जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 28 March 2018

रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

     पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अंतिम धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, संशोधन अधिकारी गौतम वाकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

      रमाई घरकूल योजनेचे लाभार्थी रविंद्र मेश्राम, सुनिल निंबेकर, हेमराज नंदेश्वर, कोमल डोंगरे, दिनबंधू भौतिक, सुषमा खांडेकर यांना अंतिम धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी समाज कल्याण कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मद्योग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ आदी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडेगावला आदर्श करणार - राजकुमार बडोले


आमदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ
       वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करुन वडेगावला आदर्श करणार. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव/सडक येथे आमदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 28 मार्च रोजी फलकाचे अनावरण करुन करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य शिला चव्हाण, माधुरी पाथोडे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, पदमा परतेकी, भाजपा तालुका अध्यक्ष विजय बिसेन, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सरपंच हेमराज खोटेले, उपसरपंच छाया डोये यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, गावातील तरुण एकत्र आले तर गावाच्या विकासाला गती मिळून गावाचा विकास नक्की होईल. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून गावाच्या विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचाराचा आदर्श पुढे ठेवून ग्रामस्थांनी ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर विकासाला गती मिळेल. आदर्श गाव निर्मितीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
      श्री.हत्तीमारे म्हणाले, वडेगाव हे गाव पालकमंत्र्यांनी दत्तक घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गाव दत्तक घेतल्यामुळे वडेगावच्या विकासाला गती मिळेल. गावातील मुख्य समस्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष्य देवून त्या सोडवणूकीसाठी त्यांनी पाठपुरावा करावा. ग्रामस्थांनी सहकार्य केले तर गाव नक्कीच आदर्श होईल असे त्यांनी सांगितले.
      श्री.कठाणे म्हणाले, वडेगाव हे गाव आमदार आदर्श ग्राम योजनेत घेण्यात आले आहे. वडेगावचे पालकत्व पालकमंत्र्यांनी स्विकारल्यामुळे या गावाच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
       कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ब्राम्हणकर, सुरेश भेंडारकर, संजय मेंढे, अनिता मेंढे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठलराव कठाणे, बळीराम मेंढे, देवराव मुनीश्वर, श्रीमत मुनीश्वर, बाबुराव मेंढे, कंठीजी ब्राम्हणकर, वामन मुनीश्वर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      प्रारंभी पालकमंत्री बडोले यांनी वडेगाव/सडक प्रवेशद्वाराजवळ आमदार आदर्श ग्राम योजनेच्या फलकाचे अनावरण केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच हेमराज खोटेले यांनी केले. संचालन गिरीपाल फुले यांनी केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री.देशमुख यांनी मानले.
00000



Sunday 25 March 2018

दिव्यांगांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री राजकुमार बडोले

                     दिव्यांग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व महोत्सवाचा समारोप

     दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले क्रीडा गुणांचे प्रदर्शन या स्पर्धेतून दिसून आले आहे. या क्रीडा स्पर्धेतून विविध खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी सुध्दा चांगले क्रीडा कौशल्य असल्याचे दाखवून दिले आहे. हे विद्यार्थी दिव्यांग जरी असले तरी त्यांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
     देवरी येथे 23 ते 25 मार्च दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी यांच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सुमन बिसेन, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे, भाजपा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रविण दहीकर, रतन वासनिक यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल. या प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात येईल. भविष्यात हे विद्यार्थी ऑलंपीक स्पर्धेत कसे सहभागी होतील  यादृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांनीही विचार व्यक्त केले. पालकमंत्री बडोले यांना यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील कला शिक्षक प्रल्हाद शिरुले यांनी काढलेल्या लुईस ब्रेल व हेलन केलर यांची चित्रे भेट म्हणून देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मुकबधीर प्रवर्गात प्रथम- पुणे जिल्हा, द्वितीय- नागपूर जिल्हा, तृतीय- यवतमाळ जिल्हा. अस्थीव्यंग प्रवर्गात प्रथम- भंडारा जिल्हा द्वितीय- उस्मानाबाद जिल्हा, तृतीय- नागपूर जिल्हा. अंध प्रवर्गात प्रथम- अमरावती जिल्हा, द्वितीय- पुणे जिल्हा तृतीय- नागपूर जिल्हा. मतिमंद प्रवर्गात प्रथम- अमरावती जिल्हा, द्वितीय- नागपूर जिल्हा तृतीय- पुणे जिल्हा. बहुविकलांग प्रवर्गात प्रथम- नागपूर जिल्हा, द्वितीय- बुलढाणा जिल्हा, तृतीय- लातूर जिल्हा यांनी पारितोषिक पटकाविले.
    स्पर्धेत राज्यातून जवळपास 2500 विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेला पालकमंत्री बडोले यांनी ट्रॉफी देवून सन्मानीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केले. संचालन जवाहर गाढवे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला देवरी शहरातील, परिसरातील गावातील नागरिक तसेच खेळाडूंचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 24 March 2018

पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा - महादेव जानकर

लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियान


    पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करुन स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी. असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
       पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 24 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती विद्या खोटेले होत्या. यावेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.संजय गायगवळी, जि.प.पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे, जि.प.पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय कोळेकर, तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री.हिरुळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.जानकर पुढे म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत अनेक योजना आहेत, त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून माशाची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती कसा बनेल यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही असे सांगून ते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई/म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गीक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गीक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनाची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकऱ्यांनी एफ.एम.डी.सी.पी. अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      डॉ.शहारे म्हणाले, जिल्ह्यातील संकलीत दूधाकरीता मार्केटींगची आवश्यकता आहे. या लसीकरण अभियानाचा सर्व गोपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
      प्रास्ताविकातून डॉ.वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे. लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसमात्रा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाला पशुधन विकास अधिकारी डॉ.रोहिणी साळवे, डॉ.सायली तगारे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ.सुनिल आकांत, डॉ.वानखेडे, डॉ.चौधरी, डॉ.येडेवार, पशुधन पर्यवेक्षक डॉ.पदम,  ग्रामपंचायत सदस्य गीता पंधरे, ग्रामसेवक एस.एस.सिरसाम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम रहिले व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.येडेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पशुधन विकास अधिकारी डॉ.कोळेकर यांनी मानले.


दिव्यांग बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- महादेव जानकर

राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन




दिव्यांग व्यक्तीच्या अंगी सुप्त गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी राज्यात   दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांनी आपल्याला कधीही कमी लेखू नये. कारण दिव्यांग व्यक्ती सुध्दा प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करुन यश संपादन करु शकतात. आपला कुणी वाली नाही असे दिव्यांग बांधवांनी मनात विचार ठेवू नये.   दिव्यांग बांधवांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच अपंग कल्याण आयुक्तालय पुणे द्वारा आयोजित कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी यांच्या संयुक्त वतीने 24 मार्च रोजी तालुका क्रीडा संकुल देवरी येथे दिव्यांगांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. यावेळी आमदार संजय पुराम, अपंग कल्याण विभागाचे आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, जि.प.उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अली, देवरी नगराध्यक्षा सुमन बिसेन, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेशराम सोनबोईर, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री. जानकर पुढे म्हणाले, दिव्यांगांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी राज्यातील मोठ्या शहरात या क्रीडा स्पर्धा न घेता गोंदिया जिल्ह्यातील देवरीसारख्या अतिदुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहेत त्याबद्दल त्यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांना धन्यवाद दिले. गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना 3 टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. स्कील डेव्हलपमेंट इंडिया मिशनच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले.
      पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, शासनाने देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात दिव्यांगांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले त्याबद्दल त्यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले. अपंग बांधवांच्या विकासासाठी ग्रामपंचायत निधीत 3 टक्के निधी खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना 20 टक्के ज्यादा गुण देण्याचा निर्णय सुध्दा राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील 123 शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भातील निर्णय सुध्दा राज्य शासन महिन्याभरात घेईल असे यावेळी आश्वासन दिले. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधीनी निर्माण करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरु आहे. दिव्यांग बांधवांनी आपल्याला कमी लेखू नये कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वसामान्य माणसारखे दिव्यांगांनी जगावे असा शासनाचा मानस आहे. दिव्यांग बांधवांना कशा पध्दतीने नोकऱ्या देता येतील याबाबत शासन विचार करीत आहे. दिव्यांग बांधवांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      आमदार पुराम म्हणाले, दिव्यांग बांधवांनी आपल्याला कधीही कमी समजू नये. अशाच क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले खेळाडू निर्माण होतील असे सांगितले. 
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अशा देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहेत याचा जिल्ह्यातील नागरिकांना अभिमान आहे. गोंदिया जिल्हा हा निसर्गसंपन्न जिल्हा असून निसर्गाने जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. गोंदिया हा संपूर्ण महाराष्ट्राला तांदूळ पुरविणारा जिल्हा आहे. एकमेकांना सोबत घेवून दिव्यांग व्यक्ती सुध्दा सर्वसामान्य मागणाप्रमाणे क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून यशस्वी होवू शकतात असे त्यांनी सांगितले.
       या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय दिव्याग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधूदुर्ग, जळगाव, धुळे, नंदूरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडा स्पर्धक सहभागी झाले होते.
     कार्यक्रमास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, तहसिलदार विजय बोरुडे, माजी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, विरेंद्र अंजनकर, अनिलकुमार येरणे, रामलाल चौधरी, जयश्री येरणे, उपदेश लाडे, कुलदिप लांजेवार, मनोज भुरे, आशिष खतवार तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     प्रास्ताविक अपंग कल्याण विभागाचे आयुक्त नितीन पाटील यांनी केले. संचालन जवाहर गाढवे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांनी मानले.
                                                                                00000



Tuesday 13 March 2018

ग्राहकांच्या मागणीनुसार बचतगटांनी वस्तूंचे उत्पादन करावे - जिल्हाधिकारी काळे



माविमचे जिल्हा तेजस्वीनी संमेलन
• उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार
       जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे काम चांगल्याप्रकारे सुरु आहे. याचे सर्व श्रेय बचतगटात काम करणाऱ्या महिलांना आहे. आयसीआयसीआय आणि अलिकडेच आयडीबीआय बँकेकडून बचतगटांना मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यात आला आहे. माविमने आता बचतगटांच्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूंचे उत्पादन करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
     13 मार्च रोजी गोंदिया येथील हॉटेल ग्रँड सीता येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत गोंदिया जिल्हा तेजस्वीनी संमेलनाचे विशेष अतिथी म्हणून श्री.काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माविमचे विभाग सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आयसीआयसीआय बँकेचे विक्री व्यवस्थापक संतोष पाटील, आयडीबीआय बँकेचे शाखा प्रबंधक विक्रम बोराडे, नॅबकिन्सचे व्यवस्थापक त्र्यंबक मगर, ऑक्सीजन सर्व्हीस प्रा.लि.चे धिरज दोनोडे यांची उपस्थिती होती.
      श्री.काळे म्हणाले, जिल्ह्यातील 416 गावात माविमने महिलांच्या बचतगटांची स्थापना केली आहे. लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात बचतगटांच्या महिलांचे मजबूत संघटन तयार झाले आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. बचतगटांनी मिळालेल्या कर्जातून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काम करावे. अलिकडेच झालेल्या कृषि व पलास महोत्सवाचा उपयोग बचतगटांना त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या महोत्सवातून महिला बचतगटांना एक निश्चित शिकायला मिळाले ग्राहकांची कोणत्या वस्तू व साहित्याची मागणी आहे, ही मागणी लक्षात घेता, त्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
       श्री.पवार म्हणाले, तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमामुळे बचतगटातील महिला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षीत होवून त्यांना व्यवहाराची दिशा मिळाली. या प्रशिक्षणामुळे महिलांनी कोणता उद्योग व्यवसाय निवडावा हे निश्चित केले आणि त्यादृष्टीने त्यांनी पुढील वाटचाल सुरु केली आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज सक्षम होत आहे. बचतगटामुळे महिला संघटीत झाल्या असून त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बदलल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.खडसे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांना माविमने बचतगटाच्या स्थापनेतून विकासाची वाटचाल दाखविली आहे. अनेक बचतगटातील महिला आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत असून त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. महिला धोरणामुळे महिलांच्या विकासाला चालना मिळाली आहे. राज्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माझी कन्या भाग्यश्री, मनोधैर्य योजना यासह अनेक महिलाविषयक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून महिला विषयक कायदयांची सुध्दा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
     श्री.बोराडे म्हणाले, जिल्ह्यात माविम महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करीत आहे. माविममुळे महिलांना स्वावलंबनाची दिशा मिळाली आहे. अनेक महिला आज उद्योग व्यवसाय सुरु करुन कुटूंबाला हातभार लावीत आहे. बँका सुध्दा बचतगटातील महिलांना कर्ज देण्यास पुढाकार घेत आहे. महिला हया कर्जाची वेळीच परतफेड करीत असल्यामुळे त्यांना पुन्हा कर्ज मिळत आहे असे त्यांनी सांगितले.
         प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे म्हणाले, जिल्हा मागास, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त असला तरी बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी एक नवी क्रांती केली आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची आर्थिक बचत सुरु असून बचतगटातील अडचणीत असलेल्या महिलांना बचतगटातील पैसा कामी पडत आहे. जिल्ह्यात 5 हजारापेक्षा जास्त महिलांचे बचतगट असून 62 हजार महिला बचतगटांशी जुळलेल्या आहेत. अनेक बचतगटातील महिला अत्यंत प्रभावीपणे काम करीत असून त्यांनी पशुसखी, कृषीसखी, मत्स्यसखी म्हणून आपली भूमिका पार पाडीत आहे. आयसीआयसीआय बँकेने जिल्ह्यातील बचतगटांना सुध्दा मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करुन त्यांना उद्योग व्यवसायासाठी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल उत्कृर्ष (गोंदिया), स्वावलंबन (आमगाव), आधार (सडक/अर्जुनी), सहारा (सालेकसा), तेजस्वीनी (तिरोडा), नारीचेतना (देवरी) व तेजस्वीनी (गोरेगाव) या लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष व सचिवांना प्रत्येकी 25 हजार रुपयाचा धनादेश, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ, तसेच लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी (गोंदिया), आशा दखने (आमगाव), पालिंद्रा अंबादे (सडक/अर्जुनी), शालू साखरे (सालेकसा), अनिल आदमने (तिरोडा), हेमलता वादले (देवरी) व योगिता राऊत (गोरेगाव) यांना प्रत्येकी 10 हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल लेखापाल, सहयोगीनी व समुदाय साधन व्यक्ती यांना बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
      संमेलनानिमीत्त संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद सत्रात लोकसंचालीत साधन केंद्र सुरु करण्यामागचा उद्देश, लोकसंचालीत साधन केंद्राची रचना व कार्यपध्दती, लोकसंचालीत साधन केंद्र कायमस्वरुपी टिकावे म्हणून कार्य करता येईल आणि कोणकोणत्या योजना/उपक्रम राबविता येईल तसेच लोकसंचालीत साधन केंद्राचा महिलांना फायदा व उपयोग होतो की नाही तसेच भविष्यात लोकसंचालीत साधन केंद्राला कसे बघता येईल या विषयाच्या अनुषंगाचे उपस्थित महिलांना श्री.पवार व श्री.सोसे यांनी मार्गदर्शन केले.
        नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरीच्या अध्यक्ष श्रीमती सिध्दीकी, आधार लोकसंचालीत साधन केंद्र सडक/अर्जुनीच्या अध्यक्ष श्रीमती ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. या संमेलनात लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगीनी, समुदाय साधन व्यक्ती, पशुसखी व मायक्रो एटीएम साथी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखाधिकारी योगेश वैरागडे, उपजिविका सल्लागार नामदेव बांगरे, सुशील पंचभाई, प्रिया बेलेकर, प्रफुल अवघड, एकांत वरघने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले.

Sunday 11 March 2018

न्याय व्यवस्थेवरील विश्वास वृध्दींगत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - न्या.भूषण गवई


                      जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमीपूजन

       भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. लोकशाहीत लोकांना जे हक्क दिले आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास वृध्दींगत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांनी केले.
      जिल्हा न्यायालय परिसरात 11 मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत नविन इमारतीचे भूमीपूजन न्या.गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्या.मुरलीधर गिरटकर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर होते.
      न्या.गवई पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने राज्यघटना तयार केली आहे. राज्यघटना ही समानतेवर आधारीत आहे. कायदयापुढे सर्व समान आहे. जे मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचे काम राज्यघटनेला अभिप्रेत आहे. न्यायिक अधिकारी व वकील ही न्याय व्यवस्थेची चाके आहेत. दोघांनी एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय न्यायदानाचे काम पूर्ण होवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी समानता कबुल केली आहे. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. विरोधाभास जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत सामाजिक व आर्थिक समानता निर्माण होणार नाही हे डॉ.आंबेडकरांनी सांगितले आहे. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
     आज आनंदाचा क्षण असल्याचे सांगून न्या.गवई म्हणाले, गोंदिया वकील संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. याची सुरुवात आजपासून आपण करीत आहोत. गोंदिया वकील संघाला मोठी परंपरा लाभली आहे. न्या.वायकर, न्या.वझे, न्या.अमरजितसिंह बग्गा, न्या.टहलानी, न्या.स्वप्ना जोशी हे गोंदियाचे आहेत. न्यायमुर्ती सर्वश्री बग्गा, टहलानी आणि श्रीमती जोशी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगून न्या.गवई पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्याने मोठे वकील, न्यायाधीश दिले आहे. ज्यांनी गोंदिया बार असोशिएशनला नावारुपास आणले असल्याचे ते म्हणाले.
      न्या.गवई पुढे म्हणाले, शताब्दी वर्षापासून या वकील व न्यायाधीशांची प्रेरणा घेवून आपले कार्य आणखी चांगल्या प्रकारे करणे अपेक्षीत आहे. जिल्हा बार असोशिएशनचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे. शताब्दी वर्षात चांगले कार्य बार असोशिएशनच्या हातून घडतील आणि चांगले वकील व न्यायाधीश निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     न्या.गिरटकर म्हणाले, जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण होणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा या इमारतीत उपलब्ध राहणार आहे. जिल्ह्याच्या न्यायालयीन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन इमारती व व्यवस्थेच्या बाबतीत जिल्हा मागे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
     न्या.कोठेकर म्हणाले, विस्तारीत इमारत पाच मजली असणार आहे. यावर 23 कोटी रुपये खर्च होणार आहे. इमारत पुर्ण होताच न्यायालयात प्रलंबीत असलेली व पुढे येणारी प्रकरणे यांचा वेगाने निपटारा होण्यास मदत होईल. प्रलंबीत प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी न्यायिक अधिकारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
     जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.कटरे म्हणाले, न्यायालयीन कामकाज सोयीचे व्हावे यासाठी विस्तारीत इमारतीची गरज होती. पालक न्यायाधीश म्हणून न्या.गिरटकर यांनी विस्तारीत इमारतीला जागा उपलब्ध व्हावी तसेच तिचे बांधकाम लवकर व्हावे यासाठी पुढाकार घेतला. न्यायालयीन प्रक्रिया ही भारतीय व्यवस्थेत उच्च मानली जाते. भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमीपूजन कोनशिलेचे अनावरण करुन केले. न्या.गवई यांचा परिचय न्या.त्रिवेदी यांनी तर न्या.गिरटकर यांचा परिचय न्या.श्रीमती आनंद यांनी करुन दिला. जिल्हा वकील संघाच्या वतीने न्या.गवई यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून तसेच जिल्ह्यातील सर्व वकील संघाच्या वतीने देखील न्या.गवई यांचे स्वागत करण्यात आले. तसेच न्या.गिरटकर यांचे देखील स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
      कार्यक्रमाला चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन बोरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रबंधक श्री.चांदेकर, नागपूर खंडपिठाचे उपप्रबंधक आशिष आवारी यांचेसह न्यायिक अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा व तालुका वकील संघाचे पदाधिकारी, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संचालन न्या.नितीन ढोके व ॲड.ओम मेठी यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार न्या.श्रीमती इशरत शेख यांनी मानले.

Saturday 10 March 2018

देवरीतील दिव्यांगांच्या राज्य क्रीडा स्पर्धा यशस्वी करा - पालकमंत्री बडोले


23 ते 25 मार्च दरम्यान स्पर्धा
      दिव्यांग व्यक्तीच्या अंगी सुप्त क्रीडा गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी राज्यात 1997 पासून दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा येत्या 23 ते 25 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून हया स्पर्धा यशस्वी करा. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      10 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देवरी येथील क्रीडा संकुलात समाज कल्याण व विशेष सहाय्य विभाग व कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी यांच्या संयुक्त वतीने 23 ते 25 मार्च दरम्यान आयोजित दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, कृष्णा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, दिव्यांगांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना तीन टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यंगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. देवरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातून 3500 विद्यार्थी व 500 कला आणि विशेष शिक्षक येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना रेल्वे स्टेशन व बसस्थानकावरुन क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विभागाने क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी 108 क्रमांक ॲम्बुलन्सची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना हया स्पर्धा बघण्यासाठी आणावे. असे त्यांनी सांगितले.
     श्री.पाटील म्हणाले, दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचविण्याचे, त्यांच्या निवास व भोजनाच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुलामुलींसाठी मुकबधीर, मतीमंद, अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गात हया क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.गायकवाड म्हणाले, क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी मोबाईल शौचालय, ई रिक्शाची सुविधा तसेच खेळतांना खेळाडूला दुखापत झाल्यास औषधोपचारी सुविधा उपलब्ध करुन दयावी. क्रीडा स्पर्धेदरम्यान बसस्थानक गोंदिया व देवरी नियंत्रण कक्ष सुरु करावा. खेळाडूंसाठी काळजीवाहकाची व्यवस्था करावी. या दरम्यान वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. असे त्यांनी सांगितले.
    क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती श्री.येरणे यांनी दिली. सभेला क्रीडा स्पर्धेशी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मिलींद रामटेके यांनी मानले.

Friday 9 March 2018

लोककल्याणासाठी सोशल मिडियाचा वापर व्हावा - प्रविण महिरे





महामित्र उपक्रमाअंतर्गत संवाद सत्र
• सहभागी महामित्रांना भेटवस्तू वितरण
      आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. प्रिन्ट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता सोशल मिडिया असा प्रवास माध्यमांचा आहे. आज सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून लोककल्याणासाठी या मिडियाचा वापर झाला पाहिजे. असे मत निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी व्यक्त केले.
       माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मिडिया महामित्र या उपक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने चार संवाद सत्राचे आयोजन आज 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. संवाद सत्रानंतर सहभागी महामित्रांना भेटवस्तू देतांना आयोजित कार्यक्रमात श्री.महिरे बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी एल.एस.बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार, प्रा.बबन मेश्राम, प्रा.कविता राजाभोज, अनुलोम संस्थेचे सतीश ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.महिरे म्हणाले, महामित्रच्या माध्यमातून सोशल मिडियाचा एक प्लॅटफार्म उपलब्ध झाला आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. हया योजना सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्यास विकासाला गती मिळण्यासोबतच विवेकी समाज निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी संवाद सत्रामागची भुमिका विशद केली. संवाद सत्रात सहभागी झालेल्या महामित्रांना संदर्भमुल्य असलेली महाराष्ट्र वार्षिकी हे पुस्तक, लोकराज्य मासिक, आपला जिल्हा पुस्तिका, नववर्षाचे टेबल कॅलेंडर व सारस पक्षाची माहिती असलेली घडिपुस्तिका भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षक म्हणून संजय भावे, सुनिल पटले, अशोक शेंडे, श्री.बावणकर, प्रा.बबन मेश्राम, डॉ.सुवर्णा हुबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, लेखाधिकारी एल.एस.बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी तर निरीक्षक म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, प्रा.कविता राजाभोज, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, के.के.गजभिये यांनी काम पाहिले. उपस्थितांचे आभार अनुलोम संस्थेचे सतीश ठाकरे यांनी मानले.

Thursday 8 March 2018

सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शावर महिलांनी वाटचाल करावी - सविता पुराम




अर्धनारेश्वरालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा
    महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. महिला हया दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत आहे. महिलांनी प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. असे प्रतिपादन माजी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम यांनी केले.
       8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थानात महिला आर्थिक विकास महामंडळ, तहसिल कार्यालय सालेकसा, जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया व सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा यांच्या संयुक्त वतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळाव्याच्या उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पं.स.उपसभापती दिलीप वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार प्रशांत सांगळे, पं.स.सदस्य प्रतिभा परिहार, हिरालाल फाफनवाडे, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांची तर मंचावर सहारा लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा अर्चना चुटे, सचिव सुकेशना रहांगडाले, सदस्य सुनिता थेर, दमयंती मौजारे, धनवंता वडगाये, शिला मेश्राम यांची उपस्थिती होती.  
       श्रीमती पुराम म्हणाल्या, महिला आता केवळ चुल आणि मुल यापुरत्या मर्यादित न राहता पुरुषाच्या खांदयाला खांदा देवून प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. महिलांनी कुटूंबाकडे लक्ष्य देवून काम केले तर त्या सर्वच क्षेत्रात यशस्वी होतील असेही त्या म्हणाल्या.
      अध्यक्ष म्हणून बोलतांना श्री.वाघमारे म्हणाले, देशात महिलांना एकीकडे पुजनीय स्थान आहे, तर दुसरीकडे तिच्याकडे हिनतेने बघितले जाते. महिलाने स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यास त्या प्रगतीकडे वाटचाल करतील. महिला शिक्षीत झाल्या तर त्या त्यांच्या हक्कांबाबतीत जागरुक होतील. महिलांनी जुन्या परंपरा, रितीरिवाज यांना तिलांजली देण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये समाजाचा उध्दार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.सिल्हारे म्हणाले, महिला जर सामाजिकदृष्टया सक्षम झाल्या तर आर्थिकदृष्ट्या त्या समृध्द होतील. महिलांसाठी बँकांच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग करुन समृध्दीचा मार्ग प्रशस्त करावा. बँकांच्या विविध योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. स्टॅन्ड अप इंडिया या अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांसाठी असलेल्या बँकेच्या योजनाचा महिलांनी लाभ घेवून विकासाचा मार्ग प्रशस्त करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      श्री.जागरे म्हणाले, महिलांच्या विकासात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे महत्वाचे योगदान आहे. महिलांना आजही पाहिजे तसे मानाचे स्थान मिळत नाही. महिलांच्या बाबतीत पुर्वी असलेल्या केशवपण सारख्या प्रथा बंद केल्या आहेत. महिलांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. स्त्री भ्रृण हत्या थांबल्या पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज संघटीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती परिहार म्हणाल्या, महिलांनी राजकीय क्षेत्रात काम करतांना स्वबळावर निर्णय घ्यावे. घरच्या व्यक्तीवर अवलंबून राहून राजकीय निर्णय महिलांनी घेवू नये. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसीत होण्याची आवश्यकता आहे. महिलांनी केवळ संसारात न रमता समाजाच्या कल्याणासाठी काम करावे. जेवढा पुरुष मुक्त आहे तेवढ्या महिला सुध्दा मुक्त असल्या पाहिजे. अशक्य काम शक्य करण्याची क्षमता महिलांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.                                                                                                                            
      डॉ.बेदरकर म्हणाल्या, महिला आजही निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. पुर्वी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उध्दारी असे म्हटले जायचे. पण आज महिलांच्या हाती ध्वजारोहणाची दोरी आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोडबिलामुळे महिलांना आत्मसन्मान मिळाला आहे. अनेक कर्तृत्ववान महिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महिलांनी वाटचाल करावी असे त्या म्हणाल्या.
      श्रीमती रामटेके म्हणाल्या, महिलांवर आजही अत्याचार होतात. अत्याचाराचे प्रमाण आजही कमी झालेले नाही. डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या मुलमंत्रानुसार काम करावे. महिलांसाठी ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या 10 टक्के निधीचा वापर महिलांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. कौंटूबिक हिंसाचार कायदयाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. महिलांचे जीवन उध्वस्त होवू नये म्हणन हा कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.सांगळे म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे जीवन परिवर्तन आणखी वेगाने होण्याची आवश्यकता आहे. अनेक महिलांनी विविध बँकांचे कर्ज घेवून यशस्वीपणे उद्योग व्यवसाय सुरु करुन आदर्श निर्माण केला आहे असे त्यांनी सांगितले.
       प्रास्ताविकातून श्री.खडसे म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना बँकांच्या विविध योजनांची माहिती होण्यास मदत होत आहे. महिलांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड केली आहे. मुद्रा योजना महिलांना स्वावलंबी करण्यास उपयुक्त ठरत आहे. जास्तीत जास्त महिलांनी राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री.फाफनवाडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
      यावेळी मंजुषा सुर्यवंशी आमगाव/खुर्द यांना रेडिमेड कपड्याच्या व्यवसायासाठी 75 हजार रुपये, उषा वऱ्हाडे आमगाव/खुर्द यांना किराणा दुकान व्यवसायासाठी 75 हजार रुपये आणि संतोषी चुटे आमगाव/खुर्द यांना 75 हजार रुपये मंडप डेकोरेशन व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या किशोर गटातून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सालेकसाच्या वतीने कर्ज प्रकरण मंजुरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
      सालेकसा तालुक्यातील उत्कृष्ट महिला बचतगट म्हणून जिजाबाई महिला स्वयंसहाय्यता बचतगट पांढरी, चांदणी महिला स्वयंसहाय्यता बचतगट गांधीटोला, मातोश्री महिला स्वयंसहाय्यता बचतगट हलबीटोला, गायत्री महिला स्वयंसहाय्यता बचतगट तिरखेडी, उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून रचना ग्रामसंस्था रोंढा, दर्पण ग्रामसंस्था लोहारा, कचारगड ग्रामसंस्था जमाकुडो व भविष्य ग्रामसंस्था ब्राम्हणटोला, उत्तम समुदाय साधन व्यक्ती म्हणून गीता सोनटक्के(कोटजंभोरा), ज्योती चुटे(भजेपार), मंजू कुंभरे(हलबीटोला), मालती बारबते (कावराबांध), उत्तम पशुसखी म्हणून सुनिता रहांगडाले(खोलगड), रेखा रहांगडाले(पांढरी), अर्चना सहारे(कहाली), ज्योती दोनोडे(सलंगटोला) यांचा स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल, आरोग्य विभागाचा एडस् व सिकलसेलबाबत जनजागृती स्टॉल, महिलांच्या हिमोग्लोबीन तपासणीसाठी बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक, पशुखाद्य, मत्स्य लोणचे आदींचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते. उपस्थित महिलांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती असलेले पॉम्पलेटस्‍ व वाटचाल विकासाची ही घडिपुस्तिका वितरीत करण्यात आली. यावेळी बचतगटाच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप कुकडकर, सुरेंद्र टेंभरे, भुषण कोरे, झनक तुरकर, श्री.ढेकवार, देवेंद्र शहारे, लक्ष्मी नागदेवे, प्रशांत बारेवार, छाया मोटघरे, अर्चना कटरे, दुर्गा देशमुख, नैना कटरे, उषा पटले, मंदा करंडे, कामेश्वरी गोंडाणे, सुशीला बघेले, मुकेश भुजाडे, रवि कटरे, पन्नालाल पटले, नैना अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शालिनी साखरे यांनी केले, उपस्थितांचे आभार माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले. कार्यक्रमाला सालेकसा तालुक्यातील बचतगटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Saturday 3 March 2018

रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी - आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत



खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण
     लोकसंख्या आणि अंतराच्या निकषावरच वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य संस्थेची स्थापना करण्यात येते. रुग्णांसाठी डॉक्टर हा देव असतो. रुग्णांच्या सेवेची गरज लक्षात घेता त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.
       3 मार्च रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण डॉ.सावंत यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य सर्वश्री गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे, माधुरी पातोडे, शिला चव्हाण, सरिता कापगते, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, पं.स.सदस्य इंदूताई परशुरामकर, सरपंच उर्मिला कंगाले, उपसरपंच टेकराम परशुरामकर यांची उपस्थिती होती.
       डॉ.सावंत म्हणाले, आरोग्य सेवा ही राजकारण विरहित असली पाहिजे ही आपली भूमिका आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील 86 टक्के डॉक्टरांची पदे भरली आहे. यासाठी पालकमंत्री बडोले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील समस्या सोडविण्यात येतील. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या इमारतीच्या भूमिपूजनाची कामे प्रलंबीत असल्यामुळे ही भूमिपूजने पालकमंत्र्यांनी तातडीने करावीत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम त्वरित होण्यास मदत होईल. येत्या सहा महिन्यात सौंदड ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यात येतील. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकही दिवस डॉक्टरविना राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही नविन पध्दतीची आहे. ही इमारत चांगली आणि दर्जेदार व्हावी यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आरोग्य अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आता चांगली वास्तू निर्माण झाल्यामुळे चांगली आरोग्य सेवा देखील आरोग्य विभागाने दयावी असे ते म्हणाले.
       सौंदड ग्रामीण रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री.बडोले म्हणाले, सडक/अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला पाहिजे. आरोग्य सेवा देतांना वैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध झाले पाहिजे. सौंदड ग्रामीण रुग्णालयासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला पाहिजे तसेच या रुग्णालयासाठी नविन इमारत देखील तयार झाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
       यावेळी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करणारे कंत्राटदार विष्णू अग्रवाल यांचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
      खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत ही 894 स्क्वेअर मीटर जागेवर उभारण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे टाईप-1 निवासस्थान 206 स्क्वेअर मीटरवर, टाईप-2 210 स्क्वेअर मीटर, पहिल्या माळ्याचे बांधकाम 210 स्क्वेअर मीटर आणि टाईप-3 चे बांधकाम 210 स्क्वेअर मीटर करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, 14 कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, सुरक्षा भिंत, रस्ते, बोरवेल, विद्युतीकरण, फर्निचर, बगीचा, बायोमेडिकल वेस्ट पीट, गप्पीमासे पैदास केंद्र तयार करण्यात आले आहे. या इमारतीच्या बांधकामावर 4 कोटी 28 लाख 22 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
     प्रारंभी आरोग्य मंत्री डॉ.सावंत, पालकमंत्री बडोले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. आरोग्य केंद्रातील विविध विभागाची पाहणी केली. कार्यक्रमाला खोडशिवणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री.शेंडे यांनी मानले.