जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 31 July 2017

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले 'जय महाराष्ट्र'मध्ये



        माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजना' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.

          ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी  ७:३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयीची सविस्तर माहिती श्री. बडोले यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात दिली आहे.

Saturday 29 July 2017

शेतकऱ्यांच्या अर्जाचा ऑफलाईन स्वीकार करणार काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विम्यासाठी रविवारीही बँका सुरू

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या (रविवार, दि. 30) राज्यातील बँका सुरू राहणार आहेत. याबरोबरच बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे. या योजनेत सहभागापासून कणीही वंचित राहणार नाहीयाची दक्षता घेण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाहीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याची दखल घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निम शहरी भागातील बँका सुरू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ज्या बँकांची सोमवारी साप्ताहिक सुटी असते त्यांनी देखील सोमवारी कामकाज चालू ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेने कळविले आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना ई-केवायसीमुळे फॉर्म भरण्यास विलंब लागतो त्यातच काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवल्याने ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला मंजुरी देत बँकांमध्ये ई-केवायसीची माहिती घेऊन अर्ज ऑफलाईन जमा करण्यात येत आहेत. या सुविधेमुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होणार असून शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता राज्य शासनामार्फत घेण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी काळजी करु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
००००

स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा - राजकुमार बडोले

                                   हवाई सुंदरी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळा                                                                         • पुर्व विदर्भातील 213 युवतींचा सहभाग
 • 60 युवतींची पुर्वतयारी प्रशिक्षणासाठी निवड
              पुर्व विदर्भातील मुली हया हवाई सुंदरी होणे हे पुर्वी स्वप्नच होते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुलींच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला. या होतकरु मुलींना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम बार्टी करीत आहे. मुलींनी आता हवाई सुंदरीचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        29 जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे च्या वतीने आयोजित एअर इंडियातील हवाई सुंदरी (केबीन क्रु) च्या 400 रिक्त जागांकरीता मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेचे उदघाटक म्हणून श्री.बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुमरे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर, राजेश कठाणे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेव कापगते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एअर इंडियाचे केबीन क्रु प्रशिक्षक हेमंत सुटे, आशुतोष नगराळे, स्टेफी निकोलस यांची उपस्थिती होती.
       श्री.बडोले पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षापासून आपण या खात्याचा मंत्री म्हणून अनेक कामे केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यात येत आहे. मागील वर्षी 75 विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. आपला वाढती बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी 30 हजार मुला-मुलींना स्वयंरोजगार व स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये गटई कामगार, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांचे पाल्य व अन्य व्यवसायातील कामगारांच्या पाल्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम बार्टीमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
      जगातील उत्कृष्ट 200 विद्यापिठाच्या यादीत भारतातील एकाही विद्यापिठाचा समावेश नसल्याची खंत व्यक्त करुन श्री.बडोले पुढे म्हणाले, जगातील इतर विद्यापिठाच्या तुलनेत भारतातील विद्यापीठे मागे आहेत. उच्च शिक्षणासाठी बहुजन समाजाची मुले विदेशात गेली पाहिजे. बार्टीकडून दिल्लीतील नामांकीत संस्थेत मागासवर्गीय मुला-मुलींना संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पाठविण्यात आले होते, त्यांनी चांगले यश मिळविले. यावर्षी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाठविलेल्या 14 मुला-मुलींची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन समाजातील मुले शिकून मोठ्या पदावर गेली पाहिजे. न्यायिक प्रशासनात मागासवर्गीय मुले कमी आहेत. या क्षेत्रात त्यांनी आपले यश संपादन केले पाहिजे असेही ते म्हणाले.
       श्रीमती गहाणे म्हणाल्या, जिल्ह्यातील मुलींना हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न या पुर्व प्रशिक्षणातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बार्टीने योग्य मार्गदर्शन व दिशा दिल्यामुळे जास्तीत जास्त मुलींची निवड या कार्यशाळेतून हवाई सुंदरीच्या पुर्व प्रशिक्षणासाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       हवाई सुंदरीच्या या मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील 213 युवती उपस्थित होत्या. एअर इंडियाचे हवाई सुंदरी (केबीन क्रु) प्रशिक्षक हेमंत सुटे, आशुतोष नगराळे, स्टेफी निकोलस, श्रीकांत राऊत, नेहा जवादे व कुणाल चौकीकर यांनी उपस्थित युवतींची मुलाखत, संवाद कौशल्य चाचणी, शिक्षण, उंची व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे तपासली. या कार्यशाळेतून 60 युवतींची निवड हवाई सुंदरी पुर्वतयारी प्रशिक्षणासाठी केली. पुर्वतयारीसाठी त्यांना आता लेखी परीक्षा, प्रश्नावली, गटचर्चा, वैद्यकीय तपासणीची तयारी करावी लागणार आहे.                                                                                                                    डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून निवड झालेल्या गोंदिया येथील मोहिनी मेश्राम व भंडारा येथील द्विपल बिसने या युवतींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी या युवतींनी कठोर परिश्रमातून आपण हे यश मिळविल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने युवती उपस्थित होत्या. प्रास्ताविक देवसूदन धारगावे यांनी तर संचालन प्रा.किशोर शंभरकर यांनी, तर उपस्थित युवतींचे आभार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी मनोगतातून मानले.

Friday 28 July 2017

29 व 30 जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथे बार्टीचा पुढाकार : एअर इंडियातील केबीन क्रु 400 जागांसाठी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळा

          ग्रामीण भागातील होतकरु असलेल्या मुलींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथे 29 व 30 जुलै रोजी एअर इंडियातील केबीन क्रु च्या 400 रिक्त जागांसाठी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया असतील. विशेष अतिथी म्हणून खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री ना.गो.गाणार, प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रहांगडाले, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे यांची उपस्थिती राहणार आहे.

        एअर इंडियातील केबीन क्रु च्या 400 रिक्त जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 28, अनुसूचित जमातीसाठी 19, इतर मागासवर्गासाठी 153 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 200 पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मुलींची शैक्षणिक पात्रता पदवी व त्यापेक्षा अधिक गुणवत्ता असावी. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 27 वर्ष, इतर मागासवर्गीयांसाठी 18 ते 30 वर्ष आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी 18 ते 32 वर्ष अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी इच्छुक तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पदवी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांसह उपस्थित राहावे. असे आवाहन बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी केले आहे.   

पीक कर्ज व पीक विमा योजना बँकांना कृषि विभागाने सहकार्य करावे - जिल्हाधिकारी काळे


     
        खरीप हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतीची झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बँकांना कृषि विभागाने सहकार्य करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 27 जुलै रोजी खरीप पीक कर्ज वाटप व पंतप्रधान पीक विमा योजनेचा आढावा घेतांना आयोजित सभेत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.सिल्हारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक निरज जागरे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, आज शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करु नये. ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतील तर अशा बँकांच्या अधिकाऱ्यांच्या वेतनवाढी थांबविण्यात याव्या अशी सूचना आपण मुख्यमंत्री यांना नुकत्याच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी पीक कर्ज देतांना विम्याचा प्रिमियम कपात करावा. हा प्रिमियम 31 जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यातून कपात करुन भरावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
       30 जुलैला देखील बँका सुरु राहणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे म्हणाले, या दिवशी देखील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करुन व प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरता येईल. बँकांनी जर शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात केला नाही तर संबंधित बँकेकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्यात येईल. आता कमी दिवस शिल्लक असल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषि सहाय्यकामार्फत जास्तीत जास्त बिगर कर्जदार शेतकरी विमा काढतील यादृष्टीने नियोजन करावे. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची विस्तृत माहिती कृषि सहाय्यकांनी समजावून सांगावे असेही ते म्हणाले.
        एक कृषि सहाय्यक 25 बिगर कर्जदार शेतकरी पीक विमा काढतील यादृष्टीने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नियोजन करावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होईल त्यांना निश्चितच मदत करण्यात येईल. 31 जुलै पर्यंत जिल्ह्यातील 2500 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे यासाठी कृषि विभागाने व रिलायंस कंपनीच्या प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
       श्री.सिल्हारे म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. यापुढे शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी. 10 हजार रुपयापर्यंत तात्काळ कर्ज सर्व बँक शाखांनी शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध करुन दयावे. बँकांनी आपला व्यवसाय करतांना पीक कर्ज वाटपाबाबत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करु नये. कर्जमाफीचे अर्ज सर्व बँक शाखांमध्ये उपलब्ध करुन दयावे असेही ते यावेळी म्हणाले.
       श्री.इंगळे म्हणाले, तालुका कृषि अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाखेत पीक कर्ज वाटप व पीक विमा योजनेसाठी कृषि सहाय्यकाची समन्वयक म्हणून नेमणूक करावी. 31 जुलै पर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांकडून 780 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे विमा हप्ता शेतकऱ्यांकडून भरुन घ्यावा. प्रत्येक तालुका कृषि अधिकारी कार्यालयात रिलायंस कंपनीचा व्यक्ती समन्वयक म्हणून नियुक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांनी पीक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, कृषि उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री.नाईनवाड, तालुका कृषि अधिकारी सर्वश्री मंगेश वावधने, श्री.तुमडाम, श्री.शृंगारे, श्री.तोडसाम यांचेसह बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच विविध बँकेचे शाखा प्रबंधक उपस्थित होते.

एक संधी बळीराजाप्रती ऋण व्यक्त करण्याची!

            राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात आपलेही योगदान असावे या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. त्यादृष्टीने कर्जमाफीसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते सुरू करण्यात आले आहे. संस्था आणि व्यक्ती यांनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार असून या खात्यातील जमा रक्कम शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठीच उपयोगात आणण्यात येणार आहे.
            मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून भारतीय स्टेट बँकेच्या फोर्ट येथील मुंबई मुख्य शाखेमध्ये CHIEF MINISTERS FARMER RELIEF FUND या नावाने 36977044087 क्रमांकाचे बचत खाते उघडण्यात आले आहे. या शाखेचा कोड 0030 आणि आयएफएससी कोड SBIN0000300 असा आहे. या खात्यावर इच्छूक देणगीदारांना एनईएफटी ‌अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील.
राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वसमान्य जनतेबरोबरच विविध शेतकरी संघटना, सामाजिक तसेच खासगी संस्थांनी स्वागत केले असून या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपलेही सहकार्य देऊ केले आहे.
           शासनाच्या या योजनेस आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून संस्था आणि व्यक्ती यांनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तसेच कृषी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेसाठी आर्थिक सहाय्यता निधी कक्षाकडून अर्थसहाय्य देण्याचा ठराव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष न्यासाने मंजूर केला आहे. राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे मदत द्यावी, ‌असे आवाहन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

Tuesday 18 July 2017

पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टी बाधित जरुघाटाची पाहणी

महेंद्र लांडगेच्या वारसाला 4 लाखाची मदत


              अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात 15 जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील अनेक कुटूंब अतिवृष्टीने बाधित झाले. याच मंडळात येत असलेल्या चिचोली येथील शेतकरी महेंद्र लांडगे हा शेतातून घरी येत असतांना वाहून गेला.
                पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या केशोरी मंडळातील चिचोली, जरुघाटा व प्रतापगड या गावातील शेतीची तसेच घरांची पाहणी करुन शाळेत व भक्तनिवास येथे आश्रयास असलेल्या कुटूंबांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच इंदू वालदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                चिचोली येथे पालकमंत्री बडोले यांनी मृत शेतकरी महेंद्र लांडगे यांची पत्नी वत्सला लांडगे हिचे सांत्वन करुन नैसर्गीक आपत्ती अनुदानातून 4 लाख रुपयाचा धनादेश दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जरुघाटा या गावाला भेट देवून पुष्पाबाई लोगडे, मुन्ना तिवसकर व राजु तिवसकर यांच्या क्षतीग्रस्त घराची पाहणी केली व गावातील चौकात उपस्थित ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित कुटूंबांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
                जरुघाटा येथे 40 घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णत: नुकसान झाले असून हे नुकसान 5 लाख 81 हजाराचे आहे. चिचोली-केशोरी रस्त्याची पाहणी करुन अतिवृष्टीमुळे हा रस्ता खराब झाल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रतापगड येथील भक्त निवासात आश्रयास असलेल्या इश्वर शेंडे, इभाकर झिलपे, मनोहर राऊत, शनिश्वर मडावी, विनायक उईके या कुटूंबियांची त्यांनी भेट घेतली.
                पालकमंत्र्यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देवून अतिवृष्टीमुळे बाधित शेती व क्षतीग्रस्त घरांचे योग्यप्रकारे सर्वेक्षण करण्यात यावे. कोणताही बाधित शेतकरी तसेच क्षतीग्रस्त घरे नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Saturday 15 July 2017

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट.



जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया निर्मित समाज कल्याण योजनांवर आधारित सामाजिक न्यायाच्या दिशेने माहितीपट प्रसारण १६ जुलै रोजी सकाळी ९.३० झी २४तास वर.

Wednesday 12 July 2017

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित माहितीपट व जिंगल्स डिव्हिडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. या योजनांची माहिती तसेच या योजनांचे यश मांडणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत तयार केलेल्या सामाजिक न्यायाच्या दिशेने या 29 मिनिटाच्या माहितीपटाच्या डिव्हिडीचे व महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजना, कौशल्य विकास योजना आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना या योजनांवर आधारित वाटचाल समतेची या ऑडिओ-व्हिडिओ जिंगल्सच्या डिव्हिडीचे विमोचन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      या माहितीपटात समता, न्याय व बंधुता या विचारांवर आधारित काम करणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनेक योजना, अभियान व उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई स्टॉल योजना, फुले-शाहू-आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना व इतर शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह योजना, निवासी शाळा योजना, बचतगटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना, बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षेचे वर्ग, कौशल्य विकास योजना, रमाई घरकूल योजना, कृषि यांत्रिकीकरण योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, सामुहिक विवाह योजना, थोर समाजसुधारकांचा वसा पुढे नेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना देण्यात येणारे पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेले विविध कार्यक्रम, व्यसनमुक्ती साहित्य संमेलन यासह अन्य योजनांचे व कार्यक्रमांचे यश मांडणाऱ्या तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महामंडळाची माहिती या माहितीपटाद्वारे देण्यात आली आहे.

      माहितीपट व जिंगल्स निर्मितीसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे विशेष आभार मानण्यात येत असून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या माहितीपट व जिंगल्स निर्मितीमुळे जास्तीत जास्त युवक-युवतींना तसेच संबंधित घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी सांगितले.

पारदर्शकपणे योजनांचा लाभ देवून विकास कामे करा - खा.नाना पटोले

                       जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा
                                      

          केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ गरजू व योग्य लाभार्थ्यांना देतांना आणि विकास कामे करतांना यंत्रणांनी पारदर्शकपणे कामे करावी, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.

       11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
       खा.पटोले बोलतांना पुढे म्हणाले, केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास यंत्रणा उदासीन दिसतात. पावसाळा सुरु होवून सुध्दा आज ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व पंचायत विभागाने वेळीच याकडे लक्ष दयावे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. भूजल कायदयाचा वापर करुन भविष्यात पाण्याचा अतिवापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगून श्री.पटोले म्हणाले, यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दयावी. 31 जुलैपर्यंत जास्तीत जास्त कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी विम्याचा हप्ता भरतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेतून मदत देता येईल. नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना वेळीच मदत करावी. गरीब, गरजू व योग्य व्यक्तींना यादृष्टीने लाभ देण्यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले.
      प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून श्री.पटोले म्हणाले, बँकांनी या योजनेअंतर्गत तीन गटातून कर्ज देतांना बेरोजगारांची दिशाभूल करु नये. जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी प्रबंधक यांनी मुद्रा बँक योजनेत व्यक्तीश: लक्ष घालून बँकांना निर्देश दयावे असे सांगितले. जिल्ह्यातील एकही परिवार गॅस कनेक्शन पासून वंचित राहणार नाही यासाठी पुरवठा व वन विभागाने लक्ष दयावे. विविध यंत्रणांनी आपल्या कामात सुधारणा करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे ते म्हणाले.
      जिल्ह्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण नियमीत झाले पाहिजे असे सांगून श्री.पटोले म्हणाले, वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये कराव्यात. ज्या शेतकऱ्यांना धान रोवणी यंत्रे देण्यात आली आहे ती यंत्रे जूनी असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्याचे सांगून त्याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवनवीन कृषि तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करण्यासाठी कृषि विभागाने प्रोत्साहित करावे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होवून पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. गरजू व योग्य व्यक्तीलाच शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नैसर्गीक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना वेळीच मदत करण्यात येते. मुद्रा योजनेचा लाभ बेरोजगार व गरजू व्यक्तींनाच दिला पाहिजे यासाठी लक्ष घालण्यात येत असून बेरोजगारांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
      सभेला उपस्थित काही गावातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी समस्या मांडल्या. सभेला गोंदिया पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प.सदस्य तेजूकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, माजी जि.प.सदस्य राजेश चतूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, सुनिल केलनका यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री राजकुमार बडोले यांची जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुलाखत


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळी पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमीपूजन पालकमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सींग संवाद






             सडक/अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे 10 जुलै रोजी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार, वर्ल्ड बँकेचे टास्क टिम रिडर राहावा नीती उपस्थित होते.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात ई-भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, गोंदिया सारख्या मागास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पुतळी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या 16 गावातील ग्रामस्थांची पाणी समस्याची सोडवणूक करण्यास या भूमीपूजनामुळे मदत होणार आहे. या गावातील नागरिक बऱ्याच दिवसापासून शुध्द व स्वच्छ पाण्यासाठी व्याकूळ होते, आता या ई-भूमीपूजनामुळे पाण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितले.
         जिल्हाधिकारी कार्यालयात ई-भूमीपूजन कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सतीश सुशीर, कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे, उपअभियंता प्रदिप वानखेडे, शाखा अभियंता निशीकांत ठोंबरे, उपअभियंता राजेश मडके, उप कार्यकारी अभियंता श्रीमती सारवी, सहायक अभियंता श्री.नगराळे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कृष्णा जनबंधू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील विविध विभागातील 171 पाणीपुरवठा प्रकल्पाचे एकाचवेळी ई-भूमीपूजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शुध्द पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. ग्रामीण भागाला पिण्याचे शुध्द पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून 1003 नळ पुरवठा योजना व 83 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाची कामे हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

       पुतळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा लाभ सडक/अर्जुनी तालुक्यातील 16 गावे व 18 वाड्यांना होणार आहे. यामध्ये कोहलीपार, कन्हारपायली, सायलीटोला, पाटीलटोला, पाथरटोला, कोहमारा, बेघरटोली, कोयलारी, कोहळीटोली, मोहघाटा, पांढरवाणी, महारटोला, पुतळी, नरेटीटोला, रेंगेपार, कुलारटोला, मोकाशीटोला, कन्हारटोला, नवाटोला, बेघरटोला, उशीखेडा, सडक/अर्जुनी, दल्ली, लेंडीटोला, बोंडकीटोला, हलबीटोला, जीराटोला, सलंगटोला, डव्वा, घोटी, म्हसवाणी, चिरचाळी व गोंगले या गाव व वाड्यांना होणार आहे. या योजनेच्या कामाची किंमत 11 कोटी 32 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. ही पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतर दरडोई 55 लिटर पाणी रोज उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पुतळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट.

Monday 10 July 2017

नगदी पिकासह सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दयावे - राजकुमार बडोले

                           जिल्हा नियोजन समिती सभा


       गोंदिया धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी आता शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळण्यासोबतच जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रीय शेतीला चालना दयावी, यासाठी यंत्रणांनी त्यांना प्रोत्साहन दयावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 10 जुलै रोजी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, विविध यंत्रणांना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. हा निधी योग्य नियोजनातून निर्धारित वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी. निधी समर्पित करण्याची वेळ यंत्रणांना येणार नाही याकडेही लक्ष दयावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता 31 जुलै पुर्वी भरण्यास प्रोत्साहित करावे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 36 रिक्त पदे भरण्याची कार्यवाही बिंदू नियमावलीनुसार एका महिन्याच्या आत करावी. जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज जोडणी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्ह्यातील ज्या शाळांच्या इमारतीचे बांधकाम अपुर्ण अवस्थेत आहेत त्यांची कामे तातडीने पूर्ण करावेत असे सांगून श्री.बडोले म्हणाले, मुलांना शाळेच्या खोल्या नसल्यामुळे बसण्यास अडचणी निर्माण होत आहे त्या अडचणी दूर कराव्यात. जिल्ह्यातील तालुका पातळीवर असलेल्या क्रीडा संकुलाच्या आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करुन आवश्यक तेथे वीज दुरुस्तीची कामे सुध्दा करावी. जिल्ह्यातील पोंगेझरा, धम्मगिरी व कामठा या तीर्थक्षेत्राला क दर्जा मिळावा यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्यातील चिचगड, पालांदूर, बघोली, लटोरी, कहाली, गोरेगाव व इतर अपुर्ण अवस्थेतील पाणीपुरवठा योजना तातडीने सुरु कराव्यात. आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेचा निधी तिरोडा व गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी वाढवून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       ज्या ठिकाणी निकषानुसार राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची आवश्कता आहे त्याठिकाणी बँक शाखा सुरु व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून पाठपुरावा करावा असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयासाठी 16 स्लाईडची सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्याची कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या वृध्द, अपंग व गर्भवती महिलांना ये-जा करण्यासाठी लिफ्ट बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कपात करण्यात आली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यातील अंगणवाडी दुरुस्तीसाठी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया कक्षासाठी वातानुकूलित यंत्र बसविण्यासाठी व जिल्हा परिषदेला लिफ्ट बसविण्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून करुन दयावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
      आमदार अग्रवाल यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे बिंदू नामावलीनुसार भरण्याची कार्यवाही, कामठा आश्रमाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा पुन्हा दयावा, कमी करण्यात आलेला आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेचा निधी गोंदिया व तिरोडा मतदार संघासाठी वाढवून दयावा, वैद्यकीय महाविद्यालयासाठी नविन सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
       आमदार रहांगडाले यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे, त्या क्रीडा संकुलाची तातडीने दुरुस्ती करुन संकुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. या इमारतीचा वापर खेळाडूसाठी झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
      आमदार पुराम म्हणाले, कचारगड ते हाजराफॉल या 5 कि.मी. अंतराच्या रोपवेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ककोडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात यावी. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय टाळता येईल असे ते म्हणाले.      
       जिल्हाधिकारी काळे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 या वर्षात अनेक विभागाच्या तांत्रिक मान्यता उशिरा प्राप्त झाल्यामुळे निधी अखर्चीत राहिला तर यावर्षी योग्य नियोजनातून सर्व यंत्रणांचा निधी निर्धारित वेळेपूर्वीच खर्च करणार असल्याचे सांगितले.
       पुरातन वृक्षांचे जतन करणाऱ्या सालेकसा तालुक्यातील मोहाटोला येथील अनिता माहुले, रामाटोला येथील प्रेमलाल चौरके, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथील राजकुमार मानापूर, चोपराम आरसोडे, विनोद कापगते, पुष्पाबाई तिरपुडे, दुर्गा हातझाडे, तिडका येथील पुरुषोत्तम कापगते, कौशल्याबाई उके, देवराम मडावी व इब्राहिम पठाण या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आंबा, चिंच या वृक्षांचे संवर्धन करीत असल्याबद्दल एक हजार रुपये व दोन हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
      जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 या वर्षात सर्वसाधारण योजनेवर 97.78 टक्के, अनुसूचित जाती उपयोजनेवर 99.99 टक्के, आदिवासी उपयोजनेवर 98.3 टक्के आणि आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेवर 97 टक्के खर्च झाला आहे तर सन 2017-18 या वर्षात जून अखेर अनुसूचित जाती उपयोजनेवर 2.58 टक्के, आदिवासी उपयोजनेवर 54.32 टक्के, आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेवर 58.30 टक्के, तर सर्वसाधारण योजनेवर खर्च निरंक असून असा एकूण 42.74 टक्के खर्च झाला आहे. खर्चाची टक्केवारी 12.25 टक्के इतकी आहे.
      यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविता यावी यासाठी यापुढे कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ, पुष्पहार न देता सेंद्रीय तांदळाची पिशवी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून आज उपस्थित सर्व मान्यवरांना जिल्हाधिकारी काळे यांनी तांदळाची पिशवी भेट म्हणून दिली. राज्य सरकारला सुध्दा त्यांनी अशाच प्रकारचा प्रस्ताव पाठवून विविध कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या मान्यवरांना स्वागत प्रसंगी पुष्पगुच्छ न देता सेंद्रीय तांदूळ असलेली 1 किलोची पिशवी भेट म्हणून दयावी त्यामुळे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी सूचविले आहे. सभेला विविध यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांनी मानले.

कर्जाचा विनियोग स्वावलंबनासाठी करा - राजकुमार बडोले

                           महात्मा फुले महामंडळाचा 40 वा वर्धापन दिन

       सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील बेरोजगार तरुण-तरुणी, तसेच गरजू व्यक्ती हे स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बेरोजगार व गरजूंनी या महामंडळाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाचा विनियोग खऱ्या अर्थाने स्वावलंबनासाठी करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
    10 जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 40 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री श्री.बडोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जात पडताळणी कार्यायालचे संशोधन अधिकारी गौतम वाळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
    श्री.बडोले यावेळी म्हणाले, 500 कोटीचे या महामंडळाचे भागभांडवल आहे. या महामंडळामुळे अनेकांनी उद्योग व्यवसायात यश संपादन केले आहे. कोणत्याही महामंडळाकडून घेतलेले कर्ज हे बुडविण्यासाठी असतात हा विचार सर्वप्रथम डोक्यातून काढावा. आज या महामंडळाचे भागभांडवल संपत असून नव्याने 700 कोटी रुपये भागभांडवल मागण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळापैकी जास्त निधी या महामंडळाला देण्यात आला आहे. जिल्ह्यात या महामंडळाची कर्ज वसूली केवळ 12 टक्के आहे. ज्यांना महामंडळामार्फत कर्ज देण्यात आले आहे त्यांनी कर्जाची वेळीच परतफेड करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
      भविष्यात अनुसूचित जातीतून उद्योजक घडविण्यासाठी या महामंडळाकडून कर्ज देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यापुढे कर्ज देतांना योग्य त्या व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल. ज्यांच्याकडे या महामंडळाच्या कर्जाची थकबाकी आहे त्यांच्याकडून कर्जाची वसूली करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना स्वावलंबी करण्यास हे महामंडळ निश्चित काम करेल असे ते म्हणाले.

      मान्यवरांच्या हस्ते महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश व प्रशिक्षणार्थी यांना विद्या वेतनाचे धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.आर.ठाकूर यांनी केले. संचालन श्री.मुळे यांनी, तर उपस्थितांचे आभार श्री.इंगळे यांनी मानले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ


     पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गोंदिया जिल्हा मिशन-1 मिलियन फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा क्रीडा अधिकारी शुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

      अवघा महाराष्ट्र फुलबॉलमय करण्यास जिल्ह्यात फुटबॉल या खेळाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने हे मिशन उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यात सुध्दा चांगले फुटबॉलपटू तयार होण्यास या मिशनची मदत होणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. पालकमंत्री बडोले, जिल्हाधिकारी काळे, पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी फुटबॉलला किक मारुन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्री.उईके, श्री.बारसागडे व क्रीडापटू तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

11 जुलै रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांची जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मीत जय महाराष्ट्र कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांची सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजना या विषयावर 11 जुलै रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी 7.30 ते रात्री 8 या वेळेत मुलाखत प्रसारीत होणार आहे. निवेदिका मनाली दिक्षीत यांनी ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम, योजना तसेच सामाजिक न्याय दिनानिमित्त राबविण्यात आलेले कार्यक्रम आदि विषयीची सविस्तर माहिती पालकमंत्री बडोले हे या कार्यक्रमात देणार आहेत.

Friday 7 July 2017

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’


                    
                            दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन रविवारी प्रसारण 
                        कर्जमाफीविषयक प्रश्नांना सडेतोड उत्तरे
       कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, ३४ हजार कोटींचा मेळ कसा घातला, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का …. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. येत्या रविवारी ९ जुलै २०१७ रोजी मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्यांना पडलेल्या या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.  
        राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या शेतकरी कर्जमाफीया विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे ९ जुलै २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता प्रसारण होणार आहे. मुंबई दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनी, झी २४ तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होईल. याच दिवशी सकाळी १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर त्याचे प्रसारण होईल. 

                          आकाशवाणीवरुनही होणार प्रसारण
           या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक १० जुलै २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी ५.३० वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. १० जुलै, मंगळवार दि. ११ जुलै व बुधवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ७.२५ वाजता होईल. 
           या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यभरातील लोकांनी विचारलेल्या तसेच कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरुन लोकांकडून या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण २० हजाराहून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन शेतकरी कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन, शेतमालाला हमीभाव, नवीन पीक कर्ज अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत. 
           व्यवसाय अडचणीत आला म्हणून कर्ज माफ करणे योग्य आहे काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का, कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, ४० लाखांचा आकडा कोठून आला, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्त फायदा ?, ३४ हजार कोटींचा मेळ कसा घातला, जॉईंट अकाऊंट खातेदारांना काय फायदा होणार, चुकीच्या लोकांना लाभ मिळणार नाही याची काय खात्री, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत.


Wednesday 5 July 2017

कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·        कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकित कर्जदारांचा समावेश
·        नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
·        ओटीएस योजनेच्या लाभासाठी मुदतवाढ देणार
    
   राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून 2009 नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या परंतु 30 जून 2016 पर्यंत थकित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.
 त्याचप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून ती 31 जुलै 2017 पर्यंत करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेंतर्गत (ओटीएस) दीड लाखावरील रक्कम भरण्याचा निश्चित कालावधी शासन निर्णयात नमूद करण्यात आलेला नव्हता. त्यांना पैशाची उपलब्धता करण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून अशा शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमांतर्गत राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी, आमदार सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. आशिष देशमुख, डॉ. संजय कुटे आणि प्रशांत बंब यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीचे निकष बदलण्याची मागणी केली होती. त्यात प्रामुख्याने 2009 नंतरचे जून 2016 अखेरपर्यंत थकित असलेले कर्ज दीड लाख रुपयांच्या मर्यादेत माफ करणे, कर्जाचे पुनर्गठन केलेल्या मध्यम मुदत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी लागू करणे आणि ओटीएस योजनेसाठी कर्जाचे किमान चार टप्पे पाडून तीन टप्पे शेतकऱ्यांनी भरल्यानंतर शासनाने आपला दीड लाख रुपयांचा शेवटचा टप्पा भरावा, यांचा समावेश आहे.
शासनाने 28 जून 2017 च्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2012 नंतर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, 1 एप्रिल 2012 पूर्वी कर्ज घेतलेले अनेक थकित शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. त्यामुळे 1 एप्रिल 2012 हा निकष काढून त्यात 2009 नंतरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
           सन 2016-17 या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या व या कर्जाची 30 जून 2017 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेंतर्गत परतफेड केलेल्या कर्जाच्या 25 टक्के अथवा कमाल 25 हजार आणि किमान 15 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, या संदर्भातील 28 जून 2017 च्या शासन निर्णयातील 30 जून 2017 च्या मर्यादेमुळे अशा शेतकऱ्यांना 2016-17 मधील कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असल्याने या वर्षातील पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.

Saturday 1 July 2017

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन

• 33 महसूल मंडळात होणार हवामान केंद्र
               • 12 कि.मी.परिसरातील मिळणार अचुक हवामान नोंदणी
                                • आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त
                                • विकासाच्या योजना राबविण्यास ठरणार सहाय्यभूत


       कारंजा येथील कृषि चिकित्सालयात आज 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, आत्माचे उपसंचालक श्री.सराफ, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांची यावेळी उपस्थिती होती.
      हवामानाची अचुक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीचा सामना करावा लागते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान होते. या नैसर्गीक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी हे स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सोबतच अचुक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकांची माहिती वेळीच उपलब्ध होणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
      या हवामान केंद्रामुळे 12 किलोमीटर परिसरातील अचुक हवामानाची नोंद दर 10 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येणार आहे. जमा झालेली हवामान विषयक माहिती पीक विमा योजना, पीक विषयक सल्ला, हवामान विषयक संशोधन व इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषि विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हीसेस यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील 33 महसूल मंडळात हे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषि हवामानाचा सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास महत्वाचा ठरणार आहे. तसेच नैसर्गीक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापनास देखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या उदघाटन कार्यक्रमाला कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.