जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 7 January 2019

लोकांच्या कल्याणासाठी काम करा - पालकमंत्री ना. बडोले




जिल्हा नियोजनचा आढावा
निधी वेळेत खर्च करा
शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून सामान्य माणसांचा विकास व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देते. हा निधी वेळेत खर्च करून अंमलबजावणी यंत्रणांनी लोकांच्या कल्याणासाठी काम करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हा नियोजनच्या कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. ए. भूत व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            कृषी विषयक योजना, जलयुक्त शिवार, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण व रस्ते आणि पाणी पुरवठा विभागाच्या योजना संबंधित यंत्रणेने प्राधान्याने राबवाव्यात. या योजनांवरील निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. शाळा खोल्यांच्या दुरुस्तीच्या 101 कामांसाठी निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. वर्ग खोल्यांच्या बांधकामाला गती द्यावी असेही ते म्हणाले.
आरोग्य सेवा या लेखाशीर्ष अंर्तगत अनुदान वितरित झाले नाही तसेच ज्या विभागाचे अनुदान वितरित झाले नाही त्याबाबत तपासणी करून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. महिला रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावेत असे पालकमंत्री यांनी सांगितले.
ग्रामीण पाणी पुरवठा, हातपंपाची दुरुस्ती, स्रोताचे बळकटीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही या दृष्टीने काम करण्यात यावे असे पालकमंत्री म्हणाले. नगरविकास, महसूल, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्राम विकास, शिक्षण व तंत्र शिक्षण, ग्रंथालय, नगररचना, या विभागाच्या खर्चाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शिष्यवृत्तीचे वाट तात्काळ करण्यात यावेत.
जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त निधी खर्च होताच त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र सर्व विभागाने तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बडोले यांनी दिले. अंगणवाडी बांधकामाचा निधी वेळेत खर्च करण्यात यावा. जिल्ह्यातील लघू पाटबंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लपा जि.प. यांनी प्रस्ताव पाठवावा निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध असून विविध विभागाने यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विकास योजनेमध्ये कृषी पंप देण्यात येतात. या योजनेच्या शासन निर्णयात कृषी पंपासोबतच कृषी सौर पंप असा उल्लेख करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी विभागाला दिल्या.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सण 2018-19 माहे डिसेंबर 2018 अखेर झालेल्या खर्च व भौतिक प्रगतीचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना सण 2019-20 करिता सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपायोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या आराखड्याची छाननी आणि जिल्हा वार्षिक योजना सण 2018-19 सर्व साधारण योजने अंर्तगत पुनर्विनियोजन प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
00000

Saturday 5 January 2019

जिल्ह्यातील 10 पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमीपूजन





          ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 4 कोटी 91 लक्ष 36 हजार रुपये खर्चाच्या 10 पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ई-भूमीपूजन करण्यात आले. ई-भूमीपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनी येथील सरपंच श्री.बुध्दे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.
         कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश राठोड, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) एस.के.शेगावकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांचेसह विविध गावातील सरपंच व सचिव उपस्थित होते. नागपूर येथून मुख्यमंत्री यांनी विदर्भातील 88 कोटी 26 लक्ष 68 हजार रुपये खर्चाच्या 111 पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन केले.
        गोंदिया जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत सडक/अर्जुनी तालुक्यातील खाडीपार, सितेपार, गिरोला. गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, मुरदोली, सोनेगाव. तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, खुरखुडी, खैरलांजी आणि सालेकसा तालुक्यातील निंबा या गावातील पाणी पुरवठा योजनेचे आज ई-भूमीपूजन झाले.
        या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने व अर्जुनी येथील सरपंच श्री.बुध्दे यांचेशी थेट संपर्क साधला. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्‍य सचिव श्यामलाल गोयल व विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार नागपूर येथील कार्यक्रमास उपस्थित होते.
         महानेटच्या माध्यमातून 30 हजार गावांमध्ये इंटरनेट सेवा पोहचविण्यात आली असून ग्रामपंचायतींना मंत्रालयाशी थेट संवाद साधता येईल. तसेच शाळा व आरोग्य केंद्रांमध्येही ही सेवा उपलब्ध करुन दिल्यामुळे चांगले शिक्षण तसेच आरोग्य सुविधा सुध्दा उपलब्ध होणार आहे. यावर्षी 23 कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून सर्व ग्रामपंचायती हरित व स्मार्ट करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणल्या जातील असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना राबवितांना वेळोवेळी पाणी पट्टी वसूल करुन योजना यशस्वीपणे राबवा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
00000