जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 24 August 2016

वृक्षलागवड करुन त्याचे संगोपन करणे महत्वाचे - पालकमंत्री बडोले





         










वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. यातून जिल्ह्यातील नागरिकांनी पर्यावरण संतुलनासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड करुन त्याचे संगोपन करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 24 ऑगस्ट रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात आयोजित वाटचाल 50 कोटी वृक्ष लागवडीकडे कार्यक्रमात उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील व तुषार चव्हाण, अर्जुनी/मोर नगराध्यक्ष श्रीमती पोर्णिमा शहारे, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
       पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘झाडे लावा झाडे जगवा’ याचा बोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम येथेच न थांबवता आणखी यापुढे मोठ्या संख्येने झाडे लावावी व त्याचे संगोपन करावे असे सांगितले. झाडाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची काळजी घेवून झाडे जगली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
       जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, 2 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम फक्त शासनाचा उपक्रम नसून यामध्ये सर्व जनतेचा सहभाग होता. वृक्षलागवडीला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला. पुढच्या वर्षी देखील असेच वृक्षलागवड करुन अभियान यशस्वी करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       डॉ.भुजबळ म्हणाले, वृक्ष लागवड अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले. या मोहिमेत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वृक्षलागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मनापासून सहभाग घेतला. एक रोल मॉडेल मोहीम कशी असावी हे या वृक्षलागवड मोहिमेतून सर्वांना दाखवून दिले आहे. या मोहिमेतून संपन्न आणि सुरक्षित महाराष्ट्र निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.
        याप्रसंगी 2 हेक्टर जागेवर रोपवन करुन पालकत्व स्विकारल्याबद्दल शिवप्रसाद सदानंद जायसवाल महाविद्यालय अर्जुनी/मोर, सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/मोर व मानवता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बोंडगावदेवी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. वृक्षलागवडीचे औचित्य साधून तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. ग्रामपंचायत व संयुक्त व्यवस्थापन समितीने वृक्षलागवडीबाबत चांगले कार्य केल्याबद्दल आर.एन.झोळे, ए.आर.ठवरे, मंसाराम चचाणे, अशोक कापगते व संतोष मेश्राम यांचा तसेच सामाजिक संस्था समता सैनिक दल, तिबेटियन, पतंजली योगपीठ, कलभी यांचा, त्याचप्रमाणे वृक्षलागवडीबाबत वृत्तपत्रात व्यापक प्रसिध्दी दिल्याबद्दल अर्जुनी/मोर तालुका प्रतिनिधी लोकमतचे संतोष  बुकावन व अमरचंद ठवरे, तरुणभारत-सुरेंद्रकुमार ठवरे, हितवाद- ओमप्रकाशसिंह पवार, भास्कर-अश्विनसिंह गौतम, लोकमत समाचार-रामदास बोरकर, रक्षा टाईम्सचे कुलदीपसिंह राठोड यांचा, तसेच ठाणेदार एन.व्ही.बंडगर, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी एन.आर.जमईवार, शिक्षण विभागाचे आर.एम.चांडक, एस.जे.मेश्राम, जे.डी.पठाण, आय.एच.कासेवार, आर.एम.धकाते आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले, वनपाल बी.डी.दखने, वनरक्षक पी.के.लाडे, एम.एस.प्रधान, सिमा सूर्यवंशी व होमगार्ड आसाराम नागोसे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वृक्ष रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक व्ही.जी.उदापुरे व यु.टी.बिसेन, अर्जुनी/मोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, वनरक्षक, वनपाल, अर्जुनी/मोर तालुका परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.काकडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.रहांगडाले यांनी मानले.

Wednesday 17 August 2016

गरजु लाभार्थ्यांच्या निवडीसोबतच विकास कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्र्यांचे निर्देश, जिल्हा नियोजन समितीची सभा


गोंदिया,दि.17 : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकास कामे करण्यात येतात. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देतांना योग्य व गरजु लाभार्थ्यांची निवड करुन विकास कामे दर्जेदार करतांना ती निर्धारित वेळेत पूर्ण करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
                जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 16 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                पालकमंत्री पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी. ज्या आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती नादुरुस्त आहे त्या तातडीने दुरुस्त कराव्यात. जेथे उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे तेथील जमीन अधिग्रहीत करुन इमारतीचे बांधकामे तातडीने पूर्ण करावे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्याची अवस्था वाईट असून हे चित्र बदलण्यासाठी मंत्रालयात या विभागाचे मंत्री व जिल्ह्यातील आमदार यांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातील पाण्याचा वापर शेती व मत्स्योत्पादनासाठी व्हावा यासाठी या तलावांच्या दुरुस्तीची कामे पाटबंधारे विभागाने नियोजनातून करावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यासोबतच मासेमारी संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. जिल्ह्यात दुधाचे संकलन वाढण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्या इमारतींचे सर्वेक्षण करुन नव्याने इमारती बांधण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील बंगाली शाळेतील शिक्षकांचे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील. जिल्ह्यात काही भागात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
                आमदार संजय पुराम यांनी देवरी व सालेकसा तालुक्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी यावेळी केली. गोंदिया शहरात माकडांचा, मोकाट जनावरांचा व डुकरांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिकेने त्वरित यावर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली.
                आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्ह्यातील शेतीचे माकडांमुळे व रानडुकरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वनविभागाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
                प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सन 2015-16 या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना यावर 221 कोटी 8 लक्ष रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील 11 पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 48 कोटी 44 लक्ष रुपयांचा पर्यटन विकास कामांचा प्राधान्य आराखडा प्रस्ताव मंजूरी व निधी उपलब्धतेसाठी सादर केल्याचे त्यांनी सांगितले. सन 2016-17 या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 232 कोटी 33 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. सन 2016-17 च्या जिल्हा पर्यटन विकासासाठी 3 कोटी 30 लक्ष रुपये निधी मंजूर असून या निधीचा उपयोग जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दिली.
                सन 2016-17 मधून शासनाने 86.57 कोटीच्या आर्थिक मर्यादेत सर्वसाधारण योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने या योजनेच्या नियतव्ययात वाढ करुन ती 118 कोटी 38 लक्ष इतकी करण्यात आली. सन 2016-17 मध्ये सर्वसाधारण योजनेत 118 कोटी 38 लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 38 कोटी 65 लक्ष व आदिवासी उपयोजनेकरीता 75 कोटी 30 लक्ष, असा एकूण 232 कोटी 33 लक्ष नियतव्यय मंजूर आहे.
                सभेला समितीचे सदस्य श्रीमती शिला इटनकर, ओमप्रकाश येरपुडे, आशा पाटील, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावर, वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचेसह विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी मानले.
00000

Tuesday 16 August 2016

पालकमंत्र्यांची हाजराफॉल पर्यटनस्थळाला भेट



गोंदिया,दि.16 : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि ग्रीन व्हॅली म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील दुर्गम व नक्षल भागातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या हाजराफॉलला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 15 ऑगस्ट रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय पुराम, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
            पालकमंत्र्यांनी यावेळी मोठ्या संख्येने असलेली पर्यटकांची गर्दी पाहून आनंद व्यक्त केला. तसेच येथे साहसी खेळाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी असलेल्या बर्मा ब्रीज, कमांडो नेट, व्ही शेप ब्रीज, मल्टीवाईन ब्रीज, हाय रोप कोर्स एक्टीव्हिटीज झीप लाईन, झार्मींग बॉल, रोप-वे आदी सुविधांची पाहणी केली.
            यावेळी त्यांनी काही आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला. नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी तसेच यामधून ज्यांना रोजगार मिळाला आहे त्या युवक-युवतींशी चर्चा देखील केली.
            मागील वर्षी पालकमंत्री बडोले यांनी भेट दिली असता पर्यटकांची गर्दी कमी होती. तसेच साहसी खेळाच्या सुविधासुध्दा तेथे उपलब्ध नव्हत्या. आज हाजराफॉल येथे साहसी खेळाच्या निमित्ताने असलेल्या सुविधा व तेथील परिसराचा झालेला विकास बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
00000

शेतकऱ्यांनो, शेतीला समृध्द करा - पालकमंत्री बडोले




गोंदिया,दि.16 : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्तमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली असून संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारीक शेती करण्यापेक्षा नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला समृध्द करावे असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            15 ऑगस्ट रोजी गंगाझरी येथे जलयुक्त शिवार अभियानातून बांधण्यात आलेला सिमेंट नाला बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, माजी आमदार हरीश मोरे, जि.प.सदस्य रमेश अंबुले, पं.स.सदस्य प्रकाश पटले, गंगाझरीच्या सरपंच ममता लिल्हारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भांडारकर, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री पुढे म्हणाले, पूर्वी आपण पारंपारीक पध्दतीने कडधान्य घेत होतो. पण आज विदेशातून कडधान्याची आयात करण्याची वेळ आली आहे. उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य वापर व त्याची देखभाल ग्रामस्थांनी करावी. पाणी हे जीवन आहे. पाणीसाठा कमी झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाची शेती करावी. यासाठी नवनविन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जिल्ह्यात तलाव, जंगल असतांना देखील आता आपण आपल्या मागासलेपणाची ओळख पुसली पाहिजे. अधिकारी व शेतकऱ्यांमधील दुरावा दूर झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी व ऐतिहासीक कार्यक्रम आहे. जलयुक्तच्या कामामुळे 94 पैकी 80 गावात जास्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. 25 हजार एकर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. यावर्षीपासून शेतकऱ्यांनी आता उडीद मुगाचे पिक घ्यावे. उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्याचा उपयोग रब्बी पिकासाठी करण्यात यावा. यामधून त्यांनी उडीद मुग पिकाची लागवड करावी. पाणीटंचाईपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी जि.प.सदस्य रमेश अंबुले, पं.स.सदस्य प्रकाश पटले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी सांगितले की, गंगाझरीत जलयुक्तमधून 40 कामे करण्यात आली आहे. या सिमेंट नाला बंधाऱ्यावर 9 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. 10 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. यामधून 18 हेक्टर शेतीच्या सिंचनाला पाण्याची उपलब्धता झाली आहे. गंगाझरी येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामातून 298 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे सडक/अर्जुनीच्या भागात धानपिकावर लष्करी अळीचा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून यासाठी औषधाचीही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            जलयुक्त शिवार अभियानात चांगले सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार देवराम भवरीया, सरपंच ममता लिल्हारे, कृषी सहायक आर.एस.तिबुडे, उपविभागीय कृषी अधिकारी एन.बी.नायनवाड, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.वाहणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गंगाझरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.वाहणे यांनी मानले.

                                                00000

बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार - पालकमंत्री बडोले





गोंदिया,दि.16 : गुन्हेगार आता नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी करीत आहे. समाज माध्यमातून गुन्हेगारी वाढायला लागली आहे. समाज माध्यमात टाकण्यात येणाऱ्या पोस्टमुळे धार्मिक, जातीय तणाव निर्माण होत आहे. बँकींग एटीएमद्वारे ग्राहकांची लुबाडणूक होत आहे. त्यामुळे आता या बदलत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            15 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पहिल्या माळ्यावरील अत्याधुनिक सायबर लॅबच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बडोले बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री पुढे म्हणाले, सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील 44 ठिकाणी सायबर लॅबचे उदघाटन होत आहे. निश्चितच अशाप्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही लॅब जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
            पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. ते म्हणाले, ही लॅब तांत्रिक बाबीची तपासणी करण्यासाठी परिपूर्ण आहे. अत्याधुनिक अशा या सायबर लॅबकरीता सी-डॅक यांचेकडून आधुनिक सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. या लॅबमध्ये मोबाईल चेक, नेसा, सायबर चेक, एडविक व विनलिफ्ट असून यामध्ये मोबाईल फोन इमेजींग, हार्ड डिस्क इमेजींग तसेच सोशन मिडियावर निरिक्षक करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            लोक जागृती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या मदतीसाठी प्रतिसाद ॲप्स, वाहन चोरी डॉट कॉम, पोलीस मित्र, निर्भया पथक, बिट मार्शल याबाबतची माहिती डॉ.भुजबळ यांनी यावेळी दिली.
            पालकमंत्री बडोले यांनी गृह विभागाने काळाची पाऊले ओळखून राज्यात एकाचवेळी सुरु केलेल्या सायबर लॅबच्या उदघाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते नागरिकांसाठी असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थितांना समाज माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पोलीस विभाग गोंदियाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 17 व्हिडिओ क्लीप दाखविण्यात आल्या. या कार्यक्रमाला पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती.

00000

Monday 15 August 2016

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी - पालकमंत्री बडोले

जिल्ह्यातील विविध घटकातील गरजु लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजनातून योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आपला भर राहणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम कारंजा पोलीस कवायत मैदान येथे झाला. यावेळी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, नवेगाव नागझिरा वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्यातील 125 दलित वस्त्यांचा दोन वर्षात सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वीत करण्यात येतील. सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅबचा निश्चितच उपयोग होईल. ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरीत करण्यात येईल असे ते म्हणाले.
            जिल्ह्यात चालू हंगामात नैसर्गीक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हणून देण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, याचा लाभ जिल्ह्यातील 46 हजार 481 धान उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून त्यांना 30 कोटी 13 लक्ष रुपये बोनस म्हणून देण्यात आला आहे. आगामी महासमाधान शिबिरात 40 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
            गोंदिया येथे यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याची माहिती देवून श्री.बडोले पुढे म्हणाले, 3 हजार 641 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मागील वर्षी दिली असून यावर्षात जुलै अखैर 650 शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे. त्यामुळे त्यांना आता दुबार व तिबार पिके घेता येणार आहे. जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महत्वाची ठरली असून यावर्षात जुलै अखेर 1 लाख 6 हजार 322 कुटुंबांना रोजगार देण्यात आला आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
            जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 15 हजार 412 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. वनालगतच्या गावातील 11 हजार 501 कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. कायापालट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्था सुसज्ज होत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक येण्यासोबतच स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण कसा होईल या दृष्टीने आपले नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                                                                                             यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड पथक, स्काऊट- गाईड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक यांनी संचलन केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सत्कार केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी विकास ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, श्री.बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.
                                उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
            यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये  सन 2014-15 या वर्षात महसूल विभागात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगीरी केलेल्या तुमसर येथील तत्कालीन नायब तहसिलदार तथा विद्यमान गोंदिया तहसिलदार अरविंद हिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून संजय धार्मिक, तिरोडा तालुक्यातील बेलाटी येथील पोलीस पाटील श्री.रिनाईत, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन 2015-16 मध्ये हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आमगाव तालुक्यातील गोसाईटोला येथील सरपंच प्रभाबाई शिवबंशी, सचिव डी.के.महाकाळकर, सालेकसा तालुक्यातील रोंधा ग्रामपंचायत सरपंच मिलावतीबाई लिल्हारे, सचिव एन.जी.राठोड, बिंझलीच्या सरपंच सुलोचना लिल्हारे, सचिव जी.सी.भुमके, अर्जुनी/मोर. तालुक्यातील तुकमनारायण, ग्रामपंचायतचे सरपंच दयाराम शहारे, सचिव एस.एस.मेंढे, सोमलपुरचे सरपंच आशा हातझाडे, सचिव वाय.सी.डोंगरे, तिरोडा तालुक्यातील सालेबर्डीचे सरपंच विनोद लिल्हारे, सचिव गणेश कापगते, मनोरा ग्रामपंचायतच्या सरपंच लताबाई पेशने, सचिव एस.डी.उईके यांचा तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हास्तरीय युवा पुरस्कार ब्रम्हानंद सांस्कृतिक अकादमी गोंदिया, कपील बिसेन, सीमा रहांगडाले यांना गौरविण्यात आले.
            माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील हर्षा भेदे, गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील स्वरांगी नेवाने यांना प्रशस्तीपत्र, आरोग्य विभागात सन 2015-16 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यामध्ये सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे यांनी सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीच्या आरोग्य सेविका कुसूम लांजेवार, कुंदा गजभिये, आशा कार्यकर्ती म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या रेखा पटले. गोंदिया भारत स्काऊट आणि गाईडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णा           बाण चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुरुकृपा आदिवासी आश्रम शाळा ठाणा येथील कब मुले शिवांक उईक, अविनाश मडावी, हिरालाल वरखडे, गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या बुलबुल मुली अश्वीनी नंदागवळी, सांची रंगारी, राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जीईएस हायस्कूल दासगावचे भगीरथ जिवानी, गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मंजुषा देशपांडे, सामाजिक वनीकरण विभागामार्फत राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत निवड केलेल्या 2 कोटी वृक्ष लागवड आणि त्याचे होणारे चांगले परिणाम या विषयावरील निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या प्राथमिक गटातील जानवी वैद्य- प्रथम, करिश्मा कारडा- द्वितीय, हर्षल डोंगरे- तृतीय. माध्यमिक गटातील गीतांजली पोहरे- प्रथम, हेमाश्री तुरकर- द्वितीय, कुशल बिसेन- तृतीय यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच चोरट्याला पकडून देणाऱ्या महिला पोलीस गुनेश्वरी भांडारकर सोनवाने यांना रोख 5 हजार रुपये बक्षीस देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

Thursday 11 August 2016

प्रेरणा दिनी अर्जुनीत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


      देशाची भावी पिढी म्हणजे आजचे विद्यार्थी. देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी हे सुसंस्कारीत झाले पाहिजे. त्यांची जडण-घडण शालेय वयात व्हावी यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महिन्याचा दुसरा गुरुवार हा शाळेत प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
            या प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज 11 ऑगस्ट रोजी गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील कुंवर तिलकसिंह जि.प.पूर्व माध्यमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आगमन होताच पटांगणातील झाडाखाली प्रार्थनेला एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रार्थनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून चांगले निटनेटके, स्वच्छ गणवेश घालून शाळेत नियमित यावे असे सांगितले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विपश्यनेतील आनापान करण्यास शिकवावे तसेच शिक्षकांनी सुध्दा विपश्यनेचे प्रशिक्षण घेवून आनापान करावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.
            जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीला भेट दिली. अंगणवाडी सेविकेकडून विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांच्या काय शिकविण्यात येते तसेच कोणता आहार कशाप्रकारे देण्यात येतो याची माहिती घेतली. शाळेच्या स्वयंपाकगृहाची पाहणी केली. मुले-मुली वापर करीत असलेल्या स्वच्छतागृहाची सुध्दा पाहणी करुन नियमीत स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याबाबत सूचनाही मुख्याध्यापकांना केली.
            पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी वर्गात भेट घेऊन त्यांना खाऊ म्हणून ‍बिस्कीट दिले. तसेच गुलाब पुष्प देवून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी इयत्ता सातव्या वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. भविष्यात विद्यार्थ्यांना मोठे होवून काय बनायचे आहे याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. उपस्थित विद्यार्थ्यांना गोष्ट सांगून त्या गोष्टीवर आधारीत प्रश्नही विचारले. वेळ एकदा निघून गेली की पुन्हा परत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. यावरुन त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व विशद केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट म्हणून दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर रहांगडाले, केंद्र प्रमुख ठाकरे, मुख्याध्यापक श्री.रहांगडाले, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक श्री.बिसेन यांचेसह शाळेतील शिक्षक, पालकही उपस्थित होते.
                                                          

Wednesday 10 August 2016

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करा - पालकमंत्री बडोले


   








                                                                                                                     

         आगामी महासमाधान शिबिरात 40 हजार लाभार्थ्यांना आपला लाभ देण्याचा संकल्प असून त्यापेक्षाही जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी यंत्रणांनी योग्य नियोजन करुन काम करावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       गोरेगाव तहसिल कार्यालयात 9 ऑगस्ट रोजी महासमाधान शिबिराची तयारी करण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांशी चर्चा करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, लक्ष्मण भगत, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री.कावळे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री.भांडारकर, तालुका आरोग्य अधिकारी श्री.कापगते, बाल विकास प्रकल्पाच्या श्रीमती श्रीवास्तव यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महासमाधान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गावपातळीवर अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना आजही मिळालेला नाही. या लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणांनी पोहचून त्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने काम करावे. योजनांच्या लाभामुळे खऱ्या गरजु लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तालुका पातळीवर योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार येण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याचा वेळ, पैसा आणि श्रम या शिबिराच्या लाभातून वाचण्यास मदत होईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
       नैसर्गीक आपत्तीत नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी विशेष आपत्ती व्यवस्थापनातून मदत करणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्याबाबत संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. सुकन्या समृध्दी योजना, मुलींना सायकल वाटप यासह विविध योजना लाभार्थ्यांना कशा मिळतील यासाठी यंत्रणांनी सामाजिक बांधीलकीतून काम करावे असे आवाहनही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी केले.
       तहसिलदार डहाट यांनी महसूल विभागामार्फत महासमाधान शिबिरात नविन शिधापत्रिका, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, आम आदमी विमा योजना, जमीन शाखा वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे, आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिक कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीयर व उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
       कृषी विभागामार्फत जमीन सुपिक प्रमाणपत्र, भूमि अभिलेखकडून क प्रत, महावितरण कडून शेतकऱ्यांना कृषी पंपाकरीता सिंगल फेस विद्युत कनेक्शन, कृषी पंप वीज कनेक्शन, वन विभागाकडून गॅस कनेक्शन, तेंदूपत्ता बोनस वाटप, वन्यप्राण्यांमुळे बाधित लोकांना लाभ देणे, बँकांकडून मुद्रा बँक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देणे, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळांच्या लाभार्थ्यांना लाभ देणे, मुलींना सायकल वाटप यासह विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे उपस्थित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
अर्जुनी/मोरगाव येथे आढावा
     पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी/मोरगाव तहसिल कार्यालय येथे 9 ऑगस्ट रोजी महासमाधान शिबिराची पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, नायब तहसिलदार श्री.कोकवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राऊत यांचेसह तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

       पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, इंधनाच्या बाबतीत जंगलावरील असलेले अवलंबत्व कमी करण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत व वन विभागामार्फत गॅस कनेक्शनचा लाभ दयावा. तालुक्यातील सहा गावांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन करावे. तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना स्वावलंबी करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. वनहक्क जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात लवकर कसे देता येईल यादृष्टीने त्रुटीची पूर्तता करुन लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.

Monday 8 August 2016

जिल्हा नील क्रांतीच्या दिशेने जिल्ह्यात 14 कोटी 25 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन




                                                                                        

          
     तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात पूर्वजांनी सिंचनासाठी माजी मालगुजारी तलाव बांधले. हे तलाव आजही सिंचनासोबत मत्स्य शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. जिल्ह्यातील ढिवर व आदिवासी बांधव मत्स्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून या तलावात मत्स्यशेती करीत आहे. जिल्ह्यातील तलावातील गोड्या पाण्यातून कटला, रोहू, मृग आणि सायप्रिनस या जातींच्या माशांचे उत्पादन घेण्यात येत आहे. जिल्ह्यात इटियाडोह प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रातील चायनीज हॅचरीतून या हंगामात 1 कोटी 94 लक्ष तर जिल्ह्यातील जवळपास 11 मत्स्य सहकारी संस्थांच्या तलावातून 12 कोटी 31 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांसोबतच खाजगीरित्या मत्स्य शेती करणाऱ्यांना इटियाडोह मत्स्यबीज केंद्र व मत्स्य सहकारी संस्थांकडून मत्स्यजीऱ्यांची विक्री करण्यात येत आहे. मत्स्यजीरे, मत्स्यबीज उत्पादन, बोटुकली ते मत्स्योत्पादनातून जिल्ह्याची निलक्रांतीकडे वाटचाल सुरु आहे.
          जिल्ह्यात 133 मत्स्य सहकारी संस्थांची नोंदणी असून त्यापैकी 124 संस्था कार्यरत आहे. या संस्थांचे जवळपास 11 हजार सक्रीय सभासद मासेमारीचा व्यवसाय करीत आहे. ही मासेमारी पाटबंधारे विभागाच्या 65 आणि जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या 1087 तलावातून करण्यात येत असून यासाठी 11 हजार हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध आहे.
          अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव जवळील इटियाडोह मत्स्यबीज केंद्राची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली व हे केंद्र 1978-79 मध्ये कार्यान्वीत झाले. या केंद्राचे एकूण क्षेत्र 12.95 हेक्टर इतके असून याचे जलक्षेत्र 4.82 हेक्टर आहे. यामध्ये संगोपन तळी 33, संवर्धन तळी 10 आणि संचयन तळी 4 अशी एकूण 47 तळी आहेत. येथील चायनीज हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात येते. या केंद्रातील शुध्द मत्स्यजीरे, मत्स्यबीजांची व बोटुकलींची विविध मत्स्य सहकारी संस्थांना विक्री करण्यात येते. 1 लाख मत्स्यजीऱ्याला 1500 रुपये शासन दराने विक्री करण्यात येते. इटियाडोह मत्स्यबीज केंद्रातून यावर्षी 1 कोटी 10 लक्ष मत्स्यजीऱ्यांची विक्री करुन या केंद्राला 1 लक्ष 72 हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
          जिल्ह्यात जवळपास 11 मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था हया तीनही बांध पध्दतीतून मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. यंदाच्या हंगामात या संस्थांनी शुष्क, ओलीत व मोगरा पध्दतीच्या बांधातून 12 कोटी 31 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतले. मोगरा बांध पध्दतीतून कोसमतोंडी (सडक/अर्जुनी), भानपूर (गोंदिया), नवेगावबांध, माहुरकुडा, सोमलपूर व ताडगाव (अर्जुनी/मोर.), ओलीत बांध पध्दतीतून गिरोला (सडक/अर्जुनी) चान्ना/बाक्टी, माहुली खोडशिवणी (अर्जुनी/मोर.) तर शुष्क बांध पध्दतीतून खोडशिवणी, गिरोला, माहुली, चान्ना/बाक्टी येथील मत्स्य सहकारी संस्था मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. हया संस्था आपली गरज पूर्ण करुन इतर संस्थांना तसेच खाजगी मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्यजीऱ्यांची विक्री करतात.
          मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पथदर्शी प्रकल्प म्हणून 15 तलावात मत्स्यबीज संगोपन व संवर्धनासाठी तळी बनविण्यात येत आहे. या तळीचा उपयोग मत्स्यजीरे व मत्स्यबीज वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या संस्थांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. सोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकही वाढविण्यास मत्स्योत्पादनातून जिल्ह्याची नीलक्रांतीकडे वाटचाल सुरु आहे.
बांध पध्दतीतून मत्स्यजीरे निर्मिती
          जिल्ह्यात गोड्या पाण्यातून मासेमारी केली जाते. माशांकडे पोषक आहार म्हणून बघितले जाते. जिल्ह्यातील तलावातून रोहू, कटला, मृगळ व सायप्रिनस माशांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यातील तलावात असलेले प्राणी प्लवंमुळे तलावातील पाण्याची उत्पादकता वाढण्यास मदत होते.
          गोठणगाव जवळील मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रामध्ये चीनच्या तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेल्या चायनीज वर्तुळाकार हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांची निर्मिती करण्यात येते. सारख्याच वजनाच्या नर आणि मादी माशांना इंजेक्शनमधून संप्रेरक देवून उत्तेजीत केले जाते. नर व मादी माशांच्या मिलनातून मादी या उत्तेजनातून पोटातील अंडी पाण्यात सोडतात. त्यानंतर या अंड्यातून जीऱ्याच्या आकाराची माशांची पिल्ले बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना मत्स्यजीरे म्हटले जाते. नंतर चायनीज हॅचरीतून एकत्र केलेले मत्स्यजीरे संवर्धन व संगोपन तळीत सोडली जातात. या मत्स्यजीऱ्यांची मत्स्यबीज किंवा बोटुकलीपर्यंत म्हणजे बोटाच्या आकाराची होईपर्यंत संवर्धन व संगोपन तळीत वाढविली जातात. त्यानंतर त्यांना तलावात सोडण्यात येते.
          जिल्ह्यातील मासेमार ढिवर समाजबांधव हे पारंपारीक पध्दतीने माशांपासून मत्स्यजीरे तयार करतात. मोगरा, शुष्क व ओलीत बांध पध्दतीने मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. मत्स्यजीरे निर्मितीसाठी मोगरा बांध पध्दतीचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उपयोग केला जातो. मोगरा पध्दतीच्या बांधामध्ये तलावाच्या काठावर हा टाक्यासारखा मातीचा बांध तयार करुन त्यामध्ये पाणी सोडून नर आणि मादी माशांना इंजेक्शनमधून संप्रेरक देवून उत्तेजीत केले जाते. नर व मादीच्या मिलनानंतर मादी मासे आपल्या पोटातील अंडी या बांधमध्ये सोडतात. नंतर ही मत्स्यअंडी एकत्र करुन तलावात तयार करण्यात आलेल्या हाप्यामध्ये सोडण्यात येतात. 72 तासानंतर अंड्यांचे मत्स्यजीऱ्यात रुपांतर होते. नंतर ही हाप्यातील मत्स्यजीरे एकत्र करुन संवर्धन तळीत टाकण्यात येतात. तसेच हे मत्स्यजीरे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यांचा आकार मत्स्यबीज किंवा बोटुकलीचा झाल्यानंतर पाण्यात सोडण्यात येतात. शुष्क बांध पध्दतीतून कोरड्या छोट्या आकाराच्या तलावात पाणी भरुन परिपक्व नर-मादी माशांना जोडीने सोडतात. त्यानंतर पाण्याचा प्रवाह तलावात सोडण्यात येतो. नर व मादी उत्तेजीत होवून मिलनानंतर मादी अंडी सोडते. ही अंडी एकत्र करुन तलावात सोडली जातात यातून मत्स्यजीरे तयार होतात. ओलीत बांध पध्दतीतून नैसर्गीक पध्दतीने नर-मादीचे मिलन होवून मादीच्या अंड्यातून मत्स्यजीरे तयार होतात. अशाप्रकारच्या चार पध्दतीचा वापर जिल्ह्यात मत्स्यजीरे तयार करण्यासाठी केला जात आहे.
            



Monday 1 August 2016

सामाजिक बांधिलकी जोपासून महसूल प्रशासन लोकाभिमुख करा - जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी



गोंदिया,दि.1 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच महसूल यंत्रणेकडे शासन विश्वासाने बघते. या यंत्रणेमार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. गरजूंना मदत व योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून महसूल प्रशासन लोकाभिमुख करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
          आज 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, गोंदिया उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, देवरी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांची मंचावर उपस्थिती होती.
          डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, शासनाच्या कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. महसूल विभाग हा सोपविलेली कामे पूर्णपणे पार पाडतात हा त्यांचा विश्वास आहे. जनतेच्या आयुष्यात सुख शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करुन लोकांना मदत व त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या असे त्यांनी सांगितले.
          महिला खातेदारांचे सक्षमीकरण हे महिला सप्ताहात करण्यात येणार असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, महिलांचे नाव सहखातेदार म्हणून जास्तीत जास्त महिलांनी नोंदविले पाहिजे यासाठी या सप्ताहाचा उपयोग होईल. जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येईल. खऱ्या पिढीत गरजू व्यक्तीला वेळीच केलेली मदत ही समाधान आणणारी असते. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या माणसाचे त्वरित समाधान त्यासोबतच त्याला मदत व योजनांचा लाभ देण्याचेही काम करावे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
          प्रास्ताविकातून अपर जिल्हाधिकारी मोहिते म्हणाले, महसूल दिनापासून चांगले काम करण्याची सुरुवात महसूल विभाग करीत आहे. सर्वात पहिले महसूल विभाग अस्तित्वात आला. या विभागाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत झाली. समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांना योजनांची माहिती देवून योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.
          यावेळी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये गोंदिया तहसिलचे नायब तहसिलदार विजय पवार, मंडळ निरिक्षक टी.एस.पोरचेट्टीवार, तलाठी सुनिल राठोड, अव्वल कारकून आशिष रामटेके, लिपीक सोनाली भोयर, शिपाई एल.डी.मोहनकर, कोतवाल राजेंद्र टेंभूर्णे, सालेकसा तहसिलचे नायब तहसिलदार आर.आर.कुंभरे, मंडळ अधिकारी के.बी.शहारे, अव्वल कारकून आर.डी.साखरे, तलाठी बी.टी.वरखेडे, कनिष्ठ लिपीक एस.व्ही.गजभिये, शिपाई डी.जी.रहांगडाले, कोतवाल संतोष बिसेन, गोरेगाव तहसिलचे नायब तहसिलदार एन.एच.वेदी, कनिष्ठ लिपीक अर्चना पारधीकर, मंडळ अधिकारी ए.के.बारसे, तलाठी ओ.एन.येडे, शिपाई स्नेहा मेश्राम, गोंदिया उपविभागीय कार्यालयाचे सुरेश हुमणे, बी.झेड.बिसेन, मंडळ अधिकारी के.डी.गजभिये, तिरोडा नायब तहसिलदार संदीप मासाळ, तलाठी एन.एम.डगावकर, तलाठी एम.पी.मलेवार, सडक/अर्जुनी तहसिलचे मंडळ अधिकारी आर.एल.रहांगडाले, तलाठी श्री.नंदागवळी, अव्वल कारकून श्रीमती पंचीलवार, कनिष्ठ लिपीक बी.बी.बरींगे, गोपाल वलथरे, आमगाव तहसिलचे मंडळ अधिकार के.पी.कोरे, अव्वल कारकून आर.डी.रहांगडाले, तलाठी व्ही.के.पारधी, शिपाई श्रीमती एल.एच.पंधरे, कोतवाल महादेव शिवणकर, देवरी तहसिलचे नायब तहसिलदार बी.के.गुरनूले, अव्वल कारकून यु.बी.पंधरे, कनिष्ठ ‍िलपीक एस.एच.बडवाईक, शिपाई एन.एस.मरस्कोल्हे, कोतवाल कृष्णकुमार डोकरवारे, अमृतलाल बोहरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहायक अधीक्षक जी.डी.किरीमकर, मंडळ अधिकारी बी.सी.कोल्हटकर, अव्वल कारकून हर्षद लांजेवार, शिपाई एस.जी.अंबादे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गोंदिया तालुक्यातील खमारी येथील पल्लवी डोये, नर्मदा किरसान, मुनीश्वरी ताराम, शामकला सिलोटे, दुर्गाबाई माने या महिला मजूरांना रोजगारपत्रक वितरीत करण्यात आले. अदासी/तांडा येथील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रत्येकी 20 हजार रुपयाचे धनादेश शुभांगी ढाले, उर्मिला फटे, प्रियंका गजभिये, उषा यादव, कल्पना भालाधरे व राहूल कहालकर यांना देण्यात आले. अपंग लाभार्थी सलोनी उके, निलेश चवरे, खिलेश चवरे, रिंकू दुबे, करण डोहरे, दिपिका वाढई, दामिनी वाढई यांना धनादेश व कागदपत्रे, अपंग निराश्रीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, पिंडकेपार येथील छोटेलाल बिसेन यांचा वीज पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना 4 लक्ष रुपये धनादेश सुरक्षा ठेव म्हणून देण्यात आले. निशांतगिरी गोस्वामी, सुषमा रहांगडाले, पल्लवी किरणापुरे, सोनाली चौधरी यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कोतवाल राजकुमार वासनिक यांची मुलगी मनीषा वासनिक ही बी.ई. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असल्याबद्दल तीचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
          वनहक्क पट्टयाचे वाटप विजय बहेकार, सुरजलाल उके नंगपुरा (आमगाव) हितेश रहांगडाले दहेगाव, भाऊलाल पटले चिरचाळबांध, राधेश्याम शेंडे आमगाव यांना अधिकारपत्र देण्यात आले. वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये भूमिस्वामीचे पट्टे वाटप नंदलाल उईके, दुधराम मडावी, उर्मिला कोराम, भगवान कोराम यांना करण्यात आले. धुरनलाल बसेने यांनी सात-बारा उताऱ्यावर पत्नीची सहखातेदार म्‍हणून नोंद केल्याबद्दल त्यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमाला तहसिलदार सर्वश्री के.डी.मेश्राम, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, प्रशांत सांगडे यांच्यासह नायब तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत घुरुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी मानले.
00000