोरीच वन जिथे दिसेल, ते निश्चित समजायचे की ते रिठी गाव आहे.
१२ ते १५ हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला, असे सांगून श्री. चितमपल्ली म्हणाले, त्या आधी तो कंद गोळा करून खात होता. शेती करण्यापेक्षा जंगलात राहून तो आनंदित जीवन जगायचा. वाघ, बिबट व अन्य जंगली हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीपोटी गावं उठायची. ग्रामस्थांकडे असलेली थोडीथोडकी भांडीकुंडी घेवून ते दुसरे गाव बसवायचे. त्यांच्या गरजा नव्हत्या. अत्यंत साधी जीवनपद्धती त्यांची होती. पण प्रत्येक गावात पाण्यासाठी विहीर असायची. अस्वलाचा अभ्यास करण्यासाठी वनसेवेत असताना खूप प्रयत्न केल्याचे सांगून श्री. चितमपल्ली म्हणाले, या काळात आपला वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचा अभ्यास झाला. मात्र अस्वलाचा अभ्यास कोणी केला नाही. त्याचा अभ्यास व निरीक्षण करणे अत्यंत अवघड काम आहे. झाडावर मचाण बांधली तर तेथे अस्वल वर चढून हल्ला करण्याची भीती. जमिनीखाली खड्डा करून तेथे लपून बसून निरीक्षण करतो म्हटले तर अस्वलाला वास येण्याच्या भीतीमुळे तो वासाच्या दिशेने हाताच्या नखाने जमीन उकरून काढून हल्ला करण्याची भीती ही ठरलेली. त्यामुळे अस्वलाचा फारसा अभ्यास झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
लठ्ठू गुंडाविषयी माहिती देताना श्री. चितमपल्ली म्हणाले, तो शिकारी होता. तो अस्वलाची शिकार करायचा. एके दिवशी तो शिकारीला गेला आणि मादी अस्वलाची शिकार केली पण ती जखमी झाली आणि पळाली. नर आणि मादी अस्वल सोबत होते. मादी अस्वलावर झालेला हल्ला बघून नर अस्वलाने जखमी झालेल्या अस्वलाच्या जखमेवर झाडपाला लावल्याचे स्वतः डोळ्यांनी बघितल्याचे त्यांनी सांगितले. गोरिला, चिंपांजी यांचा अभ्यास अनेकांनी केला आहे. मात्र यांच्या सवयी व गुणधर्म अस्वलामध्ये नाही. अस्वल हा आक्रमक प्राणी आहे. तो मनुष्य प्राण्याला बघितले की क्रूर होवून हल्ला करतो. तो माणसाचे डोळे फोडतो, त्याची कवटी फोडतो. याचे कारण म्हणजे जेव्हा अस्वल हल्ला करतो, तेव्हा तो दोन पायांवर उभा होतो आणि माणसाच्या उंचीच्या समकक्ष उभा होवून तो चेहऱ्यावर, डोक्यावर हल्ला करतो. कारण त्याला माणसाचे तोंड आणि डोके दिसते. म्हणून तो डोळे फोडतो. डोके फोडतो आणि तेथून पसार होतो.
माणूस वाघाला किंवा बिबट प्राण्याला पाहून घाबरतो किंवा कुठल्याही रानटी प्राण्याला बघितले की घाबरतो. घाबरला की त्याचा वास त्या प्राण्याला येतो. ज्याअर्थी प्राण्याला त्याचा वास येतो, यावरून तो आपल्यासाठी घातक आहे, हे निश्चित झाल्यावर तो प्राणी हल्ला करतो. पर्यटक वन्यप्राणी बघण्यासाठी जंगलात जातात, तेव्हा पर्यटक चेहऱ्याला पावडर व कपड्यांवर अत्तर लावतात. कधी लसून जास्त प्रमाणात खावून जातात, याचा वास वन्यप्राण्यांना एक ते दीड किलोमीटरपर्यंत येतो. त्या वासामुळेच हे प्राणी जवळ येत नाहीत. आलाच तर वेळप्रसंगी हल्ला केल्याशिवाय राहत नाही. सापांबाबत अधिक माहिती देताना श्री. चितमपल्ली म्हणाले, जवळपास १०० ते १५० प्रकारचे साप आहेत. त्यामध्ये फक्त चार प्रकारचे सापच विषारी आहेत, ते आपल्याला ओळखता आले तर आपण कोणालाच मारणार नाही. नागाला आपण ओळखतो, तो केवळ फना काढत असल्यामुळे. शाळांमधून विद्यार्थ्यांना विषारी सापांची माहिती दिली पाहिजे. साप बदला घेतो, असे म्हणणे म्हणजे त्याची बदनामी करणे होय. तो बदला कधीच घेत नाही. वारुळाची रचना ही पिरॅमिड सारखी आहे. तिथे असलेल्या वातानुकूलित वातावरण असल्यामुळे सापांना अंडी देण्याचे व राहण्याचे ते एक सुरक्षित ठिकाण वाटते. साप चावला तर मंत्र तंत्र करू नये. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावून वैद्यकीय उपचार करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
रानफुल आणि फुलपाखरांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामधून फुलपाखरांना अन्न मिळते. पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्रीच्या जंगलात चिंचेच्या झाडावर काजवे येतात. जे नर काजवे आहेत, ते चमकतात. वन्यजीवसृष्टीच्या अभ्यासासाठी आपला जवळपास ४१ वर्षांचा कालावधी गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांपैकी काहींनी वन्यजीवसृष्टीबाबत असलेल्या कुतूहलाविषयी काही प्रश्न श्री. चितमपल्ली यांना केले. विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे हे बोदलकसा येथे आयोजित करण्यात आलेल्या पौर्णिमा महोत्सवाबाबत बोलताना म्हणाले, पर्यटन म्हणजे एखाद्या रिसॉर्टला जाणे, तिथे खाणे आणि आजूबाजूला फिरणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासोबतच आत्मिक उन्नती साध्य करणे, या दृष्टीने मनुष्य पर्यटन करतो. हे पर्यटन करताना महाराष्ट्रामध्ये जे थोर साहित्यिक आहेत, त्यांच्याद्वारे पौर्णिमेच्या रात्री साहित्य संस्कृतीचा पर्यटकांना आस्वाद देणे, ही संकल्पना पौर्णिमा महोत्सवाच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या ज्येष्ठ, ऋषितुल्य साहित्यिकांनी बोदलकसा येथील पर्यटकांना, रसिकांना, विद्यार्थ्यांना, वन्यजीवप्रेमींना तसेच पर्यावरण प्रेमींना त्यांच्या मुलाखतीतून एक प्रकारे मेजवानीच दिली आहे. भविष्यात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पौर्णिमा महोत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा श्री. काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
पौर्णिमा महोत्सवाला बोदलकसा येथे आलेले पर्यटक, गोंदिया येथील पत्रकार, शेजारच्या गावातील काही नागरिक, विद्यार्थी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल डोंगरे यांनी केले, उपस्थितांचे आभार श्री. कांबळे यांनी मानले.

Friday 8 November 2019

प्रधान सचिवांकडून अल्पसंख्यांक विकास योजनांचा आढावा



अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. शाम तागडे यांनी ८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याला भेट देवून नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई. ए. हाश्मी, अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी मयूर अंदेलवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उईके प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. तागडे म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षण विभागामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव परिपूर्ण असल्याची खात्री करावी व ते ऑनलाईन सादर करावेत. जिल्ह्यातील ज्या धार्मिक अल्पसंख्याक शाळांमधून ७० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशा शाळांना प्रशासनाने मदत करावी व या शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच या संस्थांना आवश्यक ते अनुदान देण्याचे प्रस्ताव मागवून घेवून पुढील कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यात असलेल्या १५ मदरशांच्या आधुनिकीकरणाचे प्रस्ताव डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून मागवून घ्यावेत व या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल, यासाठी काम करण्यात यावे.
जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी तातडीने प्रस्ताव मागवून या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा, असे सांगून श्री. तागडे म्हणाले,  जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची वस्ती आहे, त्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची योजना आहे. त्या योजनांचा लाभ या वस्त्यांना मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे. गोंदिया व तिरोडा नगरपरिषदासह जिल्ह्यातील नगरपंचायतींनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासाचे प्रस्ताव सन २०१५-१६ व त्यानंतर पाठविलेले नाहीत. ते तातडीने पाठवावेत व जी कामे अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मंजूर झालेली आहेत, ती तातडीने सुरु करावीत. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार १५ टक्के कर्ज प्रकरणे अल्पसंख्याक समाजासाठी बँकांनी मंजूर करावीत. त्यामुळे त्यांना रोजगार निर्मितीस मदत होईल व ते स्वावलंबी होण्यास मदत होईल, असेही श्री. तागडे यावेळी म्हणाले.

Sunday 3 November 2019

पिकाचे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला भरपाई मिळणार -पालकमंत्री डॉ. फुके



     
        गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. 3 नोव्हेंबर रोजी  पालकमंत्री डॉ. फुके यांच्या उपस्थीतीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे  नुकसानीच्या आढावा घेण्यात आला.या वेळीस डॉ. फुके बोलत होते.
          कृषी विभाग व विमा कंपनीला युध्दस्तरावर संयुक्त सर्व्हे करून बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यास पीक विम्याचा लाभ देण्याचे निर्देश देऊन श्री.फुके म्हणाले,  नुकसान झालेला एकही शेतकरी पिक विमापासून वंचित राहता कामा नये. राज्य सरकारने नुकतेच 10 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी जाहिर केली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पीक नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिकनिहाय भरपाई शेतकऱ्यांना निश्चित मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सर्वश्री विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
           प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.नाईनवाड यांनी यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती दिली. तसेच बाधित शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्याचे व पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले. कोरडवाहु शेतीला प्रति हेक्टर 6800/- तर सिंचनाखालील शेतीला 13600/- प्रति हेक्टर प्रमाणे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
               या बैठकीत पालकमंत्री डॉ. फुके यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली. कृषी विभागाने व विमा कंपनीने गावोगावी जाऊन शेतीच्या पीक नुकसानीचा सर्व्हे करून पिकाच्या नुकसानीची पाहाणी करावी.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची सुचना पालकमंत्री डॉ.फुके यांनी यावेळी केली. परतीच्या पावसामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देऊन हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या ऐकून घ्यावी. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर जी.पी.एस. टॅग करुन (लाईव्ह लोकेशन) फोटो काढुन विमा कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉ.फुके यांनी यावेळी सांगितले.
            या बैठकीला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नाइनवाड, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपदे, रविंद्र राठोड, तहसिलदार विनोद मेश्राम, प्रविण घोरुडे, शेखर पुनसे, राजेश भांडारकर, अप्पर तहसीलदार.ग्रामीण खडतकर ,कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Wednesday 30 October 2019

गोंदियात राष्ट्रीय एकता दिवसानिमित एकता दौडचे आयोजन अनेकांचा सहभाग



         माजी उपप्रधानमंत्री तथा गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून आज 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन सकाळी 7.30 वाजता गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून करण्यात आले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक आणि ज्येष्ठ धावपटू मुन्नाजी यादव यांनी मशाल प्रज्वलित केली. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन,गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्तवतीने 'रन फॉर युनिटी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडमध्ये  खेळाडू, कर्मचारी, शहरातील विद्यालय- महाविद्यालयाचे विद्यार्थी,क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह  नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडमध्ये सहभाग घेतला. ही एकता दौड इंदिरा गांधी स्टेडियम येथून जयस्तंभ चौक, गुजराती विद्यालय,पाल चौक पोहचली.या चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला श्री.मुस्तक व श्री.यादव यांनी पुष्पहार अर्पण केला. दौड त्याच मार्गाने परत येऊन इंदिरा गांधी स्टेडियम येथे  एकता दौडचा समारोप  करण्यात आला. यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके,क्रीडा संघटक विशाल ठाकूर,अनिल सहारे,मुजीब बेग,निलेश फुलबांधे,संदीप मेश्राम,श्री.कम्मू,स्नेहदीप कोकाटे,रविना बरेले,शेखर बिरणवार,उपेंद्र थापा,सऋतिक कटरे,अनिल एलूरू,रवी रहांगडाले,पूर्वा अग्रवाल, ओम भादुपोते यांनी पुढाकार घेतला

Thursday 24 October 2019

विधानसभा निवडणूकीत जिल्हयात 1 अपक्ष, 1 भाजपा, 1 कॉग्रेस व 1 राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार विजयी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मनोहर चंद्रीकापूरे,  तिरोडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा मतदासंघातून अपक्ष विनोद अग्रवाल आणि आमगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे सहसराम कोरोटे विजयी झाले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 8 उमेदवारांनी निवडणूक लढविली. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजकुमार बडोले,  राष्ट्रवादी कॉग्रेसचे मनोहर चंद्रीकापूरे व वंचित बहूजन आघाडीचे अजय लांजेवार यांच्यात झाली. या निवडणूकीत 2 लाख 52 हजार 591 मतदारापैकी 1 लाख 74 हजार 229 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी कॉग्रेसचे मनोहर चंद्रीकापूरे यांना 72 हजार 400, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना 71 हजार 682 व वंचित बहूजन आघाडीचे अजय लांजेवार यांना 25 हजार 579 मते पडली. श्री चंद्रीकापूरे यांनी बडोले यांचा 718 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला  2 हजार 45 मते पडली.
तिरोडा विधानसभा मतदारसंघातून एकूण 12 उमेदवारांनी निवडणूक लढविली. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय रहांगडाले,  राष्ट्रवादी कॉग्रेसचे रविकांत बोपचे व अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड यांच्यात झाली. या निवडणूकीत 2 लाख 57 हजार 351 मतदारापैकी 1 लाख 67 हजार 460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय रहांगडाले यांना 76 हजार 482, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे रविकांत बोपचे 50 हजार 519 तर अपक्ष दिलीप बन्सोड यांना 33 हजार 183 मते पडली. विजय रहांगडाले यांनी श्री बोपचे यांचा 25 हजार 963 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला  1 हजार 841 मते पडली.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल व अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यामध्ये झाली. या निवडणूकीत 3 लाख 21 हजार 798 मतदारापैकी 2 लाख 9 हजार 379 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपाल अग्रवाल  यांना 75  हजार 827, तर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल  यांना 1 लाख 2 हजार 996 मते पडली. अपक्ष विनोद  अग्रवाल यांनी श्री गोपालदास अग्रवाल यांचा 27 हजार 169 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1 हजार 857 मते पडली.
आमगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पुराम व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांच्यामध्ये झाली. या निवडणूकीत 2 लाख 66 हजार 530 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 80 हजार 181 मतदारांनी मतदान केले.  भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांना 88  हजार 265 तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पुराम यांना 80 हजार 845 मते मिळाली. श्री कोरोटे यांनी श्री पुराम यांचा 7 हजार 420 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1 हजार 883 मते पडली.