जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 17 February 2018

संतांमुळे एकता व बंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत - स्वागताध्यक्ष राजकुमार बडोले



7 व्या अ.भा.मराठी संत साहित्य संमेलनाचे सुप वाजले
     महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. या संतांच्या विचारानेच महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. संतांच्या शिकवणुकीमुळे  एकता व बंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादन सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      आज 17 फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त वतीने 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चाललेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री.बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री अमरीश राजे आत्राम, संमेलनाध्यक्ष हभप डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, आमदार सर्वश्री विनायक मेटे, संजय पुराम, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, हभप बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, भंते संघ धातू, कास्ट्राईब संघटनेचे अरुण गाडे, माजी अधिष्ठाता डॉ.ज्ञानेश्वर कडव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत साहित्य संमेलनाला उपस्थिती दर्शवून राज्यात संतपीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच संमेलनातून प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना समता प्रतिष्ठान व समाज कल्याण विभागाचा पहिला संत चोखामेळा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कार्याचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. चोखोबांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्याच्या विकासासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करुन देवून त्यांच्या निर्वाण भूमीचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
      पूर्व विदर्भ हा भाग धान उत्पादकांचा असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासोबत धानावरील संशोधन करुन अनेक बियाणे विकसीत करण्यासाठी राज्यातील पहिला राईस पार्क अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. संत कबीरांनी दोह्याच्या माध्यमातून संपूर्ण जगात बंधुता व एकतेचे बीज रोवण्याचे काम केले आहे. झाडीपट्टीच्या या भागात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुध्दा येवून गेले. त्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. जिल्ह्यातील विविध गावातील भागवत सप्ताहाच्या माध्यमातून ज्या संतांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले त्यांना सुध्दा या संमेलनात सन्मानीत करण्यात येत असल्याचे सांगितले.
      जिल्ह्यात धानाची खरेदी करणाऱ्या संस्थांकडे धान ठेवण्यासाठी गोदामे नसल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, धान खराब होवून त्याचे नुकसान होवू नये यासाठी गोदामे बांधण्यासाठी शासनाने अनुदान देण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 मध्ये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. लवकरच हया जमिनी वर्ग-1 मध्ये वर्गीकृत होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणता अर्ज किंवा खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही असे ते यावेळी म्हणाले.
      श्री.आत्राम म्हणाले, राज्याच्या संत परंपरेचे अवलोकन केले तर असे लक्षात येईल की, सर्व संतांनी समाजात एकता निर्माण करण्याचे काम केले आहे. संत परंपरेतील संतांनी मानवी जीवनाचा सार सांगितला आहे. मानवता धर्माचा पुरस्कार या संतांनी केला आहे. संतांनी आध्यात्मतेला विवेकी कडा चढविला असल्याचे त्यांनी सांगितले.
      आमदार मेटे म्हणाले, संतांशी जवळीक असलेल्या माणसाला आनंद देण्याचे काम या संमेलनातून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संतांच्या आशिर्वादानेच काम केले आहे. समृध्द महाराष्ट्र उभा करण्यात संतांचे योगदान महत्वाचे आहे. तुकाराम महाराजांनी सोप्या पध्दतीने व बोलीभाषेत आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
      आमदार गजबे म्हणाले, संतांचे संस्कार प्रत्येकाने अंगीकारचे पाहिजे. नैसर्गीक साधन संपत्तीचे नुकसान होणार नाही यासाठी संतांचे विचार स्वीकारुन त्यादृष्टीने कृती करावी. तुकाराम महाराजांनी वनांचे महत्व व त्यामाध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश त्याकाळीच दिलेला आहे असे सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, ज्ञानेश्वरी ही राज्याच्या साहित्याला लाभलेले कोंदण आहे. संसारात राहून कशाप्रकारे परमेश्वराची सेवा करता येईल याचा परिपाठ भागवत परिवानाने घालून दिला आहे. संमेलनामुळे एक चांगली सामाजिक बंधुतेची वातावरण निर्मीती झाल्याचे त्यांनी सांगितले.
      या संमेलनाच्या समारोप प्रसंगी आयोजित खुल्या अधिवेशनात 5 ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये संत चोखोबा निर्वाणस्थळ मंगळवेढाचा विकास करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देणे. संत चोखोबा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव. वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्य शासनाचा अभिनंदन करणारा ठराव. महाराष्ट्र शासनाकडून समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक दुरुस्तीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विचारमंथन असणाऱ्या व कोणताही भेदाभेद अथवा दुजाभाव न करणाऱ्या वारकरी साहित्य परिषदेला समाजाच्या मानसिक दुरुस्तीसाठी प्रकल्प योजना करतांना व अंमलबजावणी करतांना सहभागी करुन घेण्याबाबतचा ठराव आणि हभप वैकुंठवासी अजरेकर फड प्रमुख, अजरेकर माऊली उर्फ तुकाराम एकनाथ काळे महाराज, उपाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद यांचे माघ एकादशी दिवशी वैकुंठ गमन झाले त्याबद्दल भावपूर्ण श्रध्दांजली करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
      या संत साहित्य संमेलनात वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र पुरस्कृत वारकरी विठ्ठल पुरस्कार समाजासाठी अमुल्य कार्य केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सचिव तथा अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे यांनी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्कार म्हणून 1 लक्ष रुपये धनादेश, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवन गौरव पुरस्कार संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी जि.अमरावती यांना देण्यात आला. हा 1 लक्ष रुपयाचा पुरस्कार बापुसाहेब देशमुख यांनी स्वीकारला. यावेळी वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी लायकराम भेंडारकर यांची नियुक्ती झाल्याची श्री.पाटील यांनी घोषणा केली.
      पुरुष भजन मंडळ स्पर्धा आणि महिला भजन मंडळ स्पर्धा, उत्कृष्ट दिंडी तसेच उत्कृष्ट खंजेरीवादक, उत्कृष्ट तबलावादक आणि उत्कृष्ट हार्मोनियमवादक यांना देखील गौरविण्यात आले. पुरुष भजन स्पर्धेचा प्रथम पुरस्कार- श्री गुरुदेव भजन मंडळ गुरुकुंज मोझरी जि.अमरावती (31 हजार रुपये), दुसरा पुरस्कार- श्री गुरुदेव भजन मंडळ शिंदोळा जि.अमरावती (21 हजार रुपये), तृतीय पुरस्कार- संमिश्र भजन मंडळ बल्लारपूर जि.चंद्रपूर (15 हजार रुपये), चतुर्थ पुरस्कार- श्री गुरुदेव भजन मंडळ किन्हाळा (वडसा) जि.गडचिरोली (10 हजार रुपये), पाचवा पुरस्कार- सरस्वती संगीत शाळा अर्जुनी/मोरगाव (5 हजार रुपये), महिला भजन मंडळ स्पर्धा प्रथम पुरस्कार- आप्पास्वामी महिला भजन मंडळ शेंदूरजनाघाट जि.अमरावती (21 हजार रुपये), द्वितीय पुरस्कार- संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरानगर जि.चंद्रपूर (15 हजार रुपये), तृतीय पुरस्कार- साईलक्ष्मी महिला भजन मंडळ सेंदूरवाफा जि.भंडारा (10 हजार रुपये), चतुर्थ पुरस्कार- श्री गुरुदेव महिला भजन मंडळ शिंदोळा जि.अमरावती (5 हजार रुपये), उत्कृष्ट तबलावादक म्हणून विजया इंगोले, उत्कृष्ट खंजेरीवादक गोपाल सालोटकर, उत्कृष्ट हार्मोनियमवादक श्रीजय चव्हाण, उत्कृष्ट दिंडी प्रथम पुरस्कार- विठ्ठल परिवार सानगडी जि.भंडारा (31 हजार रुपये), द्वितीय पुरस्कार- भालदार चोपदार नामदेव महाराज भोर चंदोरी आडगाव नाशिक (21 हजार रुपये), तृतीय पुरस्कार- गुरुदेव सेवा मंडळ महागाव (11 हजार रुपये), उत्तेजनार्थ- विठ्ठल प्रासादिक मंडळ सेंदूरवाफा (5 हजार रुपये), उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून जीवन लंजे, अविनाश कन्नाके, चंद्रशेखर आगळे, कुलदिप लांजेवार, रतनलाल बोरकर यांना तसेच जिल्ह्यात संतांची प्रबोधनाची किर्तन, भागवत सप्ताहाच्या माध्यमातून परंपरा जपणाऱ्या अनेक संत समाजसुधारकांना देखील मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान प्रत, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे संत साहित्य संमेलनासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध समितीच्या सदस्यांना देखील सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन डॉ.दिलीप काकडे व उपस्थितांचे आभार लायकराम भेंडारकर यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment