जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 11 April 2019

निवडणूक निरीक्षक डॉ. मिश्रांनी दिली अनेक मतदान केंद्राला भेट

मतदान प्रक्रीयेची केली पाहणी
   सखी व मॉडेल मतदान केंद्राला भेट
मतदारांशी साधला संवाद




17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज 11 एप्रिल रोजी जिल्हयात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु असतांना भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी गोंदिया जिल्हयातील अनेक मतदान केंद्रांना भेटी देवून मतदान प्रक्रीयेची पाहणी केली. मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांशी डॉ. मिश्रा यांनी संवाद साधला. मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांबाबत आपण समाधानी आहात काय याबाबत मतदारांकडून माहिती जाणून घेतली.
            डॉ. मिश्रा यांनी सकाळी 9 वाजता गोंदिया शहरातील महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 210 आणि 230 याची पाहणी केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही मतदारांनी एका राजकीय पक्षाचा बुथ हा मतदान केंद्राजवळ असल्यामुळे तो 200 मीटरपेक्षा अधिक दूर करावा. अशी मागणी केली. यावेळी डॉ. मिश्रा यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना त्वरीत निर्देश देत तो बुथ तात्काळ हटवून 200 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सुरु करण्याबाबत सांगितले. येथील 210 आणि 230 क्रमांकाचे मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून कार्यरत होते. या दोन्ही मतदान केंद्रावर एकूण 2560 मतदारांची नोंदणी होती. 210 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर श्रीमती के.एम. कोल्हटकर हया मतदान केंद्राध्यक्ष तर सौ. ठाकरे, सौ. डाके, सौ. कुंडे हया मतदान अधिकारी तर रेखा कुशवाह हया पोलीस शिपाई तर 230 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर माधवी राऊत हया मतदान केंद्राध्यक्ष तर माधूरी बावनकर, वैशाली बन्सोड, सायली तिडके तर महिला पोलीस शिपाई म्हणून सरीता पंधरे या महिलांकडे या दोन्ही मतदान केंद्रांचे कामकाज सोपविण्यात आले होते.
            गोंदिया येथील मनोहर मुन्सीपल उच्च प्राथमिक शाळेतील 211 व 213 क्रमांकाच्या तर कुडवा येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 145, 146 आणि 147, वसंतनगर येथील बी.एच.जे. महाविद्यालयात असलेल्या 177, 178,179, 180 व 183 या मतदान केंद्राला डॉ. मिश्रा यांनी भेट देवून तेथे मतदानासाठी बऱ्याच वेळेपासून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना त्रास होवू नये यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्याला निर्देश देवून या मतदारांना बसण्यासाठी पेंडॉलची व्यवस्था त्वरीत करण्यास सांगितले. यावेळी डॉ. मिश्रा यांनी प्रथमच मतदान करत असलेल्या नवमतदारांशी संवाद साधून प्रथमच मतदान करतांना त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. नवमतदारांसोबत त्यांनी छायाचित्र काढले. बी. एन . आदर्श सिंधी हायस्कूल विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथील 232, 233, 237 आणि 238 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट देवून  उपस्थित मतदारांशी, मतदार सहायता कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांशी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. मतदान केंद्रावर काही अडचणी आहेत का याबाबत त्यांनी विचारणा केली.
     तिरोडा तालुक्यातील दांडेगाव येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक कन्या शाळेतील 134, 135 आणि 136 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट दिली. एकोडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील  127, 128 आणि 129 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट देवून उपस्थित मतदारांशी संवाद साधला. मतदानासाठी येणाऱ्या वरिष्ठ नागरिक व दिव्यांगाना मतदान करण्यास प्राधान्य दयावे. असे मतदान केंद्राध्यक्षांना सांगितले. चुरडी येथील प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेल्या मॉडेल मतदान केंद्राला भेट देवून त्यांनी समाधान व्यक्त केले. एखादा कार्यक्रमाला साजेसे असे मतदान केंद्र सजविल्याबद्दल त्यांनी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी , स्वयंसेवक, बीएलओ यांचे कौतुक केले. या केंद्रावरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचा भारतीय पोषाख पाहून त्यांचे कौतुक केले. तिरोडा शहरातील सी.जे. पटेल महाविद्यालयात असलेल्या 79 क्रमांकाच्या सखी मतदान केंद्राला भेट देवून केंद्राध्यक्ष पी.बी. कटरे, मतदान अधिकारी सुरेखा रहांगडाले, आरती सादतकर, वृंदा तुमसरे, निलू लारोकर व महिला पोलीस शिपाई निकिता आजबले यांचेकडून मतदान प्रक्रीयेचे माहिती जाणून घेवून काही अडचणी येत आहेत का याबाबत विचारणा केली. तसेच तिरोडा शहरातील शहीद मिश्रा विद्यालयातील 83 व 84 क्रमांकाच्या मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी डॉ. मिश्रा यांनी भेट दिली तेथील मतदान प्रक्रीया व उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
                                                                   

No comments:

Post a Comment