जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 30 April 2019

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा - डॉ.कादंबरी बलकवडे

      जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
          आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम सन 2019-20 च्या आढावा सभेत डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उपनिबंधक श्री.कांबळे, प्रभारी कृषि विकास अधिकारी झामसिंग टेंभरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
       डॉ.बलकवडे म्हणाल्या, राष्ट्रीयकृत सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी. जिल्ह्यातील जे शेतकरी शेतीमध्ये  विविधप्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात त्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
        प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.नाईनवाड यांनी सन 2018-19 या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देवून खरीप हंगाम सन 2019-20 या वर्षाचे नियोजन सादर केले. सन 2018-19 या वर्षात 1134.2 मि.मी. पाऊस झाला. याच वर्षात खरीप पेरणी 2 लाख 463 हेक्टरवर, रब्बी पेरणी 25 हजार 781 हेक्टरवर आणि उन्हाळी पेरणी 24 हजार 259 हेक्टरवर झाल्याचे त्यांनी सांगितले.
       खरीप हंगाम सन 2019-20 या वर्षासाठी महाबीज व खाजगी कंपन्यांकडून भात पिकाचे 62 हजार 540 क्विंटल, तूर पिकाचे 186 क्विंटल आणि ढेंचा व  इतर पिकाचे 106 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. सन 2019-20 करीता रासायनिक खताची मागणी 71 हजार 55 मे.टन इतकी करण्यात आली आहे. मागील वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 31 हजार 103 शेतकऱ्यांना 108 कोटी 75 लक्ष रुपये, ग्रामीण बँकेने 5 हजार 901 सभासदांना 21 कोटी 15 लक्ष तर राष्ट्रीयकृत बँकांनी 70 कोटी 36 लक्ष इतके कर्जवाटप केले. तर सन 2019-20 या वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 27 हजार 998 शेतकऱ्यांना 110 कोटी, ग्रामीण बँकेला 5 हजार 310 शेतकऱ्यांना 25 कोटी 32 लक्ष आणि राष्ट्रीयकृत बँकांना 94 कोटी 68 लक्ष असे एकूण 230 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
        सन 2018-19 या वर्षात 595 कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून सन 2019-20 या वर्षात 2792 कृषिपंपांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
       बाघ आणि इटियाडोह प्रकल्पातून सन 2018-19 या वर्षात 29 हजार 342 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून सन 2019-20 या वर्षात 28 हजार 925 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पातून मागील वर्षात 8 हजार 320 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी 9 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) प्रकल्पाच्या 17 प्रकल्पातून मागीलवर्षी 469 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी 1560 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषदेच्या 2 हजार 69 लघु प्रकल्पातून आणि 1421 माजी मालगुजारी तलावातून 29 हजार 808 हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्यात आले असून यावर्षी लघु प्रकल्पातून 23 हजार 171 हेक्टर आणि  माजी मालगुजारी तलावातून 24 हजार 52 हेक्टर असे एकूण 47 हजार 223 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गोंदिया पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या 68 प्रकल्पातून 33 हजार 668 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील विविध प्रकल्पाच्या माध्यमातून 1 लाख 6 हजार हेक्टर सिंचन करण्यात आले तर यावर्षी 1 लाख 21 हजार 196 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.
        जिल्ह्यातील 100 धान खरेदी केंद्रावरुन सन 2018-19 च्या खरीप हंगामात 85 हजार 683 शेतकऱ्यांकडून 27 लक्ष 49 हजार 879 इतका धान खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत 474 कोटी 57 लक्ष इतकी आहे. कृषि विभागाच्या विविध योजनेअंतर्गत सन 2019-20 यावर्षाचा प्रस्तावित लक्षांक देण्यात आला आहे. सन 2018-19 या वर्षात कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 432 ट्रॅक्टर आणि 312 भात मळणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, भात कापणी यंत्र व भात मील देण्यात आले आहे. या दोन्ही बाबीवर 6 कोटी 91 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.
        सन 2019-20 या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत 150 क्रॉपसॅप सलग्न शेतीशाळा घेण्यात येणार आहे. रब्बी हंगामात ज्वारीचे 1300 हेक्टर आणि करडईचे 650 हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री.नाईनवाड यांनी दिली.
        सभेला बाघ व इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त श्री.शहारे, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, श्री.तुमडाम, श्री.तोडसाम यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment