जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 31 October 2017

सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी

  • जिल्हाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ  
                                 • एकदा दौडमध्ये अनेकांचा सहभाग



        देशाचे पहिले गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात माँ बम्लेश्वरी देवस्थान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान एकता दौड आयोजित करण्यात आली. या दौडला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. दौडमध्ये जिल्हाधिकारी काळे यांचेसह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज प्रामुख्याने सहभागी झाले.
      एकता दौड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केले. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
      जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, जि.प.मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री.मडावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बागडे, श्री.राठोड, श्री.भांडारकर, लेखाधिकारी श्री.बावीस्कर, कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथोडे, दुलीचंद बुध्दे, तुलसीदास झंझाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.चौरागडे, श्री.मेनन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशिक्षणार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Sunday 29 October 2017

नुकसान झालेल्या धानासाठी प्रोत्साहन अनुदान देणार - राजकुमार बडोले

गोठणगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ


              जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे 25 टक्के शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केलेली नाही. अवकाळी पावसामुळे व वादळामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आता तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धानाची नुकसान भरपाई म्हणून प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे 28 ऑक्टोबर रोजी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उदघाटन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, रघुनाथ लांजेवार, उपविभागीय अधिकारी श्रीमती लांडगे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, आदिवासी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.राजुरकर, गोठणगाव सरपंच श्रीमती चांदेवार, प्रतापगडच्या सरपंच इंदू वालदे, सोसायटीचे अध्यक्ष शिबू कोवे, उपाध्यक्ष भोजराम लोगडे, पोलीस पाटील श्री.सांगोळे यांची उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, जिल्ह्यात कमी झालेल्या पावसाचा विषय आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. जिल्ह्यातील दोन वर्षापूर्वीची धान खरेदी केंद्राची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक आहे. 3 वर्षापूर्वी धान भरडाईसाठी 10 रुपये प्रति क्विंटल दर होते आज हेच दर 40 रुपये आहे. पूर्वी सहकारी संस्थांनी खरेदी केलेला धान उघड्यावर पडून राहायचा त्यामुळे धानाचे नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायचे. आता धान केंद्राच्या अन्न महामंडळाला न देता राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला देतो. धान खरेदी केंद्रावरुन त्याची लवकर उचल करुन त्याची भरडाई करुन आपल्या जिल्ह्याचा तांदूळ राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून पोहचत आहे. त्यामुळे लाभार्थ्याला चांगला तांदूळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
       गोदामाच्या भाड्याचे प्रलंबीत पैसे लवकर देणार असल्याचे सांगून श्री.बडोले यावेळी म्हणाले की, सोसायट्यांकडे स्वत:च्या मालकीची जर जागा असेल तर त्याठिकाणी गोदामे बांधण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. गोदामे बांधून देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून देखील धान ठेवण्यासाठी गोदामे व ओटे बांधून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण करण्याबाबतचे निर्देश कृषि विभागाला दिल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, नुकसान भरपाई देण्यासाठी शासन तयार आहे. राज्य सरकारने आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे नियमीत कर्ज भरतात. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असे त्यांनी सांगितले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, धानावर येणारी रोगराई आणि धान खरेदी बाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. धान पिकावर तुडतुडा या ‍किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळाली पाहिजे. येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या निश्चित मार्गी लागतील असेही त्या यावेळी म्हणाल्या.
      प्रारंभी पालकमंत्री पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते मधुकर पुस्तोडे या शेतकऱ्याने खरेदी केंद्रावर आणलेल्या धानाची काट्यावर तोलाई करुन धान खरेदीचा शुभारंभ केला. कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक, सभासद व परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे सचिव योगीराज हलमारे, भोदू लोगडे, भोजराम लोगडे, श्री.दरवडे यांच्यासह संस्थेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.राजुरकर यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.हटवार यांनी मानले. 

Friday 27 October 2017

वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढा - पालकमंत्री बडोले

        मागील दोन वर्षापासून वनहक्क जमिनीच्या पट्टयांची प्रकरणे प्रलंबीत आहे. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्टयांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही प्रकरणे तातडीने निकाली काढा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वनहक्क पट्टे प्रकरणांचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे. अनेक वर्षापासून लाभार्थी वनहक्क पट्टयांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या प्रकरणी सुरु असलेल्या संथ कार्यवाहीमुळे त्यांच्यामध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून येत आहे. ही प्रकरणे तातडीने निकाली काढले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयातच शिबीर आयोजित करण्यात येईल.
       आठ दिवसाच्या आत गाव समिती, तालुका समिती, उपविभागीय स्तरावरील समिती व जिल्हास्तरीय समितीकडे किती प्रकरणे प्रलंबीत आहेत हे संबंधित अधिकाऱ्यांनी बघावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, अर्जुनी/मोर व सडक/अर्जुनी तालुक्यासाठी 15 दिवसाच्या आत शिबीर आयोजित करावे. त्यामुळे वैयक्तीक वनहक्क पट्टयांचे प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील प्रलंबीत असलेल्या वनहक्क पट्टयांबाबत सातत्याने संबंधित स्तरावरुन आढावा घेण्यात येत असून ही प्रकरणे तातडीने निकाली निघावेत यासाठी प्रशासन गांभीर्याने काम करीत असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्री.मोहिते यांनी यावेळी सांगितले.
00000

     

अंत्योदय व दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणार - राजकुमार बडोले

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा
         जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्य देण्यात येते. या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करणार असल्याचे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रास्तभाव दुकानातून धान्य घेणाऱ्या अंत्योदय व दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवाई, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.भंडारी, गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, अन्न ही मुलभूत गरज आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांची गरज पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभापासून गरजू व पात्र असलेला लाभार्थी हा वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.
      जिल्ह्यात ई-पॉसच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण होत असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यालाच हे धान्य मिळत असल्याचे समाधान व्यक्त करुन श्री.बडोले म्हणाले, आता लाभार्थ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे कशा मिळतील याचे नियोजन करण्यात येत आहे. विविध योजनांचा त्यांना लाभ मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावून ते दारिद्रय रेषेच्यावर कसे येतील यादृष्टीने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करणार असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, मेळाव्याच्या आयोजनानंतर  निश्चितच त्यांना आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ मिळालेला असेल असे नियोजन करण्यात येईल. पुरवठा विभागाने योजनांचा या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मेळाव्याला सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.

       जिल्ह्यात 77 हजार 181 अंत्योदय योजनेचे लाभार्थी असून त्यांना 2 रुपये प्रति किलो दराने तांदूळ व 3 रुपये प्रति किलो दराने गहू देण्यात येतो. एप्रिल 2017 पासून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येत असल्याची माहिती श्री.सवाई यांनी यावेळी दिली.

दलित वस्त्यांवर आराखड्यानुसारच निधी खर्च व्हावा - पालकमंत्री बडोले

अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेचा आढावा
जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या कुटूंबाच्या विकासाच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत बृहत आराखडा तयार करावा. आराखड्यात मंजूर असलेल्या कामावरच योजनेतील निधी खर्च करावा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अण्णाभाऊ साठे दलित‍ वस्ती योजनेअंतर्गत नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा नागरी प्रकल्प अधिकारी चंदन पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       दलित वस्तीत राहणाऱ्या कुटूंबियांचे जीवनमान उंचावणे आवश्यक असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, हया वस्त्यांचा विकास झाला तर तेथील कुटूंब विकासाच्या प्रवाहात येतील. त्यांच्या वस्तीच्या विकासाच्या दृष्टीने कोणकोणती कामे केली पाहिजे यासाठी संबंधित वस्तीतील कुटूंबियांकडून माहिती घेवून अशा कामांचा समावेश वस्तीच्या विकास आराखड्यात करावा असे त्यांनी सांगितले.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, या योजनेचा बृहत विकास आराखडा तयार करतांना 3 टक्के निधी नाविण्यपूर्ण योजनेतून घ्यावा. दोन्ही नगरपालिकेने तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीने देखील विकास आराखडा तयार करुन विकासाच्या दृष्टीने कामे करावी. ही शहरे सुटसूटीत व चांगली कशी दिसतील याचे नियोजन करावे. ज्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी विकास आराखडे अद्याप तयार केलेले नाही अशांवर कार्यवाही करण्याची शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       ज्या मुख्याधिकाऱ्यांनी विकास आराखडे आर्थिक वर्षाच्या शेवटी सादर केले आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. 30 नोव्हेंबरपर्यंत सन 2017-18 या वर्षाचा तिरोडाचा विकास आराखडा मागविण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       तिरोडा नगरपालिका क्षेत्रात दलित वस्तीच्या विकास आराखड्यासाठी सन 2016-17 या वर्षात 72 लक्ष 88 हजार रुपये मंजूर होते. परंतू प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे तो निधी खर्च होवू शकला नाही असे संबंधित नगरपरिषदेच्या अभियंत्याने सांगितले.
      अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत गोरेगाव नगरपंचायतीला सन 2016-17 मध्ये 15 लक्ष 94 हजार रुपये व सन 2017-18 या वर्षात 19 लक्ष 29 हजार रुपये, सडक/अर्जुनी नगरपंचायतीला सन 2016-17 या वर्षात 17 लक्ष 32 हजार रुपये, सन 2017-18 या वर्षात 20 लक्ष 96 हजार रुपये, अर्जुनी/मोर नगरपंचायतीला सन 2016-17 या वर्षात 39 लाख 97 हजार रुपये तर सन 2017-18 या वर्षात 44 लाख 37 हजार रुपये, देवरी नगरपंचायतीला सन 2016-17 या वर्षात 38 लाख 39 हजार रुपये, सन 2017-18 मध्ये 46 लाख 46 हजार रुपये आणि सालेकसा नगरपंचायतीला सन 2016-17 या वर्षात 4 लाख 72 हजार रुपये आणि सन 2017-18 या वर्षात 5 लक्ष 59 हजार रुपये लोकसंख्येच्या आधारावर मंजूर करण्यात आले. परंतू अंदाजपत्रके तयार करण्यासाठी अभियंते नसल्यामुळे आणि प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे हा निधी आतापर्यंत खर्च होवू न शकल्याची माहिती संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
      गोंदिया नगरपालिकेतील नगररचना विभागात सर्व पदे रिक्त आहेत. केवळी एकच कनिष्ठ अभियंता कार्यरत आहे. अग्नीशमन विभागात देखील अनेक पदे रिक्त असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.पाटील यांनी दिली.
00000


सहकार चळवळ मजबूत करा - सुभाष देशमुख

                 पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त सहकार परिषद



         शेवटच्या घटकातील माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे. तसेच गावातील शेतकरी सुध्दा समृध्द होण्यासाठी सहकार चळवळ मजबूत करण्याची आज नितांत गरज आहे. असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
      26 ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या संयुक्त वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत मयूर लॉन कटंगीकला येथे आयोजित सहकारी संस्थांची कार्यशाळा व सहकार परिषदेचे उदघाटक म्हणून श्री.देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार डॉ.अनिल बोंडे, राज्य सहकार भारती प्रकोष्ठचे अध्यक्ष डॉ.मुकूंदराव तापकीर, माजी आमदार हेमंत पटले, केशवराव मानकर, भैरसिंह नागपूरे, भजनदास वैद्य, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, रजनी नागपूरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, राज्य पत संस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, जि.प.सभापती छाया दसरे, मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन मिश्रा उपस्थित होते.
     श्री.देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्र समृध्द होण्यासाठी सहकारी संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सहकार चळवळ बळकट करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे. विविध कार्यकारी संस्थांनी गावातील बेरोजगार तरुणांना काम देण्याचे प्रयत्न करावे. आपल्या सोसायटीचे काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याला समजावून सांगता आले पाहिजे. ज्या होतकरु गरजू तरुणांना खरोखरच पैशाची गरज आहे अशा तरुणांना सहकारी बँकेनी सहकार्य करावे. लोकांच्या सहभागातून सहकार वाढविण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील सहकारी भात गिरण्या मोडकळीस आल्याचे सांगून ते म्हणाले, या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. सहकारी तत्वावरील शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी शेतीपुरक व्यवसायाची सहकारी संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीतून गावातील शेतकरी समृध्द होईल. कर्जमाफीसाठी राज्यातील 77 लाख खातेदारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्याची आज गरज आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे असेही त्यांनी सांगितले.
      श्री.बडोले म्हणाले, राज्यात सहकारी संस्थांचे काम अत्यंत चांगले आहे. सहकारी संस्था भरभराटीला आल्या पाहिजे. यासाठी सहकारी संस्थांच्या समस्यांचे निराकरण करुन संस्थांचे बळकटीकरण करण्याची गरज आहे. जिल्ह्यात साखर कारखाने सुरु करण्याबाबत आत्मचिंतन करण्याची सुध्दा गरज आहे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय केले पाहिजे. जिल्ह्यात सध्या धान पिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या किडीवर नियंत्रणासाठी कृषि विभागाशी संपर्क साधून योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
      श्री.चरेगावकर म्हणाले, लोकाभिमुख सहकारी संस्था कशा निर्माण होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोपर्यंत‍ लोकांचा सहभाग वाढणार नाही तोपर्यंत सहकार क्षेत्र वाढणार नाही. सहकारी संस्थांचे चिंतन करण्याची आज गरज आहे. सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले तर नक्कीच विदर्भात सहकार चळवळ वाढीस येईल असे त्यांनी सांगितले.
      डॉ.तापकीर म्हणाले, सहकार परिषद समृध्द करण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. सर्वांच्याच सहकार्यातून सहकार परिषद मजबूत होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
      आमदार बोंडे म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय म्हणत होते की, प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला काम असल्याशिवाय शेतकऱ्याचा उध्दार होणार नाही. शेतकऱ्यांचा सहकाराशिवाय उध्दार होणार नाही. सहकारातील चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भातील सहकार परिषदेला पुनर्जिवीत केले तर निश्चितच सहकार चळवळीला चांगले दिवस येतील असे सांगितले. सहकार चळवळ बळकट व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहकार चळवळ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

     कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व सभासद व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष सुभाष आकरे यांनी केले. संचालन मजूर सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिपक कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रेखलाल टेंभरे यांनी मानले.

Thursday 26 October 2017

शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी प्रयत्नशील - सुभाष देशमुख

                          कामठा येथील शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट


    जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. सहकार तत्वावरील 9 धान गिरण्या कार्यरत आहेत. हया धान गिरण्या जीर्णावस्थेत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करुन जुन्या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करुन जिल्ह्यातील शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
      26 ऑक्टोबर रोजी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपूरे, माजी आमदार हेमंत पटले, भैरसिंह नागपूरे, आमदार डॉ.अनिल बोंडे उपस्थित होते.
       श्री.देशमुख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करुन त्यांचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी शासन कटिबध्द आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी सहकार विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
       श्री.बडोले म्हणाले, पूर्व विदर्भातील गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे परिस्थिती नाजूक आहे. 25 टक्के शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली नाही. यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात सहकारी संस्था आहेत परंतू त्यांच्याकडे स्वत:चे गोडावून नाही. यासाठी सहकारी संस्थांना गोडावून देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 82 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
       प्रारंभी मंत्री महोदयांनी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. त्यानंतर गोंदिया शहरानजीकच्या पिंडकेपार येथील हरिओम मॉडर्न राईस मिलला देखील भेट दिली व न.प.गोंदिया मोक्षधाम येथे सुध्दा भेट देवून पाहणी केली व उपस्थितांशी चर्चा केली.

       कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, जि.प.सदस्य विजय लोणारे, सरपंच निलेश कुंभरे, विनोद अग्रवाल, धान गिरणीचे अध्यक्ष टिकाराम भाजीपाले, रेखलाल टेंभरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर सहकारी धान गिरणीचे उपाध्यक्ष मनोज दहीकर यांनी केले. कार्यक्रमाला कामठा परिसरातील धान उत्पादन शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 18 October 2017

कर्जमाफीमुळे मिळेल प्रगतीला चालना मुन्नीबाईने व्यक्त केल्या भावना

         राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि दिवाळीच्या मुहूर्ताचे औचित्य साधून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. गोंदियासारख्या मागास, दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या जिल्ह्यातील देवरीसारख्या नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी भागातील धान उत्पादक छोट्या शेतकऱ्याला सुध्दा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
        देवरी तालुक्यातील सालई या आदिवासी गावातील मुन्नीबाई राऊत या विधवा महिलेला देखील आजच्या कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात प्रमाणपत्र देण्यात आले. दोन वर्षापूर्वी म्हणजे 7 मे 2014 रोजी तिच्या पतीचे निधन झाले. अल्पभूधारक असलेल्या तिच्या पतीवर आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे बोरगाव(बाजार)चे 13061 रुपयाचे कर्ज होते. घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मुन्नीबाई हताश झाल्या होत्या. पावसाच्या पाण्यावर अर्थात निसर्गावर अवलंबून राहून धान पीक घेणाऱ्या मुन्नीबाई आर्थिक विवंचनेत सापडल्या होत्या. पतीच्या निधनानंतर पतीवर असलेले सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे याच चिंतेत त्या सातत्याने असायच्या. एक मुलगा 12 वीत तर मुलगी 11 वी शिक्षण घेत असतांना कर्जाची परतफेड कशी करावी याच चिंतेने त्या ग्रासल्या होत्या. मुलामुलींच्या पुढील शिक्षणासाठी पैसा आणावा तरी कुठून, आधीच आपण कर्जबाजारी आहोत याच विवंचेने त्या सातत्याने असायच्या.
        राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांवर दीड लाख रुपये कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि देवरीसारख्या राज्याच्या टोकावर असलेल्या तालुक्यातील दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील सालई येथील मुन्नीबाई राऊत या महिला शेतकऱ्याला या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला.
      स्वत:च्या शेतात राबणारी मुन्नीबाई घरच्या शेतीत कामे नसतांना रोजगार हमी योजनेच्या कामावर जायची. कर्जापायी शेती करण्याची इच्छाच तिने सोडून दिली होती. निसर्गावर अवलंबून शेती करणे म्हणजे शेतकरी हा संकटात राहूनच आपला जीवन जगतो अशी भावना तिने व्यक्त केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असण्याची प्रचिती मुन्नीबाईला आली. तिच्यावर असलेले सोसायटीचे 13061 रुपयांचे कर्ज या योजनेमुळे माफ झाले. आता कर्जमाफी झाल्यामुळे माझ्या दोन्ही मुलामुलींना चांगले शिक्षण देवून त्यांना नोकरीच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करायला लावणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुन्नीबाई कर्जमाफीचे प्रमाणपत्र घेत असतांना तिच्या चेहऱ्यावर कर्जमाफीचा आनंद ओसंडून वाहत असल्याची भावना तिने व्यक्त केलेल्या मनोगतातून दिसून आल्या. या कर्जमाफीमुळे आता प्रगतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला.

शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण पालकमंत्र्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद



       राज्य शासनाने 34 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिवाळीचा मुहूर्त साधल्या गेला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरणाचा राज्यस्तरीय सोहळा आज 18 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला. अशाचप्रकारचे कार्यक्रम आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आले.
       छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरण सह्याद्री अतिथीगृहात सुरु असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे प्रामुख्याने उपस्थित होते.

       व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधतांना पालकमंत्री राजकुमार बडोले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आज खुप आनंदीत आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होत आहे. या योजनेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई येथील पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा राज्यस्तरीय सोहळा पाहण्यासाठी व मुख्यमंत्र्यांचे याबाबतचे विचार ऐकण्यासाठी माणिकलाल लिल्हारे, लखनलाल कटरे, निलवंताबाई मेश्राम, चिंटू बिसेन, मंगरु रहांगडाले व अंजनाबाई बिसेन हे पात्र शेतकरी सुध्दा यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील - राजकुमार बडोले





शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप
          राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. एकीकडे शेतकरी हा कर्जमुक्त होत असतांना आता तो शेतीवर पूर्णपणे स्वावलंबी कसा होईल या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      आज 18 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांचा सातबारा या योजनेमुळे कोरा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील 82 हजार 226 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होणार आहे. आजपर्यंत राज्यात झालेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत नव्हता अशी ओरड होती, परंतू या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
      पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याकडील शेतकरी कमी प्रमाणात कर्ज घेत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांची कर्जाची रक्कमही कमी असते. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. धान उत्पादक शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे हे मला मनापासून वाटते. घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी वेळीच केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आरटीजीएसद्वारे जमा होणार आहे. जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले. अर्ज भरतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या. या अडचणींवर मात करुनसुध्दा त्यांनी ऑनलाईन अर्ज भरले.
      ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची असतांना देखील शेतकऱ्यांनी त्या अडचणीतून मार्ग काढल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, लाखो संख्येने शेतकरी हे ऑनलाईन अर्ज भरतात यावरुन शासनाची ऑनलाईन प्रक्रियेची दिशा योग्य असल्याचे दिसून येते. या योजनेचे महत्व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या माणिकलाल लिल्हारे, निलेश धुर्वे, चिंतामन बिसेन, मंगरु रहांगडाले, अंजनाबाई बिसेन, लखनलाल कटरे, केसरबाई चुटे, पुर्णाबाई मानकर, मंगला ऊके, जाईबाई बोरकुटे, गिताबाई कुमरे, भैय्यालाल बिसेन, नकुल नेताम, मोहन नेताम, कौशल्या कुंभरे, हिवराज राऊत, समला कुमरे, सायजा उईके, सुगंधा मडावी, सुखदेव कोरे, सिताराम शेवता, उमाबाई सलामे या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे कर्जमाफीचे प्रमाणपत्र तसेच महिला शेतकऱ्यांना साडी-चोळी देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित काही शेतकऱ्यांनी योजनेबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
      कार्यक्रमाला प्रामुख्याने रेखलाल टेंभरे, विरेंद्र जायस्वाल, प्रदिप ठाकुर, धनंजय वैद्य यांचेसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी बांधव व पात्र शेतकरी लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्री.आटे, सहायक निबंधक सर्वश्री अनिल गोस्वामी, प्रमोद हुमने, नानासाहेब कदम, श्री.भानारकर, सहायक सहकार अधिकारी श्रीमती बोरकर, श्रीमती खाडे, श्री.मेश्राम, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती मारवाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सहायक निबंधक देविदास घोडीचोर यांनी मानले.

Saturday 14 October 2017

आपत्त्ती व्यवस्थापनात प्रशासन व नागरिकांची भूमिका महत्वाची - अभिमन्यू काळे

जागतिक आपत्ती धोके निवारण दिन कार्यशाळा


       कोणतीही आपत्ती वा संकट सांगून येत नाही. त्यामुळे अशा प्रसंगात कमीत कमी जिवित व वित्तीय हानी होईल यासाठी प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे. आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन व नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्ताने आयोजित कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री.काळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची उपस्थिती होती.
       जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण  जनजागृती हे महत्वाचे घटक आहे. नैसर्गीक आपत्त्तीला तोंड देण्यासाठी महसूल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून त्यांचा योग्यरितीने उपयोग करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
      श्री.ठाकरे म्हणाले, आपत्तीची तिव्रता ही आपत्ती आल्यावरच कळते. म्हणून आपत्तीची पूर्वतयारी व प्रशिक्षण गरजेचे आहे. आपत्तीच्या वेळेस आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्रीचा उपयोग आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी करता येईल असे ते म्हणाले.
       डॉ.भूजबळ म्हणाले, पोलीस विभागातील विविध पथकांच्या माध्यमातून विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस विभाग आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. नवनविन तंत्रज्ञानाचा आपत्ती व्यवस्थापनात वापर करुन प्रशासकीय यंत्रणेला या काळात मदत मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       कार्यशाळेत अदानी प्रकल्पाचे अग्नीशमन अधिकारी त्रिलोकसिंग पांचाळ यांनी आग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय रेड क्रॉस संस्थेचे मुख्य प्रशिक्षक आशिष चव्हाण यांनी प्रथमोपचार या विषयावर माहिती दिली. उपस्थितांना आपत्ती धोक निवारणाच्या दृष्टीने प्राथमिक उपाययोजना कशाप्रकारे कराव्या तसेच उपलब्ध संसाधनाच्या आधारे आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तीला स्ट्रेचरद्वारे पुढील उपचारासाठी नेण्याची उपाययोजना, या काळातील प्रथमोपचार कशा पध्दतीने करता येईल याबाबतची विस्तृत माहिती दोघांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना दिली.  
       जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेत उपस्थितांचे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी काळे यांनी स्वाक्षरी करुन केली. या अभियानात उपस्थितांनी शपथ घेतली. मी आपत्तीबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही, मी पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल ओलांडणार नाही, आकाशात ढग असतांना व गडगडाट होत असतांना मी मोबाईलवर बोलणार नाही अशी उपस्थितांनी शपथ घेतली.
        कार्यशाळेत पोलीस, आरोग्य, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना व नागरिकांनी सहभाग घेतला. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन परिविक्षा अधिकारी श्री.प्रविणकुमार यांनी मानले.
आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
अन् जिल्हाधिकारी कार्यालायत आढळला बाँब
     13 ऑक्टोबर वेळ दुपारी 4 वाजताची. जिल्हाधिकारी कार्यालयाचे इमारतीत असलेल्या विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नेहमीप्रमाणेच आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त असतांना अचानक मेगा फोनवरुन सूचना करण्यात आली. ताबडतोब इमारत रिकामी करा, कुणीतरी बाँब ठेवला आहे. या एकाच भितीने सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपली कामे अर्धवट टाकून इमारतीतील वेगवेगळ्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील भागात एकत्र झाले. कुणालाच काही कळेना. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला होता. प्रत्येकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर लक्षात आले की जर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत अज्ञात व्यक्तीने बाँब ठेवला असेल तर काय उपाययोजना केली पाहिजे याचेच प्रात्यक्षिक जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
       जर अशाप्रकारचे संकट वा आपत्ती आल्यास कशाप्रकारे दक्षता घेतली पाहिजे याबाबतची माहिती प्रात्यक्षिकातून देण्यात आली. बाँब शोधण्यासाठी बाँबशोध मोहिम राबविण्यात आली. बाँब सापडल्यानंतर त्याला निकामी कसे करायचे याबाबतची माहिती देण्यात आली. श्वान पथकाने बाँब ठेवलेल्या ठिकाणी सापडलेल्या कपड्यावरुन कुणाचा हा कपडा आहे हे गर्दीत उभ्या असलेल्या व्यक्तीला श्वानाने शोधून काढले.
       इमारतीला आग लागल्यास कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवावे याचे प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. या आपत्ती निवारण प्रात्यक्षिकात पोलीस विभागाचे नितीन तोमर, रामकृष्ण अवचट, देविदास पडोळे, ओमराज जामकाटे, विजय लोनबळे, उमेश वानखेडे, मनोज वाढे, मनोज मेंढे, विनोद कल्लो, पंकज चंद्रिकापुरे, दिपक सांदेल, विक्की सोलंकी, जितेंद्र मिश्रा, अनिल हरिणखेडे, सचिन चव्हाण, श्वान पथकाचे यादव तुमरेटी, धर्मेंद्र मडावी, रामकृष्ण सरवर, शैलेंद्र शुक्ला, उमेश मारवाडे, महेंद्र ताराम, श्वान बृनो आणि राणा यांनी सहभाग घेतला. अदानी पॉवर प्रकल्प अग्नीशमन विभागाचे अर्जुन पटले, पंकज चौहान, लोकेश कटरे, निलेश फटींग, विक्रांत गजवी, अंगराज खैरकर, राजु बांडेबुचे यांचा सहभाग होता.
     प्रात्यक्षिकाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसंरक्षक एस.युवराज, अदानी पॉवर प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सी.पी.साहू, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी मानले.

Friday 13 October 2017

एमटीडीसीने पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे - अभिमन्यू काळे


          गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात जैवविविधता आणि वन्यजीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे. अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे सुध्दा आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे. असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
       5 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील पर्यटन स्थळांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार व सोनाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी.नौकरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, निसर्गप्रेमी डॉ.राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, एस.टी.आगार प्रमुख जयकुमार इंगोले,  कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे, एमटीडिसीचे श्री.झंझाड, श्री.शिर्के, टूर्स एजन्सीचे शुभम अग्रवाल, अशोक मंत्री, ॲक्वा ॲडव्हेंचरचे सुरेश चौधरी, हितेश सव्वालाखे आदिची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले जिल्ह्यात वाघ, बिबट, काळे काळविट, विविध प्रजातीचे पक्षी तसेच नैसर्गीक सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे. 100 वर्षापेक्षा जूनी महालासारखी असलेली घरे पर्यटकांना होम स्टेच्या दृष्टीने कशी उपयोगात आणता येईल यादृष्टीने एमटीडीसीने नियोजन करावे. होम स्टे पर्यटनाला प्राधान्य दयावे, असे त्यांनी सांगितले.
      श्री.हेडे म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रचार-प्रसिध्दीचे काम करते. पर्यटन पर्वाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध पर्यटन व तीर्थक्षेत्राला पर्यटकांनी भेट दयावी. जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांना जिल्ह्यातील नागरिकांनी सुध्दा भेट दयावी. एमटीडीसीच्या माध्यमातून निवास, न्याहारी व महाभ्रमण आयोजित करण्यात येते. याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
       डॉ.जैन यांनी पर्यावरण रक्षणासाठी सायकल टुरिझमची आवश्यकता विषद केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट दिल्यास स्थानिकांना रोजगार निर्मितीस मदत होणार असल्याचे सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी नागपूर विभागातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी करण्यासाठी एमटीडीसीने तयार केलेल्या ऑडिओ जिंगल्सचे विमोचन केले. पर्यटन पर्वाचे औचित्य साधून जिल्हा पर्यटन समितीने तयार केलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेला सारस वैभव गोंदियाचे या डिव्हीडी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा प्रचार-प्रसार राज्यभर व्हावा यासाठी एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक श्री.हेडे यांना भेट म्हणून दिल्या. यावेळी उपस्थितांपैकी काहींनी पर्यटन अनुभव कथन केले. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भूत यांनी मानले.
00000

माणूस घडविण्याचे बळ पुस्तकात - देवसुदन धारगावे

                                     वाचन प्रेरणा दिन साजरा

       ग्रंथ व पुस्तके वाचनामुळेच माणसे सुसंस्कृत व प्रगल्भ होत असतात. आयुष्यात आपण कसे घडायचे हे पुस्तकेच शिकवितात. त्यामुळे माणूस घडविण्याचे बळ पुस्तकात आहे, असे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले.
     जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत सामाजिक न्याय भवन येथे 13 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.धारगावे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण निरिक्षक सतीश वाघ, पोलीस निरिक्षक श्री.कोकणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हाधिकारी यांच्या मातोश्री हिराबाई काळे यांची उपस्थिती होती.
       श्री.धारगावे पुढे म्हणाले, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे सतत विद्यार्थ्यांसाठी झटत असत. ते सतत ज्ञानाच्या शोधात राहिले आणि ज्ञान वाटत राहिले. कोणतेही यश मिळ‍विण्यासाठी माणसाची तीव्र इच्छाशक्ती, प्रयत्न करण्याची गरज व दृढ आत्मविश्वासासोबतच प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही म्हणून नेहमी चांगले कर्म करीत राहावे. आयुष्यात आलेली संधी वारंवार मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकाने मिळालेल्या संधीचे सोने करावे. वाचन संस्कृती आज घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती भूत म्हणाल्या, प्रत्येकाने सतत ज्ञान आत्मसात करीत राहावे. आपण वर्तमानपत्रे, मासिके वाचावीत तसेच निसर्गाचे सौंदर्य व्यक्त करणारी पुस्तके वाचावित. अभ्यासापर्यंत मर्यादित न राहता अवांतर वाचन करावे. नेहमीच यश संपादन करण्याचे प्रयत्न करावेत असे त्या म्हणाल्या.
       श्री.कोकणे म्हणाले, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा यांचे फार जवळचे नाते आहे. जेवढी पुस्तके वाचाल तेवढीच ज्ञानात भर पडते. योग्य वेळेस योग्य मार्गदर्शक मिळाला तर निश्चितच माणसाचे जीवन उज्वल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्रीमती काळे म्हणाल्या, पुर्वी वाचनासाठी पुस्तके नव्हती. परंतू आता बाजारात भरपूर प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते. प्रत्येकाला वाचनाचा छंद असायला पाहिजे, त्यामुळे वाचन संस्कृती रुजविण्यास मदत होते. बालवयातच मुलांवर योग्य ते संस्कार दयावे. बालपणापासून मुलांवार वाचनाची सवय लावावी असे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविकातून श्री.ढोणे म्हणाले, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 15 ऑक्टोबरला रविवार सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम आज 13 ऑक्टोबरला साजरा करण्यात येत आहे. ज्ञानसंपन्न आणि माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा यादृष्टीने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 194 ग्रंथालये आहेत. आपला थोडासा वेळ जर ग्रंथ व पुस्तके वाचनास दिला तर निश्चितच वाचन संस्कृतीत भर पडेल. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी पल्लवी दुधघरे हिने ‘जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देई ईश्वर’ हे गीत सादर केले,  चेतन मेश्राम व मयुर ढोमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे सुध्दा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शेषराव भिरडे यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Wednesday 11 October 2017

आहारात सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करा - अभिमन्यू काळे



पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चाखली सेंद्रीय भाताची चव
      शेतातील पिकांवर रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खते व किटकनाशके मारण्यात येत नव्हती त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      कारंजा येथील पोलीस मुख्यालयात 10 ऑक्टोबर रोजी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)च्या वतीने पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी सेंद्रीय तांदूळापासून शिजवलेला भात खावू घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, आज आपण डॉक्टरकडे गेलो तर तपासणीसाठी 100 ते 200 रुपये फी लागते. दुर्दैवाने कोणी आजारी पडले तर 2 ते 4 हजार रुपये कमीत कमी खर्च येतो. स्वस्तातील अन्न खाल्ल्यामुळे दवाखान्यात जावे लागते. स्वत:च्या प्रकृतीकडे आपण खाण्याच्या सवयीमुळे दुर्लक्ष करतो. आज जगभर सेंद्रीय अन्नधान्याची मागणी वाढत आहे. महिलांनी सुध्दा कुटूंब प्रमुखाकडे सेंद्रीय शेतीतील उत्पादीत मालासाठी आग्रह धरावा असे त्यांनी सांगितले.
      डॉ.भूजबळ म्हणाले, सेंद्रीय तांदूळाचा दैनंदिन आहारात वापर व्हावा यासाठी प्रचार-प्रसाराचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आहारात विषमुक्त अन्न काळाची गरज आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे दुष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अशा किटकनाशक व खतांवर बंदी आली पाहिजे, असे ते म्हणाले.
       दररोज अन्नाच्या माध्यमातून विष खाण्यात येत असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, पोलीस कुटूंबातील सर्वजण निरोगी राहण्यास सेंद्रीय शेतीतून उत्पादीत अन्न खाणेसुध्दा काळाची गरज झाली आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना यांचेसह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आत्माचे सचिन कुंभार यांनी केले. उपस्थितांचे आभार हिंदूराव चव्हाण यांनी मानले.

00000

शिबिराचा लाभ पोलीस व कुटूंबातील सदस्यांनी घ्यावा - डॉ.दिलीप पाटील-भूजबळ



     पोलीसांची नोकरी ही अत्यंत ताणतणावाची आहे. पोलीसांना आपल्या कर्तव्याप्रती    24 तास दक्ष राहावे लागते. आपले कर्तव्य बजावतांना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनी घ्यावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
      कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात 10 ऑक्टोबर रोजी इंपथी फाउंडेशन मुंबई व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित महाराष्ट्र पोलीस कल्याण कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांकरीता नि:शुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन करतांना डॉ.भूजबळ बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना, इंपथी फाउंडेशन मुंबईचे भगतसिंग पवनार, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, डॉ.एन.ओ.झाडे, डॉ.सुहास सावंत, इंपथीचे समन्वयक दिनेश मोरे, स्वामी समर्थ नेत्रालय नागपूरचे मोहन खराबे, डॉ.श्वेतल मस्करी, डॉ.अरुण दुधाने यांची उपस्थिती होती.

       डॉ.भूजबळ यावेळी म्हणाले, शिबिरातून आरोग्य तपासणी सोबतच वैद्यकीय सल्ला सुध्दा घ्यावा. त्यामुळे पुढील उपचारासाठी मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवशीय नि:शुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात नेत्र तपासणी, औषधी वाटप, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 40 वर्षावरील महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाची तपासणी आणि स्त्री रोग तपासणी करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स हे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि कुटूंबातील सदस्य यांची तपासणी करणार आहे. उदघाटन कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेरोजगारांना स्वावलंबनासाठी मुद्रातून कर्ज दयावे - जिल्हाधिकारी काळे

             बेरोजगारी आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व बेरोजगारांना रोजगार देणे शक्य नाही. जो बेरोजगार गरजू व्यक्ती उद्योग/व्यवसाय सुरु करण्यास इच्छूक आहे अशांना स्वावलंबनासाठी बँकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करुन दयावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हास्तरीय बँकर्स समितीची सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी काळे बोलत होते. सभेला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुद्रा बँक योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. गरजू व्यक्तीला स्वबळावर उभे करण्याचे स्वप्न प्रधानमंत्र्यांनी या योजनेतून बघितले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना मुद्रा योजनेतून गरजू व्यक्तींना कर्ज वाटप करण्याचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे. आर्थिकदृष्ट्या जो आधीच सक्षम आहे त्यांना या योजनेतून कर्ज देण्याचे टाळावे. गरजू व्यक्ती या योजनेची माहिती घेण्यास व कर्ज मागण्यास बँकेकडे आल्यास त्याला योग्य ते मार्गदर्शन करुन कर्ज उपलब्ध करुन दयावे.
        बँकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सभ्यपणे वागावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे. समाजाचे आपल्याला काही देणं लागतं या भूमिकेतून काम करावे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही मोठी बँक असून या बँकेच्या शाखांच्या अनेक तक्रारी येत आहे. बँकेचे जिल्हा समन्वयक याकडे विशेष लक्ष देत नाही हे यावरुन दिसून येते. मुद्रा बँक योजनेत या बँकेचे काम समाधानकारक नसल्यामुळे जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांनी रिझर्व्ह बँकेकडे याबाबतची माहिती दयावी. असेही श्री.काळे यांनी सांगितले.
       श्री.सिल्हारे म्हणाले, मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करतांना जो व्यक्ती गरजू आणि त्यांची व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे अशांचा विचार करावा. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात येणाऱ्या उद्दिष्टांची पुर्ती करावी. बँक ऑफ इंडियाच्या स्टार स्वरोजगार संस्थेअंतर्गत अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि देण्यात येत आहे त्यांना सुध्दा बँकेनी मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करुन दयावे. असे त्यांनी सांगितले.
       श्री.खडसे म्हणाले, अनेक बेरोजगार व गरजू व्यक्ती मुद्रा योजनेतून व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी करतात. तेव्हा काही बँकेचे अधिकारी व कर्मचारी त्यांची दिशाभूल करुन त्यांची बोळवण करतात. या योजनेचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात येत असल्यामुळे माहितीच्या आधारे कर्जाबाबत बँकांकडे विचारणा करण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी बँकर्स नीट बोलत नाही. यापुढे असे प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

       मुद्राबाबत आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स सभेला बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, युनियन बँक, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सीस बँक, आयसीआयसीआय बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक व बँक प्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday 10 October 2017

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रीय शेतीची कास धरा - अभिमन्यू काळे

      कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या आहारात काही प्रमाणात विष खाण्यात येत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे धोके ओळखून शेतकऱ्यांनी आता विषमुक्त अन्नासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
       अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकाचा शेतात वापर करतांना झालेल्या विषबाधेतून काही शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचे अध्यक्षतेखाली कृषि विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कृषि केंद्र संघाच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच  संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम.चौरागडे, कृषि उपसंचालक अश्विनी भोपळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात कमीत कमी किटकनाशक व रासायनिक खताचा वापर होईल तसेच फवारणीबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबतचा प्रचार-प्रसार कृषि सहायकांनी करावा. माय पोर्टलवरुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना किटकनाशकांच्या वापराबाबत मोबाईलवर संदेश पाठवावे. आज किटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला आहे हे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरुन लक्षात येते. किटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्रकिडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
    जिल्ह्यात भात पीक हे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, भात पिकावर खोडकीडा, गादमाशी, तुडतुडे, करपा यासारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शिफारशीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात किटकनाशकांची फवारणी केली जाते. तसेच निष्काळजीपणे किटकनाशकांची हाताळणी केल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. कीड रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता अनेक जैविक किटकनाशके, मित्रकीड संशोधित झालेल्या असून त्यांचा योग्य त्या वेळी वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात कीड रोगावर नियंत्रण मिळवता येईल तसेच जमिनीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता व शेतकऱ्यांचे आरोग्यसुध्दा सुदृढ ठेवता येईल असे ते म्हणाले.
           भात पिकाकरीता विविध कीड रोग नियंत्रणाकरीता रासायनिक किटकनाशकाऐवजी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम (खोडकीडाकरीता), मेटाऱ्हायसिअन ॲनिसोएमी (तुडतुड्याकरीता), कामगंध सापळे इत्यादीसारख्या जैविक नियंत्रकाचा वापर करावा. याशिवाय बेडूक संवर्धन केल्यास भातशेतीमध्ये खोडकीडा नियंत्रणाकरीता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संवर्धन देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी शेतकऱ्यांना यावेळी केले. यावेळी कृषि केंद्र संघटनेचे नितीन गुप्ता, अशोक गुप्ता, महेश पाचे, श्रीराम चंदानी, रामअवतार अग्रवाल, शैलेश जैन व राहूल सिंघानीया यावेळी उपस्थित होते.

Friday 6 October 2017

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा - शेखर चन्ने

      येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीला महत्व प्राप्त झाले आहे. निवडणूकीत पैशाचा व दारुचा वापर होणार नाही यादृष्टीने निवडणूक यंत्रणेने दक्ष राहावे. ही निवडणूक शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी दिले.
      आज 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येत्या 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात होणाऱ्या 347 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा घेतांना श्री.चन्ने बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.चन्ने म्हणाले, प्रत्येक तहसिल कार्यालयात तयार करण्यात  आलेल्या आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्षात येणाऱ्या लोकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्यावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नियंत्रण कक्षाचा नंबर हा दर्शनी भागात लावावा. त्यामुळे नागरिकांना निवडणूकीबाबतच्या तक्रारी थेट नियंत्रण कक्षाला करता येईल. राष्ट्रीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक यंत्रणेनी सतर्कतेने काम करावे.
      निवडणूक खर्चाचा हिशोब सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार हे वेळेवर सादर करतील याकडे लक्ष दयावे असे सांगून श्री.चन्ने म्हणाले ज्या ग्रामपंचायतीमध्ये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे त्या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष दयावे. सरपंच व सदस्य ज्या ग्रामपंचायतीमधून बिनविरोध निवडून आले आहेत त्यामागची कारणे शोधावीत. गावपातळीवर काम करणारे स्थानिक पोलीस पाटील व कोतवालाची या कामासाठी मदत घ्यावी असे त्यांनी सांगितले.
       जिल्हाधिकारी श्री.काळे म्हणाले, थेट सरपंचाची निवडणूक मतदारातून होणार असल्यामुळे प्रशासन सजग राहून काम करीत आहे. कोणत्याही गावात निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
       डॉ.भूजबळ म्हणाले, गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात नलक्षदृष्ट्या 59 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील आहेत तर 88 केंद्र संवेदनशील आहेत. शांततेत व निर्भय वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
       निवडणूकीच्या तयारीची माहिती देतांना उपजिल्हाधिकारी श्रीमती आंधळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 347 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणूकीत मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्यामुळे 1189 कंट्रोल युनिट व 2609 बॅलेट युनिट उपलब्ध झाली आहे. या निवडणूकीत 1081 मतदार केंद्र राहणार आहेत. या मतदान केंद्रात 2 लाख 51 हजार 314 स्त्री आणि 2 लाख 51 हजार 886 पुरुष असे एकूण 5 लाख 3 हजार 200 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
      या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे(देवरी), अनंत वालस्कर(गोंदिया), गंगाराम तळपाडे(तिरोडा), तहसिलदार सर्वश्री रविंद्र चव्हाण(गोंदिया), कल्याणकुमार डहाट(गोरेगाव), विठ्ठल परळीकर(सडक/अर्जुनी), देवदास बोंबार्डे(अर्जुनी/मोरगाव), संजय रामटेके(तिरोडा), प्रशांत सांगडे(सालेकसा), साहेबराव राठोड(आमगाव), विजय बोरुडे(देवरी) यांची उपस्थिती होती.
आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष

     ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आचारसंहितेबाबत कुणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर असलेल्या आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय 07182-230196, टोल फ्री क्रमांक 1077. तहसिल कार्यालय गोंदिया 07182-236703, तहसिल कार्यालय गोरेगाव 07187-232330, तहसिल कार्यालय तिरोडा 07198-254159, तहसिल कार्यालय अर्जुनी/मोर 07196-220147, तहसिल कार्यालय देवरी 07199-225241, तहसिल कार्यालय आमगाव 07189-225218, तहसिल कार्यालय सालेकसा 07180-244136 व तहसिल कार्यालय सडक/अर्जुनी 07199-233240 या क्रमांकावर संबंधित तालुक्यातील मतदारांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या आचारसंहिते बाबतच्या काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.