जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 30 May 2017

शेतकऱ्यांसाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीज पुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून सौर कृषी फिडरची योजना शासनाच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फिडरचे विलगीकरण झाले अशा ठिकाणी कृषी फिडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्यूतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संबोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्याच्या एकूण वीज वापराच्या 30 टक्के ऊर्जा कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महाविरतण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठया प्रमाणात अनुदान द्यावे लागते. कृषी फिडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीचा वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व औष्णिक विजेची बचत होईल.
या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. तसेच महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल. राज्यातील 11 व 132 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या 5 ते 10 किमी परिसरात शासकीय जमिनीची उपलब्धता लक्षात घेऊन या प्रकल्पाची निवड केली जाईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाकरीता शासकीय जमीन 30 वर्षाच्या कालावधीकरीता नाममात्र 1 रुपया दराने भाडेपट्टीने उपलब्ध करुन देण्यात येईल. ही जमीन अकृषक करण्याची गरज राहणार नाही.
ही योजना महानिर्मिती कंपनी पीपीपी तत्वावर राबवील. खाजगी गुंतवणूकदाराकडून सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी महानिर्मिती योग्य तो करार विशिष्ट कालावधीसाठी करण्यात येणार आहे. निवड झालेली सौर कृषी वाहिनी महावितरणच्या वीज प्रणालीपासून वेगळी करण्यात येईल. कृषी ग्राहकांना सौर कृषी वाहिनीतून वीजपुरवठा महावितरणकडून केला जाणार आहे. या वाहिनीची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनी अंतर्गत केली जाणार आहे. वीज ग्राहकांना मीटर महावितरण कंपनी जोडून देण्यात येणार असून वीजबीलाची वसुली  करुन महानिर्मितीकडे जमा करण्यात येणार आहे. या वसुलीच्या रकमेतील निश्चित रक्कम महानिर्मिती महावितरणला देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अनुदानाची रक्कम शासनाकडून महानिर्मिती कंपनीला देण्यात येणार असून, या योजनेतून लिप्ट इरिगेशन  योजनांचा वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सौर कृषी फिडर योनजेची अंमलबजावणी योग्य पध्दतीने व्हावी यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असून त्यात महावितरण, महाऊर्जा व महानिर्मितीमधील संबंधीत अधिकाऱ्यांचा समावेश राहील.
ऊर्जा संवर्धन धोरण 2016 मुळे 5 वर्षात एक हजार मेगावॅट ऊर्जेची बचत होणार
ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला शाश्वत वीज देण्यासाठी नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करुन वीज निर्मिती करणे आणि पारंपरिक म्हणजे कोळशापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेची बचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होणार नाही. केंद्र शासन, बीईई नवी दिल्ली या संस्था ऊर्जा संवर्धनाच्या विविध योजना देशभरात राबवितात. त्यातून मार्च 2015 पर्यत 16 हजार 968 मेगावॅट वीज बचत करण्यात यश आले आहे. नव्या ऊर्जा संवर्धन धोरणामुळे पुढील पाच वर्षात विविध क्षेत्रात ऊर्जा बचत कार्यक्रम राबविला तर एक हजार मेगावॅट ऊर्जेची बचत होईल.
वीज वितरण कंपन्यांतर्फे त्यांच्या क्षेत्रात (डिमांड साईड मॅनेजमेंट) कार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बदलणे, कपॅसिटर बसविणे, वीज गळती थांबविणे यासारख्या उपाययोजना कंपन्यांमार्फत राबविण्यात येतील.5 वर्षात 100 फिडरवर अशा प्रकारची योजना राबविणे प्रस्तावित आहे.यासाठी 50 लाख प्रतिप्रकल्प राज्य शासन महाऊर्जातर्फे महावितरण कंपनीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ट्रान्सफॉर्मर खरेदी करताना 3 स्टार असलेले ट्रान्सफॉर्मर खरेदी करुन,गावांमधे एलईडी पथदिवे लावण्यात यावे.म्हणजे 100 मे.वॅ. ऊर्जेची बचत होईल. महावितरण विभागाची हानी दूर करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र ऊर्जा संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.तसेच महावितरण विभागामार्फत प्रीपेड,स्मार्ट मीटर बसविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

ऊर्जा निर्मिती केंद्रानी ऑक्झिलरी पॉवर कन्झप्शन कमी करण्यासाठी प्रयत्न करुन,वीज नियामक आयोगाने दिलेली उदिष्टे साध्य करण्यात येणार आहे. सर्व ऊर्जानिर्मिती केंद्रांना उर्जा बचतीसाठी वातानुकुलन यंत्रणा, लाईटिंग, कॉम्प्रेसर, बॅटरी चार्जर, फॅन, मोटर्स, पाण्याचे पंप आदींवर ऊर्जा बचतीसाठी विशेष लक्ष देण्यात येणार असून, महानिर्मिती विभागांतर्गत ऊर्जा संवर्धन केंद्र राज्यस्तारावर स्थापन करण्यात येणार आहे. वीज पारेषण  कंपनीने अखत्यारीतील सर्व उपकेंद्रे, पारेषण वाहिन्या, इमारती, लोड डिस्पॅच सेंटर येथे ऊर्जा संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी कपॅसिटर बॅंक बसविण्यात येणार असून, बॅटरी चार्जिंगसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.तसेच पारेषण कंपनी मार्फत ऊर्जा संवर्धन कक्ष स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील तीनही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन यावर प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल.असेही श्री बावणकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

महास्वयंम पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महारोजगारएमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेब पोर्टलचे एकत्रिकरण




 कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेबपोर्टलचे एकत्रिकरण करुन महास्वयंम हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, आयुक्त ई. रविंद्रन उपस्थित होते.
कौशल्य विकास (एमएसएसडीएस),रोजगार (महारोजगार) व उद्योजकता (महास्वयंरोजगार) याबाबत तीन स्वतंत्र वेब पोर्टल होती.सदर तिन्ही वेब पोर्टल एकाच ठिकाणी एकत्रित करुन महास्वयंम हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले. महास्वयंम पोर्टल वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहे. हे सर्व प्लॅटफार्म एकाच ठिकाणी आपल्याला वापरता येणार आहेत. म्हणजे कौशल्य प्रशिक्षित लोकांची यादी ठेवता येईल, ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांना नोंदी करता येतील, बेरोजगारांना नोंदी करता येतील आणि इंडस्ट्रिजला मागणीप्रमाणे नोंदणी करता येणार आहे. उमेदवारास एकाच ठिकाणी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विषयक माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे.प्रशिक्षण संस्थाना उमेदवारास प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे देयक त्याचप्रमाणे रोजगार बाबत संपुर्ण माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.उद्योजकास सीएनव्ही ॲक्ट अन्वये रिक्त असलेली पदे अधिसुचित करणे, प्रसिध्दी देणे,योग्य उमेदवाराची निवड तयार करणे, मुलाखतीचा एसएमएस पाठविणे, अनिवार्य विवरण पत्र सादर करणे इ.सुविधा उपलब्ध आहेत.उमेदवारांना नोकरी बाबतची माहिती एकाच क्लिक बटनवर उपलब्ध आहे व याबाबत एस.एम.एस. उपलब्ध होण्याची सुविधा आहे. उमेदवार,उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे सुलभ होणार आहे तसेच उमेदवार,उद्योजक यांना प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
उमेदवारास नोंदणी, रोजगार उपलब्धतेबद्दल माहिती व अर्ज भरणे, प्रशिक्षणा बाबतची माहिती, स्वयंरोजगाराबाबतची माहिती अर्ज भरणे,    रोजगार मेळावे माहिती व सहभागी होण्याची सुविधा, रिक्त पदासाठी अर्ज करणे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
प्रशिक्षण संस्थांसाठी नोंदणी, शासनाच्या कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, प्रशिक्षण शुल्क देयक,      प्रशिक्षण शुल्क ईसीएस पध्दतीने प्राप्त होते.
तसेच उद्योजकांसाठी नोंदणी, रिक्त पदे प्रसिध्द करणे, सुयोग्य उमेदवारांची यादी काढणे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

एका बटनावरएकूण नोंदणीकृत उमेदवार / उद्योजक / प्रशिक्षण संस्था, एकूण कौशल्य विकास झालेले उमेदवार, एकूण नोकरी प्राप्त व स्वयंरोजगार करीत असलेले उमेदवार आदींची माहिती शासनास उपलब्ध होणार आहे.

Sunday 28 May 2017

अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुध्द धम्म जगभर पोहोचला - रामदास आठवले

                            भिमघाट येथे अशोक स्तंभाचे लोकार्पण


        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सम्राट अशोकानंतरचे सर्वात मोठे धर्मांतर होते. सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर बुध्द धम्म जगभर पोहोचला. बुध्दाचे तत्वज्ञान हे विज्ञानावर त्याचबरोबर स्वातंत्र, समता आणि बंधुता यावर सुध्दा आधारित आहे. सम्राट अशोकाने जगभर विविध ठिकाणी उभारलेल्या अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुध्द धम्म जगभर पोहोचला. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
       गोंदिया येथील पांगोली नदी काठावरील भिमघाट येथे 28 मे रोजी आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण व पुरस्कार वितरण ना.आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून भंते महाथेरो डॉ.राहूल बोधी, डॉ.अशोक शिलवंत, डॉ.प्रशांत पगारे, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, भुपेश थुलकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सदस्य सुलक्षणा शिलवंत, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, गोंदिया न.प.सभापती दिलीप गोपलानी, विनोद किराड, राजा बंसोड व रमेश टेंभरे यांची उपस्थिती होती.
       श्री.आठवले पुढे म्हणाले, सम्राट अशोकांनी अनेक स्तुप निर्माण केले. त्यापैकी सांचीचा स्तुप हा एक असून तो जगप्रसिध्द आहे. डॉ.आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडली. माणसाला माणसाशी जोडणारी भूमिका मांडली. डॉ.आंबेडकरांनी माणसाला माणूस बनविणारा धम्म, मनातील अहंकार संपुष्टात आणणारा धम्म, बुध्दीवादी धम्म, विज्ञानवादी धम्म अशाप्रकारच्या धम्माचा स्विकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ.आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांच्या विचारांची चळवळ चालविण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.
       अशोक शिलवंत यांनी 14 पैकी आठवा अशोक स्तंभ गोंदिया येथे उभारल्याचे सांगून श्री.आठवले त्यांचे कौतुक करतांना म्हणाले,
                   या ठिकाणी उभे केले आहे अशोकाने स्तंभ आठ
                   म्हणून मी थोपाटतो तुमची पाठ.
                   तुम्ही उभे करा स्तंभ चौदा, पण करु नका कोणाबरोबर सौदा.
                   आज मी पाहिला आहे गोंदियाचा भिमघाट,
                   म्हणून मी लावणार आहे एक दिवस भिमाच्या दुष्मनाची वाट
                   तोडून जातीयतेचे बंधन, मी करतो या अशोक स्तंभाला वंदन
                   माझ्या हृदयात नेहमीच आहे भिमाच्या आणि बुध्दाच्या विचाराचे स्पंदन
                   म्हणून मी एक दिवस करणार आहे विषमतेचे रणकंदन.
      वरील ओळीने उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या घेतल्या. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती निमित्त केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेले होते व त्यांनी तिथे सभा घेतल्या अशा ठिकाणी हे स्तंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 23 एप्रिल 1954 मध्ये या स्थळाला भेट दिली होती. परंतु अनेक वर्ष या पवित्र स्थळाचा विकास झाला नाही. राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून या भिमघाट स्मारकाच्या विकासासाठी 1 कोटी रुपये मंजूर केले आहे. अशोक शिलवंत हे देशात प्रमुख 14 ठिकाणी अशोक स्तंभ उभारत आहे. त्यांना इथे अशोक स्तंभ उभारण्याची विनंती केली असता, ती त्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील महत्वाच्या अशाप्रकारच्या ठिकाणाचा विकास करण्यासाठी निधी दिला असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्याचबरोबर 36-36 योजनेतून प्रस्ताव आल्यास त्याला देखील निधी देण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या महत्वपूर्ण 28 स्थळांचा विकास करण्यात येत आहे. लंडन येथे डॉ.आंबेडकरांनी वास्तव्य केलेले घर खरेदी करण्यात आले आहे. इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारुन 350 फुटाचा डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येईल. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, बौध्द विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा व केंद्रात बौध्दांना आरक्षण देण्याचा कायदा अस्तित्वात यावा यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. यासंबंधाने बैठकाही घेण्यात आल्या आहे. अनुसूचित जातीचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाच्या विविध योजना नियोजनबध्द पध्दतीने राबविण्यात येत आहे. ज्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे त्यामध्ये सुधारणा निश्चित करण्यात येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांच्या विचाराला वाहून घेण्याचे काम केले. हे अशोक स्तंभ त्यांच्या विचाराच्या प्रसाराचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
      भंते डॉ.राहूल बोधी म्हणाले, तळागाळात जोर-जबरदस्तीने ठेवलेल्या माझ्या समाजाचा कसा उध्दार होईल याचे स्वप्न डॉ.आंबेडकरांनी बघितले होते. या समाजाला जर संधी मिळाली तर आपल्या कर्तव्याने हा समाज प्रगती करु शकतो. प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी त्यांन संपूर्ण जीवनभर प्रयत्न केले.
       डॉ.आंबेडकर ज्यावेळी आंदोलन करीत होते त्यावेळी या समाजात एकही आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी नव्हता असे सांगून डॉ.बोधी म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी निर्माण केलेल्या मार्गाने जर आमची माणसे चालली तर ते कलेक्टर, कमिश्नर बनतील, मंत्री खासदार पण होतील. मोठ्या पदाच्या जागा ते मिळवू शकतील. एवढा त्याग करण्याची शक्ती या समाजात आहे, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. जगातील 134 देश बौध्दमय आहेत. या देशातील नागरिक बुध्दाच्या तत्वज्ञानाचे पालन करतात. डॉ.आंबेडकरांमुळे आपल्याला जगातील महान बुध्द धम्म लाभला आहे. हे अशोक स्तंभ इतिहास निर्माण करुन जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
        प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेवून आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अशोक रत्न पुरस्काराने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अशोक विभूषण पुरस्काराने सुर्तीसेन वैद्य, अनिल सुखदेवे, अजित मेश्राम, अशोक भूषण पुरस्काराने भागवत गायकवाड, अशोक बेलेकर, अशोक मित्र पुरस्काराने विश्वजीत डोंगरे, संतोष बिसेन, सुरेंद्र खोब्रागडे, संघमित्र पुरस्काराने नागाबाई पोपलवार, समता गणवीर, अशोक काव्य भूषण पुरस्काराने डॉ.नुरजहा पठाण, महेंद्र पुरस्काराने यादव मेश्राम व मिलिंद बांबोळे यांना सन्मानीत करण्यात आले.  

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक शिलवंत यांनी केले. संचालन धनंजय वैद्य यांनी, तर उपस्थितांचे आभार श्याम चौरे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Friday 26 May 2017

पुलाच्या सुविधेमुळे समस्यांच्या सोडवणूकीस मदत - राजकुमार बडोले

साखरीटोला-तिरखेडी रस्त्याच्या पुलाचे लोकार्पण
    जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांच्या लाभामुळे ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. साखरीटोला-तिरखेडी दरम्यान बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे या भागातील अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-गांधीटोला-तिरखेडी दरम्यान बाघ नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी आज 26 मे रोजी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार संजय पुराम, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका भाजपा अध्यक्ष परसराम फुंडे, जि.प.सदस्य लता दोनोडे, माजी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, सालेकसा पं.स.चे माजी सभापती बाबुलाल उपराडे, माजी जि.प.सदस्य कल्याणी कटरे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, तिरखेडीच्या सरपंच मंगला मडावी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता डी.पी.कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या पुलाच्या सुविधेमुळे पावसाळ्यात वाहतूक पूर्ववत सुरु राहणार आहे. पावसाळ्यात कामानिमित्त, बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली आहे. याच काळात शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळता येणार आहे. तसेच रुग्णांना देखील उपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश असला पाहिजे असे ते म्हणाले.
        सामान्य माणसाची कामे झाली पाहिजे व विविध योजनांचा लाभ गरजू व्यक्तीला मिळाला पाहिजे असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, भूमीहीन व दारिद्रय रेषेखालील लोकांचे जीवनमान विविध योजनेच्या लाभातून बदलले पाहिजे. विकास निधीतून चांगली विकास कामे झाली तर जिल्ह्याचे चित्र निश्चितच बदललेले दिसेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
        साखरीटोला-गांधीटोला-तिरखेडी मार्गावरील बाघ नदीवर 180 मीटर लांबीचा हा पूल बांधण्यात आला असून या पुलाला 10 मीटरचे 18 गाळे आहेत. हा पूल महाराष्ट्र ग्रामविकास संस्थेअंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामावर 6 कोटी 20 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुजारीटोला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे हा मार्ग तीन ते चार दिवस सतत बंद राहायचा. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांची गैरसोय व्हायची. पुलाच्या सुविधेमुळे पावसाळ्यात देखील या मार्गावरील वाहतूक अखंडीतपणे सुरु राहणार आहे. पुलामुळे परिसरातील नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.
        पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला तिरखेडी व गांधीटोला येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार उपअभियंता डी.पी.कापगते यांनी मानले.

शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री बडोले

सलंगटोला येथे शिवार संवाद सभा
      मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 11 हजार 95 कोटी रुपयांची राज्यातील शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून अपुर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देवून त्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        सालेकसा तालुक्यातील सलंगटोला येथे आज 26 मे रोजी आयोजित शिवार संवाद सभेत उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, माजी जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता पुराम, माजी पं.स.सभापती बाबुलाल उपराडे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री.बहेकार यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांची कर्जफेड शासनाने केली असून उर्वरित 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना पिक विम्याचे 6739 कोटी रुपये दिले आहे. 2019 पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला असून यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात येत आहे. शाश्वत सिंचनासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे. या अभियानातून 544 कोटीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. 12 लाख 51 हजार 713 हेक्टर क्षेत्रासाठी एकवेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा यातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
      गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यासाठी वरदान असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आपला जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ खत म्हणून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून तो शेतात टाकल्याने शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. यावर्षी 400 तलावांचा गाळ काढण्यात येत असून येत्या तीन वर्षात सर्वच 1800 तलावातील गाळ काढण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे 25 टक्के सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      रोजगार हमी योजनेच्या निकषामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले की, या बदलामुळे वैयक्तीक लाभाच्या विविध योजनांचा लाभ व पांदण रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. जिल्ह्यात युरियाचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. मागेल त्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी देण्यात येईल. शेती प्रकृतीची तपासणी करण्यासाठी माती परीक्षण करण्यात येत आहे. धान खरेदी केंद्रावर धान सडणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून स्वस्त धान्य दुकानातून चांगल्या प्रतिच्या तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. 100 एकर शेतीमध्ये गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      आमदार पुराम म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्याय विविध योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम, घरकूल योजना, वीज कनेक्शन यासह अनेक बाबीवर शासनाने काम केल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.अंजनकर म्हणाले, केंद्र व राज्याने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. त्या योजनांचा संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. योजनेच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. विकास कामामुळे विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी तालुक्यातील 13 दुष्काळग्रस्त गावांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची बाब उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत लवकर कार्यवाही करुन संबंधित गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गावाच्या परिसरात एका माकडाच्या उपद्रवामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त असून काही लोकांना या माकडाने चावा घेतल्यामुळे माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यावर पालकमंत्र्यांनी उपवनसंरक्षकांना ही माहिती भ्रमणध्वनीवरुन देवून त्या उपद्रवी माकडाला ताबडतोब पकडण्याचे निर्देश दिले. मोतीराम भांडारकर या शेतकऱ्याचे 10 एकर शेतीतील धान कुणीतरी अज्ञान व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे शासनाने त्या व्यक्तीस त्वरित मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरुन दिल्या. सलंगटोला येथे आयोजित शिवार संवाद सभेला गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          

Tuesday 23 May 2017

पालकमंत्र्यांची बाई गंगाबाई रुग्णालयाला आकस्मिक भेट

• रुग्णालयाचा गलथान कारभार उघड
  • रुग्ण व नातेवाईकांनी मांडल्या समस्या
                                  • दोषींवर होणार कारवाई

                                 • स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने दिले निर्देश




      बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज 23 मे रोजी दुपारी 3 वाजता आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
      पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान रुग्णालयाचा गलथान कारभार उघड झाला. गोंदियासह बालाघाट जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण महिला उपचार व बाळंतपणासाठी बाई गंगाबाई रुग्णालयात येतात. परंतू रुग्णांवर योग्य उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याच्या तक्रारीची व मागील 43 दिवसात 34 नवजात बालकांचे मृत्यू या रुग्णालयात झाल्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी हा आकस्मिक दौरा केला. तातडीने वैद्यकीय सेवेत 15 दिवसाच्या आत सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल यांना भ्रमणध्वनीवरुन पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
      पालकमंत्र्यांचे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम आकस्मिक वैद्यकीय अधिकारी कक्षाला भेट देवून वैद्यकीय अधिकारी यांचा हजेरीपट बघितला. हजेरीपटाप्रमाणे उपस्थित अधिकाऱ्यांबाबत विचारणा करुन गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश डॉ.दोडके यांना दिले. आकस्मिक विभागामध्ये जावून आकस्मिक ड्यूटी अधिकारी डॉ.अंसारी, डॉ.खान व प्रसूतीतज्ञ डॉ.रश्मी प्रसाद उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. बाह्यरुग्ण विभागात दररोजचे रुग्ण तपासणी व आंतररुग्ण विभागात दररोज दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती जाणून घेतली.
      रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची पाहणी केली. रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबाबत विचारणा केली. थंड पाणी तर सोडाच पाणी सुध्दा बाहेरुन आणावे लागत असल्याची तक्रार रुग्णाच्या एका नातेवाईकाने पालकमंत्र्याकडे यावेळी केली.
       सोनोग्राफी कक्षाला भेट देवून लेबर रुम व ऑपरेशन थिएटरची पाहणी करुन महिला रुग्णांची पालकमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. नवजात शिशु कक्षाचे निरीक्षण केले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा हजेरीपट बघितला. नवजात शिशु कक्षात गंभीररित्या भरती असलेल्या शिशुची चौकशी केली. रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांचे गंभीर आजारी व कमी वजनाचे कमी दिवसाचे किती बालके भरती आहेत व त्यांच्यावर कशा पध्दतीने उपचार सुरु आहे याबाबतची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.
      मागील 43 दिवसात 34 बालमृत्यूबाबत डॉ.दोडके यांचेकडून सविस्तर आढावा घेतला. मृत्यू झालेल्या नवजात बालकांचा डेथ ऑडीट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दोडके यांना दिले. कमी दिवसाचे व कमी वजनाचे अर्थात कुपोषित बालके जन्माला येवू नये म्हणून विशेष प्रसूती तज्ज्ञांच्या सेवा ग्रामीण रुग्णालय पातळीवर उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
      प्रसूतीसाठी भरती असलेल्या महिलांची भेट घेवून त्यांच्या समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. योग्य ते औषधोपचार प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर करावे असेही त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये येथील आरोग्य सेवा व प्रसूती सेवा बळकटीकरणावर भर देवून बाई गंगाबाई रुग्णालयातील रुग्णभार कमी कसा करता येईल याबाबत सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
      बाई गंगाबाई रुग्णालयात 200 रुग्ण असतांना ड्युटीवर केवळ एक वैद्यकीय अधिकारी हजर तर उर्वरित गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांना यावेळी जाब विचारणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच सीसीटिव्ही कॅमेरे 24 तास कार्यरत राहील यादृष्टीने उपाययोजना करण्याचे तसेच आपल्या कर्तव्यात हयगय करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी हे दर 15 दिवसांनी इथल्या व्यवस्थेबाबतचा आढावा घेतील.
       इथल्या व्यवस्थेबाबत तक्रारी केल्या आहेत त्याची निश्चित दखल घेण्यात येईल असे सांगून पालकमंत्री यावेळी म्हणाले, उपचारासाठी व बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सभ्यपणे वागावे. आलेला रुग्ण परत जाणार नाही याची काळजी घेवून त्यावर योग्य ते औषधोपचार व शस्त्रक्रिया कराव्यात. इथल्या परिसरात असामाजिक तत्वांचा तसेच दलालांचा देखील वावर राहणार नाही याची दक्षता घेवून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब लक्षात आल्यास संबंधित दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून
परिसराची पाहणी
      पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमती पाटील, बाई गंगाबाई महिला शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, सहायक अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, डॉ.सुवर्णा हुबेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले हे आकस्मिक भेटीवरुन निघून गेल्यानंतर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ यांनी रुग्णालयाचा फेरफटका मारला. असामाजिक तत्वांचा रात्रीला मुक्त संचार रुग्णालयाच्या परिसरात असल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती डॉ.दोडके यांनी दिली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ व समोर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची पाहणी करुन त्वरित अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधितांना सूचना केली. पक्के बांधलेले अतिक्रमीत घर बुलडोजरने पाडण्याच्या सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता कायम राहील यासाठी त्वरित पावले उचलून रुग्णालयाचा परिसर सुरक्षीत कसा राहील यासाठी त्वरित सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Friday 19 May 2017

योजनांच्या अंमलबजावणीतूनच मानवाधिकाराचे काम करावे - श्रीमती एस. जलजा

भारतीय संविधानातून मुलभूत अधिकार दिले आहेत. या अधिकारासोबतच कर्तव्याची जाणीव करुन दिली आहे. यंत्रणांनी मागास, वंचित घटकासोबत महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन मानवाधिकाराचे काम करावे. असे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निमंत्रित सदस्य श्रीमती एस. जलजा यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 18 मे रोजी आयोजित सभेत श्रीमती जलजा बोलत होत्या. सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          श्रीमती जलजा पुढे म्हणाल्या, स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी व्यापक प्रमाण जागृती केली पाहिजे. या जागृतीमुळेच मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यास मदत होईल. महिलाविरुध्द कौटूंबिक हिंसाचाराचे प्रमाण कमी झाले पाहिजे. महिलांसाठी असलेल्या विविध कायदयाची प्रभावी अंमलबजावणी केली तर महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासा मदत होईल. मुस्कान अंतर्गत हरविलेली बालके शोधून ती त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावी. बालविवाह जिल्हयात होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करुन संबंधित घटकाला योग्य तो न्याय देवून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी. गुन्हयाचा योग्य तपास करुन पिडितांना वेळीच मदत करावी. असे त्यांनी सांगितले.
          हिंसाचाराचे कुणीही समर्थन करणार नाही असे सांगून श्रीमती जलजा म्हणाल्या, जिल्हयात नक्षल चळवळ नियंत्रणात आहे. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगाराला सुधारण्याची जबाबदारीही पार पाडली पाहिजे. नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून विकासाला चालना दयावी. ग्रामीण भागात आशा वर्करचे शिक्षण जर दहावी उत्तीर्ण असेल तर तीला आरोग्य सेविकेचे प्रशिक्षण दयावे. ज्यामुळे चांगली आरोग्य सेवा रुग्णांना मिळण्यासा मदत होईल. ग्रामीण भागात दारु विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी ज्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होणे टाळता येईल. असे त्या म्हणाल्या.
          प्राथमिक शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार असल्याचे सांगून श्रीमती जलजा म्हणाल्या, कोणताही बालक बालकामगार म्हणून कुठेही दिसणार याची खबरदारी घ्यावी. विटभट्टीच्या ठिकाणी मुले बालकामगार म्हणून काम करत आहेत का याचा शोध घ्यावा. आरोग्याच्या दर्जेदार सुविधा हया प्रत्येक नागरिकाला मिळाल्या पाहिजे. यासाठी आरोग्य विभागाने काम करावे. अंगणवाडयामध्ये देखील चांगल्या सुविधा बालकांना देण्यासोबतच स्तनदा व गर्भवती महिलांना पोषण आहार नियमित दयावा.  वनहक्क कायादयांतर्गत संबंधितांना वनहक्क पट्टयांचे वाटप करावे. जिल्हा कारागृह बांधतांना ते  खुले व पर्यावरणपुरक असे बांधावे अशी उपयुक्त सूचना त्यांनी यावेळी केली.
          संविधानाच्या चौकटीत राहून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या घटकांच्या कल्याणासाठी निधी येतो तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे. मानवाधिकाराबाबत जागृती करण्याचे काम मानवाधिकार आयोगाकडून करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया जिल्हा हा हागणदारीमुक्त आहे. जिल्हयात बालवयात कोणत्याही मुलामुलींचा विवाह होत नाही. दर हजार पुरुषांमध्ये 989 स्त्रीयांचे प्रमाण आहे. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
          पोलीस अधीक्षक डॉ. भूजबळ म्हणाले, जिल्हयात महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. यासाठी निर्भया पथके गठीत करण्यात आली असून काही प्रसंग घडल्यास ही पथके तातडीने घटनास्थळी दाखल होतात. जिल्हा कारागृहासाठी 10 एकर जमीन अधिगृहीत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
          सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराव पारखे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, गोंदिया एस.टी आगार प्रमुख श्री इंगोले, यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                                        0000000000

Tuesday 16 May 2017

रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करावी - राजकुमार बडोले

 
       मजूरीनिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यात रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत अनेक विकास कामे करण्याची क्षमता या योजनेत आहे. जिल्ह्यात या योजनेतून ग्रामविकास व वैयक्तीक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 15 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेत घेतला, यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, रोहयो अंतर्गत कामाचे नियोजन मोठ्या प्रमाणात दिसते, परंतू प्रत्यक्षात कामे कमी करण्यात येतात. प्रत्यक्षात जी कामे रोहयो अंतर्गत करायला पाहिजे ती होत नाही. तलावातील गाळ काढण्याचे नियोजन देखील रोजगार हमी योजनेतून करण्यात यावे. जी कामे आपण करणार आहोत ती दिर्घकाल टिकाऊ स्वरुपाची राहतील यासाठी चांगल्या प्रकारचे अंदाजपत्रक तयार करावे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतातील उत्पादित माल घरी किंवा बाजारपेठेत पोहचविण्यासाठी चांगल्या प्रकारचे पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करावीत असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात येईल, त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. 100 दिवस जिल्ह्यातील मजूरांना रोजगार कसा मिळेल याचे नियोजन रोहयो विभागाने करावे. ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या जबाबदाऱ्या देवून कामे करुन घेण्यात येतील. तालुक्याचे नियोजन तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी एकत्र बसून करावे, असे त्यांनी सांगितले.
       उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी यावेळी सांगितले की, कुशल कामाचे मागील वर्षीचे 16 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहे, ते त्वरित मिळाल्यास संबंधितांना देता येईल. 12 मे पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत जिल्ह्यात 845 कामे सुरु असून यावर 53 हजार 262 मजूरांची उपस्थिती होती, तर यंत्रणांची 344 कामे सुरु असून यावर 16 हजार 173 मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

      सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच रोहयोची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

गाळ काढण्याचे योग्य नियोजन करा - पालकमंत्री बडोले

        गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपला जिल्हा हा तलावांचा आहे. प्रत्येक गावाच्या आजुबाजूला 2 ते 4 तलाव आहे. अनेक वर्षापासून हे तलाव गाळाने भरले आहे. हा गाळ सुपीक असून खत म्हणून या गाळाची उपयुक्तता मोठी आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी गाळ उपयुक्त ठरणार असल्यामुळे गाळ काढण्याचे योग्य नियोजन करावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        15 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 100 हेक्टरच्या आतील सर्व माजी मालगुजारी तलावातील गाळ नियोजनातून काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकावा. मुरुम मिश्रीत गाळ रस्त्याच्या बाजूला टाकावा. या योजनेतून तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत तर होईल सोबत रब्बीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर करता येईल. 31 मे पर्यंत गाळ काढण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासोबत शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी ही योजना मोठी संजीवनी देणारी आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी 50 तलावातून गाळ काढण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीचा कार्यक्रम यापूर्वी हाती घेण्यात आला असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, तलावांच्या कालव्यांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्यप्रकारे पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
         जिल्हाधिकारी काळे म्हणाले, या योजनेअंतर्गत यंत्रणांनी जास्तीत जास्त गाळ काढून त्या गाळाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देवून तो गाळ जास्तीत जास्त शेतकरी शेतात टाकतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. हा गाळ शेतात टाकल्यामुळे पुढील वर्षीपासून शेतीची उत्पादकता निश्चित वाढलेली असेल. जवळपास जिल्ह्यातील 1800 तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

       जिल्ह्यातील 100 हेक्टरच्या आतील तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे यांनी सांगितले. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ व सुंदर गोंदियासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा - राजकुमार बडोले

                           गोंदिया अतिक्रमण आढावा बैठक
      घाणेरड्या शहराच्या यादीत गोंदिया शहराचा समावेश आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होवून डासाचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. आता गोंदिया हे शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 15 मे रोजी गोंदिया शहरातील अतिक्रमणाबाबतचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता श्री.मडके, ठाणेदार श्री.शुक्ला व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
      गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, अतिक्रमणामुळे शहरातील मार्केटमधून फिरणे देखील कठीण झाले आहे. अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दयाव्यात. कायदयाचे पालन करुन अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करावी. जे अतिक्रमण काढायचे आहे त्याची मार्कींग करावी. डॉटेड लाईनच्या बाहेरचे अतिक्रमण काढावे. अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याबाबतची पूर्व कल्पना पोलीस विभागाला दयावी. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आवश्यक ते पोलीस बल मागवून घ्यावे व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेची निवड त्वरित करण्यात यावी. शहरात कोणतीही व्यक्ती उघड्यावर शौचास बसणार नाही याची काळजी घ्यावी. गोंदिया हे शहर शौचमुक्त झाल्यामुळे शौचालयाचा प्रत्येक जण नियमीत वापर करतील यासाठी त्यांना उघड्यावरील शौचाचे दुष्परिणाम पटवून दयावे. शहरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती करुन ती नियमीत वापरात आणावी. गोंदियात बायोटॉयलेटचा वापर करता येईल का याकडे देखील नगर पालिकेने लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले.
       गोंदिया शहरातील काही भागात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याचे लक्षात आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेवून ज्या भागात दुषीत पाणी पुरवठा होत आहे त्या भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम तातडीने करावे. काही दिवसानंतर पावसाळा सुरु होणार आहे त्यामुळे जलजन्य आजाराची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी. नगर पालिकेने नाल्यांची वेळोवेळी सफाई करुन वाडी-वाडीतील कचरा वेळीच उचल करावा. अनेक भागात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, असे ते म्हणाले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम लवकरच सुरु करण्यात येईल. ज्यांचे अतिक्रमण तोडले जाणार आहे त्या अतिक्रमण धारकाकडून खर्चाचा पैसा वसूल करावा, असे सांगितले.

     नगराध्यक्ष इंगळे म्हणाले, शहरात ज्या-ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे त्यांना ते अतिक्रमण काढण्याबाबतच्या नोटीस दिल्या आहेत. त्यांनी स्वत:हून केलेले अतिक्रमण काढावे अन्यथा अतिक्रमण मोहिमे दरम्यान ही अतिक्रमणे काढण्यात येतील. नगर पालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शहरातील दुषीत पाणी पुरवठ्याबाबत जीवन प्राधिकरण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेशी बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday 14 May 2017

पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करांडली येथे भूमीपूजन

      करांडली येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत धनराज जांभूळकर ते केशव नंदेश्वर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे व आदिवासी उपयोजने अंतर्गत पाणी टाकी ते योगेश कुळमेथे यांच्या घरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमीपूजन करण्यात आले. जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, तहसिलदार बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच सरस्वता शेंडे, उपसरपंच योगेश कुळमेथे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला करांडला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

दिनकरनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार - पालकमंत्री बडोले


      दिनकरनगर हे संपूर्ण गाव बंगाली बांधवांची वस्ती असलेले आहे. या ग्रामस्थांच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत. त्यांच्या समस्यांची सोडवणूक आपण प्राधान्याने करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर या बंगाली बांधवांच्या गावाला पालकमंत्री बडोले यांनी 13 मे रोजी भेट दिली व ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेवून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, यावेळी ते बोलत होते.
       जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगणकर, तहसिलदार श्री.बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच खोकन सरकार, उपसरपंच सचिन घरामी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, बंगाली शाळांमध्ये बंगाली शिक्षक असावे ही आपली जुनी मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. बंगाली शिक्षक भरतीबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त पूणे यांचेकडे पाठविण्यात आला आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या सोसायटीला धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी गोडावून बांधून देण्यात येईल.
      दिनकरनगर ग्रामपंचायत येणाऱ्या गावात लवकरच पथदिवे लावून देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात येतील. पुष्पनगर मार्गावरील नदीवर पूल बांधण्यासोबतच ग्रामपंचायतसाठी नविन सभागृह तयार करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री.बडोले म्हणाले.
      सरपंच श्री.सरकार यांनी यावेळी दिनकरनगर व अंतर्गत येणाऱ्या गावाच्या समस्यांची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

    दिनकरनगर येथे 2515 या मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या अंतर्गत सिमेंट नाली बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, तहसिलदार बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच खोकन सरकार यांची यावेळी उपस्थिती होती.

गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवा - पालकमंत्री राजकुमार बडोले

                             गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार



     गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना आहे. लोकसहभागातून गाळ काढणे हे योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी तलावातील जास्तीत जास्त गाळ आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 14 मे रोजी गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोला तलाव येथे केला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
       कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, पं.स.सदस्य केवल बघेले, अल्का काटेवार, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे, शाखा अभियंता श्री.रहांगडाले, उपअभियंता श्री.चौधरी, मुंडीपार सरपंच सिंधू मोटघरे, मुरदोली सरपंच ससेंद्र भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री यावेळी म्हणाले, गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक माजी मालगुजारी तलाव हे गाळाने भरले आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यास मदत होणार आहे. हा गाळ शेतीत टाकण्यात येणार असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. गाळ काढण्यात येणार असल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. हा पाणीसाठा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील तलाव, धरणातील गाळ काढण्याचे नियोजन यंत्रणांनी करावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची गरच लक्षात घेवून ही योजना सुरु केली आहे. हा गाळ नसून खत आहे. ‍जिल्ह्यातील जास्तीत जास्त गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसहभागातून जास्तीत जास्त तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. सुपीक गाळाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी. गाळ शेतात टाकणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेत प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.ठाकरे म्हणाले, या योजनेअंतर्गत शेतकरी पुढाकार घेवून तलावातील गाळ काढणार आहे. गाळ काढून शेतीत टाकल्यास शेतीची उत्पादन क्षमता तर वाढेलच पण तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील. लोकांच्या सहभागाशिवाय योजना यशस्वी होत नाही. गाळ काढण्याच्या कामात लोकांनी सहभाग देवून चांगली सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.

      सलंगटोला तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकणारे शेतकरी लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, शशी भगत, दामोदर शहारे, ठेकचंद ठाकुर यांना पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले. गराडा, मुंडीपार व सोदलागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात या तलावातील गाळ टाकण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मुंडीपार, गराडा, सोदलागोंदी येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी मानले.

Friday 12 May 2017

जबलपूर नजिकच्या अपघातातील मृतकांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण व सांत्वन

मृतकाच्या वारसाला प्रत्येकी 1 लक्ष मदत
                                                 ● जखमींना 25 हजाराची मदत

मध्यप्रदेश कृषी मंत्र्यांकडून मदतीचा हात

      मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी/कोहळी व सिंदीपार येथील 11 मजुरांचा जबलपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जमुनिया जवळील नाल्यावर त्यांना घेवून जाणाऱ्या वाहनाला अपघात होवून  10 मे च्या पहाटे मृत्यू झाला.
      पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज 12 मे रोजी सर्व मृतकांच्या परिवाराला भेट देवून त्यांचे सांत्वन केले व मृतकांच्या वारसांना ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रत्येकी 1 लक्ष रुपये व जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपये धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या वतीने देखील मृतकांच्या परिवाला प्रत्येकी 1 लक्ष रुपये व जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपये धनादेश वाटप करण्यात आले.
       यावेळी बालाघाटच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रेखाताई गौरीशंकर बिसेन, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, तालुका भाजपा अध्यक्ष विजय बिसेन, डॉ.भुमेश्वर पटले, गोंदिया न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक भरत क्षत्रीय, श्री.ठाकुर, पळसगावच्या सरपंच मंजूळाबाई पराते, बोथलीच्या सरपंच गीता चव्हाण, घाटबोरीच्या सरपंच सुकेशिनी नागदेवे, सिंदीपारच्या सरपंच जसवंत टेकाम, पळसगावचे उपसरपंच मुकेश सिंघल, तहसिलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार केशव वाभळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबाचा आधार गेला आहे. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असून या कुटुंबाना यापुढेही आमचे सहकार्याचीच भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती बिसेन म्हणाल्या, सडक/अर्जुनी तालुक्यातील मृतक मजूर रोजगारासाठी मध्यप्रदेशात आले होते. परंतू काळाने त्यांच्यावर घाला घातला. आमच्या राज्यात ही घटना झाल्यामुळे आम्ही मदत करणे हे आमचे कर्तव्य समजतो. सर्व कुटुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती इश्वर देवो असे त्या म्हणाल्या.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, काळ हा सांगून येत नाही. ज्या कुटुंबावर हा आघात झाला त्या कुटुंबांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या कुटुंबाबद्दल शासनाची सहानुभूती असून निश्चितच या कुटुंबाच्या पाठीशी प्रशासन उभे राहील. जे व्यक्ती अपघातात जखमी होवून जबलपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना देखील मदत करण्यात येईल. त्यांच्यावर चांगल्याप्रकारे उपचार झाले पाहिजे यासाठी तेथील आरोग्य प्रशासनाशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी मृतकाच्या वारसदार ललिता भोयर, पंचफुला शेंडे, माधुरी मरस्कोल्हे, इंदिरा दखणे, मिराबाई कांबळे, भाऊराव राऊत, पुष्पा राऊत, गीता चौधरी, जायत्रा श्रोते, सरीता भोयर, अरुणा चौधरी यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचा धनादेश तसेच जखमी रविंद्र दखणे, चुन्नीलाल शेंडे, त्रिमुर्ती बन्सोड, निलेश्वर सोनवणे, भाऊराव राऊत यांना प्रत्येकी 25 हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday 7 May 2017

व्यसनमुक्त समाज व मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणातून गाव आदर्श करा - अभिमन्यू काळे

                          कनेरी/राम येथे सभा
     गावात सुविधांची उपलब्धता असणे म्हणजे गाव आदर्श होत नाही तर गावातील प्रत्येक व्यक्ती ही सर्वच प्रकारच्या व्यसनापासून दूर असली पाहिजे. त्यामुळे आदर्श जीवन पध्दती जगता येईल. आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत व चांगला नागरिक घडविला पाहिजे. व्यसनमुक्त समाज व मुलांना दर्जेदार शिक्षण देवून गाव आदर्श निर्माण करा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      सडक/अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या कनेरी/राम येथील ग्रामपंचायतमध्ये 6 मे रोजी विकास कामांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी काळे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सरपंच श्रीमती इंदू मेंढे, उपसरपंच प्रेमराज मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, गावाच्या शाळेतील जास्तीत जास्त मुले स्कॉलरशीप प्राप्त व नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र असली पाहिजे. गावाच्या जवळ असलेल्या माजी मालगुजारी तलावातील सुपीक गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी व आवश्यक तो मुरुम मिश्रीत गाळ रस्त्याच्या कडेला टाकावा. गावातील नाल्यातून सांडपाणी वाहणार नाही याची प्रत्येक कुटुंबाने दक्षता घेवून प्रत्येक घरी शोषखड्डे तयार करावे. त्यामुळे हे पाणी भूगर्भात साचून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होईल. भविष्यात त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही.
      गावाच्या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्यात यावे असे सांगून श्री.काळे म्हणाले की, त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्त्रोत बळकट होण्यास मदत होईल. कनेरीचे जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळतील यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. गावातील प्रत्येक कुटुंब कॅशलेस व्यवहार करतील यासाठी त्यांच्या मोबाईलवर भीम ॲप्स लोड करुन घ्यावे. गावात करण्यात येणाऱ्या सर्वच कामांचा दर्जा हा उत्तम राहील याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाचे उपकेंद्र तयार करण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाकडे सादर करावा. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अपूर्ण व मंजूर असलेली कामे वेगाने वेळीच पूर्ण करावी. असेही श्री.काळे यांनी सांगितले.
     पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, कनेरीत दारुबंदी असली तरी गावात बाहेरगावातून कोणीही दारु पिऊन येणार नाही याची काळजी घ्यावी. गावात दारु पिऊन येणाऱ्यांवर दंड बसविण्याचा निर्णय ग्रामसभेने घ्यावा. असेही त्यांनी सांगितले.
     कनेरी/राम येथे कृषी विभागाने सिमेट बंधारा, भातखाचर, शेततळी, न्यापॅड, गांडूळ खत प्रकल्प युनीट, वनविभागाने साठवण बंधारा, वाचनालय इमारत, रस्त्याचे खडीकरण व सिमेंट रस्ता वैयक्तीक शौचालयाची कामे, पथदिवे, तलाव खोलीकरणाची कामे, शेतकऱ्यांच्या पंपासाठी ट्रान्सफार्मर, गॅस सिलेंडरचे वाटप, आरोग्य शिबीर, समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रमाणपत्राचे, गाई-म्हशी, शेळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देवून मंजूर व प्रस्तावित असलेल्या कामाची माहिती सहायक गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांनी दिली. जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील व प्रेमदास धांडे यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या शोषखड्डयाचे तसेच वन विभागाने लावलेल्या मिश्र रोपवनाची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.

      सभेला विविध यंत्रणाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपसरपंच प्रेमराज मेंढे यांनी मानले.

वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

      वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची 6 मे रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करुन चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, सहायक वन संरक्षक श्री.बिसेन, श्री.शेंडे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित होते.
      बिघडलेले पर्यावरण संतुलन आणि जागतिक तापमान वाढीमुळे वृक्ष लागवड करणे ही आज काळाची गरज झाली आहे. येत्या तीन वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीत लोकसहागभाग मिळावा आणि मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप यावे यासाठी वन विभागाने चित्ररथ तयार केला असून 1 मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

     वन विभागाचा हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. हा चित्ररथ राज्यभर भ्रमण करणार असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे व ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथाच्या मागच्या भागात मोठी डिजीटल स्क्रीन असून 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. 1 मे ते 30 जून पर्यंत हा चित्ररथ चांदा ते बांधा असा महाराष्ट्रभर प्रवास करुन सर्वच जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.