जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 30 May 2020

१ जूनपासून अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे सुरू होणार

तीन गाड्यांचे वेळापत्रक निश्चित
गोंदिया, तिरोडा व आमगाव येथे थांबा
मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक
        गोंदिया दि.30 (जिमाका) : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १ जून  २०२० पासून गैर श्रमिक नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ह्या अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे गाड्या  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक,नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तीन रेल्वे गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याच्या व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
       गाडी क्रमांक ०२८३३ *अहमदाबाद - हावडा* ही गाडी तिरोडा येथे १९.२५  वाजता पोहोचून १९.२७ वाजता सुटेल. १९.५८ वाजता गोंदिया येथे पोहोचून २० वाजता  गोंदिया येथून निघेल. आमगाव येथे २०.१५ वाजता पोहोचून २०.१७ वाजता निघेल.
      गाडी क्रमांक ०२८३४ *हावडा - अहमदाबाद* ही गाडी १६.११ वाजता आमगाव येथे पोहोचेल. तेथून ती १६.१३ वाजता सुटेल. १६.४१ वाजता गोंदिया येथे आगमन व तेथून ती १६.४६ वाजता निघेल. तिरोडा येथे १७.०६ वाजता पोहोचेल व तेथून १७.८वाजता पुढील प्रवासासाठी निघेल.
     गाडी क्रमांक ०२८०९ *मुंबई-हावडा विशेष रेल्वे* १३.०८ वाजता गोंदिया येथे पोहोचेल. तेथून १३.१३ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०२८१० *हावडा-मुंबई विशेष रेल्वे* गोंदिया येथे १२.०२ वाजता पोहोचून १२.०४ वाजता निघेल.
     गाडी क्रमांक ०२०७० *गोंदिया - रायगड जन्मशताब्दी एक्सप्रेस* दुपारी १५ वाजता गोंदिया येथून सुटेल तर गाडी क्रमांक ०२०६९ *रायगड - गोंदिया जन्मशताब्दी एक्सप्रेस* दुपारी १३.२५ वाजता गोंदिया येथे पोहोचेल.
     तरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रवाशांनी त्यांच्या मूळ गावी पोहोचण्याकरीता वेळापत्रकानुसार पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून प्रवास करावा.
     सदर रेल्वेची तिकिटे फक्त आय.आर.सी.टी.सी च्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल ऍप्सवर ऑनलाईन पद्धतीने ई-तिकीट स्वरूपात मिळतील. रेल्वे स्टेशनवर कोणतीही तिकिटे उपलब्ध होणार नसल्यामुळे रेल्वेस्टेशनवर अनावश्यक गर्दी टाळावी.  
      ज्या प्रवाशांचे ई-तिकिट निश्‍चित झाले आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश देण्‍यात येणार आहे. ज्यांची तिकीट निश्चित आहे, त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या पूर्वी दीड ते दोन तास अगोदर रेल्वे स्टेशनवर पोहोचावे.
      सर्व प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड -१९ ची लक्षणे आढळणार नाही त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
       प्रवाशांनी प्रवास करतांना आपल्यासोबत कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा. सर्व प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांनी स्टेशनवर आणि गाडीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
       सर्व प्रवाशांनी शक्यतो आरोग्य सेतू ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. प्रवाशांनी प्रवास करतांना स्वतःचे भोजन व पाणी सोबत घ्यावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे.

चार नवीन कोरोना बाधित रुग्ण ४ रुग्णांची कोरोनावर मात

कोरोना बाधितांची संख्या ६६ वर
३४ क्रियाशील रुग्ण

गोंदिया दि.३० (जिमाका) : आज ३० मे रोजी नागपूरच्या विषाणू प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ४ रुग्णांचे विषाणू चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. या चार रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील तर एक रुग्ण हा देवरी तालुक्यातील आहे. त्यामुळे बधितांची संख्या ६६ वर पोहचली आहे. आज ४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता कोरोना क्रियाशील रुग्ण ३४ आहेत.
      पहिल्या बाधित रुग्णाला १० एप्रिल रोजी, दोन रुग्णांना २८ मे रोजी, २५ रुग्णांना २९ मे रोजी तर चार रुग्णांना आज ३० मे रोजी सुट्टी देण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
      सर्व रुग्णांचे सुट्टी देण्यापूर्वी समुपदेशन करण्यात आले आहे. सर्वांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी याकाळात त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणार आहे.
     जे बाधित रुग्ण आढळले त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण, २१ मे रोजी २७ रुग्ण, २२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे   रुग्ण, २६ मे रोजी १ रुग्ण, २७  मे  रोजी १ रुग्ण, २८ मे रोजी ९ रुग्ण, २९ मे रोजी ३ आणि आज ३० मे रोजी ४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे अहवालावरून दिसून आले आहे.
      आतापर्यंत ९५० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६६ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८८४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
       जिल्ह्यात एकूण २२ क्रियाशील कंटेनमेंट झोन आहे. यामध्ये गोंदिया तालुका- नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा, चुटीया, रजेगाव व गजानन कॉलोनी. सालेकसा तालूका-धनसुवा. सडक/अर्जुनी तालुका- तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली. गोरेगाव तालुका- गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक, आंबेतलाव. तिरोडा तालुका- तिरोडा. अर्जुनी/मोरगाव तालुका- करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे
     ग्रामस्तरावरील विविध शाळा व इतर संस्थांमध्ये ३९६४ व्यक्ती  आणि ९४८१ व्यक्ती गृह अलगीकरणात आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले आहे.
00000

Friday 29 May 2020

आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले तर २५ कोरोनामुक्त होऊन घरी परतले


कोरोना बाधितांची संख्या ६२
३४ क्रियाशील रुग्ण

        नागपूर येथील विषाणू  प्रयोगशाळेतून आज २९ मे रोजी प्राप्त अहवालापैकी सायंकाळी ६ वाजतापर्यंत तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. हे तीनही रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बधितांचा संख्या ६२ इतकी झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे आजच २५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. कोरोनामुक्त झालेले एकूण रुग्ण २८ इतके आहे. जिल्ह्यात आता ३४ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
       जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला. दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना  २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली. तर तब्बल २५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आज २९ मे रोजी सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्या सर्वांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे. 
       कोरोना विषाणूने जिल्हयात जे बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण, २१ मे रोजी २७ रुग्ण, २२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे   रुग्ण, २६ मे रोजी १ रुग्ण, २७  मे  रोजी १ रुग्ण, २८ मे रोजी ९ रुग्ण आणि आज २९ मे रोजी ३ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे विषाणू चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
      आतापर्यंत ९५० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६२ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८३१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ५४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
       जिल्ह्यात एकूण १९ क्रियाशील कंटेनमेंट झोन आहे. यामध्ये गोंदिया तालुका- नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा सालेकसा तालूका- धनसुवा, सडक/अर्जुनी तालुका- तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली. गोरेगाव तालुका- गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक,आंबेतलाव. तिरोडा तालुका- तिरोडा. अर्जुनी/मोरगाव तालुका- करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे
      जिल्ह्यातील ग्रामस्तरावर असलेल्या विविध शाळा व इतर संस्थांमध्ये ३९६४ आणि ८८४५ व्यक्ती गृह अलगिकरणात आहे.
                                                         

Thursday 28 May 2020

(नवीन समावेशासह सुधारीत) नवीन ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले

आतापर्यंत 3 रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना बाधितांची संख्या पोहचली ५९ वर
५६ क्रियाशील रुग्ण
विलगीकरणात ४५९ आणि अलगीकरणात ९४ रुग्ण

        गोंदिया दि.२८(जिमाका)   जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे.त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज २८ मे रोजी प्राप्त अहवालापैकी सायंकाळी ६ वाजता  ६ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर रात्री ८ वाजता प्राप्त अहवालातून आणखी ३ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ५९ इतकी झाली आहे.यामध्ये क्रियाशील रुग्ण ५६ इतके असून ३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. 
     आज नवीन ९ रुग्ण आढळून आले आहे त्यामध्ये गोंदिया तालुका-२,गोरेगाव तालुका - १,सडक/अर्जुनी तालुका - २ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -४ येथील रुग्णांचा समावेश आहे.
      जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला तर उर्वरित दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.त्यांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.
     कोरोना विषाणूने जिल्हयात जे बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण , २१ मे रोजी २७ रुग्ण,२२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे   रुग्ण , २६ मे रोजी १ रुग्ण, २७  मे  रोजी १ रुग्ण आणि आज २८ मे रोजी ९ रुग्ण  पॉझिटिव्ह असल्याचे विषाणू चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
      ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येत आहे अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
     आतापर्यंत ९३४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ५९ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८०० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.६० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.१५ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.
      गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे २०८, आमगाव येथे १७,अर्जुनी /मोरगाव येथे ६०,सडक/अर्जुनी येथे ६८ ,नवेगावबांध येथे ३३,गोरेगाव येथे ३०, देवरी येथे ६ सरंडी/तिरोडा येथे १९,सालेकसा येथे १४ आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ४ असे एकूण ४५९ रुग्ण आज २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजतापर्यंत भरती आहे.
       जिल्ह्यातील शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे १३ ,तिरोडा येथे १२, उपकेंद्र बिरसी येथे २ ,समाज कल्याण निवासी शाळा डव्वा येथे ११, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४,आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी येथे ८,उपकेंद्र घटेगाव येथे ६,आदिवासी मुलांची आश्रमशाळा ईळदा येथे ३३ आणि येगाव येथे ५ असे एकूण ९४ व्यक्ती  शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहेत.
     जिल्ह्यातील ग्रामस्तरावर असलेल्या विविध शाळा व इतर संस्थांमध्ये ३८७२ आणि ९१३७ व्यक्ती गृह अलगिकरणात आहे.
                                                                      

नवीन ६ कोरोना बाधित रुग्ण आढळले


आतापर्यंत 3 रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना बाधितांची संख्या पोहचली ५६ वर
५३ क्रियाशील रुग्ण
विलगीकरणात ४५९ आणि अलगीकरणात ९४ रुग्ण
गोंदिया दि.२८(जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक, कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज २८ मे रोजी प्राप्त अहवालापैकी ६ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ५६ इतकी झाली आहे. यामध्ये क्रियाशील रुग्ण ५३ इतके असून ३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. 
        जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला तर उर्वरित दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.
      कोरोना विषाणूने जिल्हयात जे बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण, २१ मे रोजी २७ रुग्ण, २२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे    रुग्ण, २६ मे रोजी १ रुग्ण, २७  मे  रोजी १ रुग्ण आणि आज २८ मे रोजी ६ रुग्ण  पॉझिटिव्ह असल्याचे विषाणू चाचणी अहवालावरून आढळून आले आहे.
       ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येत आहे अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
       आतापर्यंत ९३४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ५६ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८०० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ६३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. १५ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.
       गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे २०८, आमगाव येथे १७, अर्जुनी/मोरगाव येथे ६०, सडक/अर्जुनी येथे ६८, नवेगावबांध येथे ३३, गोरेगाव येथे ३०, देवरी येथे ६, सरांडी/तिरोडा येथे १९, सालेकसा येथे १४ आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ४ असे एकूण ४५९ रुग्ण आज २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजतापर्यंत भरती आहे.
        जिल्ह्यातील शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे १३, तिरोडा येथे १२, उपकेंद्र बिरसी येथे २, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा येथे ११, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४,आदिवासी मुलांचे वसतिगृह देवरी येथे ८, उपकेंद्र घटेगाव येथे ६,आदिवासी मुलांची आश्रमशाळा ईळदा येथे ३३ आणि येगाव येथे ५ असे एकूण ९४ व्यक्ती  शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहेत.


Saturday 23 May 2020

कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे - आयुक्त डॉ.संजीव कुमार




         जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून येणाऱ्या  व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काळजीपूर्वक काम करावे. असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन समितीच्या सभागृहात आज २३ मे रोजी कोरोना विषाणू संदर्भात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. सभेला अपर आयुक्त अभिजित बांगर, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ.संजय झोडापे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आयुक्त डॉ.संजीव कुमार पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने टीम वर्क म्हणून काम करावे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनीटायझरचा वापर करणे, हँड वॉशच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. आयसोलेशन वार्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमीत आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत,त्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.   
       सभेला सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहूल खांडेभराड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिल्पा सोनाळे, रविंद्र राठोड, गंगाराम तळपाडे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील व आय.एम.ए.चे डॉक्टर्स उपस्थित होते.
00000

Monday 18 May 2020

वनविभागाने वाचविले विहिरीत पडलेल्या अस्वलांचे प्राण सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडले


         उन्हाळा सुरू झाल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलातील नदी- नाले, पाणवठे तर काही शेतात असलेल्या विहिरीकडे धाव घेतात. पाण्याच्या शोधात असलेले दोन अस्वल आज १८ मे रोजी सालेकसा तालुक्यातील जांभळी गावाजवळील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडले. वनविभागाच्या शघ्र कृती दलाने तातडीने याची दखल घेऊन त्या अस्वलांना विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. सालेकसा तालुक्यातील जांभळी या गावाजवळील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पहाटे ३ ते ४ वाजता दरम्यान दोन अस्वले पडल्याची माहिती सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.इलमकर यांना मिळाली. तातडीने श्री इलमकर व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. 
        विहिरीत पडलेल्या एक नर व मादी अस्वलाला जिवंत सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी गोंदिया येथील वनविभागाच्या व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या शीघ्र कृती दलाशी संपर्क करण्यात आला. उपवनसंरक्षक एस.युवराज यांच्या आदेशाने दोन्ही शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही कृती दले आणि सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही अस्वलांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्यांना पिंजऱ्यात बंद करून घनदाट जंगलात सोडण्यात आले. 
         रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच अस्वलांना इजा देखील झाली नाही. अस्वलांचे रेस्क्यू ऑपरेशन नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या शीघ्र कृती दलाचे डॉ. खोडस्कर आणि देवरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वराडपांडे  यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनची कार्यवाही सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी ए.बी.इलमकर यांच्या नेतृत्वात दोन्ही चमूने अवघ्या चार तासात यशस्वीरीत्या पूर्ण केली.
         जांभळी परिसरातील ग्रामस्थांनी दोन्ही अस्वलांना सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल वनविभागाचे  कौतुक केले.

Friday 15 May 2020

सीलबंद बाटलीतून जिल्ह्यात होणार घरपोच मद्य विक्रीची सेवा

कंटेमेंट झोन वगळून विक्री
देशी मद्य घरपोच विक्रीला परवानगी नाही
छापील किंमतीने विक्री करणे बंधनकारक
         राज्य शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरपोच सीलबंद बाटलीतुन मद्यविक्री करण्याचे आदेश 11 मे रोजी दिले आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी 14 मे 2020 रोजी काढलेल्या एका आदेशाने गोंदिया जिल्ह्यात देखील सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये स्पिरिट, सौम्य मद्य, बियर व वाईनची सीलबंद बाटलीतून घरपोच विक्री करता येणार आहे 
         जिल्ह्यामध्ये घरपोच मद्य विक्री सेवा ही जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतरत्र करता येणार आहे. वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या कंटेमेंट झोनमध्ये घरपोच मद्यविक्री सेवा देता येणार नाही. देशी मद्याची घरपोच सेवा देता येणार नाही. ग्राहकाकडे परवाना नसल्यास त्यास नमुना एफएल-एक्स-सी परवाना अनुज्ञप्तीधारक देतील. सदर परवाना https://stateexcise.maharashtra.gov.in किंवा https://exciseservices.mahaonline.gov.in यावर तात्काळ उपलब्ध होईल. मद्याची मागणी नोंदविण्यासाठी परवानाधारक - ग्राहक व्हॉट्सप/ लघुसंदेश/ भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनीचा वापर करून मागणी करता येईल. किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाने त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक ठळकपणे त्याच्या दुकानाबाहेर प्रदर्शित करावा. या माध्यमांचा वापर करून घरपोच मद्य विक्री सुविधा देण्याची कार्यवाही अनुज्ञप्तीधारकांनी करावी. घरपोच मद्य वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळ संबंधित दुकानदाराने  ठेवावे. डिलिव्हरी बॉयला कोणत्याही परिस्थितीत २४ युनिटपेक्षा जास्त मद्याची वाहतूक करता येणार नाही. आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत दुकानातून मद्य वितरित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.   
         अनुज्ञप्तीधारक घरपोच मद्यसेवा किंवा त्यांची वितरण व्यवस्था चोख करण्यास जबाबदार असेल. मद्याची घरपोच सेवा देतांना मद्य विक्री छापील किरकोळ किमतीनेच करणे बंधनकारक आहे. घरपोच मद्य सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये. घरपोच मद्याची सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयचनोंदणीकृत डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र त्याने सोबत बाळगणे आवश्यक आहे. डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, हेड कॅप आणि हॅन्डग्लोज वापरणे तसेच त्याने निर्जंतुकीकरणासाठी सॅनीटायझरचा वापर करणे, वेळोवेळी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे.
         मद्य वितरण सेवेमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीला आरोग्य सेतू ॲप्सचा वापर कसा करावा याबाबतचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची राहील. घरपोच मद्य विक्रीसाठी अनुज्ञप्तीधारकाने एक अतिरिक्त स्वतंत्र नोंदवही ठेवावी.
         मद्य बाळगणे, वाहतूक करणे ईत्यादी मद्यसेवन परवान्यातील तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता अनुज्ञप्तीधारकांनी घ्यावी. घरपोच मद्य सेवेच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक व दोषीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा - २००५, साथरोग प्रतिबंध कायदा, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000




Wednesday 13 May 2020

गोंदिया होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारातून ५५ प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी




      गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज १३ मे रोजी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात जिल्ह्यातील ५५ प्रसार माध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
        नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २५ मध्ये असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
        कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे. लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधी हे वृत्तसंकलन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी त्यांची देखील रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
        या आरोग्य तपासणी शिबिरात माध्यमांच्या प्रतिनिधींची थर्मल स्कॅनिंग, नाडीचे ठोके आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. यावेळी प्रतिबंधात्मक औषधे मोफत देण्यात आली.
        या आरोग्य तपासणी शिबिरात गोंदीया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ.हर्षा कानतोडे, डॉ.रोशन कानतोडे, डॉ.सुषमा गौपाले, डॉ.ललित रहांगडाले, डॉ.सपना पटले, डॉ.राजेश हत्तीमारे, डॉ.ग्रुरुप्रीत कौर, डॉ.आकांक्षा अग्रवाल, डॉ.साक्षी तिवारी तसेच डॉ.निहाल कुंभलकर, डॉ.रिचा कोडवानी, डॉ.रुचिता जगवानी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीची आरोग्य तपासणी केली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कैलाश गजभिये, धम्मदिप बोरकर, पंढरीनाथ लुटे, अमित आखरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
00000

कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे - खा.सुनील मेंढे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

       कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्करुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोदगार खा.सुनील फुंडे यांनी १२ मे रोजी काढले. 
         शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा.मेंढे बोलत होते. यावेळी त्यांनी प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.सुवर्णा हुबेकर, डॉ.देशमुख, दीपक कदम, गजेंद्र फुंडे, मेट्रन अनु नांदने, डॉ.तिवारी, अधिसेविका दीप्ती साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         यावेळी अधिसेविका दीप्ती साळवे यांनी उपस्थित परिचारिक व परिचारिकांना आरोग्य सेवेची शपथ दिली.
        अधिष्ठाता डॉ.रुखमोडे जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणालेरुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा असल्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा  उंचावत आहेत. कोरोना मुक्तीच्या या लढयात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहे. 
         परिचारिकांनी  त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे. तसेच परिचारिकेबरोबरच परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत. जगावर कोरोनाचे संकट असतांना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू  रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढयातील परिचारक बंधू आणि भगिणींचे हे योगदान कोणीही विसरु शकरणार नाही, असेही डॉ.रुखमोडे म्हणाले.
       खा. मेंढे म्हणाले, परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक आहे. सध्याच्या कोरोना मुक्तीच्या लढयात  त्या उत्कृष्टरित्या आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेला मी सलाम करतो, अशा शब्दात त्यांनीही सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
        खा.मेंढे यांनी कोरोना बाधितांवर उपचार करतांना संरक्षणात्मक म्हणून घालण्यासाठी ३०० पीपीई किट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिल्या.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गेडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.योगेश पटले यांनी मानले. 
      कार्यक्रमानंतर खा.सुनील मेंढे यांनी  रुग्णालयात कोरोना कोविड डेडीकेटेड सेंटरला भेट देवून पाहणी केली.  कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा  बैठकीतून घेतला व आवश्यक त्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका उपस्थित होत्या.