जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 11 August 2016

प्रेरणा दिनी अर्जुनीत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


      देशाची भावी पिढी म्हणजे आजचे विद्यार्थी. देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी हे सुसंस्कारीत झाले पाहिजे. त्यांची जडण-घडण शालेय वयात व्हावी यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महिन्याचा दुसरा गुरुवार हा शाळेत प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
            या प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज 11 ऑगस्ट रोजी गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील कुंवर तिलकसिंह जि.प.पूर्व माध्यमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आगमन होताच पटांगणातील झाडाखाली प्रार्थनेला एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रार्थनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून चांगले निटनेटके, स्वच्छ गणवेश घालून शाळेत नियमित यावे असे सांगितले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विपश्यनेतील आनापान करण्यास शिकवावे तसेच शिक्षकांनी सुध्दा विपश्यनेचे प्रशिक्षण घेवून आनापान करावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.
            जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीला भेट दिली. अंगणवाडी सेविकेकडून विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांच्या काय शिकविण्यात येते तसेच कोणता आहार कशाप्रकारे देण्यात येतो याची माहिती घेतली. शाळेच्या स्वयंपाकगृहाची पाहणी केली. मुले-मुली वापर करीत असलेल्या स्वच्छतागृहाची सुध्दा पाहणी करुन नियमीत स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याबाबत सूचनाही मुख्याध्यापकांना केली.
            पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी वर्गात भेट घेऊन त्यांना खाऊ म्हणून ‍बिस्कीट दिले. तसेच गुलाब पुष्प देवून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी इयत्ता सातव्या वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. भविष्यात विद्यार्थ्यांना मोठे होवून काय बनायचे आहे याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. उपस्थित विद्यार्थ्यांना गोष्ट सांगून त्या गोष्टीवर आधारीत प्रश्नही विचारले. वेळ एकदा निघून गेली की पुन्हा परत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. यावरुन त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व विशद केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट म्हणून दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर रहांगडाले, केंद्र प्रमुख ठाकरे, मुख्याध्यापक श्री.रहांगडाले, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक श्री.बिसेन यांचेसह शाळेतील शिक्षक, पालकही उपस्थित होते.
                                                          

No comments:

Post a Comment