जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 26 February 2018

माविमच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न - राजकुमार बडोले



       महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करीत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
     24 फेब्रुवारी रोजी प्रितम लॉन गोंदिया येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 43 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे, आयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमोल राजगिरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, जिल्ह्यात 5043 बचतगट असून महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करुन त्यांना सक्षम करण्याचे चांगले काम करीत आहे. आजच्या काळात मार्केटिंग बदललेली आहे. त्यामुळे बाजारपेठेची सांगड घालणे अत्यंत गरजेचे आहे. महिला बचतगटाने उत्पादीत केलेल्या वस्तुला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.अग्रवाल म्हणाले, महिला सक्षमीकरण चळवळीला पुढे नेण्याचे काम माविमच्या माध्यमातून होत असून यात 62 हजार 486 महिलांचा सहभाग आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुला विक्री केंद्रासाठी एक चांगला मॉल तयार करण्याच्या दृष्टीने माविमची स्वतंत्र इमारत तयार व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
    प्रास्ताविकातून श्री.सोसे म्हणाले, आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने 24 फेब्रुवारी 1975 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांचा विकास करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम माविमच्या माध्यमातून करण्यात येत आहे असे सांगितले.
      यावेळी महिला बचतगटाच्या कार्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार केल्याबद्दल लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांचा, महिला बचतगटाच्या कार्याची इलेक्ट्रानिक मिडियाच्या माध्यमातून दखल घेवून त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल एबीपी माझा न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी हरिष मोटघरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून प्रोत्साहीत केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांचा, महिला बचतगटाच्या सक्षमीकरणात नाबार्डच्या सहभागाबाबत नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे, महिला बचतगटाच्या बळकटीकरणात बँकेच्या आर्थिक सहभागाबद्दल आयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमोल राजगिरे, तसेच उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया, स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव, सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा, त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धेत नलु मेहर (प्रथम), अस्मिता भैसारे (द्वितीय), एल.डी.बांगरे (तृतीय) यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल, यशोगाथा स्पर्धेत भारती लांजेवार (प्रथम), सहारा सीएमआरसी सालेकसा (द्वितीय), तेजस्वीनी येरपुडे (तृतीय) यांना पुरस्कार मिळाबद्दल, गीत गायन स्पर्धेत मनोज बोरकर तिरोडा (प्रथम), कल्पना नंदेश्वर सडक/अर्जुनी (द्वितीय), नंदेश्वरी बिसेन तिरोडा (तृतीय) यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
    यावेळी पालकमंत्री बडोले यांनी चित्रकला स्पर्धा व यशोगाथा स्पर्धेचे अवलोकन केले. याप्रसंगी माविमच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, माविम कार्यालयातील प्रफुल अवघड, एकांत वरघने व महिला बचतगटाच्या सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मानले. कार्यक्रमास माविमच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tuesday 20 February 2018

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कटिबध्द - पालकमंत्री बडोले


                        वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र शिबीर

      जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रापासून वंचित आहे. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहिम कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्राचे प्रमाण शुन्य टक्के आणण्यात येईल. त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
       20 फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शुन्य टक्के प्रमाण या विशेष मोहिम कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले, यावेळी ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.पावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.रुखमोडे, सुनील केलनका, विरेंद्र जायसवाल, डॉ.लक्ष्मण भगत यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, राज्यातील किंवा देशातील हा कदाचित पहिला प्रयोग असावा की जेथे अपंगत्वाचे 100 टक्के प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या जवळपास 22 योजनांचा लाभ त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनेक यंत्रणांनी चांगले सहकार्य केले आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले साहित्य देखील शिबिरातून देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे मोजमाप केल्यानंतर त्यांना साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. आपला कुणी वाली नाही ही दिव्यांग बांधवांमध्ये असलेली भावना त्यांनी दूर करावी. अडीअडचणीच्या प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असे त्यांनी सांगितले.
     डॉ.दयानिधी म्हणाले, दिव्यांगांना शुन्य टक्के प्रमाणपत्र देण्याचा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे. पुर्वी दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांना खुप त्रास सहन करावा लागला. मात्र या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना घरपोच प्रमाणपत्र देण्याचे काम होणार आहे. विविध यंत्रणांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही याची दक्षता या विशेष मोहिमेतून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.अल्ताफ हमीद म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही याची दक्षता पालकमंत्री बडोले यांनी घेतली आहे. या बांधवांना भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी जिल्ह्यातून आलेल्या 463 अपंगत्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधीर, बहुविकलांग, मतिमंद, अंधत्व/अंशत: अंधत्व या पाच प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. प्रारंभी पालकमंत्र्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी करुन दिव्यांग बांधवांशी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
       प्रास्ताविक अभिजीत राऊत यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विजय ठोकणे यांनी मानले. कार्यक्रमाला शिबिरासाठी आलेले दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गोंदिया व नागपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Sunday 18 February 2018

समृध्द शेतीसाठी शेतीचे प्रयोग गावापर्यंत पोहोचवा - पालकमंत्री राजकुमार बडोले




गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सवाचे उदघाटन
                                • सेंद्रीय तांदूळाचे प्रदर्शन व विक्री
                                • यांत्रिकीकरण व शेतीविषयक तज्ञांकडून मार्गदर्शन
                                • बचतगटांच्या उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्री
                                • पशुपक्षांचे प्रदर्शन
      जिल्ह्यात औद्योगिकीकरण झाले नसल्यामुळे जिल्हा मागास आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक देखील कमी आहे. मात्र निसर्गाने जिल्ह्याला भरभरुन दिल्यामुळे जल व वन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. जिल्ह्याच्या पारंपारिक शेतीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता प्रगत कृषि तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीच्या समृध्दीसाठी नवनविन कृषिविषयक प्रयोग गावापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      18 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा, कृषि विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त वतीने आयोजित पाच दिवशीय गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले. यावेळी ते बोलत होते. मंचावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, गोंदिया शेतकरी उत्पादक संघाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, गोरेगावच्या माजी पं.स.सभापती चित्रलेखा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, विरेंद्र जायसवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, जगात सर्वात जास्त शिक्षणाची गरज आज कृषि क्षेत्रात आहे. शेतीसाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रगत देशातील शेतीवरुन लक्षात येईल. अशाप्रकारच्या प्रदर्शनाच्या प्रयोगातून अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. बचतगटातील महिला हया चांगल्याप्रकारे विविध वस्तुंचे उत्पादन करीत आहे. उत्पादीत मालाची चांगली पॅकींग व मार्केटिंग केली तर चांगली बाजारपेठ त्यांना मिळू शकते असे त्यांनी सांगितले.
      कमीत कमी जागेत जास्तीत जास्त धानाचे उत्पादन घेता आले पाहिजे यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, शेतकऱ्यांनी आता जागतिक तंत्रज्ञानाशी जोडून घेतले पाहिजे, तरच शेतीवरचा भार कमी होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी मातीची आरोग्य तपासणी केली तर त्याला मातीत असलेली कमतरता व कोणते उत्पादन त्या शेतीमधून घ्यावयाचे आहे हे लक्षात येईल. केवळ धानपिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी आता शेतीपुरक उद्योगाकडे वळले पाहिजे व त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे. जिल्ह्यात राईस पार्क सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्जुनी/मोरगाव येथे नुकतीच केल्यामुळे कृषि संशोधन, प्रक्रिया व विविध प्रकारच्या धानाच्या प्रजातीतून जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होणार असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी समृध्द होण्यास मदत होणार आहे.
      तुटतुडा व मावामुळे ज्या धानपिकाचे नुकसान झाले आहे तसेच गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना देखील निश्चित मदत करण्यात येईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, आता उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करुन दुष्काळ निश्चित करण्यात येतो. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात बदल करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व शेतकऱ्यांनी तसेच बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची विक्री व्हावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीच्या गटांनी सुध्दा उत्पादित केलेला सेंद्रीय तांदूळ विक्रीसाठी या प्रदर्शनात उपलब्ध आहे. सेंद्रीय शेतीत रोगराई येत नाही. जिल्ह्यातील उत्पादीत सेंद्रीय तांदूळ गोंदिया ब्रँड म्हणून विकसीत करुन मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या शहरात मोठ्या   मॉलमधून चांगल्याप्रकारे विकला जाईल असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी शेतकऱ्यांनी निष्ठेने सेंद्रीय शेती करावी असे आवाहन केले.
       श्री.दयानिधी म्हणाले, शेतीच्या विकासाच्या दृष्टीने ज्या विविध योजना आहेत त्या योजनांची माहिती शेतकऱ्यांनी करुन घ्यावी व त्या योजनांचा लाभ घ्यावा. अनेक शेतकरी कृषिविषयक योजनांचा चांगल्याप्रकारे लाभ घेतात. या प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची जास्तीत जास्त नागरिकांनी खरेदी केली पाहिजे. त्यामुळे शेतकरी व बचतगटातील महिलांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी रेखलाल टेंभरे यांनी देखील मार्गदर्शन केले.
      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवात लावण्यात आलेल्या कृषिविषयक सेंद्रीय तांदूळाच्या स्टॉलला, भाजीपाला स्टॉल, बियाणे स्टॉल, बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंच्या स्टॉलला तसेच अन्य स्टॉलला देखील पालकमंत्री व मान्यवरांनी भेट दिली.
      पशु व पक्षी प्रदर्शनात शादाब गोटफार्म हिरडामाली यांनी बरबरी, तोतापरी, जमनापारी, बिटल, सोजत या बकऱ्यांच्या जाती, गिर, सेहवाल व अन्य देशी गाई तसेच कडकनाथ, गिरीराज व अन्य प्रजातीच्या कोंबड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहे. तसेच कृषि विभागाने देखील विकसीत वसुंधरा पाणलोट, अन्य कृषिविषयक प्रदर्शने लावली आहे.
     उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. संचालन तालुका कृषि अधिकारी घनश्याम तुमडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार उपसंचालक अश्विनी भोपळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, बचतगटातील महिला उपस्थित होत्या.

Saturday 17 February 2018

संतांमुळे एकता व बंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत - स्वागताध्यक्ष राजकुमार बडोले



7 व्या अ.भा.मराठी संत साहित्य संमेलनाचे सुप वाजले
     महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. या संतांच्या विचारानेच महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. संतांच्या शिकवणुकीमुळे  एकता व बंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादन सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      आज 17 फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त वतीने 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री.बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री अमरीश राजे आत्राम, संमेलनाध्यक्ष हभप डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, आमदार सर्वश्री विनायक मेटे, संजय पुराम, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, हभप बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, भंते संघ धातू, कास्ट्राईब संघटनेचे अरुण गाडे, माजी अधिष्ठाता डॉ.ज्ञानेश्वर कडव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत साहित्य संमेलनाला उपस्थिती दर्शवून राज्यात संतपीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच संमेलनातून प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना समता प्रतिष्ठान व समाज कल्याण विभागाचा पहिला संत चोखामेळा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कार्याचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. चोखोबांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्याच्या विकासासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करुन देवून त्यांच्या निर्वाण भूमीचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
      पूर्व विदर्भ हा भाग धान उत्पादकांचा असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासोबत धानावरील संशोधन करुन अनेक बियाणे विकसीत करण्यासाठी राज्यातील पहिला राईस पार्क अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. संत कबीरांनी दोह्याच्या माध्यमातून संपूर्ण जगात बंधुता व एकतेचे बीज रोवण्याचे काम केले आहे. झाडीपट्टीच्या या भागात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुध्दा येवून गेले. त्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. जिल्ह्यातील विविध गावातील भागवत सप्ताहाच्या माध्यमातून ज्या संतांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले त्यांना सुध्दा या संमेलनात सन्मानीत करण्यात येत असल्याचे सांगितले.
      जिल्ह्यात धानाची खरेदी करणाऱ्या संस्थांकडे धान ठेवण्यासाठी गोदामे नसल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, धान खराब होवून त्याचे नुकसान होवू नये यासाठी गोदामे बांधण्यासाठी शासनाने अनुदान देण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 मध्ये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. लवकरच हया जमिनी वर्ग-1 मध्ये वर्गीकृत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणता अर्ज किंवा खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही असे ते यावेळी म्हणाले.
      श्री.आत्राम म्हणाले, राज्याच्या संत परंपरेचे अवलोकन केले तर असे लक्षात येईल की, सर्व संतांनी समाजात एकता निर्माण करण्याचे काम केले आहे. संत परंपरेतील संतांनी मानवी जीवनाचा सार सांगितला आहे. मानवता धर्माचा पुरस्कार या संतांनी केला आहे. संतांनी आध्यात्मतेला विवेकी कडा चढविला असल्याचे त्यांनी सांगितले.
      आमदार मेटे म्हणाले, संतांशी जवळीक असलेल्या माणसाला आनंद देण्याचे काम या संमेलनातून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संतांच्या आशिर्वादानेच काम केले आहे. समृध्द महाराष्ट्र उभा करण्यात संतांचे योगदान महत्वाचे आहे. तुकाराम महाराजांनी सोप्या पध्दतीने व बोलीभाषेत आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
      आमदार गजबे म्हणाले, संतांचे संस्कार प्रत्येकाने अंगीकारचे पाहिजे. नैसर्गीक साधन संपत्तीचे नुकसान होणार नाही यासाठी संतांचे विचार स्वीकारुन त्यादृष्टीने कृती करावी. तुकाराम महाराजांनी वनांचे महत्व व त्यामाध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश त्याकाळीच दिलेला आहे असे सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, ज्ञानेश्वरी ही राज्याच्या साहित्याला लाभलेले कोंदण आहे. संसारात राहून कशाप्रकारे परमेश्वराची सेवा करता येईल याचा परिपाठ भागवत परिवानाने घालून दिला आहे. संमेलनामुळे एक चांगली सामाजिक बंधुतेची वातावरण निर्मीती झाल्याचे त्यांनी सांगितले.
      या संमेलनाच्या समारोप प्रसंगी आयोजित खुल्या अधिवेशनात 5 ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये संत चोखोबा निर्वाणस्थळ मंगळवेढाचा विकास करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देणे. संत चोखोबा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव. वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्य शासनाचा अभिनंदन करणारा ठराव. महाराष्ट्र शासनाकडून समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक दुरुस्तीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विचारमंथन असणाऱ्या व कोणताही भेदाभेद अथवा दुजाभाव न करणाऱ्या वारकरी साहित्य परिषदेला समाजाच्या मानसिक दुरुस्तीसाठी प्रकल्प योजना करतांना व अंमलबजावणी करतांना सहभागी करुन घेण्याबाबतचा ठराव आणि हभप वैकुंठवासी अजरेकर फड प्रमुख, अजरेकर माऊली उर्फ तुकाराम एकनाथ काळे महाराज, उपाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद यांचे माघ एकादशी दिवशी वैकुंठ गमन झाले त्याबद्दल भावपूर्ण श्रध्दांजली करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
      या संत साहित्य संमेलनात वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र पुरस्कृत वारकरी विठ्ठल पुरस्कार समाजासाठी अमुल्य कार्य केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सचिव तथा अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे यांनी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्कार म्हणून 1 लक्ष रुपये धनादेश, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवन गौरव पुरस्कार संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी जि.अमरावती यांना देण्यात आला. हा 1 लक्ष रुपयाचा पुरस्कार बापुसाहेब देशमुख यांनी स्वीकारला. यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी लायकराम भेंडारकर यांची नियुक्ती झाल्याची श्री.पाटील यांनी घोषणा केली.
      पुरुष भजन मंडळ स्पर्धा आणि महिला भजन मंडळ स्पर्धा, उत्कृष्ट दिंडी तसेच उत्कृष्ट खंजेरीवादक, उत्कृष्ट तबलावादक आणि उत्कृष्ट हार्मोनियमवादक यांना देखील गौरविण्यात आले. पुरुष भजन स्पर्धेचा प्रथम पुरस्कार- श्री गुरुदेव भजन मंडळ गुरुकुंज मोझरी जि.अमरावती (31 हजार रुपये), दुसरा पुरस्कार- श्री गुरुदेव भजन मंडळ शिंदोळा जि.अमरावती (21 हजार रुपये), तृतीय पुरस्कार- संमिश्र भजन मंडळ बल्लारपूर जि.चंद्रपूर (15 हजार रुपये), चतुर्थ पुरस्कार- श्री गुरुदेव भजन मंडळ किन्हाळा (वडसा) जि.गडचिरोली (10 हजार रुपये), पाचवा पुरस्कार- सरस्वती संगीत शाळा अर्जुनी/मोरगाव (5 हजार रुपये), महिला भजन मंडळ स्पर्धा प्रथम पुरस्कार- आप्पास्वामी महिला भजन मंडळ शेंदूरजनाघाट जि.अमरावती (21 हजार रुपये), द्वितीय पुरस्कार- संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरानगर जि.चंद्रपूर (15 हजार रुपये), तृतीय पुरस्कार- साईलक्ष्मी महिला भजन मंडळ सेंदूरवाफा जि.भंडारा (10 हजार रुपये), चतुर्थ पुरस्कार- श्री गुरुदेव महिला भजन मंडळ शिंदोळा जि.अमरावती (5 हजार रुपये), उत्कृष्ट तबलावादक म्हणून विजया इंगोले, उत्कृष्ट खंजेरीवादक गोपाल सालोटकर, उत्कृष्ट हार्मोनियमवादक श्रीजय चव्हाण, उत्कृष्ट दिंडी प्रथम पुरस्कार- विठ्ठल परिवार सानगडी जि.भंडारा (31 हजार रुपये), द्वितीय पुरस्कार- भालदार चोपदार नामदेव महाराज भोर चंदोरी आडगाव नाशिक (21 हजार रुपये), तृतीय पुरस्कार- गुरुदेव सेवा मंडळ महागाव (11 हजार रुपये), उत्तेजनार्थ- विठ्ठल प्रासादिक मंडळ सेंदूरवाफा (5 हजार रुपये), उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून जीवन लंजे, अविनाश कन्नाके, चंद्रशेखर आगळे, कुलदिप लांजेवार, रतनलाल बोरकर यांना तसेच जिल्ह्यात संतांची प्रबोधनाची किर्तन, भागवत सप्ताहाच्या माध्यमातून परंपरा जपणाऱ्या अनेक संत समाजसुधारकांना देखील मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान प्रत, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे संत साहित्य संमेलनासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध समितीच्या सदस्यांना देखील सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन डॉ.दिलीप काकडे व उपस्थितांचे आभार लायकराम भेंडारकर यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Friday 16 February 2018

संत साहित्याने समतेचा संस्कार करुन समाजाचे आत्मबल जागे केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



७ वे अ.भा.संत साहित्य संमेलन
. सत्यपाल महाराजांना संत चोखोबा पुरस्कार प्रदान
     गोंदिया,दि.१६ : समाजातील वाईट प्रथांवर वार करण्याचे आणि प्रत्येक वाईट गोष्टीविरोधात उभे करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. याच संत साहित्याने समतेचा संस्कार करुन समाजाचे आत्मबळ जागे करण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
        आज अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात विशेष अतिथी म्हणून श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ह.भ.प. डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, स्वागताध्यक्ष पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, आमदार संजय पुराम, विजय रहांगडाले, समाजकल्याणचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याणचे आयुक्त मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, माजी आमदार हेमंत पटले, सप्त खंजीरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज, बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, प्रशांत महाराज ठाकरे, महादेवबुवा शहाबाजकर  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत हे कर्माने व ज्ञानाने मोठे झाले. त्यामुळे समाजातील सर्व लोक या संतांपुढे नतमस्तक होतात. ११ ते १७ व्या शतकापर्यंत आपल्या संस्कृतीवर आक्रमण होत होते, हे आक्रमण परतवून लावण्यचे काम वारकरी संतांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रध्देला थारा नाही. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम संतांनी केले. संतांनी विश्वाची, जनतेची चिंता केली. ते कधीच आत्मकेंद्रीत नव्हते. हे विश्व माझे घर आहे हा विचार वारकरी संप्रदायाने मांडला. वारकरी संप्रदाय हे जगातील अद्वितीय संघटन असल्याचे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले, अत्यंत शिस्तीत ते पंढरीच्या वारीला जातात. आपली संस्कृती जीवंत ठेवण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. संतांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचले तर समाजातील व्याधी दूर होतील. तुकोबा, ज्ञानोबा यांच्या लिखाणातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे मनशांती लाभेल. आज शेतकऱ्यांवर अरीष्ठ आले आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वनांचे, जंगलांचे, तलावांचे नुकसान आपण केले तर निसर्ग हा आपल्यावर कोपतो. मानवाने निसर्गाची काळजी घेतली नाही, त्यामुळेच ही नैसर्गीक संकटे ओढावतात असे त्यांनी सांगितले.
        यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाच्या स्थितीमुळे रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना धानाची रोवणी करता आली नाही असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेती शाश्वत करतांना निसर्गाचा समतोल राखून करावी, त्यामुळे अडचण येणार नाही. जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा करण्यात आला आहे. इथला शेतकरी संकटाचा सामना करतो, आत्महत्या करीत नाही. या जिल्ह्यातील रोहयोच्या कामावरील १ लाख मजुरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांसाठी मदत म्हणून प्रत्येकी एक रुपया दिला आहे. जिल्ह्यात राईस पार्कला मान्यता देण्यात येईल. त्यामुळे धान संशोधनास व शेतकऱ्यांना मदत होईल. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरुन शेतकऱ्याला हमीभाव देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रातून गरजू व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब व गरजू व्यक्त्तींच्या शस्त्रक्रिया मोफत करता येणे शक्य होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातील आरोग्य योजनेमुळे देशातील ५० कोटी लोकांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपयापर्यंतची मदत मिळणार आहे.
     सत्यपाल महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनामुळे हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्यास मदत झाली आहे. संत चोखोबांच्या मंगळवेढा या निर्वाणभूमीत त्यांचे चांगले स्मारक उभारण्यात येईल.  
     जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करण्यास जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे.
      संमेलनाध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा खरा इतिहास विदर्भभूमीत आहे. सदाचार व सदवर्तनाचे काम संत साहित्याने केले आहे. सर्व तत्वज्ञानाला एकत्र करुन समग्र राष्ट्राचा अभ्यूदय व्हावा यासाठी संतांचे योगदान महत्वाचे आहे. महाराष्ट्रात सदाचाराला महत्व आहे. धर्म व संस्कृतिला मानणारे शासन राज्याला लाभले आहे. आज संत विचारांची गरज आहे. संतपीठ तसेच संत साहित्याचे प्रत्येक विद्यापिठात अध्ययन केंद्र सुरु झाले पाहिजे. संत साहित्याचा मुल्यशिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
     स्वागताध्यक्ष म्हणून बोलतांना पालकमंत्री बडोले म्हणाले, संतांनी व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा पुरस्कार केला व तो राज्यात रुजविला. संतांचा समतेचा व बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचविला. व्यसनमुक्त समाज आणि समतेचा संदेश घेवून सत्यपाल महाराज काम करीत आहे. संत चोखोबांच्या नावाने हा पुरस्कार राज्यात पहिल्यांदाच देण्यात येत आहे. सामाजिक बंधुत्वाची भावना रुजविण्यासाठी हे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यशासनाने जनतेच्या कल्याणासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहे. जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याचा व गोंदिया जिल्हा राईस पार्क घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्रयांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करुन गारपीटग्रस्तांना मदतीची घोषणा केल्याबद्दल, धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस जाहीर केल्याबद्दल तसेच नवेगावबांध, प्रतापगड व चुलबंद येथील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्रयांचे आभार मानले.
     यावेळी सत्यपाल महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
     प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरु केलेला पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजीरीवादक सत्यपाल महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार म्हणून ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्रही मुख्यमंत्रयांच्या हस्ते सत्यपाल महाराजांना देण्यात आला. यावेळी बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवणीकर, प्रशांत महाराज ठाकरे व महादेवबुवा शहाबाजकर यांना वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसाराचे विशेष कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्रयांचे मंचावर आगमन होताच वारकरी फेटा, घोंगडी व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
                                                            ०००००


Wednesday 14 February 2018

गारपिटग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी


       जिल्ह्यातील काही भागात 13 फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 14 फेब्रुवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील काही गावांना भेटी देवून अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट प्रामुख्याने उपस्थित होते.
       गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार, मोहाडी, कमरगाव यासह 40 गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास पाऊण ते एक फुटपर्यंत गाराचा खच शेतात, गावात साचला होता. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला दिल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, सर्वेक्षण करतांना महसूल, कृषि यंत्रणेने सरपंचासह अन्य लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Tuesday 6 February 2018

प्रतापगड यात्रेकरुंना सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात - पालकमंत्री बडोले

महाशिवरात्री यात्रा व उर्स तयारी आढावा
    प्रतापगड येथे होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेला आणि ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांच्या उर्सला मोठ्या संख्येने लाखो भाविक येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगडला यात्रा व उर्सनिमीत्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने यंत्रणा आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे 5 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री बडोले यांनी येत्या महाशिवरात्रीपासून होणाऱ्या यात्रा व उर्स निमित्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष श्रीमती सीमा मडावी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य श्रीमती रचना गहाणे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, सडक/अर्जुनी पं.स.उपभापती राजेश कठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नेवले, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर, तहसिलदार छगन भंडारी, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच अहिल्याबाई वालदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
      देवस्थान आणि दर्ग्याकडे जातांना ज्या झाडांची भाविकांना अडचण होते अशा झाडांच्या फांदया तोडाव्यात असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, यात्रा व उर्स दरम्यान वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी तात्पुरत्या स्वरुपात थ्री फेजवर वीज पुरवठा उपलब्ध करुन दयावा. जिल्हा परिषदेच्या निधीतून यात्रा-उर्ससाठी 3 लक्ष रुपये तातडीने दयावे. यात्रेदरम्यान दुषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घेवून पाण्याचे निर्जंतुकीरण करावे. मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे सहा रुग्णवाहिका यादरम्यान तैनात ठेवाव्यात. यात्रा संपल्यानंतर आरोग्य विभागाने रोगराई पसरणार नाही यासाठी फॉगींग मशीनद्वारे फवारणी करावी. पार्कींगमुळे वाहतूकीस अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी असे त्यांनी सांगितले.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दर्ग्याकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळा होणार नाही यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. प्रतापगड किल्ल्याचे महत्व लोकांना माहीत व्हावे याकरीता किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करावी. पासेस असलेल्या गाड्यांनाच दर्ग्यापर्यंत जावू दयावे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. यात्रेदरम्यान बंदोबस्ताकरीता येणाऱ्या पोलिसांच्या मुक्कामासाठी नक्षलग्रस्त भागासाठी मिळणाऱ्या निधीतून सभागृह बांधण्यात यावे. यात्रेकरुंसाठी पुरेसे शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष्य दयावे. प्रतापगड ते दिनकरनगर रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात यावा. त्यामुळे अपघात होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
      11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान यात्रेसाठी गोंदिया, साकोली, पवनी व भंडारा येथून अतिरिक्त बसेस सोडाव्यात असे सांगून श्री.बडोले म्हणाले की, त्यामुळे यात्रेकरुंची गैरसोय टाळता येईल. 10 फेब्रुवारीपासून इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध होईल. यात्रेकरुंसाठी मोबाईल शौचालय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. यात्रा व उर्स दरम्यान येणाऱ्या भाविकांना विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी विविध विभागाने स्टॉल लावावे असेही त्यांनी सांगितले.
       श्री.दयानिधी म्हणाले, यात्रा संपल्यानंतर तिथे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. ही रोगराई पसरुच नये यासाठी गावात त्वरित फवारणी करण्यासाठी जिल्हा परिषदेमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यात्रेदरम्यान दुषित पाणी पिण्यात येवू नये म्हणून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

      यावेळी यात्रा-उर्स दरम्यान येणाऱ्या अडचणी जि.प.सदस्य रचना गहाणे, दर्गा समितीचे अध्यक्ष हाजी सत्तारभाई, श्री.लोगडे यांच्यासह काही ग्रामस्थांनी मांडल्या. तहसिलदार भंडारी, गटविकास अधिकारी जमईवार तसेच तालुकास्तरीय यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यानच्या यात्रा व उर्ससाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यावेळी काही यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सी.डी.गणवीर यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी श्री.भावे यांनी मानले.                                                     00000

Saturday 3 February 2018

पालकमंत्र्यांच्या हस्ते नववर्ष कॅलेंडरचे प्रकाशन



      जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यटक व पक्षी अभ्यासक पर्यटनस्थळांना व तलावांवर येणाऱ्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांना बघण्यासाठी यावेत व या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्थलांतरीत व विदेशी पक्षांची तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती असलेले सन 2018 या नववर्षाचे बहुरंगी भित्ती कॅलेंडर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केले आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नियोजन विभागाचे उपायुक्त बकुल घाटे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        गोंदिया जिल्हा जैवविविधतेने आणि वन्यजीवसृष्टीने समृध्द आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील परसवाडा, झिलमिली, घाटटेमणी, लोहारा, नवेगावबांध, श्रृंगारबांध, नवनीतपूर, सिरेगावबांध, सलंगटोला, बाजारटोला, कुंभारटोली व पदमपूरसह अन्य तलावांवर मध्यपूर्व एशिया, मध्य युरोप, दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण व उत्तर युरोप, पूर्व चीन, सायबेरिया, मंगोलिया, अमेरिका, रशिया, फ्रांस, हॉलंड, इंडोनेशिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकीस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका व आखाती देशातून बार हेडेड गुज, ब्राऊन हेडेड गल, कॉम्ब डक, कॉमन टील, कॉमन पोचार्ड, परपल हेरॉन, कॉमन क्रेन, युरेशियन स्पुन बील, ग्रे लॅग गुज, रेड क्रिस्टेड पोचार्ड, नॉर्थन शॉवेलर, व्हाईट नेक्ट स्टॉर्क यांचे बहुरंगी सचित्र त्या पक्षांचे मराठी नाव व कोणत्या देशातून हे पक्षी स्थलांतरीत होतात याबाबतची थोडक्यात माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे. या पक्षांसह विविध प्रजातीचे 325 पेक्षा जास्त स्थलांतरीत व विदेशी पक्षी जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याच्या दिवसात हमखास येतात.
       जिल्ह्यात असलेले हाजराफॉल, प्रतापगड, कचारगड, माँ मांडोदेवी देवस्थान, बोदलकसा जलाशय, चुलबंद प्रकल्प, संत लहरीबाबा कामठा आश्रम, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, भवभूतीची जन्मभूमी पदमपूर, श्रमाचे प्रतिक अर्धनारेश्वरालय, राज्यातील एकमेव तिबेटियन कॅम्प या पर्यटन व तीर्थस्थळांची थोडक्यात सचित्र माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे तसेच वर्षभरात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शासकीय सुट्यासुध्दा नमूद करण्यात आल्या आहे.
        कॅलेंडरच्या प्रकाशनाच्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी कॅलेंडर तयार करण्यामागची भूमिका विशद केली व कॅलेंडरचे प्रकाशन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डिपीडीसीतून निधी देणार - पालकमंत्री बडोले



     यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती राहणार असून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
   जिल्हा नियोजन समितीची सभा 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नियोजन विभागाचे उपायुक्त बकुल घाटे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही सभा महत्वाची आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे अद्याप सुरु झालेली नाही त्या आरोग्य केंद्राच्या बांधकामाच्या निविदा सात दिवसाच्या आत काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नादुरुस्त असलेल्या सिटीस्कॅन मशीन ऐवजी नव्याने मशीन खरेदी करावी. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ज्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत त्यांची कामे तातडीने सुरु करावी. कुठल्याही ग्रामस्थांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही यादृष्टीने आतापासूनच नियोजन करावे. ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगातून देण्यात आलेल्या निधीतून 30 टक्के निधी हा पाणीपुरवठ्यासाठी खर्च करावा. त्यामुळे ग्रामस्थांना टंचाईची झळ बसणार नाही. यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ लवकरच बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत अपूर्ण असलेली बांधकामे तातडीने पूर्ण करावी असे सांगून श्री.बडोले म्हणाले, ही बांधकामे पूर्ण करतांना नियोजन करावे. ग्रामपंचायतींनीसुध्दा 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन दयावा. पर्यटन व तीर्थस्थळ विकासाच्या दृष्टीने संबंधित स्थळांचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत सादर करावे. त्यामुळे या स्थळांच्या विकासासाठी निधी देणे सोईचे होईल. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी उपलब्ध निधी वेळेच्या आत खर्च होवून अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल यादृष्टीने नियोजन करावे.  ज्या विभागांना निधीचे वितरण करण्यात आले नाही त्या विभागांनी निधीची मागणी करुन तो वेळीच व नियोजनातून खर्च करावा. जिल्हा परिषदेला पुनर्विनियोजनामधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्रीमती मडावी म्हणाल्या, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे येत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या जाव्या अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       खासदार नेते म्हणाले, विकासाच्या दृष्टीने निविदा काढणे हे महत्वाचे काम आहे. मात्र निविदा न काढल्यामुळे अनेक कामे रखडलेली आहे. त्यामुळे कामांची निविदा वेळेत काढून ती कामे लवकर सुरु करावी असे ते म्हणाले.
       आमदार अग्रवाल म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी नव्याने सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यात यावी. गोरेगाव शहराकरीता पाणीपुरवठा योजना सुरु करुन या योजनेच्या पाणीपट्टीच्या वसुलीची जबाबदारी नगरपंचायतकडे दयावी. टंचाईच्या काळात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये. कामठा येथील तीर्थस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
     जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने विंधन विहिरी घेणे धोकादायक आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी धानपीक घेवू नये. त्यामुळे पाण्याचा वापर होणार नाही व संभाव्य पाणीटंचाई टाळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील आवश्यक त्या तलावांना गेट लावण्यात यावी. अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी ठराव उपलब्ध करुन दयावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 या वर्षात जानेवारी अखेर सर्वसाधारण योजनेत 24 कोटी 76 लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेत 17 कोटी 11 लक्ष, आदिवासी उपयोजनेत 32 कोटी 40 लक्ष, आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेत 11 कोटी 26 लक्ष खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी 50.43 इतकी आहे.
       जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 च्या प्रारुप आराखड्यास कमाल आर्थिक मर्यादेनुसार सर्वसाधारण योजनेचा 99 कोटी 85 लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेचा 43 कोटी 48 लक्ष, आदिवासी उपयोजनेचा 70 कोटी 17 लक्ष, आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेचा 7 कोटी 86 लक्ष प्रस्तावित नियतव्यय आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत पालकमंत्री बडोले नियतव्यय वाढीची मागणी करणार असल्यामुळे सर्वसाधारण योजनेचा नियतव्यय 155 कोटी रुपयांपर्यंत जाईल.
    सभेला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रिती रामटेके, मनोज डोंगरे, माधुरी पातोडे, सरिता कापगते, लता दोनोडे, रमेश अंबुले, पी.जी.कटरे, मंदा कुमरे, कमलेश्वरी लिल्हारे, शैलजा सोनवणे, दुर्गा तिराले, ललिता चौरागडे, विमल नागपूरे, दिपकसिंग पवार, विश्वजीत डोंगरे, अलताफ हमीद अली, राजेश भक्तवर्ती, रमेश चुऱ्हे, हेमलता पतेह, विनीत शहारे, श्वेता मानकर, आशिष बारेवार, कैलाश पटले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेला उपस्थित मान्यवरांचे सेंद्रीय तांदूळ भेट देवून स्वागत करण्यात आले. सभेत जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भूत यांनी देवून उपस्थितांचे आभार मानले.