जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 4 April 2019

मतदार जागृती करणाऱ्या स्वीप एक्सप्रेसला निवडणूक निरीक्षकांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक



       येत्या 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गोंदिया शहरातील तसेच गोंदिया शहरात कामानिमीत्त येणारा मतदार मतदानासाठी प्रोत्साहित व्हावा यासाठी मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यातून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील नविन उड्डाणपुलाच्या भिंतीवर चित्राद्वारे साकारण्यात आलेल्या भंडारा-गोंदिया स्वीप एक्सप्रेसला आज भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी या एक्सप्रेसची पाहणी करुन हिरवी झेंडी दाखविली.
         यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिलीप सिल्लारे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,  शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.जाधव, तहसिलदार राजेश भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
         जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून रेखाटण्यात आलेल्या या स्वीप एक्सप्रेसमुळे मतदार जनजागृती करण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. कोणताही मतदार  मतदानापासून वंचित राहू नये हा संदेश स्वीप एक्सप्रेसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणूकीत शंभर टक्के मतदानाचे धोरण अवलंबीले आहे. निवडणूकीत विविध मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मोटार सायकल रॅली, मानव शृंखला आदी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
         उड्डाणपुलाच्या भिंतीवर साकारण्यात आलेली स्वीप एक्सप्रेस शहरवासीयांसोबत जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष्य वेधून घेणारी आहे. याठिकाणी वोटर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याठिकाणी नागरिक या रेल्वे गाडीच्या चित्रासमोर अर्थात स्वीप एक्सप्रेस समोर उभे राहून सेल्फी काढू शकतील. रेल्वे गाडीवर रेखाटलेले चित्र व दिलेले संदेश मतदान करण्यास प्रोत्साहन देणार आहे. या रेल्वे गाडीच्या चित्राला स्वीप (सिस्टेमॅटीक वोटर्स एज्यूकेशन ॲन्ड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन प्रोग्राम) एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. या गाडीचा नंबर 110419 म्हणजे निवडणूकीचा दिनांक 11 एप्रिल 2019 हा आहे. अनेकांनी कुतूहलतेने या एक्सप्रेसची पाहणी केली.
        यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अतुल देशपांडे, बँक ऑफ इंडियाच्या विना अग्रवाल, श्री सत्य साई संस्थेचे सुशील अग्रवाल, कुलदिपीका बोरकर, अन्य अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.

No comments:

Post a Comment