जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 19 June 2018

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी जनतेसाठी काम करावे - खासदार प्रफुल पटेल


                                                               विकास कामांची आढावा बैठक



      केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी जनतेसाठी काम करावे. त्यामुळे एकमेकांच्या समन्वयातून विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 18 जून रोजी जिल्ह्यात सुरु असलेल्या विकासात्मक कामाची जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.पटेल पुढे म्हणाले, योजनांची अंमलबजावणी करतांना यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे. गरजू व्यक्तींना लाभ देणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून काम करावे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीच्या कामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज उपलब्ध करुन दयावे. मनरेगाच्या कामावरील मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यातील मंजूर असलेली नॅशनल हायवे रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा उपलब्ध करुन दयावा. पाण्याचे महत्व लक्षात घेता पाणी टंचाई भासणार नाही याचे सुक्ष्म नियोजन करावे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार नाही असे त्यांनी सांगितले. 
      खासदार कुकडे म्हणाले, बॅंका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. खरीप हंगाम लक्षात घेता लीड बँकेने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.  जिल्ह्यात अपूर्ण अवस्थेत असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. वन हक्क जमिनीचे पट्टे त्वरित निकाली काढण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
       यावेळी जिल्ह्यातील धान बियाणे आणि खते, बँक, सिंचन, पाणी टंचाई, मेडिकल कॉलेज, आरोग्य सेवा, विद्युत, जिल्हा ग्रामीण विकास योजना, धान्य पुरवठा, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार, आदिवासी विकास, बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे आदी कामांबाबत आढावा घेण्यात आला.
       बैठकीस उपजिल्हाधिकारी(सामान्य) शुभांगी आंधळे, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायसवाल, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, लीड बँकेचे अधिकारी दिलीप सिल्हारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांनी मानले.

No comments:

Post a Comment