जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 30 September 2020

3 ऑक्टोबरला नाविण्यपूर्ण उपक्रम. एकाच दिवशी एक लाख कुटूंबांना थेट भेट - जिल्हाधिकारी मीना




 माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती : 10 हजार कर्मचारी साधणार गृहभेटीतून संवाद
          कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सर्व्हेक्षण करण्यासाठी संपूर्ण राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारीही मोहिम राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातही हे सर्व्हेक्षण करण्यात येत असून 3 ऑक्टोबर या दिवशी एक लाख कुटूंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली.

         आज 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात माझे कुटूंब-माझी जबाबदारीया मोहिमेच्या यशस्वीतेसाठी  जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

          जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, राज्य शासनाची माझे कुटूंब-माझी जबाबदारीही महत्वाकांक्षी मोहिम आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक दृष्टीकोनातून जबाबदारीने काम करावे. या मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये सकारात्मक संदेश जायला पाहिजे. या मोहिमेत सरपंच, ग्रामसेवक यांचा सुध्दा सहभाग घेण्यात यावा. सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती करुन ही मोहिम यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

         संपूर्ण राज्यात कोविड-19 या आजाराची संख्या वाढत आहे. ग्रीन झोनमधील गोंदिया जिल्हा सुध्दा आता रेड झोनमध्ये आलेला आहे. अनलॉक सुरु असतांना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावी करण्याचे राज्याचे धोरण आहे. विशेष म्हणाजे, या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिक्षणावर भर देण्यासह मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार आणि लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्ती सुध्दा शोधल्या जाणार आहेत. लोकांना कोविड साक्षर करण्याच्या या मोहिमेत शासकीय कर्मचारी, क्रिडा मंडळ, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, बचतगट, व्यापारी संघटना, राजकीय प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा एकूण 10 हजार लोकांच्या सहकार्याने गृहभेटी करण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.

         एका दिवसाच्या या थेट भेट उपक्रमाला 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात येईल. एका कुटूंबाला भेट दिल्यानंतर त्या कुटूंबाने शेजारच्या 10 कुटूंबांना अभियानाची माहिती पोहचवावी असे आवाहन त्याचवेळी करण्यात येईल. त्यामुळे साधारणत: 10 लक्ष लोकांपर्यंत एकाच दिवसात उपक्रम पोहोचेल. घरोघरी माहिती देण्याच्या या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागातर्फे भेट देणाऱ्या व्यक्तीला माहितीचे एक लेखी नोट प्रदान केले जाणार आहे. भेट देणारा व्यक्ती भेट दिलेल्या कुटूंबाची नोंद ठेवणार आहे. त्यासाठी विशेष प्रपत्र सुध्दा तयार करण्यात आले आहे. गृहभेटी करतांना शारिरीक अंतर ठेवणे, कुटूंब प्रमुखाला घराबाहेर बोलावून त्यांना माहिती देण्यावर भर देण्यात येईल. हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीला आरोग्य साक्षर करण्यासाठी असल्याने अनेक व्यक्तींना स्वयंस्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होता येईल. विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.

         सभेला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहूल खांदेभराड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नरेश भांडारकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, गोंदिया नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी अर्चना मेन्ढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे,गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, सडक/अर्जुनी तहसिलदार उषा चौधरी, तिरोडा तहसिलदार प्रशांत घोरुडे, गोरेगावचे प्रभारी तहसिलदार श्री वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

00000

 

कोरोना बाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदिया नगरपरिषदेकडून शववाहिका उपलब्ध

 



जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे बाधितांचे प्रमाणदेखील वाढत आहे.बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येत आहे.
         गोंदिया नगरपालिका क्षेत्रात दुर्दैवाने कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर गोंदिया नगर परिषदेकडून अंतिम संस्कार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करण्यात येत आहे.गोंदिया शहरात बाधित व्यक्तींचा शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालय किंवा घरी मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने घेतली आहे.यासाठी दोन कर्मचारी पीपीई किट घालून तेथे पोहचतील. अंतिम संस्कारासाठी लागणारे लाकडे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने घेतली असून यासाठी मृतकाच्या नातेवाईकांकडून कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.
             गोंदिया नगरपालिका क्षेत्रात कोविड -१९ विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी पांगोली स्मशानभूमी घाट निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशाने गोंदिया नगर परिषदेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
          शव वाहिकेच्या व्यवस्थेसाठी गोंदिया नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता सुमित खापर्डे (7276369802),स्वास्थ निरीक्षक प्रफुल पानतावणे ( 9403126126) आणि आनंद नागपुरे(9307097088) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी केले आहे.


Tuesday 29 September 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी जबाबदारीने काळजीपूर्वक कामे करावी - दीपक कुमार मीना


       जिल्ह्यात सातत्त्याने कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरीता संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काळजीपूर्वक कामे करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

        आज 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड-19 संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. रॅपिड ॲन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देण्यात यावा. बाधित रुग्णांची टेस्ट 24 तासात येईल असे नियोजन करावे. होम क्वारंटाईन रुग्णांना स्टॅम्प लावण्यात यावे. कोरोना केअर सेंटरमधील सर्व कामे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सोपविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रायव्हेट लॅबकडे सुध्दा लक्ष देण्यात यावे. बाधित रुग्णांबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

           जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना सांगितले की, RTPCR Test ची डाटा ऐन्ट्री प्रलंबीत आहे, त्यामुळे टेस्टींगचे काम व्यवस्थीतरित्या झाले पाहिजे. कोणत्याही बाधित रुग्णांची ॲन्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी. रुग्णांच्या रक्ताची चाचणी करुन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात यावा. आरोग्य तपासणीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असेल तर आजूबाजुच्या नागरिकांना नगरपरिषदेतर्फे कळविण्यात यावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल असेही श्री मीना यावेळी म्हणाले.

       गोंदिया येथे जिल्हा क्रीडा संकुल, पॉलिटेक्नीक कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होणार नाही व कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही याकडे लक्ष दयावे. रुग्णाला डिस्चार्ज करतांना होम आयसोलेशनचा त्याच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा. कोरोना बाधित रुग्णांना घाबरवू नका, त्यांना दिलासा दिला पाहिजे. 24 तासात रुग्णाची टेस्टींग रिपोर्ट यायलाच पाहिजे. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाला पूर्वपरवानगीशिवाय बाहेर काढता येणार नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बाधित व्यक्तीच्या बॉडीचे प्रोटोकॉल पाळण्यात यावे. कोरोना बाधित रुग्णांबाबत यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. कोरोनाबाबत मनुष्यबळाची अडचण असल्यास गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन आतापर्यंत 408 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी माझे कुटूंब-माझी जबाबदारीमोहिमेअंतर्गत यंत्रणांनी कुटूंबाचे सर्व्हे करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय आढावा घेतला. कुटूंबाचे सर्व्हे करण्याकरीता आशा सेविकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. कुटूंबाचे सर्व्हे ऑफलाईन व ऑनलाईन करण्यात यावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून व्यवस्थीतरित्या काम करावे. नगरपरिषद मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी कोरोना बाधित रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे असेही श्री.मीना यावेळी म्हणाले.

       सभेला उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपतेतहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री पांचाल, पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत उपस्थित होते.

00000

Monday 28 September 2020

आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, कौशल्यपूर्ण शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य - प्रदिपकुमार डांगे

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्विकारली

           ग्रामीण विकासात जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. गोंदियासारख्या दुर्गम,आदिवासी बहूल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य देतांना लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण,विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.

          श्री.डांगे पुढे म्हणाले,जिल्ह्याच्या विकासाला गती देतांना अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात येईल. प्रशासकीय सुधारणा करताना वक्तशीरपणा यावर आपला भर राहणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे.या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतांना त्यांचे कौशल्य विकसित करण्याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री डांगे यांचा अल्प परिचय

          श्री प्रदिपकुमार डांगे यांची निवड १९९५ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाकडून थेट उपजिल्हाधिकारी या पदावर झाली. श्री डांगे यांनी साकोली जिल्हा भंडारा, ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल) म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर,अतिरिक्त जिल्हाधिकारी भंडारा, उपायुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, उपायुक्त (मनोरंजन कर ) भंडारा आणि गोंदिया येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, नागपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण संस्था (महाज्योती) येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. ३ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने त्यांची पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत निवड केल्यानंतर राज्य शासनाने त्यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

00000

 

 

 

 


 

Sunday 27 September 2020

‘माझा जिल्हा-माझी जबाबदारी’ मोहिम राबविणार - जिल्हाधिकारी मीना




             ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारीही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात माझा जिल्हा-माझी जबाबदारीमोहिम राबविणार असे मत जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांनी व्यक्त केले.

        जिल्हाधिकारी मीना पुढे म्हणाले, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून कोविड-19 विषाणू बाधित रुग्णांना त्यांच्या स्वगृही विलगीकरण/अलगीकरण करुन शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

        गोंदिया नगर परिषद क्षेत्रातील एखादी व्यक्ती जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह येते तेव्हा तिला नगरपरिषदेच्या कंट्रोल रूममधून फोन करून कोवीड केअर सेंटरमध्ये जाण्याविषयी सुचविले जाते. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण व्यक्ती गेल्यास तेथे त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. तसेच आवश्यकतेप्रमाणे औषधे दिली जातात. तसेच रुग्णाची आरोग्यविषयक स्थिती विचारात घेऊन रुग्णाला गृह अलगीकरणात ठेवावे किंवा कसे याबाबतचा निर्णय घेतला जातो. अशा कोवीड पॉझिटिव्ह व्यक्तीने कोवीड केअर सेंटरमध्ये‌ नोंदणी करून स्वतःची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते.   

        गोंदिया तालुक्याअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन न करता अनेक नागरिक खाजगी/शासकीय रुग्णालयात जावून Antigen/RTPCR तपासणी करतात व सदर तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी नजिकच्या कोरोना केअर सेंटर केंद्रावर जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे.

       तथापि कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नजिकच्या कोरोना केअर सेंटर, आरोग्य विभाग तसेच प्रशासनाला कोणतीही माहिती न देता स्वमर्जीने घरीच राहतात आणि खुलेपणाने समाजामध्ये वावरतात. यामुळे रुग्णांच्या स्वतःच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यांनी असे केल्यामुळे गोंदिया शहरांमध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह केसेस येण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे.अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरुध्द दंडात्मक कार्यवाही करुन 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या कामासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन पथक गठीत करण्यात आलेले आहेत असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

       ज्या नागरिकांना आजाराची काही लक्षणे आहेत त्यांनी नजिकच्या आरोग्य केंद्राला भेट दयावी. तसेच पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी प्रशासकीय आरोग्य संस्थांना भेट देवून संपर्क करावा. असे पॉझिटिव्ह रुग्ण जे कोरोना बाधित झाले असता प्रशासनाला कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने घरीच गृह अलगीकरण (Home Isolation) करतात आणि समाजामध्ये खुलेपणाने वावरतात अशा रुग्णांवर दंडात्मक कार्यवाही करुन 10 हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास किंवा ते कोरोना बाधित असल्यास त्यांनी तात्काळ प्रशासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा आणि जवळच्या कोवीड केअर सेंटरमध्ये जाऊन स्वतःची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घ्यावी. कोणीही स्वमर्जीने घरी गृह अलगीकरणात राहू नये व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मुक्तपणाने फिरू नये. त्याची माहिती प्रशासकीय आरोग्य संस्थांना दयावी.

      आज जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहूल खांदेभराड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे उपस्थितीत नियुक्त 15 पथकाद्वारे पोलीस विभाग, नगर परिषद कर्मचारी यांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबवून गोंदिया नगर परिषद हद्दीतील नियमभंग करुन स्वमर्जीने घरीच राहणाऱ्या एकूण 70 रुग्णांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाचे आदेश संबंधित रुग्णांचे घरी जावून देण्यात आलेले आहे. संबंधितांनी अलगीकरणाचा कालावधी संपुष्टात येताच मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांचेकडे हजर राहून सदर दंडाच्या रक्कमेचा भरणा करावा असे आदेशित करण्यात आलेले आहे.

00000

      


 

Saturday 26 September 2020

शेवटच्या माणसाला जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे - न्यायमूर्ती भूषण गवई

गोंदिया येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन




          विधी पालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका ह्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण झाल्या आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीतून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला जलदगतीने न्याय मिळाला पाहिजे. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

      आज गोंदिया येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आभासी पद्धतीने न्यायमूर्ती गवई यांनी केले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आभासी पद्धतीने मुंबई येथून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती नितीन बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी गोंदिया येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.टी.बी.कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       न्यायमूर्ती गवई पुढे म्हणाले की, गोंदिया आणि माझा जुना संबंध आहे. 1997 मध्ये मी न्यायालयीन कामकाजासाठी अनेकदा गोंदियाला गेलो. अनेकदा तिथे मुक्काम देखील केला. तेथील अनेक वकिलांसोबत मला जवळून काम करण्याची संधी मिळाली. गोंदियाच्या वकिलांना सामाजिक कार्याचा वसा आहे. ॲड. छेदीलाल गुप्ता हे त्यापैकीच एक होते. न्यायमूर्ती बोरकर यांची गोंदिया ही मातृभूमी आहे. या कार्यक्रमातून यांच्या सत्काराचे आयोजन करण्याचे ठरले होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. न्यायमूर्ती गिरडकर यांचे या विस्तारित इमारत उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी या इमारतीच्या भूमिपूजनाला देखील होतो. आज उद्घाटन समारंभाला देखील उपस्थित आहे. हे माझे भाग्य आहे. ही इमारत सुसज्ज झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराने अत्यंत चांगल्या पद्धतीने ही इमारत बांधली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना या इमारतीतून न्याय मिळेल असे ते म्हणाले.

      न्यायमूर्ती दत्ता म्हणाले, जिल्हा व सत्र न्यायालयाची ही विस्तारित इमारतीसाठी जागा मिळण्यापासून अनेक अडथळे आले. त्यावर तोडगा निघून अखेर जागा उपलब्ध झाली. न्यायमूर्ती गिरडकर हे गोंदिया येथे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश असतांना त्यांनी या विस्तारित इमारतीसाठी लागणाऱ्या जागेपासून तर इमारत पूर्ण होईपर्यंत लक्ष दिले. न्यायमूर्ती गवई यांच्या पुढाकारामुळे ही वास्तू आज साकारली आहे. इमारतीचे बांधकाम चांगल्या गुणवत्तेचे असून फर्निचर सुद्धा चांगले आहेत. चांगल्या सुविधा या इमारतींमध्ये निर्माण करण्यात आल्या आहे. विस्तारित इमारतीमुळे न्यायिक अधिकारी व वकील बांधवांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या इमारतीमध्ये नियमांचे सर्वांनी पालन करावे. अनेकांना या इमारतीतून न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

      न्यायमूर्ती देशपांडे म्हणाले, गोंदिया येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची ही विस्तारित इमारत पूर्ण होण्यामागे न्यायमूर्ती गिरडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. न्यायिक अधिकारी, वकील मंडळी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या इमारतींमुळे सुविधा निर्माण होण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.

      न्यायमूर्ती बोरकर म्हणाले, आज या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे. अतिशय सुसज्ज अशी इमारत तयार झाली आहे. या जागेसाठी जनहित याचिका दाखल करावी लागली. या इमारतीमध्ये असलेल्या लिफ्ट सुविधेमुळे वरिष्ठ वकिलांना कामानिमित्त येण्या-जाण्यासाठी आधार झाला आहे. गोंदिया ही आपली मातृभूमी असल्यामुळे येथे वकील म्हणूनही आपण काम केल्याचे त्यांनी सांगितले.

       अध्यक्षस्थानावरून बोलतांना न्यायमूर्ती गिरडकर म्हणाले, विस्तारित इमारतीच्या उद्घाटनामुळे माझे आज स्वप्न पूर्ण झाले आहे. जुनी इमारत ही अपुरी पडत असल्यामुळे विस्तारित इमारतीची आवश्यकता होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून येथे काम करीत असताना या जागेसाठी पाठपुरावा केला. अनेक अडथळे आले, त्यावर मात करून अखेर जागा उपलब्ध झाली. काही महिन्यांच्या कालावधीतच या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही इमारत आता लोकांच्या सेवेत रुजू होत असल्याचा आनंद आपल्याला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

       प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री माने म्हणाले, ही इमारत उभी राहण्यासाठी न्यायमूर्ती गिरडकर यांनी बीजारोपण कार्य केले. त्यांच्या योगदानातून ही इमारत उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयांच्या इमारती झाल्या पाहिजे यासाठी न्यायमूर्ती गिरडकर यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ॲड. टी.बी.कटरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      कार्यक्रमाचे संचालन न्यायाधीश एन.आर.वानखडे व न्या.श्रीमती मालोदे यांनी केले. उपस्थितांचे आभार न्यायाधीश शरद पराते यांनी मानले.

   कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना, न्यायिक अधिकारी, वकील वर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक आर.जी.बोरीकर, सहायक अधीक्षक महेंद्र पटले, नरेंद्र टेंभरे, एम.आर.कटरे, श्री लिल्हारे, सी.ए.कावळे, व्ही.पी.बेदरकर व बी.डी.बडवाईक यांनी सहकार्य केले.



Tuesday 22 September 2020

कोरोनाबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे - जिल्हाधिकारी मीना


      जिल्ह्यात सातत्त्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज वाढणारी बाधितांची संख्या ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढण्यासाठी यंत्रणांनी कोरोना बाधित रुग्णांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

       आज 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कोविड-19 संदर्भात तिरोडा तालुक्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती अर्चना मेन्ढे, तहसिलदार प्रशांत घोरुडे, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.हिम्मत मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश मोटघरे, गटविकास अधिकारी एस.एम.लिल्हारे, गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी, विस्तार अधिकारी पी.डी.कुर्वे व जी.एम.भायदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, कोरोना केअर सेंटरमध्ये प्राथमिक तपासणी झाली पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये आणले पाहिजे. होम आयसोलेशमध्ये कोणत्याही बाधित रुग्णाचा मृत्यू होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविडबाबत काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. होम क्वारंटाईनसाठी तहसिलदाराची मंजूरी घेणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांच्या एक्सरे बाबत तसेच कंटेंटमेन्ट झोनची व्यवस्था कशाप्रकारे करण्यात येते याबाबत त्यांनी यंत्रणेला विचारणा केली. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या बाधित रुग्णांकडे तहसिलदारांनी विशेष लक्ष्य दयावे. तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरलेली नसल्यामुळे मनुष्यबळाची अडचण येत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

        माझे कुटुंब-माझी जबाबदारीही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत तिरोडा तालुक्यातील संपूर्ण कुटुंबाचे सर्व्हे करुन डाटा एन्ट्रीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. यामध्ये एका दिवसात 50 कुटुंबाचे सर्व्हे करायचे आहे. संपूर्ण कुटुंबाचे सर्व्हे करण्याकरीता ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीमध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, मास्क, सॅनिटायजर व हॅन्‍ड ग्लोव्हचा पुरवठा करण्यात यावा. साहित्य पुरवठा करण्याकरीता नगरपरिषदेची मदत घेण्यात यावी असेही श्री.मीना यावेळी म्हणाले.

       तिरोडा तालुक्यात सरांडी येथे कोरोना केअर सेंटर आहे. या केंद्रामध्ये बाधित रुग्णांसाठी 112 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे व आय.टी.आय. तिरोडा येथे 103 बेडची व्यवस्‍था करण्यात आली आहे. व्हेन्टीलेटरसाठी  तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. दररोज 70 ते 80 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येते अशी माहिती यावेळी संबधित अधिकाऱ्याने दिली.

 

Monday 21 September 2020

‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे - जिल्हाधिकारी मीना



 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटूंब-माझी जबाबदारीही मोहिम हाती घेतली  आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली माझे कुटूंब-माझी जबाबदारीही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

       आज 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.जी.तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारीही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारीया मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कुटुंबाचे संपूर्ण सर्व्हे येत्या 5 ते 6 दिवसात पूर्ण झाले पाहिजे. सर्व्हे करण्याकरीता आशा सेविका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सेवा घेण्यात यावी. त्यांच्याकडे पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, मास्क, सॅनिटायजर व हॅन्‍ड ग्लोव्हचा पुरवठा करण्यात यावा. सोबतच सर्व्हे करण्याकरीता शिक्षकांची सुध्दा मदत घेण्यात यावी. आशा सेविकांच्या काय अडचणी आहेत त्याकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

        जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर माझे कुटूंब-माझी जबाबदारीमोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्व्हे करणे सुरु करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी यंत्रणांकडून जाणून घेतली. कुटुंबाचे सर्व्हे करण्याकरीता डाटा एन्ट्रीचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. या मोहिमेअंतर्गत कुटुंबाची माहिती भरण्याची सर्व ऑफलाईन कामे ऑनलाईन करण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये माझे कुटूंब-माझी जबाबदारीमोहिमेबाबत जनजागृती करण्यात यावी. कुटुंबाचे सर्व्हे करण्याच्या कामात गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष्य देण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुटुंबाचे सर्व्हे व्यवस्थितरित्या होत आहे की नाही याकडे विशेष लक्ष्य दयावे असे त्यांनी सांगितले.

       माझे कुटूंब-माझी जबाबदारीमोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्व्हे करण्याकरीता साहित्य पुरवठाबाबत अथवा तांत्रिक बाबतीत काही अडचणी आल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित कळविण्यात यावे. जेणेकरुन प्रत्यक्ष काम करतांना येणाऱ्या अडचणी दूर कणे सोईचे होईल. या कामात ग्रामसेवकांचा सुध्दा सक्रीय सहभाग असावा. मोहिमेत आशा सेविकांच्या सहभागासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात यावे. सर्व्हे करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष नियोजन करुन कामे करण्यात यावी. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

      जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी म्हणाल्या, डाटा एन्ट्रीच्या आधार सिडींगचे काम व्यवस्थितरित्या झाले पाहिजे. डाटा एन्ट्रीचे काम करतांना काही अडचणी आल्यास त्वरित कळविण्यात यावे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, संपूर्ण महिना पोषण अभियानम्हणून राबविण्यात येत आहे. यासाठी गरोदर महिलांमध्ये जनजागृती करण्यात यावी. याकरीता नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी पोषण अभियानयशस्वीरित्या राबवावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. घरकुल योजनेच्या कामाबाबत सध्या काय परिस्थिती आहे याबाबत संबंधित यंत्रणेला त्यांनी विचारणा केली.

       जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे यांनी माझे कुटूंब-माझी जबाबदारीया मोहिमेबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली. सोबतच कुटुंबाचे सर्व्हे करण्याच्या कामात काही अडचणी असल्यास श्री कनिफ यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9921904015 यावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

       सभेला जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नरेश भांडारकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाल, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, डॉ.विनायक रुखमोडे, सर्व तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

00000