जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 29 May 2018

30 मे रोजी 49 मतदान केंद्रावर फेरमतदान

   मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान क्षेत्रात शासकीय सुट्टी

   30 मे रोजी कोरडा दिवस अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान
                             
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2018 साठी खालील नमुद मतदान केंद्रावर फेरमतदान बुधवार, 30 मे 2018 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 30 मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे.

61-भंडारा विधानसभा- 302- अडयाळ, 320नवेगाव, 318-उमरी, 335-पिंपळगाव, 403-पवनी, 405-पवनी, 374-खैरी दिवाण, 314-पिलांद्री, 317-केसलवाडा,322-पाथरी पुर्नवसन, 362-लोणारा, 363-लोणारा, 428-वलनी, 429-वलनी एकूण 14 केंद्र.
           62- साकोली विधानसभा-306-पारडी, 316-मुरमाडी, 292-तई बु., 287- घोडेझरी एकूण 4 केंद्र. 63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली, 159-मानेरी एकूण 2 केंद्र. 64-तिरोडा विधानसभा- 45-अत्री, 97-दवनीवाडा, 102-पिपरटोला, 108-विहीरगाव, 205- भजेपार, 215-पिंडकेपार, 38-मुरदाळा, 52-पालडोंगरी एकूण 8 केंद्र. 65-गोंदिया विधानसभा- 50-सोनपूरी, 78-चारगाव, 94-रतनारा, 115-कामठा, 116-कामठा, 117-कामठा, 123-लांबटोला, 169-गोंदिया, 176A-गोंदिया, 194-गोंदिया, 200-गोंदिया, 206-गोंदिया, 218-गोंदिया, 225-गोंदिया, 233-गोंदिया,240-गोंदिया, 250-गोंदिया, 253-गोंदिया, 271-गोंदिया, 276-गोंदिया, 303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र असे एकूण 49 मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत मतदान होणार आहे.

Monday 28 May 2018

नक्षलग्रस्त भरनोलीत 74 टक्के मतदान



 
                                                  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक
    भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज 28 मे रोजी मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व दुर्गम भागात असलेल्या भरनोली या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील गावात 74 टक्के मतदान झाले.
        रखरखत्या उन्हात भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदार मतदान करतांना उत्साहीत दिसत होते. विशेष म्हणजे हा भाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदानाची वेळ अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत होती. भरनोली येथील 305 क्रमांकाच्या एकमेव मतदान केंद्रावर 537 पुरुष आणि 506 स्त्रिया अशा एकूण 1043 मतदारांचा समावेश होता. त्यापैकी दुपारी 3 वाजतापर्यंत 384 पुरुष आणि 383 स्त्री अशा एकूण 767 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 74 टक्के इतकी आहे.
      भरनोली येथील मतदान केंद्रावर भरनोली, बल्लीटोला, शिवरामटोला, बोअरटोला व तिरखुरी या गावातील मतदारांनी रखरखत्या उन्हात आडवळणावर असलेल्या आपल्या गावावरुन येऊन मतदान केले. विशेष म्हणजे भरनोली येथील श्रीमती भागरथा कराडे (वय 90 वर्ष) व श्रीमती जनको कुमरे (वय 85 वर्ष) यांनी देखील आपल्या नातवंडांचा आधार घेवून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
       भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या भरनोली येथील मतदान केंद्रावर वरील 5 नक्षलग्रस्त गावातील मतदारांनी येवून व मतदान केंद्रावरील रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात मतदान केले. यावरुन या भागातील लोक नक्षलवादाला कंटाळले असून त्यांचा लोकशाहीवरच विश्वास असल्याचे केलेल्या मतदानावरुन स्पष्ट झाले आहे. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वात मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Wednesday 23 May 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक




मतदान यंत्रांचे केले सरमिसळीकरण
राजकीय पक्ष प्रतिनिधींची उपस्थिती
           येत्या 28 मे रोजी होणारी भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे प्राथमिक पातळीवर सरमिसळीकरण निवडणूक निरीक्षक तेजप्रतापसिंग फुल्का यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 23 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले.

       भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाकरीता वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रापासून सरमिसळीकरणाला सुरुवात करण्यात आली. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील-305, तिरोडा विधानसभा मतदारसंघातील-289 आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघातील-345 असे एकूण 939 मतदान केंद्रावर प्रत्येकी एक कंट्रोल युनिट व एक व्हीव्हीपॅट मशीन आणि दोन बॅलेट युनिटचा वापर करण्यात येणार आहे. याचे सरमिसळीकरण यावेळी करण्यात आले.
       आज प्राथमिक पातळीवर करण्यात आलेल्या सरमिसळीकरणाच्यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक सहारे, भारतीय जनता पार्टीचे प्रचार-प्रसिध्दी प्रमुख जयंत शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नानु मुदलीयार, रवी मुंदडा, संजीव राय, जिम्मी गुप्ता, मनिष अग्रहारी, एकनाथ वहिले यांच्यासह अन्य प्रतिनिधींची उपस्थिती होती.
       मतदान यंत्रात सेटींग होत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री.फुल्का म्हणाले, मतदान यंत्रामध्ये कुठलेही सेटींग होत नाही. तो राजकीय पक्षांचा गैरसमज आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री.वासनिक, तहसिलदार प्रशांत सांगळे, साहेबराव राठोड, नायब तहसिलदार राजश्री मलेवार यांची उपस्थिती होती.
00000
   

Tuesday 22 May 2018

वैनगंगा नदी पूर नियंत्रण समन्वय




बालाघाट येथे आंतरराज्यीय बैठक संपन्न
     • पूरस्थितीत नदीत पाणी सोडण्याची सूचना मिळणार
• प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त करणार
     वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. ही पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज 22 मे रोजी बालाघाट जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बालाघाट, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, बालाघाटच्या जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजुषा राय प्रामुख्याने उपस्थित होत्या.

       तसेच या बैठकीला गोंदिया, नागपूर, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर प्रकल्पातील पाणी अतिवृष्टीच्या काळात सोडल्यानंतर बालाघाट, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काही गावे प्रभावित होतात. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर प्रकल्प, पुजारीटोला व कालिसराड या प्रकल्पातील सुध्दा अतिवृष्टीच्या काळात पाणी सोडल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील काही गावात पूरपरिस्थिती निर्माण होते. बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये सुध्दा पूरपरिस्थिती निर्माण होते. ही बाब बैठकीतील चर्चेत आली.
       यावेळी निश्चित करण्यात आले की, शिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीवर भिमगड प्रकल्प तसेच बालाघाट जिल्ह्यातील बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्प तसेच गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीवर बांधण्यात आलेले शिरपूर, पुजारीटोला व कालिसराड प्रकल्पातील नदीमध्ये पूरपरिस्थितीच्या काळात एकाचवेळी पाणी सोडण्यात येणार नाही. एका प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर दुसऱ्या प्रकल्पातून पाणी सोडले जाणार नाही. प्रकल्पातून पाणी सोडतांना योग्य समन्वयातून पाणी सोडण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर, पुजारीटोला व कालिसराड प्रकल्पात पावसाळ्याच्या दिवसात नियंत्रीत स्वरुपात पाणी सोडण्यात येईल. ज्यामुळे वैनगंगा नदीत पूरस्थिती निर्माण होणार नाही व या नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसणार नाही.
      पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक ते साहित्य व साधने तयार असावीत. या साहित्य साधनांचा वापर करण्याच्या दृष्टीने त्याची रंगीत तालीम सुध्दा घेण्यात यावी. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या साधनांची माहिती मिळून आवश्यक ते साहित्य खरेदी करता येईल. पूरपरिस्थितीच्या काळात ग्रामस्थांना सावध करण्याचे स्त्रोत अद्ययावत करण्यात येतील. प्रसारमाध्यमातून पूरपरिस्थितीबाबतची पूर्वकल्पना ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गावाकरीता एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून या काळात ग्रामस्थांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासोबतच उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पूर्ण करण्याचे काम नोडल अधिकारी करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
      प्रकल्प पूर्णपणे भरल्यानंतर किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबतची सूचना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय नदीमध्ये प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार नाही. संजय सरोवरातून पाणी सोडल्यानंतर 170 कि.मी.चा प्रवास करीत हे पाणी 15 ते 20 तासामध्ये बालाघाटपर्यंत पोहोचते. त्यामुळे सर्व संबंधित जिल्ह्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात येणार असल्यामुळे पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासोबतच आवश्यक त्या उपाययोजना करता येणार आहे.
      संजय सरोवर व बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यासाठी बालाघाटचे अधीक्षक अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत हेही निश्चित करण्यात आले की, बालाघाट, शिवनी, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी एकदूसऱ्यांशी याबाबत समन्वय ठेवतील व प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती परस्परांना देतील. तसेच शिवनी, बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मोबाईवर एक व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करुन पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीवर तसेच प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत माहितीचे आदान-प्रदान करतील.
      संजय सरोवर व राजीव सागर या प्रकल्पातील पाण्याच्या पातळीबाबतची माहिती गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. अशाचप्रकारची माहिती गोंदिया जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी शिरपूर, पुजारीटोला व कालिसराड प्रकल्पातील पाण्याच्या पातळीची माहिती बालाघाटच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी उपलब्ध करुन देतील. मोबाईवर एस.एम.एस. व व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून प्रकल्पातील पाण्याची क्षमता, पाण्याची पातळी याबाबतची माहिती बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल.
      बैठकीला बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एच.वाय.छप्परघरे, केंद्रीय जलसिंचन आयोगाचे नागपूर येथील अधिकारी जितेंद्र कुमार, भंडाऱ्याचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, भंडारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के.एस.मानवटकर, गोंदियाचे सहायक वनसंरक्षक एन.एच.शेंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अभिषेख नामदास, डॉ.के.पी.त्रिपाठी, बालाघाट जिल्ह्यातील बालाघाट, वाराशिवनी, बैहर, लांजीचे उपविभागीय अधिकारी, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, संजय सरोवर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.एस.शर्मा यांची उपस्थिती होती. 

ज्ञान व माहितीचा खजिना असलेला महाराष्ट्र वार्षिकी-2018 संदर्भ ग्रंथ विक्रीस उपलब्ध


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन
      माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र वार्षिकी-2018 हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भ ग्रंथ नविन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. या संदर्भ ग्रंथात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वन, नदया, कृषि, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदी घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे.
      या वार्षिकेचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे शासनाच्या सर्व विभागांच्या कामकाजाची पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना यात उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील घडामोडींचा यात समावेश केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व राज्याचे मंत्रीमंडळ, आजवरचे विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र विधीमंडळ सदस्यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकाची माहिती या महाराष्ट्र वार्षिकेत समाविष्ट करण्यात आल्याने हा संदर्भ ग्रंथ प्रत्येक वाचकांच्या संग्रही असणे आवश्यक आहे.
        माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र वार्षिकी-2018 हा संदर्भ ग्रंथ विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी व सामान्य ज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व नागरिकांना उपयुक्त आहे. महाराष्ट्राची अधिकृत वस्तुनिष्ठ माहिती देणाऱ्या संदर्भ ग्रंथाची गरज अनेक वर्षापासून वाचकांनी व्यक्त केली होती. महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महाराष्ट्र वार्षिकी-2018 या संदर्भ ग्रंथाच्या रुपाने ही गरज पूर्ण झाली आहे.
       महाराष्ट्र वार्षिकी-2018 या संदर्भ ग्रंथाची किंमत फक्त 250 रुपये आहे. या संदर्भ ग्रंथासाठी जिल्हा माहिती कार्यालय, न.प.इंजिन शेड शाळा, मेठी बगीच्या समोर, सिव्हील लाईन, गोंदिया येथे प्रत्यक्ष किंवा या कार्यालयाच्या 07182-237760 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या संदर्भ ग्रंथाच्या प्रती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पुस्तक विक्रेत्यांना सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल. संदर्भ ग्रंथाच्या मर्यादेत प्रती शिल्लक असल्याने वाचकांनी तातडीने जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.

Sunday 20 May 2018

लोकसभा पोटनिवडणूक : मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी


       लोकसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज 20 मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया येथे राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र सुस्थितीत आहेत किंवा नाही याची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
       यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगळे, आमगाव तहसिलदार साहेबराव राठोड, नायब तहसिलदार सर्वश्री सोमनाथ माळी, ओमकार ठाकरे, राजश्री मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी अशोक सहारे व अन्य राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Friday 18 May 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करा - जिल्हाधिकारी काळे



आंतरराज्यीय सीमा परिषद
         येत्या 28 मे रोजी लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. गोंदिया हा जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची तसेच शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची देखील सीमा लागून आहे. दोन्ही राज्याच्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेचा भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोटनिवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी तिनही राज्याच्या सीमेलगतच्या पोलीस यंत्रणेने योग्य समन्वयातून सुरक्षा बंदोबस्त करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 18 मे रोजी लोकसभा पोटनिवडणूकीच्या दृष्टीने आयोजित आंतरराज्यीय सीमा परिषदेत सुरक्षेचा आढावा घेतांना श्री.काळे बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक एन.बी.उपाध्याय, शफुल हक, तेजप्रतापसिंग फुल्का, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, राजनांदगावचे पोलीस अधीक्षक वाय.पी.सिंग, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अखिल पटेल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, कोब्रा बटालियनेचे भाग्यश्री परमार, राजनांदगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीशंकर चंद्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), राजीव नवले (आमगाव), नितीन यादव (तिरोडा), शैलेश काळे (कुरखेडा) यांची उपस्थिती होती.
        श्री.काळे म्हणाले, निवडणूकीच्या काळात आंतरराज्यीय सीमेवर कडक बंदोबस्त ठेवून जिल्ह्यात अवैध दारु, पैसा येणार नाही यासाठी प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करावी. तशाचप्रकारची तपासणी नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या नाक्यावर देखील करावी. निवडणूकीच्या काळात संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात ज्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी रस्ते नाही अशा ठिकाणी मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायदळ जावे लागणार नाही त्यासाठी बैलगाड्यांची व्यवस्था करावी असे त्यांनी सांगितले.
        डॉ.भूजबळ यांनी जिल्ह्यातील आंतरराज्यीय व जिल्ह्यातील विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहनांची देखील तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मतदानाच्या दृष्टीने मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
        निवडणूक होत असलेल्या भागातील नक्षलदृष्ट्या संवेदनशील मतदान केंद्रे, भरारी पथके, प्रतिबंधात्मक कारवाई, जमा करण्यात आलेले परवाना शस्त्रे याबाबतची माहिती डॉ.भूजबळ यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात 1290 पोलीस बल उपलब्ध असून राज्य राखीव पोलीस दल किंवा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 11 कंपन्या 1558 पोलीस अधिकारी-पोलीस कर्मचारी व होमगार्डची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
        गडचिरोली परिक्षेत्रात या निवडणूकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली. उपस्थित निवडणूक निरीक्षकांना नक्षल चळवळीबाबत व त्यांच्या दलमबाबत तसेच जिल्ह्यात कोणते दलम कार्यरत आहेत याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली.
        निवडणूक निरीक्षकांनी पोटनिवडणूकीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने तसेच नक्षलग्रस्त भागात मतदानाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उपस्थितांचे आभार अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी मानले.
00000
   

तंटामुक्त गाव मोहिम बातमीदारांसाठी तंटामुक्त पुरस्कार


15 जून पर्यंत प्रवेशिका आमंत्रित
       महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची वृत्तपत्रातून व्यापक प्रसिध्दी देणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने गौरविण्यात येते. 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम या विषयावर लिखान केलेल्या बातमीदारांकडून पुरस्कारासाठी 15 जून 2018 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहे.

       महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची व्याप्ती व महत्व लक्षात घेता हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता ती व्यापक लोकसहभागाची चळवळ होणे आवश्यक आहे.
       छोट्या-छोट्या कारणावरुन निर्माण होणारे तंटे ग्रामपातळीवरच सामोपचाराने मिटवून व भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत असे वातावरण निर्माण करुन लोकांनी स्थायी विकासाच्या मार्गावरुन वाटचाल करावी, असा व्यापक उद्देश या मोहिमेमागे आहे. सकारात्मक पत्रकारितेचा भाग म्हणून हा विचार, प्रसार माध्यमे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात वृत्तपत्रे महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यादृष्टीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीरित्या राबविण्यामध्ये पुरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतात.
      जिल्हास्तरावर प्रथम- 25 हजार, द्वितीय- 15 हजार, तृतीय- 10 हजार. विभागीय स्तरावर प्रथ्म- 1 लक्ष, द्वितीय- 75 हजार, तृतीय- 50 हजार रुपयांचा पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम- 2 लक्ष 50 हजार, द्वितीय-        1 लक्ष 15 हजार व तृतीय- 1 लक्ष रुपयांच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.
       पुरस्कारासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक निकष मिळून 100 गुण आहेत. संख्यात्मक तपशिलात बातम्या, वृत्तांकन, फोटो फिचर्स, लेख, अग्रलेख यांची संख्या यासाठी 40 गुण आहेत. साहित्य व अ वर्गवारीतील दैनिकात प्रसिध्द झाले असेल तर त्याला मिळालेल्या एकूण गुणांच्या 10 टक्के व ब वर्गवारीतील दैनिकास        5 टक्के ज्यादा गुण देण्यात येतात.
      गुणात्मक निकषात कल्पकता, प्रबोधनात्मकता, व्यवहारिकता तसेच मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात दखल घेवून मोहिमेच्या अंमलबजावणीत किती व कोणत्या गावात बदल करण्यात आला याबाबत अनुषंगीक माहिती लेखासोबत दिलेली असल्यास त्यावर सुध्दा गुण देण्यात येतात. बातमी, लेखामध्ये सुचविलेल्या धोरणात्मक सुधारणांची दखल घेवून शासनाकडून सुधारणा केल्यास त्यावर सुध्दा गुण असतात. जनमानसावरील बातमी, वृत्तांकन, लेख, अग्रलेख, लेखमाला, फोटो फिचर्सचा परिणाम व प्रभाव यावर सुध्दा गुण आहेत. संबंधित बातमीदाराने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची अंमलबजावणी व्यापक स्वरुपात व्हावी म्हणून प्रत्यक्ष कृतीपूर्ण पध्दतीने बजावलेली सकारात्मक भूमिका असे मिळून 60 गुण गुणात्मक तपशिलास व 40 गुण संख्यात्मक तपशिलास राहणार आहेत. या दोन्ही तपशिलाचा विचार करुन बातमीदारांनी प्रवेशिका संपादकाच्या शिफारसीने पाठवाव्यात.
      प्रवेशिका पाठवितांना बातम्या, लेख हे 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीत प्रकाशित झालेले असावेत. प्रवेशिका तीन प्रतीत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, न.प.इंजीन शेड शाळा इमारत, लोकोशेड जवळ, मेठी बगीच्या समोर, सिव्हील लाईन, गोंदिया येथे 15 जून 2018 पर्यंत पाठवाव्यात. असे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी कळविले आहे.

Tuesday 15 May 2018

निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरिक्षण करा - खर्च निरिक्षक प्रभात दंडोतिया


Ø   खर्चाचा दररोज अहवाल पाठवा
Ø   बँकेचे स्टेटमेंट तपासा
Ø   समारंभ जेवणावळीवर नजर ठेवा
लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार निश्चित झाले असून निवडणूकीच्या प्रचारासाठी पक्ष उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अतिमहत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा उमेदवार वस्तुस्थितीदर्शक खर्च नमूद करीत नाहीत. त्यामुळे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकाऱ्यांनी उमेदवार पक्षाच्या खर्चावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षक प्रभात दंडोतिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज लोकसभा निवडणूक खर्चाशी संबंधित नोडल अधिकारी सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विलास ठाकरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी अशोक मातकर, कोषागार अधिकारी अमित मेश्राम सर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
लोकसभा पोटनिवडणूकीच्या संबंधाने पक्ष उमेदवाराचा होणारा खर्च याची 18 मे, 22 मे 26 मे रोजी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च अहवाल तपासणी दिनांकाच्या एक दिवस अगोदरपर्यंत निवडणूक खर्च नोंदवहीत नोंदविण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरिक्षकांनी दिल्या. खर्चाशी संबंधित सर्व अहवाल दररोज निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावे. उमेदवारांचे वाहन, सभा प्रचार कार्य आदीची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात यावी. या व्हिडिओ रेकॉर्डींगची तपासणी  करण्यात यावी. उमेदवारांनी सादर केलेला खर्च रेकॉर्डींगमधील बाबी तपासून खर्च मान्य करण्यात यावा.
स्टॉटिक सर्व्हेलन्स टिम मार्फत सुध्दा नियमित व्हिडिओ रेकॉर्डींग होणे आवश्यक आहे. रोख मद्य पकडणे या  घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरिक्षक आयकर खात्याला दयावे त्या आधारेच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सभास्थळी येणाऱ्या वाहनांची रेकॉर्डींग करतांना प्रत्येक वाहनाची नंबरप्लेटसह रेकॉर्डींग करणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील बँकांमधून मोठया प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. निवडणूक काळात उमेदवारांनी आपल्या खात्यातून काढलेल्या रकमेचा तपशिल सादर करावा,असेही त्यांनी सांगितले.
केवळ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर विश्वास ठेवता सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांनी आपल्या वैयक्तिक यंत्रणेमार्फत खर्चाची पडताळणी करावी. निवडणूक खर्च निरिक्षक यांचेशी कायम संपर्क ठेवून काही अडचण आल्यास प्रभात दंडोतिया निवडणूक खर्च निरिक्षक यांचेशी 7620625587  या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. राजकीय पक्ष उमेदवार यांचे खर्चाचे खाते वेगवेगळे असून खर्च नोंदणी करतांना वेगवेगळी नोंदणी करावी, असे निर्देश दंडोतिया यांनी दिले. निवडणूक काळात होणाऱ्या जेवणावळी राजकीय पक्ष किंवा उमेदवार उपस्थित असलेले लग्न समारंभ यावर लक्ष्य ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.