जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 30 April 2019

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण - पालकमंत्री राजकुमार बडोले

                             महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा






महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन अनेक समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने गेल्या 59 वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करुन विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकाविले असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे असे गौरोदगार पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी काढले.
  पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमीत्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना श्री. बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  श्री. बडोले पुढे म्हणाले, धर्मसुधारणांपासून ते समतेच्या चळवळीपर्यंत आणि देशाच्या प्रत्येक नव्या विधायक उपक्रमात महाराष्ट्र सदैव अग्रभागी राहिला आहे. या राज्याला संस्कृतीची, पराक्रमाची, त्यागाची, तेजाची आणि राष्ट्रप्रेमाची परंपरा आहे. परकीयांच्या आक्रमणापासून या भूमीला मुक्त करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रयतेचे राज्य स्थापन केले. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने समृध्द राज्य आहे. राज्यात विस्तीर्ण सागर किनारे, दाट वने, वन्यप्राणी, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे विपुल प्रमाणात आहे.
   संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा संतांची मांदियाळीच महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला लाभली असल्याचे सांगून श्री. बडोले पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील कचारगड हे देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहे. देशातील विविध भागातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने फेब्रुवारी महिन्यात माघ पोर्णिमेला नतमस्तक होण्यासाठी कचारगडला येतात. शतकापूर्वीच छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारामुळेच मागासवर्गीयांना हक्काचे आरक्षण मिळाले. दरवर्षी आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी निघते. चांदयापासून ते बांध्यापर्यंतचे भाविक स्त्री-पुरुष पंढरीच्या वारीत सहभागी होतात असा हा लोकोत्सव जगाच्या पाठीवर एकमेवाद्वितीय असा आहे. शेकडो वर्षामधल्या संत वाङमयाच्या रुपानं झालेलं विचारमंथन आणि भक्तीच्या धाग्यानं एकत्र बांधला गेलेला समाज यामुळे आध्यात्मिक लोकशाही दृढ करणारी मार्गदर्शक यंत्रणा म्हणून या वारीकडे बघितले जात असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                                                                        
   महाराष्ट्रातील नाटकवेड्या मंडळींना लोकाश्रयाबरोबरच आता राजाश्रयही मिळू लागल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, छोट्या-छोट्या एकांकीकेपासून ते व्यावसायिक लोकप्रिय नाटकांपर्यंत रंगभूमीची उपासना सतत सुरु असल्याचे चित्र आहे. प्रायोगिक रंगभूमी, संगीत रंगभूमी, हौशी रंगभूमी, लोकरंगभूमी अशा विविध प्रकारातील नाट्यप्रतिभा विविध महोत्सवांमुळे आणि संमेलनामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात चांगलीच बहरु लागली आहे. पुर्व विदर्भाची रंगभूमी ही झाडीपट्टी रंगभूमी म्हणून ओळखली जाते. गोंदिया जिल्ह्यात सुध्दा झाडीपट्टी रंगभूमीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
   महाराष्ट्र दिनासोबतच हा दिवस जगभर कामगार दिन म्हणून आणि गोंदिया जिल्ह्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला तसेच कामगारांना शुभेच्छा दिल्या.
   प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. पुरुष व महिला पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक, पोलीस वाहतूक शाखा, पुरुष व महिला होमगार्ड पथक, स्काऊट-गाईड पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, दामिनी पथक, अग्नीशमन दल यांनी परेड संचलन केले.
   यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, सुनिल कोरडे, जि.प.चे मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री.मडावी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राठोड, श्री.भांडारकर, कार्यकारी अभियंता श्री.विश्वकर्मा, श्री.वैरागकर, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गाणार, श्री.चव्हाण, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, तहसिलदार श्री.भांडारकर, अपर तहसिलदार श्री.खरडकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी मानले.
00000

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा - डॉ.कादंबरी बलकवडे

      जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
          आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम सन 2019-20 च्या आढावा सभेत डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उपनिबंधक श्री.कांबळे, प्रभारी कृषि विकास अधिकारी झामसिंग टेंभरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
       डॉ.बलकवडे म्हणाल्या, राष्ट्रीयकृत सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी. जिल्ह्यातील जे शेतकरी शेतीमध्ये  विविधप्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात त्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
        प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.नाईनवाड यांनी सन 2018-19 या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देवून खरीप हंगाम सन 2019-20 या वर्षाचे नियोजन सादर केले. सन 2018-19 या वर्षात 1134.2 मि.मी. पाऊस झाला. याच वर्षात खरीप पेरणी 2 लाख 463 हेक्टरवर, रब्बी पेरणी 25 हजार 781 हेक्टरवर आणि उन्हाळी पेरणी 24 हजार 259 हेक्टरवर झाल्याचे त्यांनी सांगितले.
       खरीप हंगाम सन 2019-20 या वर्षासाठी महाबीज व खाजगी कंपन्यांकडून भात पिकाचे 62 हजार 540 क्विंटल, तूर पिकाचे 186 क्विंटल आणि ढेंचा व  इतर पिकाचे 106 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. सन 2019-20 करीता रासायनिक खताची मागणी 71 हजार 55 मे.टन इतकी करण्यात आली आहे. मागील वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 31 हजार 103 शेतकऱ्यांना 108 कोटी 75 लक्ष रुपये, ग्रामीण बँकेने 5 हजार 901 सभासदांना 21 कोटी 15 लक्ष तर राष्ट्रीयकृत बँकांनी 70 कोटी 36 लक्ष इतके कर्जवाटप केले. तर सन 2019-20 या वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 27 हजार 998 शेतकऱ्यांना 110 कोटी, ग्रामीण बँकेला 5 हजार 310 शेतकऱ्यांना 25 कोटी 32 लक्ष आणि राष्ट्रीयकृत बँकांना 94 कोटी 68 लक्ष असे एकूण 230 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
        सन 2018-19 या वर्षात 595 कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून सन 2019-20 या वर्षात 2792 कृषिपंपांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
       बाघ आणि इटियाडोह प्रकल्पातून सन 2018-19 या वर्षात 29 हजार 342 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून सन 2019-20 या वर्षात 28 हजार 925 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पातून मागील वर्षात 8 हजार 320 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी 9 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) प्रकल्पाच्या 17 प्रकल्पातून मागीलवर्षी 469 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी 1560 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषदेच्या 2 हजार 69 लघु प्रकल्पातून आणि 1421 माजी मालगुजारी तलावातून 29 हजार 808 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी लघु प्रकल्पातून 23 हजार 171 हेक्टर आणि  माजी मालगुजारी तलावातून 24 हजार 52 हेक्टर असे एकूण 47 हजार 223 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गोंदिया पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या 68 प्रकल्पातून 33 हजार 668 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील विविध प्रकल्पाच्या माध्यमातून 1 लाख 6 हजार हेक्टर सिंचन करण्यात आले तर यावर्षी 1 लाख 21 हजार 196 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.
        जिल्ह्यातील 100 धान खरेदी केंद्रावरुन सन 2018-19 च्या खरीप हंगामात 85 हजार 683 शेतकऱ्यांकडून 27 लक्ष 49 हजार 879 इतका धान खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत 474 कोटी 57 लक्ष इतकी आहे. कृषि विभागाच्या विविध योजनेअंतर्गत सन 2019-20 यावर्षाचा प्रस्तावित लक्षांक देण्यात आला आहे. सन 2018-19 या वर्षात कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 432 ट्रॅक्टर आणि 312 भात मळणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, भात कापणी यंत्र व भात मील देण्यात आले आहे. या दोन्ही बाबीवर 6 कोटी 91 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.
        सन 2019-20 या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत 150 क्रॉपसॅप सलग्न शेतीशाळा घेण्यात येणार आहे. रब्बी हंगामात ज्वारीचे 1300 हेक्टर आणि करडईचे 650 हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री.नाईनवाड यांनी दिली.
        सभेला बाघ व इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त श्री.शहारे, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, श्री.तुमडाम, श्री.तोडसाम यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday 11 April 2019

निवडणूक निरीक्षक डॉ. मिश्रांनी दिली अनेक मतदान केंद्राला भेट

मतदान प्रक्रीयेची केली पाहणी
   सखी व मॉडेल मतदान केंद्राला भेट
मतदारांशी साधला संवाद




17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज 11 एप्रिल रोजी जिल्हयात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु असतांना भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी गोंदिया जिल्हयातील अनेक मतदान केंद्रांना भेटी देवून मतदान प्रक्रीयेची पाहणी केली. मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांशी डॉ. मिश्रा यांनी संवाद साधला. मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांबाबत आपण समाधानी आहात काय याबाबत मतदारांकडून माहिती जाणून घेतली.
            डॉ. मिश्रा यांनी सकाळी 9 वाजता गोंदिया शहरातील महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 210 आणि 230 याची पाहणी केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही मतदारांनी एका राजकीय पक्षाचा बुथ हा मतदान केंद्राजवळ असल्यामुळे तो 200 मीटरपेक्षा अधिक दूर करावा. अशी मागणी केली. यावेळी डॉ. मिश्रा यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना त्वरीत निर्देश देत तो बुथ तात्काळ हटवून 200 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सुरु करण्याबाबत सांगितले. येथील 210 आणि 230 क्रमांकाचे मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून कार्यरत होते. या दोन्ही मतदान केंद्रावर एकूण 2560 मतदारांची नोंदणी होती. 210 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर श्रीमती के.एम. कोल्हटकर हया मतदान केंद्राध्यक्ष तर सौ. ठाकरे, सौ. डाके, सौ. कुंडे हया मतदान अधिकारी तर रेखा कुशवाह हया पोलीस शिपाई तर 230 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर माधवी राऊत हया मतदान केंद्राध्यक्ष तर माधूरी बावनकर, वैशाली बन्सोड, सायली तिडके तर महिला पोलीस शिपाई म्हणून सरीता पंधरे या महिलांकडे या दोन्ही मतदान केंद्रांचे कामकाज सोपविण्यात आले होते.
            गोंदिया येथील मनोहर मुन्सीपल उच्च प्राथमिक शाळेतील 211 व 213 क्रमांकाच्या तर कुडवा येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 145, 146 आणि 147, वसंतनगर येथील बी.एच.जे. महाविद्यालयात असलेल्या 177, 178,179, 180 व 183 या मतदान केंद्राला डॉ. मिश्रा यांनी भेट देवून तेथे मतदानासाठी बऱ्याच वेळेपासून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना त्रास होवू नये यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्याला निर्देश देवून या मतदारांना बसण्यासाठी पेंडॉलची व्यवस्था त्वरीत करण्यास सांगितले. यावेळी डॉ. मिश्रा यांनी प्रथमच मतदान करत असलेल्या नवमतदारांशी संवाद साधून प्रथमच मतदान करतांना त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. नवमतदारांसोबत त्यांनी छायाचित्र काढले. बी. एन . आदर्श सिंधी हायस्कूल विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथील 232, 233, 237 आणि 238 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट देवून  उपस्थित मतदारांशी, मतदार सहायता कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांशी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. मतदान केंद्रावर काही अडचणी आहेत का याबाबत त्यांनी विचारणा केली.
     तिरोडा तालुक्यातील दांडेगाव येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक कन्या शाळेतील 134, 135 आणि 136 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट दिली. एकोडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील  127, 128 आणि 129 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट देवून उपस्थित मतदारांशी संवाद साधला. मतदानासाठी येणाऱ्या वरिष्ठ नागरिक व दिव्यांगाना मतदान करण्यास प्राधान्य दयावे. असे मतदान केंद्राध्यक्षांना सांगितले. चुरडी येथील प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेल्या मॉडेल मतदान केंद्राला भेट देवून त्यांनी समाधान व्यक्त केले. एखादा कार्यक्रमाला साजेसे असे मतदान केंद्र सजविल्याबद्दल त्यांनी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी , स्वयंसेवक, बीएलओ यांचे कौतुक केले. या केंद्रावरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचा भारतीय पोषाख पाहून त्यांचे कौतुक केले. तिरोडा शहरातील सी.जे. पटेल महाविद्यालयात असलेल्या 79 क्रमांकाच्या सखी मतदान केंद्राला भेट देवून केंद्राध्यक्ष पी.बी. कटरे, मतदान अधिकारी सुरेखा रहांगडाले, आरती सादतकर, वृंदा तुमसरे, निलू लारोकर व महिला पोलीस शिपाई निकिता आजबले यांचेकडून मतदान प्रक्रीयेचे माहिती जाणून घेवून काही अडचणी येत आहेत का याबाबत विचारणा केली. तसेच तिरोडा शहरातील शहीद मिश्रा विद्यालयातील 83 व 84 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी डॉ. मिश्रा यांनी भेट दिली तेथील मतदान प्रक्रीया व उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
                                                                   

Wednesday 10 April 2019

11 एप्रिल रोजी निवडणूक : मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना

Ø   14 उमेदवार भाग्य आजमावणार
Ø      18 लाख 8 हजार 948 मतदार बजावतील मतदानाचा हक्क
Ø      गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान
Ø      अर्जुनी/मोरगाव मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान
Ø   मतदानासाठी 2184 मतदान केंद्र
Ø   निवडणूकीसाठी 13 हजार मनुष्यबळ




17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षासह 14 उमेदवार या निवडणूकीत आपले भविष्य आजमावणार आहेत. गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा या विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान, तर अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 2184 मतदान केंद्रावर 18 लाख 8 हजार 948 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये  9 लाख 5 हजार 490 पुरुष मतदार आणि 9 लाख  3 हजार 458 स्त्री मतदारांचा समावेश आहे.
मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) बुधवारी मतदान केंद्रासाठी रवाना झाली आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुकूंद टोणगावकर, साकोली विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनिषा दांडगे, अर्जूनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा सोनाळे, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंत वालस्कर व तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गंगाराम तळपाडे यांनी मतदान साहित्य देवून मतदान पथकांना रवाना केले.
गुरुवार 11 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या निवडणूकीत भंडारा-गोंदिया जिल्हयातील 18 लाख 8 हजार 948 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2184 मतदान केंद्रावर  हे मतदान होणार असून यासाठी 3644 बॅलेट युनिट, 2671 कंट्रोल युनिट व 2909 व्हिव्हिपॅट यंत्र वापरले जाणार आहेत.
·         निवडणूकीसाठी असलेले मनुष्यबळ
भंडारा-गोंदिया मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्हयात 1211  मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून 6260 अधिकारी कर्मचारी  तर गोंदिया जिल्हयासाठी 973 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून 4279 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. निवडणूकीच्या कामासाठी सहाही विधानसभा मतदार संघात  पोलीस कर्मचाऱ्यांसह १३ हजार २९२ अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने व शांततेने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शांतनू गोयल , गोंदिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, गोंदिया पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले आहे.                                                                                                                          ·         सखी व आदर्श केंद्र
लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा, साकोली व तुमसर क्षेत्रात 7 मतदान केंद्रावर तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 7 मतदान केंद्रावर महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. या सोबतच आयोगाने आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.  
* मतदानासाठी सुट्टी
        11 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी  सुट्टी जाहिर करण्यात आली  आहे. ज्या गावामध्ये  मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार आहे तो बंद ठेवण्यात येणार आहे. सुट्टी ही मतदान करण्यासाठी असून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच अन्य कामासाठी जावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
·         मतदान केंद्रावर सुविधा
निवडणूक आयोगाने यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीत महिला व दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करुन देवून मतदान केंद्राव रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गरोदर महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी सहकार्य व प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठीच्या उपाय योजना कराव्यात. भरपूर पाणी प्यावे, रुमाल बांधावा, सावलीचा आधार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
·         निवडणूक लढत असलेले उमेदवार
नाना पंचबुध्दे-राष्ट्रवादी, विजया नांदूरकर-बहुजन समाज पाटी, सुनिल बाबुराव मेंढे-भारतीय जनता पार्टी, कारु नागोजी नान्हे-वंचित बहुजन आघाडी, भिमराव दुर्योधन बोरकर- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, भोजलाल मरसकोल्हे-भारतीय शक्ती चेतना पार्टी तर अपक्ष निलेश कलचूरी, प्रमोद गजभिये, विरेंद्रकुमार जसवा, देविदास लांजेवार, राजेंद्र पटले, सुनिल चवळे, सुमित पांडे व सुहास फुंडे असे एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत.
·         मतदानाचे आवाहन
            मतदान करणे केवळ हक्क नसून कर्तव्य आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रतयेकाने मतदान करण्याचा संकल्प करावा. लोकसभेसाठी पाच वर्षातून एकदा येणाऱ्या मतदानाच्या संधीचे मतदान करुन सोने करा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान दयावे, असे आवाहन मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा व जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
·         एकूण मतदार

विधानसभा मतदार संघ
मतदान केंद्र
पुरुष मतदार
स्त्री मतदार
 इतर
एकूण
60-तुमसर
358
151709
147636
00
299345
61-भंडारा
458
183838
183920
00
367758
62-साकोली
395
160319
156271
00
316590
63-अर्जूनीमोर
317
127557
125257
02
252816
64-तिरोडा
295
126277
128424
00
254701
65-गोंदिया
361
155790
161948
00
317738
एकूण
2184
905490
903456
02
1808948