जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 3 April 2019

जिल्ह्यातील 3558 दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

553 ग्रामपंचायत अंतर्गत 714 व्हील चेअर तर
नागरी क्षेत्रात 82 व्हील चेअर उपलब्ध  

           येत्या 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना व्हील चेअर, रॅम्स सह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
        जिल्ह्यात 3558 दिव्यांग मतदार या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 845, तिरोडा विधानसभा मतदारसंघात 903, गोंदिया विधानसभा मतदारसंघात 689 आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात 1121 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 439 अंध मतदार, 385 कर्णबधीर मतदार, 2255 अस्थीव्यंग मतदार आणि अन्य प्रकारचे दिव्यांगत्व असलेले 479 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतीअंतर्गत दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी 714 व्हील चेअरची तर तर 8 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात 82 व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
       भारत निवडणूक आयोगाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्वप्रकारच्या दिव्यांग मतदारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना दिल्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर दिव्यांगांना सहजपणे मतदान करता यावे यासाठी रॅम्स व व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना रांगेत प्रतिक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीतील मतदार स्लीप, अल्पदृष्टी मतदारांकरीता मॅग्नीफाईन ग्लास व डमी मतदान पत्र आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अंध असलेल्या मतदाराला मतदानासाठी सहकार्य करण्यासाठी मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने मतदान करण्यास एका व्यक्तीला सोबत नेण्याची परवानगी देण्यात येईल. दिव्यांग मतदाराला मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक तसेच दिव्यांग शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवक मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment