जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 7 May 2017

गोंदियातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तयार व्हावे - पालकमंत्री राजकुमार बडोले

                         जलतरण तलावाचे लोकार्पण


        गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. या जलतरण तलावाचा फायदा जिल्ह्यातील युवक-युवतींना होणार आहे. भविष्यात गोंदियातील या तलावातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू तयार व्हावे. अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
       6 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, नगर पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, भाजपा शहराध्यक्ष सुनिल केलनका, न.प.बांधकाम समिती सभापती घनश्याम पानतावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, नगरसेवक भरत क्षत्रीय, क्रांती जयसवाल, राकेश ठाकुर, अपूर्व अग्रवाल यांची उपस्थिती होती.
      राज्य शासनाने या क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी भरभरुन मदत केल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री तावडे व आमदार गोपालदास अग्रवाल यांनी एवढा मोठा जलतरण तलाव तयार करण्यास हातभार लावल्याबद्दल आभार मानले व ते पुढे म्हणाले, ज्यांना जलक्रीडा क्षेत्रात प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हा तलाव उपयुक्त आहे. जिल्हा क्रीडा संकुलातून भविष्यात अनेक प्रतिभावंत खेळाडू निर्माण होवून जिल्ह्याचा नावलौकीक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवर्ती राजाभोज यांचे नाव देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.
      आमदार अग्रवाल म्हणाले, हा जलतरण तलाव राज्यात आगळावेगळा आहे. ऑलिंपीक दर्जाचा हा तलाव असून मुंबई, नवी मुंबई व पुण्यानंतर गोंदियात अशा प्रकारचा तलाव तयार करण्यात आला आहे. इथले जिल्हा क्रीडा संकुल वेगळ्या प्रकारे व वैशिष्ट्यपूर्ण असे तयार करण्यात येत आहे. एकीकडे राज्यातील जिल्हा क्रीडा संकुले हे 8 कोटी रुपयातून तयार करीत असतांना गोंदियाचे क्रीडा संकुलाला सुरुवातीलाच 14 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे.
      गोंदिया येथील उच्च दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री बडोले यांनी देखील अतिरिक्त निधी देण्यास सहकार्य केल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, पहिला 4 कोटीचा निधी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना प्राप्त झाला आहे. संकुलाच्या निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवर्ती राजाभोज यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी करुन तसा प्रस्ताव जिल्हा क्रीडा संकुल समितीने मान्य केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील मुलांना जलक्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची संधी या तलावामुळे मिळाल्याचे ते म्हणाले.

      राष्ट्रीय जलतरणपटू हिमानी फडके, रिध्दी जनबंधू यांच्यासह अन्य जलतरणपटूंनी मान्यवरांसमोर फास्टेट स्ट्रोक, बटरफ्लाय, बेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आदी जलक्रीडा प्रकार सादर केले. प्रास्ताविक क्रीडा उपसंचालक श्री.रेवतकर यांनी केले. संचालन क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी मानले. कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment