जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 27 June 2018

कर्जाची परतफेड करण्यात महिलांची प्रामाणिकता - संजय पुराम


अर्धनारेश्वरालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा
        



      केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
       महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने 27 जून रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थानात आयोजित सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्रीमती लता दोनोडे, पं.स.उपसभापती दिलीप वाघमारे, जि.प.सदस्य विजय टेकाम, श्रीमती दुर्गाबाई तिराले, पं.स.सदस्य श्रीमती प्रतिभा परिहार, तहलिसदार प्रशांत सांगळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्लारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे यांची उपस्थिती होती.
       श्री.पुराम पुढे म्हणाले, माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूला मार्केटींग करण्यासाठी वन विभागाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष्य देणे गरजेचे आहे. सोबतच बचतगटातील महिलांनी प्रधानमंत्री जनधन योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्याकरीता बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या जीवन सुरक्षेची हमी शासनाने घेतली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे असून महिलांनी आता आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही असे समजून काम करावे असे त्यांनी सांगितले.
      डॉ.बलकवडे म्हणाल्या, महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आपल्या परिश्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या बचत केली पाहिजे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नसल्यामुळे महिला पुढे येत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्या शंकाचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. बचतगटातील महिलांच्या मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.सिल्लारे म्हणाले, महिलांच्या विकासात बँकेचे सहकार्य मोठ्या प्रामाणात लाभत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी बँकेचे शाखा प्रबंधक निश्चितच आपल्याला समुपदेशन करुन सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत. सालेकसा तालुक्यात ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोन शाखा आहेत. या बँकेत भेट देवून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी बँकेत खाते उघडले नाही त्यांनी लवकरात लवकर आपले खाते उघडावे, जेणेकरुन या योजनेचा संबंधितांना लाभ घेता येईल. सोबतच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घेण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत बचतगटांच्या 47 माहिलांना कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले.
      यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच गाव हागणदारीमुक्त करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून संस्कार ग्रामसंस्था कुणबीटोला, धनश्री ग्रामसंस्था धानोली, विकास ग्रामसंस्था गिरोला, कचारगड ग्रामसंस्था जमाकुडो, अपेक्षा ग्रामसंस्था झालिया, दर्पण ग्रामसंस्था लोहारा यांचा सत्कार करण्यात आला तसेच जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्र यांना गौणउपज खरेदी केंद्राकरीता 1 लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
      प्रारंभी सालेकसा तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून उत्पादित केलेल्या वस्तुंच्या मार्केटींगबाबत माहिती जाणून घेतली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रदिप कुकडकर, योगेश वैरागडे, प्रफुल अवघड, प्रिया बेलोकर, एकांत वरघने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मानले. संचालन शालू साखरे यांनी केले.
00000




Tuesday 26 June 2018

वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढा - पालकमंत्री बडोले



       मागील काही वर्षापासून वनहक्क जमिनीच्या पट्टयांची प्रकरणे प्रलंबीत आहे. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्टयांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रलंबीत प्रकरणे तातडीने निकाली काढा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        25 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वनहक्क पट्टे प्रकरणांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, लोकांजवळ शेती नाही. त्यामुळे वनहक्क पट्टयांची जूने दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर शिबिरे घेवून प्रलंबीत प्रकरणे लवकराव लवकर निकाली काढण्यात यावे. उपविभागीय स्तरावर 17634 प्राप्त दावे असून अर्जुनी/मोरगाव- 4392, तिरोडा- 302, देवरी- 380 व गोंदिया- निरंक, असे एकूण 5074 दावे प्रलंबीत आहेत. अनेक वर्षापासून लाभार्थी वनहक्क पट्टयांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वैयक्तीक लक्ष्य दयावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
00000

Thursday 21 June 2018

शरीर निरोगी राहण्यासाठी योगा करणे आवश्यक - डॉ.कादंबरी बलकवडे

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा




        मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
       इंदिरा गांधी स्टेडियम येथे आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी कुटूंबासह योगा करावे, त्यामुळे समाज निरोगी होण्यास मदत होईल. योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते तसेच शरीराचे पुनर्जागरण होत असते. योगासनामुळे शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अनेक कामे वेळीच पार पाडण्यास मदत होते. योगासनामुळे मनुष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते आणि काम करण्यास उत्साह निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योगा निरंतर करीत राहावे असे त्यांनी सांगितले.
      यावेळी योग प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकाद्वारे शवासन, वज्रासन, शशाकासन, मंडूकासन, मक्रासन, भूजंगासन, सेतूबंधासन, उत्तानपादासन, पदमासन, सुखासन, ध्यान मुद्रासन, ताडासन, वृक्षासन, कपालभाती, नाडी शोधन प्राणायाम, शितली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेतली व योगासनाचे महत्व पटवून दिले.
       प्रारंभी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, योग मित्र मंडळ, पोलीस विभाग यांचे सहकार्य लाभले.
       कार्यक्रमाचे संचालन डॉ.नागेश गौतम यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.प्रशांत कटरे यांनी मानले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सांख्यिकी अधिकारी तुलसीदास झंझाड, नेहरु युवा केंद्राचे अधिकारी श्री.धुवारे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 19 June 2018

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी जनतेसाठी काम करावे - खासदार प्रफुल पटेल


                                                               विकास कामांची आढावा बैठक



      केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी जनतेसाठी काम करावे. त्यामुळे एकमेकांच्या समन्वयातून विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 18 जून रोजी जिल्ह्यात सुरु असलेल्या विकासात्मक कामाची जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.पटेल पुढे म्हणाले, योजनांची अंमलबजावणी करतांना यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे. गरजू व्यक्तींना लाभ देणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून काम करावे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीच्या कामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज उपलब्ध करुन दयावे. मनरेगाच्या कामावरील मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यातील मंजूर असलेली नॅशनल हायवे रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा उपलब्ध करुन दयावा. पाण्याचे महत्व लक्षात घेता पाणी टंचाई भासणार नाही याचे सुक्ष्म नियोजन करावे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार नाही असे त्यांनी सांगितले. 
      खासदार कुकडे म्हणाले, बॅंका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. खरीप हंगाम लक्षात घेता लीड बँकेने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.  जिल्ह्यात अपूर्ण अवस्थेत असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. वन हक्क जमिनीचे पट्टे त्वरित निकाली काढण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
       यावेळी जिल्ह्यातील धान बियाणे आणि खते, बँक, सिंचन, पाणी टंचाई, मेडिकल कॉलेज, आरोग्य सेवा, विद्युत, जिल्हा ग्रामीण विकास योजना, धान्य पुरवठा, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार, आदिवासी विकास, बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे आदी कामांबाबत आढावा घेण्यात आला.
       बैठकीस उपजिल्हाधिकारी(सामान्य) शुभांगी आंधळे, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायसवाल, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लीड बँकेचे अधिकारी दिलीप सिल्हारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांनी मानले.

Monday 4 June 2018

डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला

        डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज 4 जून रोजी गोंदिया जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारली. डॉ.बलकवडे हया सन 2010 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. सन 2015 पासून त्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. मूळच्या पंजाब राज्यातील असलेल्या डॉ.बलकवडे यांचे शिक्षण एम.बी.बी.एस.पर्यंत झाले आहे. नागपूर येथे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी, त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. 

Friday 1 June 2018

गोंदिया जिल्हा नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष

कक्षाचा दूरध्वनी क्रमांक (07182) 230196 आणि ई-मेल आयडी rdcgon@gmail.com