जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 30 September 2016

डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी - आ.गोपालदास अग्रवाल

गोंदिया, दि.30 : जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना डॉ.सूर्यवंशी यांनी सर्वांना सोबत घेवून काम केले आहे. जिल्ह्यात सर्वांशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. जिल्ह्यात सारस महोत्सव, कायापालट योजना यासह अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळे डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी आहे, असे गौरोदगार राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल यांनी काढले.
            29 सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून दिल्ली येथे बदली झाल्यामुळे आयोजित निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे होते. आरती सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, उपविभागीय अधिकारी मोहन टोणगावकर, सुनिल सूर्यवंशी, जिल्हा खनीकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            आ.अग्रवाल पुढे म्हणाले, देशाच्या संरक्षण मंत्रालयाला देखील डॉ.सूर्यवंशी यांच्या सारख्या सनदी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. गोंदिया शहराच्या स्वच्छतेत त्यांनी पुढाकार घेवून प्रत्यक्षात स्वच्छतेला सुरुवात केली. आपल्या 24 वर्षाच्या काळात डॉ.सूर्यवंशी यांच्यासारखे जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाले नसल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले.
        सत्काराला उत्तर देतांना डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वांकडून चांगले सहकार्य मिळाल्यामुळे आपण विविध उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. जिल्ह्यात पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला भरपूर वाव आहे. लोकांना जेव्हा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात तेव्हाच ते सोडविण्यासाठी आपल्याकडे   येतात.
            आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान झाले पाहिजे असे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, चांगले काम केले तर आपण नक्की यशस्वी होतो. केलेल्या कामातून लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद दिला पाहिजे. चौकटीबाहेर काम करुन जास्तीत जास्त लोकांना आपली मदत झाली पाहिजे. ज्या पदावर आपण काम करीत आहोत तेथे ध्येय ठेवून विकासात योगदान दिले पाहिजे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            श्री.मोहिते म्हणाले, गोंदिया हा नक्षल जिल्हा असल्याची ओळख पुसून डॉ.सूर्यवंशी यांनी पर्यटनात जिल्ह्याची नविन ओळख करुन दिली आहे. महाराजस्व अभियान, पर्यटन, महसूल वसूलीचे उद्दिष्ट पूर्ण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणसांचा लोकसेवक म्हणून डॉ.सूर्यवंशी यांनी काम केले आहे.
            श्री.महिरे म्हणाले, कामानिमीत्त भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस आस्थेवाईकपणे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी करायचे. खऱ्या अर्थाने लोकसेवकाची भूमिका जिल्हाधिकारी यांनी पार पाडली आहे. प्रत्येक व्यक्तीला समजून घेवून त्यांच्या अडचणी देखील ते विचारत असायचे. विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ त्यांच्याच पुढाकारामुळे लाभार्थ्यांना वेळेत मिळाला.
             यावेळी उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके, तिरोडा उपविभागीय अधिकारी सूनिल सूर्यवंशी, देवरी तहसिलदार संजय नागटिळक, लेखाधिकारी श्री.बाविसकर, संजय धार्मिक, चैताली मानकर, संतोष शेंडे, वाहन चालक श्री.तिवारी, परिचर श्री.नाकाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
          अपर जिल्हाधिकारी मोहिते यांनी डॉ.सूर्यवंशी व श्रीमती सूर्यवंशी यांना सारस पक्षांचे दोन तैलचित्र तसेच सर्व तहसिलदार यांनी देखील सारस पक्षाचे तैलचित्र भेट म्हणून दिले.
            कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, गोंदियाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार सर्वश्री अरविंद हिंगे, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, रविंद्र चव्हाण, साहेबराव राठोड, प्रशांत सांगडे, प्रशांत घोरुडे, सहायक अधीक्षक श्री.किरीमकर, सहायक लेखा अधिकारी कुलदिप गडलिंग, नियोजन अधिकारी श्री.कडू, लेखाधिकारी श्री.मसराम, नायब तहसिलदार विलास कोकवार, नाझर श्री.मेनन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, मंडळ अधिकारी श्री.कोल्हटकर, आकाश चव्हाण, श्री.झरारीया, श्री.राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले. उपस्थितांचे आभार लेखाधिकारी श्री.बाविसकर यांनी मानले.

                                                                        00000

Thursday 29 September 2016

गोंदिया कायम मनात राहील - डॉ.विजय सूर्यवंशी




गोंदिया, दि.29 : गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असून निसर्गाने जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे. प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका नेहमी असली पाहिजे. दीड वर्षाच्या कार्यकाळात सारस फेस्टीव्हल, लाईफ लाईन एक्सप्रेस, कायापालट उपक्रम आपण यशस्वीपणे राबविले असून इथल्या नागरिकांनी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रेमामुळे गोंदिया जिल्हा माझ्या कायम मनात राहील. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून केंद्र सरकारमध्ये बदली झाली. यानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने 28 सप्टेबर रोजी बाहेकर लॉन गोंदिया येथे आयोजित निरोप समारंभात सत्काराला उत्तर देतांना डॉ.सूर्यवंशी बोलत होते.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, बिरसी विमानतळ प्राधिकरणचे व्यवस्थापक सुभाष प्रजापती, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले, भंडारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, डॉ.दिपक बाहेकर, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, प्रशासनात काम करतांना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून मनापासून जबाबदारीने काम केले पाहिजे. विकासाच्या बाबतीत सातत्याने सहकार्य करण्याची भूमिका जिल्हावासीयांची दिसून आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे काम अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून होत असल्याचे गौरोदगारही त्यांनी काढले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, जिल्हाधिकारी यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू आहे. त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी आहे, ते जिथे जातील तिथे आपली छाप पाडतील. आपले ऋणानुबंध असेच कायम राहतील असेही त्यांनी सांगितले.
डॉ.भुजबळ म्हणाले, प्रशासनाचा प्रमुख म्हणून विधायक दृष्टीकोन ठेवून जिल्हाधिकारी यांनी काम केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवे उपक्रम राबवून यशस्वीपणे काम केले आहे. त्यांची पुढील वाटचाल अशीच कायम राहो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. गोंदियातील अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती म्हणजे गोंदियाची एकता आहे. जिल्ह्यात ऑफिसर्स क्लब होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.प्रजापती म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एखादे उपक्रम किंवा अभियान राबवितांना ते दूरदृष्टीकोन ठेवून काम करतात. त्यांच्यात अष्टपैलू वृत्ती आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.सूर्यवंशी यांनी, होश वालो को खबर क्या, गोंदिया क्या चीज है...  गोंदिया आयीए, सारस देखिए... अशी गझल म्हणून सर्व उपस्थितांची मने जिंकली.
डॉ.पुलकुंडवार यांनी, एक अजनबी हसीनासे यु मुलाखात हो गयी... हे गीत तर डॉ.भुजबळ यांनी, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा... हे भावगीत सादर केले.
यावेळी गोंदिया येथून स्थानांतरण झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, नव्याने जिल्ह्यात रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांचेही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, समाज कल्याणचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम व राजेश देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, विभागीय वन अधिकारी श्री.कातोरे, सहायक वनसंरक्षक श्री.शेंडे, कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, केटीएसचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल परियाल, नेत्रतज्ज्ञ डॉ.राजेंद्र अग्रवाल, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक अश्वीन ठक्कर, विनोद चौधरी, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजीव दोडके, उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे, डॉ.काळे, डॉ.जयस्वाल, उपविभागीय अभियंता संजय कटरे, सुबोध कटरे, लेखाधिकारी श्री.बाविसकर, कार्यकारी अभियंता विलास निखारे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप अग्रवाल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, डॉ.मनोज राऊत, डॉ.विनोद जायसवाल, समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, शाखा अभियंता गोवर्धन बिसेन, सांख्यिकी अधिकारी श्री.राऊत, दुलीचंद बुध्दे, विस्तार अधिकारी श्री.लिचडे, विठ्ठलराव भरणे, लिलाधर पाथोडे, तुलसीदास झंझाड यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भंडारा येथील डॉ.चेतन राणे यांनी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.यु.रहांगडाले यांनी केले. संचालन दुलीचंद बुध्दे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार लिलाधर पाथोडे यांनी मानले.

                                                            00000

Monday 26 September 2016

जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची गरज - डॉ.विजय सूर्यवंशी



गोंदिया,दि.26 :  कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता, या आपत्तीतून होणारी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी लोकसहभागातून आपत्तीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
         आज 26 सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरण पुणे येथील पाचव्या बटालीयनचे मेजर दुली चंद, मेजर ददन तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्त्ती व्यवस्थापनाच्या बटालीयनने पाच दिवसाच्या वास्तव्याच्या काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त जणांना आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दयावे. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे ज्ञान डॉक्टर पासून तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असले पाहिजे. पूरपरिस्थितीच्या काळात योग्य समन्वय राहावा यासाठी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवनी, तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचीही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील 85 गावे पुराने बाधित होतात. या गावातील नागरिकांनी पूरपरिस्थितीच्या काळात पूरस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात. मानवनिर्मीत होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नेहमी सतर्क राहावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
        प्रास्ताविकातून श्री.महिरे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची चमू पाच दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात आग प्रतिबंधक, पूरपरिस्थिती नियंत्रण याबाबतची रंगीत तालीम देणार आहे. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी स्थानिक स्तरावर तयारी करावी असेही सांगितले. या प्रशिक्षणाची जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेवून आपत्तीच्या काळात या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
         श्री. दुली चंद यांनी आपत्तीबाबत प्रत्येकाने जागृत असणे गरजेचे असल्याचे सांगून कोणत्याही प्रसंगी सजग राहण्याची आवश्यकताही त्यांनी विशद केली.
        यावेळी एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार, बचाव कार्य, आपत्तीच्यावेळी घेण्यात येणारी दक्षता, घरात उपलब्ध असलेल्या संसाधनाचा आपत्त्तीच्या काळात कसा उपयोग करावा याबाबतची माहिती देण्यात आली.
        बचाव व मदत कार्यात उपयोगात येणारी साहित्य व साधने, स्वयंचलीत डोंगे, कटर, कामात येणारे अवजारे, बोल्ड कटर, कम अलाँग, सरप्राईडर कटर, रेस्प्रो कटींग सॉ, एअर लिफ्टींग बॅक, चिपींग हॅमर, ड्रील मशीन तसेच पूरपरिस्थितीच्या काळात उपयोगात येणारे साहित्य, आऊट बोर्ड मोटर, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, लाईफ लाईन, प्रथमोपचार पेटीतील साहित्य याबाबतचे प्रदर्शन एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने लावण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना बटालीयनच्या सैनिकांनी माहिती दिली.
         एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनचे सैनिक एम.विजयन, डि.एम.मितकीरी, राजेंद्र जाट, माहीर जालंदर, राजीवकुमार, राकेशकुमार पाठक, एस.एस.पांडे, के.एस.जौनध्याल, आर.सिल्व्हाकुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासह माहिती दिली.
         कार्यशाळेला प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे, प्रा.डॉ.कविता राजाभोज, सहायक अधीक्षक श्री.किरीमकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रविणकुमार, व्ही.सी.कोल्हटकर, संजय सांगोडे, विविध महाविद्यालयाचे समन्वयक, मनोहर म्युन्सीपल विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, महावीर मारवाडी विद्यालय, जे.एम.हायस्कूल, एन.एम.डी.कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, व्हाईट आर्मीचे युवक, गृहरक्षक दल, पोलीस दलचे जवान यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.

00000

Friday 23 September 2016

आत्मविश्वास व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त - डॉ.जितेंद्र रामगावकर



गोंदिया,दि.23 : खिलाडू वृत्तीने चांगले काम केल्यास यश नक्की मिळते. जीवनात आत्मविश्वास वाढीसाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केले.
       जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-2016 चा समारोप बक्षीस व पारितोषिक वितरण आज (ता.23) कारंजा येथील पोलीस कवायत मैदान येथे डॉ.रामगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सर्वश्री रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), दिपाली खन्ना (आमगाव), परिविक्षाधीप पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, आयबीचे श्री.पशीने यांची प्रमुख उपस्थिती होती.
       डॉ.रामगावकर पुढे म्हणाले, मानसिकता व सांघिकवृत्ती या सांघिक भावना वृध्दींगत होण्यास क्रीडा स्पर्धा हया उपयुक्त आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारी आपल्या कुटुंबांपासून दूर राहून देशाची व राज्याची सेवा करतात. शारिरीक तंदुरुस्त राहण्यास खेळ अत्यंत उपयुक्त आहे. आजारांना दूर ठेवण्यास खेळांची महत्वाची भूमिका आहे. अशाप्रकारच्या खेळातून आपले अंगी असलेले क्रीडा कौशल्य दाखविण्यास मदत होते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
        प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, प्रत्येक क्रीडा स्पर्धेत खेळाडूने सहभाग घेतला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खिलाडू वृत्तीचा परिचय दिला. चंद्रपूर येथे होणाऱ्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत निश्चित चांगली कामगीरी बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
        यावेळी सांघिक खेळाचे विजेता व उपविजेता संघांना पाहुण्यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये फुटबॉल (पुरुष) प्रथम- पोलीस मुख्यालय गोंदिया, द्वितीय- तिरोडा विभाग. हँडबॉल (पुरुष) प्रथम- देवरी विभाग, द्वितीय- आमगाव विभाग, व्हॉलीबॉल (पुरुष) प्रथम- पोलीस मुख्यालय गोंदिया, द्वितीय- आमगाव विभाग, व्हॉलीबॉल (महिला) प्रथम- गोंदिया विभाग, द्वितीय- पोलीस मुख्यालय, बास्केटबॉल (पुरुष) प्रथम- देवरी विभाग, द्वितीय- आमगाव विभाग. बास्केटबॉल (महिला) प्रथम- गोंदिया विभाग, द्वितीय- पोलीस मुख्यालय. कबड्डी (पुरुष) प्रथम- आमगाव विभाग, द्वितीय- देवरी विभाग. कबड्डी (महिला) प्रथम- पोलीस मुख्यालय, द्वितीय- गोंदिया विभाग. खो-खो (पुरुष) प्रथम- तिरोडा विभाग, द्वितीय- आमगाव विभाग, खो-खो (महिला) प्रथम- पोलीस मुख्यालय, द्वितीय- गोंदिया विभाग. हॉकी (पुरुष) प्रथम- देवरी विभाग, द्वितीय- पोलीस मुख्यालय. उत्कृष्ट धावपटू (महिला) ज्योती बांते- पोलीस मुख्यालय गोंदिया, उत्कृष्ट धावपटू (पुरुष) हिमेश भुजाडे- तिरोडा विभाग. सर्वसाधारण विजेतेपद (महिला) पोलीस मुख्यालय, सर्वसाधारण विजेतेपद (पुरुष) देवरी विभाग यांना देण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धेत कविता शेडमासे- प्रथम, निलीमा पवार- द्वितीय, भुमेश्वरी सोनवाने- तृतीय यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अधिकारी व निमंत्रीतामध्ये रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. अधिकारी संघाने यामध्ये बाजी मारली. पोलीस बँड पथकाने सुरेख धुन वाजविली.
       कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे पारिवारीक सदस्य तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी मानले.

                                                                        00000

Wednesday 21 September 2016

क्रीडा कौशल्य दाखवून जिल्ह्याचा नावलौकीक करा - न्या.गिरटकर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उदघाटन


पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेतून आपले क्रीडा कौशल्य दाखवून राज्य व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून जिल्ह्याचा नावलौकीक करावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी.गिरटकर यांनी केले.
            आज 21 सप्टेबर रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-2016 चे उदघाटन करतांना न्या.गिरटकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर (तिरोडा), श्रीमती दिपाली खन्ना (आमगाव), मंदार जवळे (देवरी), रमेश बरकते (गोंदिया) व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, खिलाडी वृत्तीतून विविध खेळात प्राविण्य दाखविण्याचा प्रयत्न या क्रीडा स्पर्धातून होत आहे. गुणवंत खेळाडूंची निवड या स्पर्धेतून पुढील खेळांसाठी करण्यात येते. या स्पर्धेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरीरीने भाग घेवून पुढील स्पर्धेसाठी चांगली कामगीर करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.
            जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत आमगाव, देवरी, गोंदिया, तिरोडा व गोंदिया पोलीस मुख्यालयातील जवळपास 300 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील खेळाडूंनी सुरेख पथसंचलन केले. गायत्री बरेजू व सनद सुपारे या खेळाडूंनी आणलेल्या मशालीने न्या.गिरटकर यांनी दीप प्रज्वलीत केली. चंद्रबहादूर ठाकूर या खेळाडूंनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. मान्यवरांनी यावेळी विविध रंगांचे फुगे आकाशात सोडले. यावेळी न्या.गिरटकर यांना पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी स्मृतीचिन्ह भेट दिले.
            यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आमगाव व देवरी संघादरम्यान कबड्डीचा उदघाटकीय सामना घेण्यात आला. यामध्ये आमगाव संघाने विजय संपादन केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मुख्यालयाचे राखीव पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक यांचेसह विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी मानले.
                                                00000
           


Thursday 8 September 2016

संवादपर्वातून दिली योजनांची माहिती , योजनांचा लाभ घेवून जीवन सुखकर करा - तहसिलदार सांगडे : अर्धनारेश्वरालय येथील गणेश मंडळात संवादपर्व कार्यक्रम




        गोंदिया,दि.8 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसते. योजनांची माहिती संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी लाभार्थ्यांना प्रभावीपणे दिली पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेवून आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी केले.
       सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय मंदिरातील गणेश मंडळात 7 सप्टेबर रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध योजना, ध्येय-धोरणे व निर्णयांची माहिती देण्यासाठी संवादपर्व या जनप्रबोधनात्मक कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री.सांगडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, बाल विकास प्रकल्प (नागरी) अधिकारी बी.डी.पारखे, महिला व बाल कल्याणचे परिविक्षा अधिकारी आर.एन.बोधले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अर्धनारेश्वरालय ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे, सचिव बाजीराव तरोणे, प्रा.डॉ.नामदेव हटवार, आमगाव (खुर्द) ग्रा.प.सदस्य ब्रजभूषण बैस यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.सांगडे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधन करण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. या उत्सवाच्या माध्यमातून युवाशक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येत आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्यात येत आहे. याच माध्यमातून शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांना व नागरिकांना माहीत व्हाव्यात यासाठी संवादपर्व उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा, आपले सरकार, महा स्कीम यासह अन्य योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकरी कडधान्य पिकाकडे वळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 50 टक्के अनुदानावर कडधान्य बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       डॉ.हुबेकर म्हणाल्या, मनुष्य आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन स्त्रीभ्रुण हत्या करीत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. मुलामुलींच्या जन्मदराच्या संख्येत संतुलन साधले पाहिजे. मुलगा ज्याप्रमाणे वंशाचा दिवा आहे त्याचप्रमाणे मुलगी सुध्दा पणती आहे. ती दोन्ही घरांचा सांभाळ करते. मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुली कुपोषित होवू नये यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. यावेळी त्यांनी जननी शिशु सुरक्षा योजना, जीवनदायी आरोग्य योजना, 108 क्रमांक व 104 क्रमांक यासह अन्य आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली.
         श्री.पारखे म्हणाले, शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे. मुलीचा जन्मदर वाढला पाहिजे. ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत जास्त आहे त्या गावांचा सन्मान व बक्षिस शासन देणार आहे. मुलींचा जन्म नाकारला जात असल्यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
        श्री.बोधले म्हणाले, महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला व बालकांच्या कल्याणासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. बाल संगोपन ही योजना निराधार बालकांच्या संगोपनासाठी उपयुक्त आहे. मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामुहिक योजना राबविण्यात येते. मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून पिडीत महिला व मुलींना आर्थिक स्वरुपात मदत करण्यात येते असे ते म्हणाले.
           प्रा.डॉ.हटवार यांनी सांगितले की, बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या विरोधात भारतीयांना जागृत करण्यासाठी तसेच त्यांचे प्रबोधन करण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी काही योजनांची समिक्षा होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
           श्री.बैस यांनी जिल्ह्याच्या विकासात विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्वाचे योगदान आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांसोबतच नागरिकांची भूमिका महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
          प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी संवादपर्व या जनप्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात करण्यात येत असल्याचे सांगून शासनाच्या लोकोपयोगी योजना, ध्येय-धोरणे, अभियान व निर्णयाची माहिती संवादपर्वच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
           प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते गणेश मुर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बाजीराव तरोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. यावेळी हलबीटोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

                                                                                    00000

जिल्हाधिकाऱ्यांनी पदमपूरात साधला विद्यार्थ्यांशी संवाद , विद्यार्थ्यांनी अनुभवला वाचनाचा आनंद , दप्तरविरहित दिवसामुळे आनंदाचे वातावरण




        गोंदिया,दि.8 : विविध शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात नावलौकीक मिळविलेल्या गोंदिया जिल्ह्याने 8 सप्टेबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिन साजरा करुन वाचनाचा आनंद अनुभवला. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमधूनच वाचनीय पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. या पुस्तकामध्ये थोर पुरुषांचे जीवनचरित्र, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना दप्तरविरहित दिनामुळे सुट्टी देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध वैचारीक स्वरुपातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचारसरणी तयार व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिनाच्या निमित्ताने पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांसोबतच गावात व शेजारच्या गावात असलेल्या सार्वजनिक वाचनालयातून वाचन आनंद दिवसासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचानाची आवड निर्माण होत असल्याचे यामधून दिसून आले. वाचन चळवळ भक्कम करण्यासाठी दप्तरविरहित दिवस उपयुक्त ठरला.
            जिल्ह्याचे उपक्रमशील व लोकाभिमुख जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याच संकल्पनेतून दप्तरविरहित दिवस जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी आमगाव तालुक्यातील आदर्श गाव व महाकवी भवभूती यांची जन्मभूमी असलेल्या पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे तर होत्याच, सोबत जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी आणि आई सुशिलाबाई सूर्यवंशी देखील उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आईवडील देखील या दप्तरविरहित दिनाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांची उपस्थिती तर अनेकांना प्रेरणादायी ठरली. नामदेवराव सूर्यवंशी हे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आई सुशिलाबाई हया राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या आईवडिलांनी सुध्दा विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
           जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी 8 व्या वर्गातील विद्यार्थ्यांशी डिजीटल वर्गात संवाद साधला. आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांना पदमपूर गावाचे वैशिष्ट्य विचारले. महाकवी भवभूतीचा इतिहास सुध्दा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला. कोणकोणती पुस्तके वाचता, शाळा सुटल्यानंतर काय करता, सकाळी किती वाजता उठता, कोणाच्या घरी शौचालय नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. फुटबॉलपटू रोनाल्डो, मेसी, ऑलिम्पीक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची माहिती, संत पद मिळालेल्या मदर टेरेसा यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.
         उपस्थित विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न देखील विचारले. तुमचा आदर्श थोरपुरुष, आवडते पुस्तक, आवडता खेळ तर जिल्हाधिकारी पदावर जाण्याची प्रेरणा तुम्हाला कोणापासून मिळाली असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत त्या प्रश्नाचे उत्तर आईवडील हे सांगताच आईवडील हे प्रेरणादायी आणि पहिले गुरु असतात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. याच शाळेत आता आम्हाला 10 व्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शाळेतील सर्व वर्गात जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक वर्गात जिल्हाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात केले. शाळेचा रमनीय परिसर, स्वच्छता व शिस्त आणि गणवेशात असलेली जिल्हा परिषद शाळेतील मुलांना भेटून जिल्हाधिकारी त्यांच्याच संकल्पनेतील दप्तरविरहित दिनात आनंदी दिसत होते. शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील शिक्षक वर्ग, ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांशी देखील जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा दप्तरविरहित दिनामुळे योग आल्याचे बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

00000

पदमपूर येथे दप्तरविरहित दिवस साजरा विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेवून यशाची शिखरे गाठावी - उषा मेंढे : शिक्षणाचा प्रगतीसाठी उपयोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन




        गोंदिया,दि.8 : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्व दयावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पुर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी असे आवाहन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
      8 सप्टेबर रोजी आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशिलाबाई सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सिताबाई पाथोडे, उपसरपंच श्री.किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.घोषे, केंद्रप्रमुख श्री.रामटेके, रुम टू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, पोलीस निरिक्षक श्री.सांडभोर, पत्रकार ओ.बी.डोंगरवार, नरेश रहिले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते असेही मेंढे यावेळी म्हणाल्या.
       डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात 50 ते 60 वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
      दर महिन्यातून एकदा जिल्ह्यातील वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी विविध शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून आम्ही कसे घडलो याबाबतची माहिती प्रेरणा दिनातून देत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळत आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी भरपूर खेळले पाहिजे तसेच भरपूर अभ्यास सुध्दा केला पाहिजे. आईवडिलांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळे आपण या पदापर्यंत पोहोचल्याचे सांगितले. मुलांच्या आयुष्यात यशस्वी होण्यात त्यांच्या गुरुजनांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या मार्गदर्शनातूनच पुढे जायचे असते असेही त्यांनी सांगितले.
         सुशिलाबाई सूर्यवंशी बोलतांना म्हणाल्या, धनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खुप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमीत घ्यावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या.
        प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी परिपाठ सादर केला. सर्व धनापेक्षा विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन असल्याचा सूविचार विद्यार्थ्यांनी सांगितला. दिन विशेषाचा उल्लेख करतांना आज जागतिक साक्षरता दिन व दप्तरविरहित दिन असल्याचे सांगितले. भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, माणूसकी ही बोधकथा, आठच्या पाढ्याचे सामुहिक वाचन, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावरुन सारे जहाँ से अच्छा हिंदूस्ता हमारा या गीताचे कवी इकबाल, संगणकाचा संशोधक, भारताची उडन परी, आद्यक्रांतीकारक यावर सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या गटाने उपस्थित विद्यार्थ्यांना विचारले. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली.
       तहसिल कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार, श्री.देशमुख, शाळेतील शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, माता पालक संघ, शिक्षक पालक संघउ  यांचे पदाधिकारी, तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार यांनी मानले.

00000

Friday 2 September 2016

पोषाहाराचे महत्व सर्वसामान्यांना कळावे - अधिष्ठाता डॉ.केवलीया

राष्ट्रीय पोषाहार सप्ताह
       व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती महिलेला योग्य पोषाहार वेळेत मिळाला तर त्यांचे आरोग्य निश्चित चांगले राहील. असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांनी व्यक्त केले.
          1 सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाचे उदघाटक म्हणून डॉ.केवलीया बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, मेट्रन निरंजन फुलझेले यांची उपस्थिती होती.
          डॉ.केवलीया पुढे म्हणाले, कशाप्रकारे आहार घ्यावा याबाबत काही पध्दती आहेत. काही पध्दतीबाबत भ्रम सुध्दा आहेत. आहार तज्ज्ञांनी जनमाणसामध्ये पोषाहाराबाबत असलेला गैरसमज दूर करण्याचे काम करावे.
          डॉ.पातुरकर म्हणाले, आपण काय खातो, कसे खातो, किती खातो हे आहारात महत्वाचे आहे. मानवी आहारात जीवनसत्व, धातू, खनीजे यांचा समावेश असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहून सकस आहार घेतला पाहिजे. किती खावे याची सुध्दा मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
          प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदेवता धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 1 ते 7 सप्टेबर दरम्यान चालणाऱ्या पोषाहार सप्ताहनिमीत्त लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनय पटले, एकता मोगरे, योगेश वलथरे व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार आहारतज्ज्ञ शिल्पा आंबेकर यांनी मानले.

                                                          00000

Thursday 1 September 2016

अवयवदानामुळे दुसऱ्यांना जीवन जगण्याची संधी - डॉ.विजय सूर्यवंशी

मानवाला डोळे, यकृत, हृदय व मुत्रपिंड यासारख्या अवयवांची दिलेली अवयवरुपी भेट ही मृत्यूनंतरही दुसऱ्या गरजू रुग्णांना दान करता येवू शकते व मृत्यूच्या क्षणावर असलेल्या रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
            आज 1 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे महाअवयवदान अभियानाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, प्रा.डॉ.व्ही.पी.रुखमोडे, प्रा.डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन, सनदी लेखापाल श्री.जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
            डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत महा अवयवदान अभियान राबविण्यात आले. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मरावे परी अवयवदानारुपी उरावे असेच म्हणावे लागेल. मृत्यूनंतर आपल्या शरीरावर आपला काहीच अधिकार राहत नाही, तो मातीमोल असतो. परंतू अवयवदानामुळे आपण मृत्यूनंतरही एका नवीन व्यक्तीला जीवनदान देवू शकतो असेही त्यांनी सांगितले.
            गोंदिया जिल्हा निसर्गसंपन्न असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात वनसंपदा व जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. आपल्या कारकिर्दीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले याचा आपल्याला अभिमान असून या महाविद्यालयाचे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी डॉ.अजय केवलीया व डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी शासनाकडून महा अवयवदान अभियान राबविण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली व त्याचे महत्व पटवून दिले व मृत्यूनंतर प्रत्येकाने अवयवदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी अवयवदान महान कार्य या विषयावरील व्याख्यानातून डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन व श्री.जैन यांनी मार्गदर्शन केले. महा अवयवदान निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा  पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल, मनोहर म्युन्सीपल हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनियर कॉलेज, डी.बी.सायंस कॉलेज, एस.एस.ए.एम.गर्ल्स हायस्कूल व श्रीमती सरस्वतीबाई महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
            जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाला डॉ.सुवर्णा हुबेकर, डॉ.सुरेखा मेश्राम, डॉ.तोटे, डॉ.श्रीखंडे, डॉ.जयस्वाल, सविता बेदरकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.संगीता भलावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रवीण जाधव यांनी मानले.